रखिन राज्य व रोहिंग्या मुस्लिम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018   
Total Views |


रखिन राज्य


रखिन राज्य पुर्वी अराकन नावाने ओळखले जात होते. रखिन राज्य म्यानमारच्या वायव्य किनारपट्टीलगत वसलेले अरूंद प्रदेशाच्या पट्टीसारखे असून उत्तर व पूर्वेला उंच पर्वतरांगांनी व दक्षिण व पश्चिमेला बंगालच्या उपसागराने वेढलेले आहे. ह्या अरुंद प्रदेशातील जमीन गाळाची व खूप सुपीक आहे. भौगोलिकदृष्ट्या रखिन राज्याचा किनारपट्टीचा भाग निसर्गतः बांगलादेशातील चित्तगावकडे विस्तारल्यासारखा दिसतो. नाफ नदीमुळे दोन्ही प्रदेश वेगळे होतात. रखिन राज्य भारतीय सीमेलगत नसल्यामुळे रोहिंग्या मुस्लिम रखिनमधून थेट भारतात प्रवेश करू शकत नाहीत. मिझोरम, मणिपूर, नागलँड व अरूणाचल प्रदेश ही भारतीय राज्ये म्यानमारच्या सीमेलगत आहेत, पण रखिन राज्याची पश्चिम सीमा चित्तगाव लगत आहे. याव्यतिरिक्त उत्तरेकडे चिन, सागेंग व काचिन राज्याच्या टेकड्या रखिन राज्याला भारतापासून विलग करतात.

रखिन राज्यात 'अराकनीज' भाषा बोलली जाते. ही बोली भाषा बर्मी भाषेपेक्षा भिन्न असली तरी लिखित स्वरूप बर्मी भाषेशी साम्य दर्शवते. रखिन राज्यात बौद्ध बहुसंख्य आहे व सर्वात मोठी अल्पसंख्या रोहिंग्या मुस्लिमांची आहे म्हणजेच अल्पसंख्यांकामध्ये बहुसंख्य आहेत.



ब्रिटिशांनी घेतेलेल्या जनगणनेनुसार पुर्वी रखिन (तेव्हाच्या अराकन) राज्यात रोहिंग्या किंवा इतर मुस्लिमांचे प्रमाण कमी होते. त्यांनी बंगालमधील चित्तगावमधून मुस्लिमांना रखिनमध्ये आणले. त्यामुळे लोकसंख्या प्रचंड वाढत गेली व रखिनमधील मुस्लिमांचा वाटाही वाढत गेला. १८२४ मध्ये अगदी अल्प असलेली त्यांची संख्या वाढत जाऊन १८७२ मध्ये १३.२८% व १९३१ ला २५.३३% इतकी झाली. ब्रिटिश काळात चित्तगाव मुस्लिमांच्या लोंढ्यामुळे ही संख्या वाढत गेली तथापि २०१४ मध्येही ती वाढून ३५.०८% इतकी झाली आहे. म्यानमारमधील बहुतांश लोक रोहिंग्यांना बांगलादेशातून आलेले अवैध स्थलांतरित मानतात व त्यांना रोहिंग्या न म्हणता बंगाली म्हणतात.


रोहिंग्या मुस्लिम


सौजन्य : विकिपेडिया


रोहए किंवा रोहशांगी (Rohai or Rohshangee) शब्दाचा अपभ्रंश होऊन 'रोहिंग्या' शब्द निर्माण झाला आहे. रोहए किंवा रोहशांगी हे शब्द किंवा संज्ञा जुन्या अराकन किंवा रोहांग किंवा रोशांगमध्ये वास्तव करणाऱ्या मुस्लिमांना उद्देशून उपयोगात आणला जातो.


रोहिंग्या रुऐनग्गा किंवा रोहिंग्यालीश किंवा रोहिंग्या भाषा बोलतात. भाषाशास्त्रदृष्ट्या ह्या भाषेचे बांगलादेशातील दक्षिणेकडील भागात बोलल्या जाणाऱ्या चित्तगाव भाषेशी साधर्म्य आहे. म्यानमार तसेच रखिन राज्यात बोलल्या जाणाऱ्या इतर भाषेपेक्षा ही बोलीभाषा भिन्न आहे व अरबी, हनाफी, उर्दु व बर्मी ह्या लिपीत लिहिली जाऊ शकते. १९६१ ते १९६५ दरम्यान रोहिंग्या भाषा राज्यसंचलित बीबीएस (Burma Broadcasting Service- बर्मा नभोवाणी सेवा) वरून प्रसारित केली जात होती.

म्यानमारमध्ये चार भिन्न वांशिक मुस्लिम समुदाय असून ते सर्व सुन्नी आहेत. चिनी वंशाचे ‘हुई मुस्लिम’ चीनच्या युन्नान प्रांतातून आलेले असून मंडाले शहर व उत्तरेकडील सीमावर्ती भागात होणाऱ्या व्यापारावर त्यांचे वर्चस्व आहे. ब्रिटिशकाळात अखंड भारतातून आलेले अनेक मुस्लिम म्यानमारमध्ये स्थायिक झाले असून मुख्यत्वेकरून यांगोन व मंडाले शहरात प्राबल्य आहे. नवव्या व चौदाव्या शतकादरम्यान अनेक अरब व्यापारी म्यानमार, मलेशिया व थायलंडमध्ये आले व त्यांनी स्थानिकांची मोठ्या प्रमाणावर धर्मांतरे घडवून आणली. मूळ बर्मन वंशाच्या ह्या लोकांचे वंशज म्यानमारच्या मध्यवर्ती सपाट भागात राहतात. रोहिंग्या हा सध्या म्यानमारमधील सर्वात मोठा व सर्वात दरिद्री मुस्लिम वांशिक गट आहे.  ते मुखत्वेकरून रखिन राज्याच्या उत्तर भागात राहतात. रखिन राज्यात राहणारे सर्व मुसलमान रोहिंग्या मुस्लिम नाहीत, रखिन राज्यातील इतर मुस्लिम स्वतःला अराकनी किंवा कमन मुस्लिम म्हणतात की जे मुख्यत्वेकरून सित्तवे, क्याय्कफ्यू, थँडवे परगण्यात व यांब्ये शहरात राहतात. म्यानमार शासनाने रोहिंग्या मुस्लिमांचा १३५ राष्ट्रीय वांशिक गटात समावेश केलेला नसला तरी कमन मुस्लिमांचा १३५ राष्ट्रीय वांशिक गटात समावेश केलेला आहे. त्यामुळे म्यानमार मुस्लिमविरोधी असून मुस्लिमांना राष्ट्रीय वांशिक गट मानत नाही हा आरोप फोल ठरतो.

रखिनची राजधानी सित्तवे (पूर्वीचे नाव अक्याब) जिल्ह्यात मुस्लिमांची सर्वाधिक घनता आहे. १८८१ च्या जनगणनेनुसार सित्तवे लोकसंख्येच्या अंदाजे १९% जनता बंगालमध्ये जन्मलेली होती. नवीन आलेल्या ह्या लोकसंख्येच्या जवळपास सर्वच चित्तगावमधून आलेले मुस्लिम होते. सित्तवेच्या लोकसंख्येत मुस्लिमांचा वाटा २८% होता, ज्यापैकी १९% अलीकडेच चित्तगावमधून आलेले स्थलांतरित होते व ९% बहुतेककरून चित्तगावमधून पूर्वीच स्थलांतर केलेल्यांचे सित्तवेमध्ये जन्मलेले वंशज होते. म्हणजे आधी ह्या भागात खूपच कमी रोहिंग्या मुस्लिम होते; म्हणूनच कदाचित म्यानमार शासन रखिन मुस्लिमांना रोहिंग्या ही संज्ञा मान्य करण्यास नकार देत आहे. ब्रिटिशांनी चित्तगावमधून आणलेले स्थलांतरित युद्धखोर गट म्हणूनच राहत असून म्यानमार शासनाशी जमेल तेव्हा जमेल तिथे लढत असतात व वारंवार ह्या प्रदेशाला स्वतंत्र इस्लामी राज्य करण्याचा प्रयत्न करत असतात.

नवव्या शतकात अरब व्यापाऱ्यांनी अराकन व चित्तगावमध्ये शिरकाव केला; त्यानंतर पर्शियन, तुर्क, मुघल व पठाण येथे आले. अठराव्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत 'फारसी'' ही रखिनच्या राज्यकारभाराची अधिकृत भाषा होती. १७८४ पर्यंत अराकन स्वतंत्र राज्य होते व त्यात सध्याच्या बांगलादेशाचा दक्षिणेकडील काही भाग समाविष्ट होता. आशिया व पर्शियन खाडीमधील व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र होते.


४ जानेवारी १९४८ ला म्यानमार स्वतंत्र राष्ट्र झाले. 'सो श्वे थैक' हे पहिले राष्ट्रपती व 'यु नू' पहिले पंतप्रधान झाले. 'यु नू' ह्यांच्या लोकशाही सरकारने रोहिंग्या मुस्लिमांचा भिन्न वांशिक गट ही मागणी मान्य केली होती. पण नंतर २ मार्च १९६२ला जनरल 'ने विन' च्या नेतृत्वाखालील सैनिकी उठाव करून सत्ता ताब्यात घेऊन बर्मीछाप समाजवादाचा पुरस्कार केला व तेव्हापासून म्यानमार शासनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सैनिकी नियंत्रण आहे. रोहिंग्यांवरील निर्बंधाला १९६२च्या सैनिकी राजवटीपासून सुरूवात झाली. त्यांना १३५ अधिकृत राष्ट्रीय वांशिक गटातून वगळण्यात आले व १९८२च्या नागरिकत्वाच्या निर्बंधानुसार त्यांना नागरिकत्वही नाकारण्यात आले.

२०१६ पासून 'आँग सान स्यू की' ह्या म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या* आहेत व 'तिन क्याव' हे राष्ट्रपती आहेत. ह्यांनीही अजून रोहिंग्यांना नागरिकत्व व इतर अधिकार दिलेले नसल्यामुळे रोहिंग्यांची स्थिती जैसे थे आहे. लोकशाहीवादी असो नाही तर समाजवादी किंवा सैनिकी शासन कोणीही रोहिंग्यांना कायमचे नागरिकत्व दिलेले नाही.

"*" - पंतप्रधानपदाशी समतोल असे पद.


संदर्भ :

१. Bajaj, Dr. J. K., Are they Rohingas or Chittagongis?, Centre for Policy Studies, Chennai, पृष्ठ २-३

२. उपरोक्त, पृष्ठ ८

३. Alam, Mohamed Ashraf. The Etymology of Arakan, Rohingya & Rakhine, Kaladan Press Network, 20 June 2007

४. Ozturk, Cem. Myanmar's Muslim sideshow, Asia Times Online, 21 October 2003

५. Bajaj, Dr. J. K., पृष्ठ १

६. गोडबोले, डॉ.श्रीरंग; बौध्द-मुस्लिम संबंध- आजच्या संदर्भात, तक्षशिला प्रबोधिनी प्रकाशन, २००९, पृष्ठ ११०


- अक्षय जोग 
@@AUTHORINFO_V1@@