कूर्द निवासस्थान (सौजन्य: Who are the Kurds?, 31 October 2017, BBC.com)
रोजावा क्रांतीविषयी जाणून घ्यायच्या आधी कूर्दिस्तानच्या इतिहासाबद्दल थोडक्यात जाणून घेणे गरजेचे आहे.
ऑटोमन काळात कूर्दांना उप-स्वायत्त दर्जा होता. पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याच्या पाडावानंतर १९२० ला 'सेव्रेस तहा' मध्ये कूर्दिस्तानची तरतूद करण्यात आली होती; पण तीनच वर्षात 'लॉसान तहा' मध्ये आधुनिक तुर्कस्तानच्या सीमा निश्चित करताना कूर्दिस्तानची काहीही सोय न करता त्यांना ४ विविध देशात अल्पसंख्यांक करण्यात आले व अशाप्रकारे कूर्दिस्तानचे स्वप्न धुळीस मिळाले. ह्या कूर्दिस्तानमध्ये तुर्कीचा आग्नेय भाग, सिरियाचा ईशान्य भाग, इराकचा उत्तर भाग व इराणचा वायव्य भाग (अर्मेनियाचा नैऋत्येचा छोटासा भाग) समाविष्ट होतो.
कूर्दिस्तानवर आजपर्यंत पूर्वेकडून प्राचीन पर्शियन, पश्चिमेकडून अलेक्झांडर, दक्षिणेकडूण ७ व्या शतकात अरब मुस्लिम, पूर्वेकडून ११ व्या शतकात सेलजुक तुर्क, पुन्हा पूर्वेकडून १३ व्या शतकात मंगोल, १६ व्या शतकात पूर्वेकडून मध्ययुगीन पर्शियन व उत्तरेकडून ऑटोमन तुर्कांनी आक्रमणे केली.
बहुतांश कूर्द हे सुन्नी मुस्लिम आहेत, काही शिया वंशीयही आहेत. तसेच फार थोडे ख्रिश्चन, ज्यू, बाबेइझ, याझिदी, याझदानी व इतर आहेत. सध्या ह्या भागात कूर्दिशांव्यतिरिक्त तुर्क, अरब, पर्शियन, अर्मेनियन, असेरियन, चेचेन, अझेरी व इतर वंशीय लोक राहतात.१
सध्या (२०१६ च्या आकडेवारीनुसार) जगात अंदाजे ३.६ ते ४.५ कोटी कूर्द राहत आहेत.
संदर्भ : The Kurdish population, (https://www.institutkurde.org/en/info/the-kurdish-population-1232551004)
कूर्दबहुल प्रदेश (सौजन्य: Iddon, Paul. Why post-referendum Iraqi Kurdistan is seeking better relations with Iran, 5 March 2018, TheNewArab)
उत्तर इराकमधील कूर्दबहुल भागाला स्वायत्ततेचा दर्जा मिळालेला असून हा भाग ''कूर्दिस्तान प्रादेशिक शासन'' (KRG - Kurdistan Regional Government) म्हणून ओळखला जातो. मसौद बरझानी नेतृत्वाखालील 'कुर्दिश लोकशाही पक्ष' (KDP- Kurdish Democratic Party) व जलाल तालिबानींच्या नेतृत्वाखालील 'कुर्दिस्तान देशभक्त संघ' (PUK- Patriotic Union of Kurdistan) ह्या दोन राजकीय पक्षांचे तेथे नियंत्रण आहे. तूर्कस्तान व इराणने अजूनपर्यंत कुर्दांच्या स्वायत्ततेच्या मागणीला मान्यता दिलेली नाही.
रोजावा -
रोजावा प्रदेश (सौजन्य: Kurdistan National Congress (KNK) Information File, Canton Based Democratic Autonomy of Rojava: A Transformation Process From Dictatorship to Democracy, May 2014, पृष्ठ १६)
कूर्दिस्तानचा पश्चिम भाग म्हणजेच सिरियाचा ईशान्य भाग ‘’रोजावा’’ म्हणून ओळखला जातो. रोजावाचा अर्थ ''भूमी जेथे सूर्यदर्शन होते''. रोजावा प्रदेश इफ़्रिन, कोबान व सिझिरे ह्या तीन परगण्यांचा मिळून बनलेला आहे. हे तिन्ही प्रदेश एक सलग लागून नाहीत, त्यांच्या मधील प्रदेश विरोधक, शासन व इसिसने व्यापलेले आहेत. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने ही भौगोलिक परिस्थिती खूप नाजूक आहे. रोजावा भूभाग अंदाजे २३१३ चौ. किमीचा आहे. ज्यात एकूण ३८० शहरे, उपनगर व गावं आहेत. सिरिया नागरी युद्धाच्या सुरुवातीला रोजावाची लोकसंख्या ३५ लक्ष होती, पण नंतर युद्धजन्य परिस्थितीमुळे पलायन केल्यामुळे सध्या २५ लक्ष लोकसंख्या आहे.२
मध्य आशियातील ''अरब वसंत'' (Arab Spring) मध्ये २०१२ ला असाद राजवटीच्या पाडावानंतर हळूहळू रोजावा क्रांतीला बळ मिळाले व ९ जानेवारी २०१४ ला रोजावा प्रदेशाच्या स्वायत्ततेची घोषणा करुन २९ जानेवारी २०१४ ला ''सामाजिक कराराची सनद'' म्हणजे रोजावा ह्या स्वायत्त प्रदेशासाठी तात्पुरती घटना स्वीकारण्यात आली.३ मार्च २०१६ मध्ये रोजावामध्ये संघराज्य व्यवस्थेची घोषणा करण्यात आली. पण ह्यास अजूनपर्यंत सिरिया, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ व नाटोने मान्यता दिलेली नाही.
'कूर्दिश' ही येथील बोलीभाषा आहे. रोजावामध्ये कूर्दांव्यतिरिक्त अरब, असेरियन, सिरिक, अर्मेनियन, तूर्की व चेचेन लोक राहतात. इस्लाम, ख्रिश्चन, याझदी व अलावी हे येथील प्रमुख धर्म आहेत. सिरियाच्या लोकसंख्येच्या ७ ते १० % दरम्यान कूर्द लोकसंख्या असून हा सिरियामधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा वांशिक गट आहे.
मार्च २०१६ मध्ये रोजावामध्ये संघराज्य व्यवस्थेची घोषणा करण्यात आली. (सौजन्य : Who are the Kurds?, 31 October 2017, BBC.com)
‘लोकशाही संघ पक्ष’ (PYD - Democratic Union Party - Partiya Yekitiya Demokrat) हा २००३ ला स्थापन झालेला सिरियातील कूर्दांचा राजकीय पक्ष आहे. TEV-DEM (Tevgera Civaka Demokratik- Movement for a Democratic Society, Rojava/Northern Syria) २०११ मध्ये स्थापन झालेली रोजावा मधील राजकीय युती असून ह्यांच्याकडे रोजावामध्ये प्रशासनाचे काम आहे. ‘असायिश’ ('सुरक्षा' शब्दाला कूर्दिश भाषेत ‘असायिश’ म्हणतात) हे पोलीस व 'पिपल्स प्रोटेक्शन युनिटस' (YPG - People’s Protection Units - Yekineyen Parastina Gel) व 'वुमेनस प्रोटेक्शन युनिटस' (YPJ- Women’s Protection Units- Yekineyen Parastina Jine) ह्या दोन सैनिकी व क्रांतिकारी संघटना तेथे जनतेच्या सुरक्षेची काळजी घेतात. ह्यातील YPG मध्ये महिला व पुरुष आहेत तर YPJ ही केवळ महिलांची लढाऊ संघटना आहे. २००४ मध्ये स्थापन झालेल्या पण २०१२ पासून सक्रिय झालेल्या YPG मध्ये अंदाजे ४५ ते ५० सहस्त्र लढाऊ स्त्री व पुरुष आहेत तर २००६ मध्ये स्थापन झालेल्या पण २०१२ पासून सक्रिय झालेल्या YPJ मध्ये १० सहस्त्र शस्त्रधारी महिला आहेत. YPG-YPJ ने एकत्रितपणे आयसिसशी जवळजवळ २ वर्ष यशस्वी लढा दिला होता.
सिरियामधील राजवटीने विशेषतः बशर-अल-असादच्या राजवटीने कूर्दवंशीयांचा खूप छळ केलाय.
१. त्यांना सिरियाचे नागरिकत्व नाकारून त्यांच्याच भूमीत त्यांना परदेशी ठरवल. (नंतर असादने काही कूर्दांना नागरिकत्व दिले.)
२. भूमी सुधारणा धोरणाच्या नावाखाली त्यांची सुपीक जमीन सार्वजनिक मालमत्तेत रुपांतरित केली.
३. कूर्द प्रदेशाची कुर्दबहुल लोकसंख्या कमी करण्यासाठी त्यांना त्यांच्या प्रदेशातून स्थलांतर करायला भाग पाडून स्वतः च्या मालमत्तेवरील मालकी हक्कापासून वंचित करून अरबांना तेथे वसवले व एकप्रकारे अरब-कूर्द बंधुतेमध्ये वैर उत्पन्न केले.
४. सर्व कूर्द शहरांची व गावांची कूर्द नावे बदलण्यात आली. उदा. तिर्बेस्पीचे नाव बदलून आधी व्हाईट ग्रेव व नंतर काह्तिनिह ठेवण्यात आले.
५. विधान परिषद, स्थानिक प्रशासन, सैनिक व इतर शासकीय व सार्वजनिक कचेरीत कूर्दांच्या प्रवेशामध्ये अडथळे निर्माण करणे.
६. कूर्द भाषा व संस्कृती राज्यसुरक्षेला धोका आहे असे दर्शवून कूर्दांवर त्यांची मातृभाषा बोलण्यावर बंधन घालून अरेबिक भाषा व संस्कृती त्यांच्यावर लादली गेली.
७. कूर्द भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीतून मिळणाऱ्या मोबदल्यातून कूर्दांना वंचित ठेवले गेले.
८. नवरोझ सारखे सण साजरे करण्यावर बंदी.
९. कूर्द नेते, मानवतावादी कार्यकर्ते व विचारवंतांना पकडून कारावासात टाकले.४
ह्या पार्श्वभूमीवर अरब वसंत व इसिसविरोधी लढा ह्या निमित्ताने चालून आलेल्या संधीमुळे रोजावामध्ये कूर्दांनी रोजावा क्रांतीद्वारे लोकशाही स्वयंशासनाचा आगळावेगळा प्रयोग केला. ज्याला ते ‘Democratic Confederalism - लोकशाही संघवाद’ म्हणतात.
काय आहे हा लोकशाही स्वयंशासनाचा प्रयोग ? व ह्यात महिलांचे व कूर्देतरांचे स्थान काय ? तसेच ह्याला इराकमधील कूर्दिस्तान प्रादेशिक शासनाचा पाठिंबा का नाही ? व तूर्कस्तानचा विरोध का आहे ? कोण आहे ह्या रोजावा क्रांतीचा प्रेरणास्रोत ? पाहूया पुढच्या लेखात.
संदर्भ -
१. https://thekurdishproject.org/history-and-culture/kurdish-history/
२. Mountain river has many bends: an introduction to the Rojava revolution excerpted from A Small Key Can Open A Large Door: The Rojava revolution, पृष्ठ ३
३. http://ypg-international.org/rojava/
४. Kurdistan National Congress (KNK) Information File, Canton Based Democratic Autonomy of Rojava: A Transformation Process From Dictatorship to Democracy, May 2014, पृष्ठ ४
- अक्षय जोग