ज्यांनाही मिथिला पालकर आवडते हा लघुपट खास त्यांच्यासाठी. खरं तर तिच्या चाहत्यांनी आता पर्यंत हा लघुपट नक्कीच बघितला असणार. मात्र तरी देखील पुन्हा एकदा बघण्यास काहीच हरकत नाही. कारण हा लघुपट आहेच असा. ही कथा आहे ऋजुता... (हो ऋजुताच ऋतुजा नाही.) या २० वर्षीय मुलीची. तिच्या दादाच्या कॅमेऱ्यात ती स्वत:चं रिकॉर्डिंग करत असते आणि इथूनच सुरुवात होते या लघुपटाला.
ऋजुता एक २० वर्षांची मुलगी. आई वडिलांची इतकी लाडकी की त्यांनी तिला कधीच कुठेच जावू दिलं नाही. तिचा दादा खूप फिरायचा आणि कॅमेऱ्यात सगळं काही टिपून आणायचा. तर अशी ही ऋजुता जिने मुंबईत राहून देखील मुंबई कधीच बघितलं नाही. ती आज एकटीच खोलीत या कॅमेऱ्यात स्वत:च्या हनीमूनच्या इच्छा सांगते.
तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलेलं असतं. खरं तर तिला अजिबातच इच्छा नसते, मात्र 'मुंबई ला हनीमूनला जायला मिळेल' या एका अटीमुळे ती लग्नाला होकार देते. होय मुंबईत राहून सुद्धा तिला हनीमूनला मुंबईतच फिरायचं असतं. कारण तिने ही मुंबई केवळ स्वप्नात, दादाच्या कॅमेऱ्यात आणि चित्रपटांमध्ये बघितली असते. तिला दादरचा वडापाव खायचा असतो, जुहू बीच बघायचा असतो, शाहरुख खानचा मन्नत बंगला बँडस्टँज वरुन न्याहाळायचा असतो, आणखी बरंच काही. ती खूप मनापासून बोलत असते.. आणि अचानक तिची आई येते.. मग... मग काय होतं? बघण्यासाठी नक्कीच बघा हा लघुपट..
एका अती प्रोटेक्टेड मुलीची स्वप्न काय असतील? जिने कधीच मुंबई बघितली नाही तिच्या मनात हनीमूनला मुंबईलाच जायचे असे का असेल? किंवा एखाद्या मुलीची इतकी छोटी छोटी मात्र खूप प्रामाणिक स्वप्नं पण असूच शकतात का? असे अनेक प्रश्न या लघुपटातून आपल्याला पडतात. त्यामुळे एकदा तरी हा लघुपट नक्कीच बघावा. या लघुपटाला यूट्यूबवर ६.५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यात अनेकांची लाडकी मिथिला पालकर मुख्यभूमिकेत आहे, तर याचे दिग्दर्शन केले आहे करन असनानी यांनी.
- निहारिका पोळ