यार, मी बाथरुम धुणार नाही. का? अहो, ते काम करण्यासाठी मी एवढा शिकलेलो नाही. बाथरुम धुवायचं सोडून बोला. बाकीचं कोणतंबी कामबोला. मी करतो...’’ साई इंटरनॅशनलच्या मालकाला प्रत्येक वेळी नोकरीसाठी आलेल्या तरुणांकडून मिळणारं हे ठरलेलं उत्तर. अशा वेळी एम.ए.एल.एल.बी झालेले मालक स्वत: हातात साफसफाईचं सामान घेऊन, बाथरुमकसं साफ करावं याचे धडे देतात. यात आपण मालक असल्याचा अहंगड नसतो वा आपण काहीतरी वेगळं करतोय याचा अभिनिवेश नसतो. कोणतंही काम हलकं नसतं. तुमचे विचार महत्त्वाचे. आपल्या सहकार्यांना कृतीतून मोठं करणारे हे मालक म्हणजे हॉटेल साई इंटरनॅशनलचे संतोष पाटील.
सांगलीच्या वाळवा तालुक्यात येल्लुर नावाचं गाव. चांगलं बर्यापैकी गाव म्हणता येईल असं. याच गावातील वसंतराव आणि सावित्रीबाई या पाटील दाम्पत्याच्या पोटी संतोषचा जन्मझाला. वसंतराव हे गावातील एक सधन शेतकरी. गावात त्यांना चांगलाच मान होता. फक्त गावच्याच नव्हे, तर तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय वर्तुळात त्यांच्या शब्दाला वजन होतं. इतरांना मदत करण्यात ते नेहमीच तत्पर असत. हेच गुण संतोष यांच्यात उतरले. इस्लामपूरला १९९२ साली त्यांनी बी.ए.पूर्ण केलं, तर कोल्हापूरमधून त्यांनी एम.ए. एल.एल.बी.ची पदवी मिळवली. वकिलीचा अभ्यास केल्यानंतर कोणत्याही मुलाने वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली असती, पण संतोष पाटील यांना समाजकार्य करायचे होते. त्यासाठी त्यांनी एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात केली. प्रशासकीय सेवेतून समाजकार्य प्रभावीपणे करता येईल, हाच त्यामागे हेतू होता.
मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. संतोष यांनी सहा वर्षे सातत्याने प्रयत्न केले, मात्र ते स्पर्धा परीक्षेचा अंतिम टप्पा गाठण्यात अपयशी ठरले. त्यांच्यासोबत स्पर्धा परीक्षेचे धडे घेणारे त्यांचे मित्र विश्वास नांगरे-पाटील एव्हाना आयपीएस झाले होते. खरंतर हे अपयश नव्हतं, भविष्यातील वाटचालीत कशाप्रकारे आयुष्य बळकट करावं याचे ते धडे होते. या धड्यांतूनच एक हॉटेल इंडस्ट्री आकारास येणार होती. या इंडस्ट्रीला आकार देण्याची योजना, दूरदृष्टी ही संतोष पाटील यांचे मेहुणे इंगवले दाजींची. त्यांनी दिलेल्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून ही इंडस्ट्री आकारास आली. त्याची सुरुवात एका ढाब्यापासून झाली. पुणे-बंगळुरू महामार्गाजवळ हा ढाबा सुरु झाला. वर्ष होतं १९९३. ढाबा चांगला चालल्यानंतर त्यांनी १९९६ साली इमारत बांधली. ’हॉटेल साई इंटरनॅशनल’ हे हॉटेल पंचक्रोशीत चांगलंच नावारुपाला आलं, मात्र काही दिवसांनी एक समस्या जाणवायला लागली. गाड्या यायच्या, मात्र न उतरता हॉटेलच्या बाहेरुनच निघून जायच्या. काय कारण असावं याचा शोध इंगवले दाजी आणि पाटील यांनी घेतला. तेव्हा असं जाणवलं की चकाचक हॉटेल आहे म्हणजे महागडं असावं असा समज ग्राहकांनी करुन घेतला होता. यावर एक जालीम उत्तर शोधून काढलं. त्यांनी न्याहरीसाठी फास्टफूड सुरु केलं. त्यामुळे निघून जाणार्या गाड्या नाश्त्यासाठी थांबू लागल्या. हॉटेल साई इंटरनॅशनल आता ग्राहकांनी गजबजू लागलं.
येलुरला हॉटेल सुरु असतानाच, मुंबईला जाताना हायवे जवळ सुद्धा आपलं हॉटेल असावं या इंगवले दाजींच्या इच्छेतून १९९७ साली पाटील यांनी मुंबई-पुणे जुन्या महामार्गाला लागून एक एकर जागा खरेदी केली. मुंबईमधील प्रसिद्ध असलेले ‘अंकल्ज किचन’ हे भागीदार म्हणून कामकरु लागले. आता कुठेतरी जम बसणार असं वाटत असतानाच, नव्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे जुन्या महामार्गावरची सुमारे ८० टक्के वाहतूक कमी झाली. म्हणजेच सुमारे ८० टक्के धंदा बसला. अक्षरश: हॉटेलमधले कर्मचारी दिवस-दिवसभर रस्त्याकडे डोळे लावून बसायचे. खूपच कठीण काळ आला होता, मात्र हार मानतील ते संतोष पाटील कसले! त्यांना त्यातही एक आशेचा किरण दिसला. त्या परिसरात काही कंपन्यांचे कारखाने होते. त्यांच्या कर्मचार्यांसाठी त्यांनी अत्यंत माफक दरात हॉटेलच्या खोल्या उपलब्ध करुन दिल्या. सोबतच एक वॉटरपार्क सुरु केलं. परत चांगले दिवस येणार असं वाटत असतानाच, ‘अंकल्ज किचन’चे अंकल आजारी पडले. अगदी खाटेला खिळूनच राहिले. त्यात २००८ ची आर्थिक मंदी जगभर पसरली होती. ‘अंकल’ने भागीदारी विकायची ठरवली. पाटील आणि इंगवले दाजी यांनी पैशांची जमवाजमव करुन त्यांची भागीदारी विकत घेतली. आजूबाजूची जमीन खरेदी करत, आज ‘युके रिसॉर्ट’ १२ एकर जागेवर उभं आहे. आता तर ते वेडिंग डेस्टिनेशन म्हणून नावारुपास येत आहे. हॉटेल इंडस्ट्रीसोबत पाटील यांची आर्किटेक्चर कंपनीसुद्धा आहे. आज हा उद्योगसमूह कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहे. सामाजिक भान जपत, पाटील हे सामाजिक क्षेत्रात सुद्धा तेवढेच आघाडीवर आहेत. ‘आम्ही सांगलीकर’, ’स्टडी सर्कल’, ‘काडसिद्धेश्वर मठ’ यांसारख्या सामाजिक संस्थांचे ते विश्वस्त आहेत. ‘जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते सरचिटणीस होते. ‘युवक बिरादरी’चे ते मुंबई अध्यक्ष होते. सोबतच ते मराठी तरुण उद्योजकांना घडविण्याचं महत्त्वाचं कार्य ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या माध्यमातून करतात.