रोजोवा क्रांती आणि महिला सबलीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018   
Total Views |




YPG च्या महिला गटासोबत मार्गारेट ओवेन, जानेवारी २०१३ (सौजन्यः Owen, Margaret. Special Report- Gender and justice in an emerging nation: My impressions of Rojava, Syrian Kurdistan, ceasefire magazine, 11 February 2014)

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे ‘स्त्रीवाद’ हे रोजावा क्रांतीच्या संस्थापक तत्वांपैकी एक तत्व आहे.


कूर्दिश संस्कृती सर्वसाधारणपणे पितृप्रधान असून पुरूषी वर्चस्व प्रचलित होते व अरेंज व सक्तीचे विवाह तेथे सामान्य गोष्ट होती.


अब्दुल्ला ओकलान हा स्वतः स्त्री-स्वातंत्र्य व महिला सबलीकरणाचा पुरस्कर्ता आहे. त्याने ह्यावर ‘Liberating Life: Woman’s Revolution’ या नावाची पुस्तिकाच लिहिली आहे. ह्यात त्याने कूर्दांमधील स्त्रीयांचे स्थान, स्त्रीवाद, स्त्री-स्वातंत्र्य ह्याविषयी परखड मत मांडली आहेत. मध्यपूर्वेचा विचार करता इतरांपेक्षा ऐतिहासिक काळापासून कूर्दांमध्ये स्त्रीला मानाचे स्थान होते. पण गेल्या काही काळाचा विचार करता परिस्थिती ह्याच्या उलट होती. महिला व मुले ह्यांची स्थिती फार धक्कादायक होती व महिलांची अवस्था गुलामासारखी भयानक होती असे ओकलानच नमूद करतो. BDP- Peace and Democracy Party सोबतच्या त्याच्या भेटीच्यावेळी तर त्याने स्पष्टच सांगितल की, 'मला जन्मभूमीच्या स्वातंत्र्यापेक्षा स्त्री-स्वातंत्र्य जास्त मौल्यवान वाटत.' कारण ओकलानच्या मते 'जोपर्यंत महिला स्वतंत्र होत नाही तोपर्यंत राष्ट्र स्वतंत्र होऊ शकत नाही.' म्हणजे ओकलानला केवळ राजकीय स्वातंत्र्य अपेक्षित नसून सामाजिक स्वातंत्र्यही अपेक्षित आहे व हे सामाजिक स्वातंत्र्य स्त्री-स्वातंत्र्याव्यतिरिक्त साध्य करता येणार नाही कारण स्त्रीपारतंत्र्य म्हणजेच समाजाची गुलामगिरी. ओकलानच्या मते स्त्रीयांच्या स्थानावर लक्ष देणे हाच मध्यपूर्वेतील सामाजिक प्रश्नावरील उपाय आहे. स्त्री-स्वातंत्र्य म्हणजेच लोकशाहीकरणाचा शाश्वत व व्यापक घटक.


आपले हेतू साध्य करण्यासाठी ओकलान स्त्रीवादाचे तत्वज्ञान पाजळून नुसत्या गप्पा मारत नव्हता. पिकेकेच्या ५०% सदस्य महिला आहेत. पिकेकेचा लढा केवळ वसाहतवादाविरुद्ध नव्हता, तर तो लढा महिलांची स्थिती व समाजादास्य बदलण्यासाठी अंतर्गत सरंजामशाहीविरुद्धचाही लढा होता. हे फार महत्वाचे आहे कारण नुसत राजकीय दास्य संपुष्टात येऊन उपयोग नाही त्यासोबत सामाजिकदास्यही संपुष्टात येणे आवश्यक आहे. राजकीय असो सामाजिक असो नाहीतर कौटूंबिक- कुठलीही मानवाचे मूलभूत न्याय्य अधिकार नाकारणारी अन्यायी हुकूमशाही केव्हाही हानिकारकच असते. स्त्रीयांना गुलाम ठेवण्याच्या पुरूषी वर्चस्ववादी मानसिकतेवर त्याने वरील पुस्तिकेत कठोर टीका केली आहे.

ओकलानच्या मते स्त्री-स्वातंत्र्याच्या स्तरावरून (Level) समाजस्वातंत्र्याचा स्तर कळतो. महिलांची भावनिक बुद्धिमत्ता पुरुषांपेक्षा जास्त कणखर असते. थोडक्यात समाजस्वास्थ हे महिला सबलीकरणावर अवलंबून असत.

ओकलानच्या प्रेरणेवरून रोजावामध्ये झालेल्या क्रांतीतही महिलांचा सिंहाचा वाटा होता व तेथे आज अस्तित्वात असलेल्या 'लोकशाही संघवाद' व्यवस्थेतही महिलांना मानाचे व महत्वाचे स्थान आहे. २९ जानेवारी २०१४ला ''सामाजिक कराराची सनद'' म्हणजे रोजावा ह्या स्वायत्त प्रदेशासाठी तात्पुरती घटना स्वीकारण्यात आली. त्यातील अनुच्छेद २७ अनुसार, महिलांना राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनात सहभागी होण्याचे अनतिक्रमणीय अधिकार दिलेले आहेत. तसेच अनुच्छेद २८ अनुसार, निर्बंधापुढे स्त्री-पुरुष समान असून स्त्री समानतेचा पुरस्कार करून सार्वजनिक संस्थांना लिंगभेदाचे निर्मूलन करण्याच्यादृष्टीने कार्य करण्यास सांगितले आहे.

रोजावामध्ये महिला मंत्र्यांचा अपवाद वगळता सर्व पुरुष मंत्र्यांना १ पुरुष व १ स्त्री असे दोन सह-मंत्री असतात. प्रत्येक नगरपालिकेत ३ उच्च अधिकारी असतात, त्यांपैकी किमान एक तरी महिला अधिकारी असावी असा नियमच आहे. तेथे महिला समित्या आहेत. आता तेथे बालविवाहावर बंदी आहे.

रोजावामध्ये ‘असायिश-जे’ हे फक्त महिलांचे सुरक्षादल आहे. स्त्री व बालकांसंबंधित गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार व द्वेष संबंधित गुन्हे ह्यांचे दायित्वही ‘असायिश-जे’ कडे आहे. तसेच 'असायिश'कडे असणारी काही कर्तव्येही ‘असायिश-जे’ स्वतंत्रपणे हाताळते. ‘असायिश-जे’ द्वारे सर्व महिलांसाठी महिलागृह स्थापन केले आहे. १५ वर्षावरील कोणीही महिला ह्या घरात हवा तितका काळ राहून मोफत शिक्षण घेऊ शकते व स्वेच्छेने हव तेव्हा आपल्या घरी जाऊ शकते. पुरुषांना ह्या वास्तूत प्रवेश निषिद्ध आहे. अशा एकूण ३० वास्तू सध्या रोजावामध्ये आहेत. सक्तीच्या विवाहामुळे स्त्रीयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत होते त्यावर उपाय म्हणून ‘असायिश-जे’ द्वारे हॉटलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्याद्वारे केव्हाही महिलांना भावनिक आधार देऊन आत्महत्येपासून परावृत्त केले जाते. लैंगिक हिंसाचार, ऑनर किलिंग, शारिरिक व मानसिक आरोग्यविषयक समस्या, कौटुंबिक हिंसाचार इत्यादीविषयी सल्ला, समुपदेशन, सुरक्षा व आश्रयासाठी महिला व मुली येथे येऊ किंवा राहू शकतात.

'वुमेनस प्रोटेक्शन युनिटस' (YPJ- Women’s Protection Units- Yekineyen Parastina Jine) ही केवळ महिलांची लढाऊ संघटना २००६ मध्ये स्थापन झाली. २०१२ पासून सक्रिय झालेल्या YPJ मध्ये १० सहस्त्र शस्त्रधारी महिला आहेत. कूर्दीश व महिला अधिकार समर्थक मार्गारेट ओवेनने २०१३ मध्ये प्रत्यक्ष रोजावाला भेट दिली होती. तेव्हा त्यांना एक महिला भेटली, तिच्या नवऱ्याला व भावाला तिच्या डोळ्यादेखत मारून तिच्या सामूहिक बलात्कार केला होता. कूर्दीश महिला अपवित्र व काफिर असल्यामुळे त्यांच्यावर बलात्कार करणे हलाल आहे असा फतवा एका अरब इमामाने काढला होता. त्यामुळे फक्त इसिसविरुद्ध लढणे हे YPJ चे उद्दीष्ट नसून स्त्रीवादासाठी व लिंगसमानतेसाठी तसेच बलात्काऱ्यांविरुद्ध व स्त्रीयांना गुलाम म्हणून विकणाऱ्याविरुद्धही YPJ लढत आहे.

रोजावामध्ये विशेष उल्लेख करण्यासारख्या ४ महिला संघटना आहेत.

The Star Union, the All-Women Political Party
The Women’s Academies for Education and Training

The Women’s Houses, serving women and family needs

YPG- Women’s Protection Units- Yekineyen Parastina Jine


रोजावामधील लढाऊ महिलांविषयी जाणून घेऊया पुढील लेखात,


संदर्भ -

१. Mountain river has many bends: an introduction to the Rojava revolution excerpted from A Small Key Can Open A Large Door: The Rojava revolution, पृष्ठ २४
२. Ocalan, Abdullah. Liberating Life: Woman’s Revolution, International Initiative Edition in cooperation with Mesopotamian Publishers, Neuss, 2013, पृष्ठ ४०
३. उपरोक्त. पृष्ठ ५२
४. उपरोक्त. पृष्ठ ४०

५. उपरोक्त. पृष्ठ ५०

६. Charter of the Social Contract- http://ypg-international.org/rojava/

७. Mountain river has many bends: an introduction to the Rojava revolution excerpted from A Small Key Can Open
A Large Door: The Rojava revolution, पृष्ठ २४-२५

८. Owen, Margaret. Special Report- Gender and justice in an emerging nation: My impressions of Rojava, Syrian Kurdistan, ceasefire magazine, 11 February 2014


- अक्षय जोग
@@AUTHORINFO_V1@@