फिरण्याची आवड कोणाला नसते ? रोजच्या कामाच्या धबडग्यातून, घाई गडबडीतून निवांत वेळ काढून कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. आपल्या या फिरण्याच्या, पर्यटनाच्या आवडीला 'प्रायोरिटी' देत आपण स्वत:साठी किंवा परिवारासाठी नेहमीच वेळ काढू शकतो, असे होत नाही. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांना पर्यटनाची केवळ आवडच नाहीये तर त्यांना याचे वेड आहे. "पॅशन" म्हणतात ना तसेच. यापैकी एक आहे इशा रत्नपारखी. हैदराबाद येथे राहणारी इशा इंस्टाग्रामवर "मॉम डॅड ट्रॅव्हल्स" या नावाने प्रसिद्ध आहे. इशा तिचे पती अनूप आणि मुलगा अर्जुन वेळ मिळेल तेव्हा, किंवा वेळ काढून भारत आणि भारताबाहेर भरपूर फिरतात. याविषयी इंस्टाग्रामवर आपलं अकाउंट सुरु केल्यानंतर त्यांना अनेक प्रश्न, अनेक प्रतिक्रिया आल्यात आणि त्यातूनच प्रसिद्ध झाले, "मॉम डॅड ट्रॅव्हल्स"..
या बाबतीत इशा सोबत गप्पा मारल्यानंतर तिने तिच्या या "पॅशन" विषयी भरपूर सांगितले. या जगात अनेकांना फिरण्याची आवड आहे, वेड आहे, मात्र असे लोक कमीच असतात जे खरच आपल्या या "पॅशन"ला जगू शकतात. या पॅशन विषयी ती सांगते, "आजच्या काळात जर कुणाला विचाराल तुमचे स्वप्न काय आहे तर आपल्याला उत्तर मिळतं मोठी गाडी, बंगला, पैसा इत्यादी. मात्र मला विचाराल तर संपूर्ण जग आपल्या डोळ्यांनी बघणं हेच माझं स्वप्न. पैसा कमवून त्याचा उपयोग मला आणि माझ्या नवऱ्याला जग बघण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी आम्ही आपली नोकरी सोडली नाही, घर देखील घतेलं, गाडी घेतली. मात्र पर्यटनाचा छंद आजही सर्वतोपरी आहे. जेव्हाही जमेल, वेळ मिळेल किंवा वेळ काढून आम्ही वेग वेगळ्या ठिकाणांवर फिरायला जातो. माझ्यात हा छंद माझ्या वडीलांकडून आला, मी आजही डोळे बंद करुन माझ्या सगळ्यात आनंदाच्या क्षणांचा विचार करते तर मला लहानपणी परिवारासोबत सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणंच आठवतं. मला फिरण्याचा छंद आहे, मात्र तो मी जगू शकते माझ्या पती मुळे. एकत्र फिरण्यामुळे आम्ही एकमेकांना भरपूर वेळ देऊ शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं, हे जग उलगडणं आपल्याला शाळेतल्या ज्ञानापेक्षाही जास्त खूप काही शिकवतं. तुम्ही नव्या जागेच्या संस्कृतीचा खाद्य पदार्थांचा आदर करायला शिकता. तुम्ही आणखी खुल्या मनाने विचार करायला शिकता, लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकार करायला शिकता, तसेच जगण्याचा केवळ एकच मार्ग असतो असे नाही, प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी असते. एक माणूस म्हणून आपण या भटकंतीमुळे भरपूर काही शिकतो. असंही ती सांगते.
समाज माध्यमे : एक महत्वाचा मार्ग
आजच्या काळात समाज माध्यमांवर वेग वेगळ्या पर्यटनाच्या पोस्ट्स आणि भरपूर माहिती असते, असे असताना तुझा सोशल मीडियाच्या प्रवासाला कशी सुरुवात झाली विचारले असता ती सांगते, " खरं तर आज सगळंच काही समाज माझ्यमांवर उपलब्ध असतं, तसंच प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे, हे देखील आता समाज माध्यमांवर आहे, माझ्या परिवारात वातावरण एकदमच वेगळं होतं. मी नेहमीच अनेक गोष्टी स्वत:पुरती आणि परिवारापुरती ठेवत आले आहे. मात्र आमच्या अनेक मित्रमैत्रिणींनी फेसबुकवरचे आमचे पर्यटनाचे फोटो बघून आम्ही सार्वजनिक आणि मोठ्या स्तरावर याविषयी काही करावे असे प्रोत्साहन दिले, अनेकांनी "तुम्हाला बघून आम्हाला देखील पर्यटनाची प्रेरणा मिळते." असंही म्हटलं. आणि अचानक एकेदिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर २०१७ रोजी म्हणजे गेल्याच वर्षी या इंस्टाग्राम खात्याची सुरुवात झाली. आणि बघता बघता याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ ८ महिन्यातच या खात्याचे ६ हजार फॉलोअर्स आहेत.
इंस्टाग्रामवर इशाच्या खात्याचे नाव "मॉम डॅड ट्रॅव्हल्स" असे आहे. या आगळ्या वेगळ्या नावाबद्दल ती सांगते, " मी माझे पती आणि अर्जुन देशातील, देशाबाहेर विविध ठिकाणी भरपूर फिरतो, त्यामुळे नावात तीघांचाही समावेश असणे आवश्यक होते, अशा प्रकारची २-३ नावे मी माझ्या पतींना सुचवली आणि अखेर अर्जुनचे आई वडील या नात्याने आम्ही या नावाची निवड केली."
लहानग्याला घेवून प्रवासाचे अनुभव :
लहानग्या अर्जुनला सोबत घेवून फिरताना आलेल्या विविध अनुभवांना यावेळी इशाने उजाळा दिला. "पहिल्यांदाच अर्जुल केवळ १२ आठवड्यांचा असताना आम्ही त्याला घेवून प्रवास केला होता. आम्ही गोवा येथे गेलो होतो. छोट्याशा बाळाला घेवून प्रवास करणे, घरापासून लांब राहणे हे सोपे आहे, असे जर कुणी तु्म्हाला सांगितले तर त्यांच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. छोट्या बाळाला त्याच्या त्याच्या घरी, त्याच्या त्याच्या जागेवर खूप आराम मिळतो, मात्र लहान बाळासोबत किवा लहान मुलांसोबत फिरल्यामुळे त्यांना देखील अगदी लहानवयातच बाहेरच्या जगाचा अनुभव यायला लागतो. त्यांच्यासाठी हे अनुभव पुढे खूप महत्वाचे ठरतात. आणि यामुळे पालक म्हणून आम्हाला देखील भरपूर वेगवेगळे अनुभव आले. आमचे अनुभव "मॉम डॅड ट्रॅव्हल्स"च्या माध्यमातून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतोय, याचा मला आनंद आहे.
आता पर्यंत इशाने गोवा, चंदीगढ, पॉण्डीचेरी, ऊटी, कुर्ग, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब मनाली, हंपी, त्याशिवाय दुबई, हाँगकाँग, मकाऊ, फुकेट, सिंगापुर, मलेशिया, लंडन, पॅरिस, अॅम्सटरडॅम आणि अशाच विविध ठिकाणी आपल्या परिवारासोबत भटकंती केली आहे.
आयुष्य जगा, खूप फिरा मात्र स्वत:ची काळजी घेत...
इशाने वाचकांना या गप्पांमध्ये एक खूप छान संदेश दिला आहे, ती सांगते.." सतत फिरण्यासाठी, ठिकठिकाणी जाण्यासाठी आपले आरोग्य उत्तम असणे अत्यावश्यक आहे. त्याच्यासाठी मी आणि माझे पती आळीपाळीने कामाची जबाबदारी वाटून घेतो, जेणेकरून आम्हाला घर आणि ऑफिस सांभाळून स्वत:च्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी बराच वेळ मिळतो. आम्ही आमच्या सु्ट्ट्या आणि पर्यटन वर्षाच्या सुरुवातीलाच नियोजित करतो, जेणे करुन आम्हाला या सुट्ट्या आर्थिकदृष्ट्या जड जात नाहीत. कारण वेळेवर नियोजन केल्यामुळे आर्थिक नियोजनासही मदत मिळते. तसेच सकस आहार घेणे आणि व्यायाम करणे यामुळे आम्ही आमच्या या प्रवासांसाठी फिट असतो. शनिवार रविवारला लागून आलेल्या मोठ्या सु्ट्ट्यांमध्ये आम्ही आमच्या अधिकांश "ट्रिप्स" ठरवतो, जेणेकरून आम्हाला ऑफिस मधून सुट्ट्या घ्याव्या लागत नाहीत. त्यामुळे सगळ्यांनीच स्वत:ची काळजी घेत आपले आयुष्य भरपूर जगले पाहीजे." असंही ती सांगते.
आयुष्य एकदाच मिळतं. ते पूर्णपणे जगण्यासाठी विविध ठिकाणांना भेट देवून, फिरून, भटकंती करून, भ्रमण करुन आपण भरपूर काही शिकतो. इशा सारखे अनेक लोकं आहेत जे आपल्या दगदगीच्या आयुष्यातून स्वत:साठी, स्वत:च्या परिवारासाठी वेळ काढतात, मेहनत करून अर्थार्जन करतात, आणि त्याचा उपयोग भरपूर साऱ्या आठवणी निर्माण करण्यासाठी करतात. एकदाच मिळालेलं आयुष्य भरपूर जगण्यासाठी अशाच प्रमाणे वेळात वेळ काढून परिवारासोबत भटकंती केली पाहीजे कारण धकाधकीचं आयुष्य तर रोजचंच आहे, मात्र आयु्ष्याच्या शेवटच्या टप्प्यात या आठवणीच असतात ज्यामुळे आण खऱ्याअर्थाने जगू शकतो. शेवटी महत्वाचं काय तर परिवार, प्रेम, एकत्र घालवलेला वेळ आणि.... आठवणींचा ठेवा...
- निहारिका पोळ