कास्टिंग काऊच आणि बरंच काही..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018   
Total Views |


काल प्रसिद्ध नृत्यनिर्देशक सरोज खान यांनी "कास्टिंग काऊच" या विषयावर एक वादग्रस्त विधान केले आणि सगळ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या. एका पत्रकाराने त्यांना कास्टिंग काऊच या विषयवार प्रश्न विचारला असता, "हे तर बाबा आदमच्या जमान्यापासून सुरु आहे, यात नवीन काय आहे. प्रत्येक मुलीवर कुणी ना कुणी हात मारतोच, सरकार करते, सरकारी लोक करतात. सिनेसृष्टी कमितकमी तुम्हाला खायला तरी देते, बलात्कार करून सोडून देत नाही." अशा भीषण शब्दात त्यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. मात्र त्यांच्या या विधानाने केवळ सिनेसृष्टीतीलच नाही तर सर्वच क्षेत्रातील एका भयानक सत्याची जाणीव करून दिली.
 
 
 
 
सिनेसृष्टी जितकी नाव, पैसा, आणि जगमगाटीसाठी प्रसिद्ध आहे तितकीच 'कास्टिंग काऊच' सारख्या या चुकीच्या गोष्टींसाठी देखील कुप्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे होत आलेलं आहे. वेळोवेळी हे समोर येतं, यावर चर्चा होते आणि मूळ विषय मात्र बाजूलाच राहून जातो. या सगळ्या विषयाला आता सुरुवात झाली ती म्हणजे "श्री रेड्डी" या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या कास्टिंग काऊच संबंधातील आंदोलनामुळे. तिच्या सोबत कास्टिंग काऊचचा प्रकार घडला आणि त्याविषयी तिने लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन केले आणि याविषयी चर्चेला उधाण आले. तिने जे केले ते योग्य होते का याविषयी भाष्य करता येणार नाही, मात्र ज्याविषयासाठी तिने आंदोलन केले तो विषय नक्कीच महत्वाचा आहे.
 
 
 
सिनेसृष्टीतील हे एक भीषण, विदारक सत्य आहे. केवळ 'नेम, फेम, मनी' म्हणजेच नाव पैसा आणि प्रसिद्धीसाठी अनेक मुली, नवीन कलाकार या जाळ्यात अडकतात. दाक्षिनात्य सिनेसृष्टी आणि हिंदी सिनेमामध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. २० फेब्रुवारी २०१७ रोजी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेते आर. सार्थकुमार यांची कन्या वरलक्ष्मी सार्थकुमार हिने याविषयी स्वत:चा अनुभव सांगत एक ट्विट केले होते, त्यावेळी देखील हे प्रकरण असेच गाजले. एका प्रसिद्ध वाहिनीच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करत असताना आलेला अनुभव तिने सांगितला. यामध्ये त्या अधिकाऱ्याने तिला कामा व्यतिरिक्त बाहेर भेटण्यासाठी विचारले. तसेच तसे केल्यास तिचे काम मालिकेत पुढे सुरु राहील अन्यथा काम थांबवावे लागेल असे तिला सुचविले. याविषयी तिने आपेल मत व्यक्त करत महिलांना केवळ एक वस्तु प्रमाणे बघत तिला तिची किंमत मागणाऱ्या पुरुषांनी आता सुधरण्याची आवश्यकता आहे, असे मत मांडले आहे. यामुळे दक्षिणेतील सिनेसृष्टीत नायिकांसोबत होणाऱ्या या अत्याचांवर प्रकाश पडला.
कास्टिंग काऊच : नेमकी काय आहे ही भानगड :

सिनेसृष्टीत कास्टिंग काऊच हा एक प्रचलित शब्द झाला आहे. जेव्हा एखादा दिग्दर्शक, अधिकारी, प्रायोजक किंवा नट किंवा इतर कुणीही व्यक्ती एखाद्या भूमिकेबदल्यात, एखाद्या महत्वाच्या कामाबदल्यात अभिनेत्री किंवा अभिनेत्याकडून शरीरसुखाची मागणी करते, त्या प्रकाराला "कास्टिंग काऊच" असे म्हणतात. कास्टिंग काऊचचे पहिले प्रकरण पाश्चात्य देशांमध्ये "मोशन पिक्चर इंडस्ट्री" येथे समोर आले. याठीकाणी असलेल्या 'काऊच' चा वापर कास्टिंग डायरेक्टर आणि दिग्दर्शक शरीरसुख घेण्यासाठी करत असत. त्यामुळे या प्रकाराला "कास्टिंग काऊच" असे नाल पडले. अनेक अभिनेत्र्या किंवा अभिनेते नाव, पैसा आणि प्रसिद्धीसाठी इतके अंधळे होतात, की ते या सगळ्या मागण्या मान्य करतात, आणि त्यांना "कॉम्प्रोमाईज" करावं लागतं. मात्र कितीतरी घटनांमध्ये दिलेलं आमिष पूर्ण होत नाही, दिलेला शब्द पाळल्या जात नाही, आणि उपभोग मात्र घेण्यात येतो अशा वेळी ही प्रकरणं जगासमोर येतात.

चूक नेमकी कुणाची ? :

मात्र जेव्हा आपण अशा बातम्या वाचतो, त्यावेळी आपण पटकन दोष त्या दिग्दर्शकाला किंवा प्रायोजकाला देऊन मोकळे होते. मात्र एक बाब आपण लक्षात घेत नाही ती म्हणजे "कास्टिंग काऊच" हा प्रकार घडलेल्या घटना जेव्हा उघड होतात, त्यामध्ये जितके दोषी आमिष देणारे असतात, तितकेच दोषी ते आमिष स्वीकारणारे असतात. केवळ करिअरच्या एखाद्या महत्वाच्या टप्प्यासाठी एखाद्याने शरीरसुखाची मागणी केल्यास ती पुरवून आपल्याला हवी ती भूमिका, हवे ते स्थान मिळवायचे का हे ठरवणे त्या त्या अभिनेत्रीच्या / अभिनेत्याच्या हातात असते. त्यामुळे यामध्ये केवळ त्या एका दिग्दर्शकाची चूक आहे असे म्हणता येणार नाही. त्याची चूक १०० टक्के आहे. त्याच्या मानसिकतेत विष आहे. तो अभिनेत्रीला केवळ एक वस्तु म्हणून बघतो. त्याचा नक्कीच विरोधच आहे, मात्र ही मानसिकता स्वीकारणारा देखील तितकाच दोषी आहे. असे म्हणतात ना अन्याय करणारा गुन्हेगार असतो मात्र अन्याय सहन करणारा त्याहून मोठा गुन्हेगार असतो, इथेही तसेच आहे. 

 



या बाबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याशी संवाद साधल्यास ती म्हणते, " मराठी सिनेसृष्टीत कास्टिंग काऊचचे प्रकार तुलनेने कमी आहे, आणि छोट्या पडद्यावरतर नाहीच. मात्र मराठी सिनेमात असे होतच नाही असे देखील म्हणता येणार नाही. देवाच्या कृपेने मला कधीच अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागला नाही. माझा प्रवास टप्प्या-टप्प्याने होत गेला, त्यामुळे माझे यश स्वबळावर मिळवलेले आहे. मात्र हा प्रकार इतका अधिक असल्याने स्वबळवार मिळवलेल्या यशाकडे देखील लोक साशंक नजरेने बघतात. शारीरिक छळ नसला तरी मानसिक छळ म्हणजेच "मेंटल कास्टिंग काऊच" हा प्रकार सर्वच क्षेत्रांमध्ये आहे, आणि ते थांबले पाहीजे." असेही ती म्हणते. 

 


एकूणच सरोज खानच्या वक्तव्याने मोठ्या चर्चेला पुन्हा चालना दिली. त्यांचे वक्तव्य निश्चितच चुकीचे होते, त्यांच्या भाषेचे किंवा वक्तव्याचे समर्थन नाही. मात्र हे केवळ सिनेसृष्टीतच होतं असंही नाही. इतर अनेक क्षेत्रांमध्ये कास्टिंग काऊच प्रकार हा घडतोच. अनेकदा समाजात, जगासमोर ही प्रकरणे येत नाहीत. मात्र दबक्या आवाजात बोलले तरी सत्य कुणापासूनही लपलेले नाही.

या विषयावर सरोज खान नंतर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी देखील आपले मत व्यक्त केले. "संसद देखील यातून मुक्त नाही, राजकारणाच्या क्षेत्रात देखील हे मोठ्या प्रमाणात होते." असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. केवळ सिनेसृष्टीच नाही तर राजकारणातही हा प्रकार सर्रास होतो. 'तिकीट' मिळवून देईन असे आमिष दाखवत अनेक प्रसिद्ध राजकीय नेते महिला कार्यकर्त्यांना आपल्या वासनेच्या आहारी नेण्याचा प्रयत्न करतात. आणि अनेक महिला कार्यकर्त्यांनी होकार देत ही मागणी स्वीकारली देखील आहे. हे देखील एका प्रकारचे कास्टिंग काऊचच आहे. केवळ इतकेच नव्हे तर मोठे मोठे राजकीय नेते यामध्ये सामिल आहेत, लोकांना ते माहीत देखील आहे, मात्र याविषयी उघडपणे चर्चा करण्याचे धाडस कुणातही नाही. आणि हे सर्वच पक्षांमध्ये आहे.  
केवळ महिलाच नाहीत तर पुरुष देखील कास्टिंग काऊचचे बळी  :

जर आपला समज असेल की कास्टिंग काऊच हे केवळ महिलांसोबत होतं, तर हे खोटं आहे. आजच्या काळात पुरुषांसोबत देखील असे प्रकार घडतात. दुर्दैवाने हे अधिक वेदनादायी असतात. अनैसर्गिक असल्याकारणाने अनेक पुरुषांचे आयुष्य यामुळे उध्वस्त झालेले आहे. फॅशन इंडस्ट्री मध्ये याचे प्रमाण सगळ्यात जास्त आढळते. तसेच कास्टिंग काऊच जितक्या प्रमाणात सिनेसृष्टीत आहे तितक्याच कदाचित त्याहून अधिक प्रमाणात ते फॅशन इंडस्ट्री मध्ये आढळते.
 
 
कॉर्पोरेट क्षेत्रात प्रमोशन करुन देण्यासाठी "विशेष मागण्या" :
यापासून कॉर्पोरेट क्षेत्र ही लांब नाही. प्रमोशन करून देतो, पगार वाढवून देतो, डील मिळवून देतो असे अनेक आमिष दाखवून अनेक मोठे उद्योगपती, अधिकारी महिलांना आपल्या झाशात घेतात. महिला फसतातही. त्यानंतर प्रमोशन लांब राहतं, मात्र उपभोग हा अवश्य घेतला जातो. हा देखील कास्टिंग काऊचचाच एक प्रकार आहे.
 
 
क्रीडा क्षेत्र देखील मागे नाही :
कास्टिंग काऊच प्रकारात क्रीडा क्षेत्र देखील मागे नाही. "चक दे इंडिया" या चित्रपटातील ते दृश्य आठवतं ज्यात ती खेळाडू प्रशिक्षकाला विचारते "उसमें ऐका क्या है जो मुझमें नहीं." अनेकदा महिला स्वत: देखील यासाठी तयार होतात, कारण केवळ एकच पैसा, पद आणि प्रसिद्धी.
 
 
हे सगळं बघता केवळ प्रसिद्धीसाठी पैशासाठी पिढ्यांपिढ्या लोकं किती खालच्या थराला जावू शकतात हे लक्षात येतं. प्रश्न मानसिकतेचा आहे. सगळ्यात जास्त ओढाताण होते ज्या व्यक्तीत प्रतिभा आहे त्याची. ज्या व्यक्तीत खरंच मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे यामुळे त्या व्यक्तीला यशापर्यंत पोहोचणे अवघड होते. तर यश मिळाल्याच त्याला साशंक नजरांनी बघण्यात येतं. अनेकदा जो पर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत असतात, शब्द पाळले जात असतात तो पर्यंत नैतिकतेची जाणीव होत नाही, मात्र जेव्हा या मागण्या पूर्ण होत नाहीत, शब्द पाळले जात नाहीत तेव्हा अचानक नैतिकता आणि समाजाची आठवण येते. माणसाचा हा दुटप्पीपणा देखील चुकीचा आहे.
 
 
एका कार्यक्रमात याविषयी प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उजगांवर यांनी सांगितल्या प्रमाणे याचा विरोध करणं आपल्या हातात आहे. खालच्या थराच्या मागण्या कुणी केल्या तर ते उघड करणे आवश्यक आहे. त्यावेळी त्या व्यक्तीच्या समाजातील स्थानाचं, त्या क्षेत्रातील वर्चस्वाचं दडपण येऊ शकतं, मात्र घाबरल्यास बळी आपला जाणार हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तसंच आपल्या सोबत पुढे काय होणार हे आपला निर्णय ठरवणार, त्यामुळे आपण आपल्या निर्णयावर दृढ असणं देखील आवश्यक आहे.
 
 
कास्टिंग काऊच सारखे प्रकार प्रत्येका क्षेत्राला लागलेल्या ग्रहणाप्रमाणे आहेत. याचा विरोध वेळोवेळी झालाच पाहीजे. मात्र याला थांबविण्यासाठी आपली मानसिकता स्वच्छ आणि आपले निश्चय ठाम असणेही आवश्यक आहे. अन्यथा केवळ पैसा, पद आणि प्रसिद्धीच्या मोहापायी पिढ्यांपिढ्या आपले तत्व विकत राहतील आणि कास्टिंग काऊच एखाद्या प्रथेप्रमाणे पिढ्यांपिढ्या चालत राहील.
 
 
- निहारिका पोळ
@@AUTHORINFO_V1@@