आकाशाशी जडले नाते - आकाशातला बाप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018   
Total Views |


“Hi आबा!”, आबांच्या खांद्यावर हात ठेवत सुमित म्हणाला.


“सुम्या, अरे आजोबा ना मी तुझा ? मला माझ्या बापाच्या खांद्यावर सुद्धा हात ठेवून बोलायची हिम्मत नव्हती!”, आबा सुमितच्या पाठीवर थाप मारून म्हणाले.

“नवीन पिढी आहे शंकरराव! एक पाऊल पुढेच असणार!”, दुर्गाबाई कौतुकाने म्हणाल्या.

“बरी आठवण केलीत आबा, आज तुम्ही ‘आकाशातल्या बापाची’ गोष्ट सांगणार आहात ना ?”, सुमितने ट्रॅक बदलला.

“ओह, Yes! फारच रंजक गोष्ट आहे ती! चल, आज एका लांबच लांब सफरीला जाऊ! खूप खूप वर्षांपूर्वी, ऋग्वेदाच्याही पूर्वीच्या काळात जाऊ! तेंव्हा पासूनच्या आकाश देवांची परंपरा पाहू.

“आपल्या पूर्वजांची, आद्य कल्पना अशी होती की पृथ्वी ही सर्व जीवांची माता असून आकाश म्हणजे ‘द्यौस्’ हा आपला पिता आहे.


‘द्यौस् पितृ’ हा चमकणारा, प्रकाशित देव. विद्युलता ज्याचे स्मित आहे असे दिवसाचे व रात्रीचे आकाश म्हणजे द्यौस्. उषा, आदित्य, इंद्र, मित्र, पर्जन्य या आकाशाशी निगडीत असलेल्या वैदिक देवता त्याची मुले होत.

“कालांतराने, द्यौस् चे महत्व कमी होत गेले आणि त्याची जागा त्याच्या पुत्राने - वरुणाने घेतली. मग वरुण हा आकाशाचा, अवकाशाचा, आप: अर्थात Primordial Water चा देव झाला. नंतरच्या काळात ती ओळख जाऊन तो पाण्याचा / समुद्राचा देव झाला. वरुण सर्वश्रेष्ठ देव झाला. त्याला ‘देवांचा राजा’ म्हणले आहे. ‘क्षत्रिय’ म्हणले आहे. त्याला ‘असुर’ म्हणून संबोधले आहे.




मकरावर आरूढ वरुण, होयसाळेश्वर मंदिर, १२ वे शतक, हळेबिड, कर्नाटक


“ऋग्वेद काळात वरुणाचे महत्व कमी होऊ लागले होते. मग द्यौस् चा आणखी एक पुत्र – मित्र हा आकाशाचा देव म्हणून नावारूपास येऊ लागला. मग वरुणाला मित्राबरोबर आकाशाचे स्वामित्व वाटून घ्यावे लागले. मित्र दिवसाच्या आकाशाचा देव झाला, तर वरुण रात्रीच्या आकाशाचा देव झाला. मित्र-वरुण या देवांचा उल्लेख जोडीने येऊ लागला. सूर्य हा मित्र व वरुण यांचा डोळा मानला गेला. रात्रीच्या आकाशातील हजारो चांदण्या वरुणाच्या हेर होत्या. त्याचे हेर सर्वांवर बारीक लक्ष ठेवत असत. आणि वरुणाकडे रोजचे रोज reporting करत. जो खोटे बोलेल, सृष्टीचे नियम अर्थात ऋत् मोडेल, त्याच्यावर वरुण आपले पाश सोडून, त्यांना शिक्षा करतो असा समज होता.”, आबा सांगत होते.

“आबा, मग पुढे काय झाले ? मित्र हा एकटाच आकाशाचा देव झाला का ?”, सुमितने विचारले.


“काय झालं सुमित, ऋग्वेद काळात द्यौस् पुत्र इंद्रचे महत्व वाढले होते. मग वरुण आणि मित्राला मागे सारून इंद्र हा आकाश, पाउस, वादळ, वीज यांचा देव झाला. वज्र अथवा वीज हे त्याचे शस्त्र होते. जलप्रवाह अडवून दुष्काळ निर्माण करणाऱ्या वृत्र या सर्पाला इंद्र हरवतो आणि पाण्याचे प्रवाह मोकळे करतो, असे वर्णन ऋग्वेदात वारंवार येते. इंद्र पाऊस आणत असल्याने तो शेतकऱ्यांचा देव होता. अनेक असुरांशी शौर्याने लढणारा इंद्र, युद्धाचा सुद्धा देव होता. आणि युद्धात विजय देणारा देव होता.




ऐरावतावर आरूढ इंद्र, बांते सराय, १० वे शतक, कंबोडिया


“वैदिक काळात - मित्र, वरुण आणि इंद्र या तहाच्या देवता होत्या. करार करतांना, शपथ घेतांना वरुणाला साक्षी ठेवायची पद्धत आजही हातात पाणी घेऊन संकल्प सोडतांना दिसते. जो कोणी करार मोडेल, तो ‘मित्रद्रोह’ करतो. म्हणजे ‘मित्र’ या करार देवतेचा द्रोह करतो असे आजही म्हणले जाते.”, आबा म्हणाले.

“शंकरराव, पण आता तर इंद्राचे सुद्धा महत्व कमी झाले आहे. इंद्राचे मंदिर वगैरे दिसत नाही. ते का?”, दुर्गाबाईंनी विचारले.

“दुर्गाबाई, पौराणिक काळात इंद्राचा लहान बंधू विष्णू महान झाला. मग इंद्राची जागा विष्णूने घेतली. इंद्राचे महत्व कमी करण्यासाठी पुराणकथांमध्ये ‘पळपुटा इंद्र’, ‘डळमळीत आसन असलेला इंद्र’ अशी प्रतिमा निर्माण केली गेली. पण अजूनही, ‘देवांचा राजा’ म्हणजे इंद्र, ही त्याची ओळख कायम आहे. इंद्राचा, आकाशाचा आणि पावसाचा संबंध किती घट्ट आहे ते पावसात दिसणाऱ्या ‘इंद्रधनुष्य’ या शब्दातून दिसते.”, आबा म्हणाले.

“आबा, ही द्यौस् and Sons ची आकाश-देवांची भारतीय परंपरा झाली. भारताबाहेर पण आकाशाच्या देवाची संकल्पना होती का ?”, सुमितने विचारले.

“अरे संकल्पनाच काय ? देवतेचे नाव सुद्धा सारखे आहे. काय झाले सांगतो. कधीतरी वैदिक लोकात दोन गट पडले. पूर्वेकडचा गट इंद्राचे महत्व मानणारा. तर पश्चिमेकडचा गट वरुण हाच सर्वात मोठा देव मानणारा. आज सुद्धा पूर्व दिशेचा देव इंद्र, आणि पश्चिम दिशेचा देव वरुण आहे. पूर्वेकडे, अर्थात भारतात वरुणाचे महत्व कमी होत गेले. तर पर्शिया मधील वैदिक गटात ‘असुर वरुण’ हा सर्वश्रेष्ठ देव झाला. पारसी लोकांचा हा देव ‘अहुर मझदा’ या नावाने प्रसिद्ध झाला. असुर मझदा हा आकाशाचा देव, चांदण्यांच्या आकाशाची शाल पांघरतो! आणि मित्र / सूर्य हा त्याचा डोळा आहे! त्याची पूजा यस्न म्हणजे यज्ञाद्वारे अग्नीमध्ये आहुती देऊन करत असत.”, आबा म्हणाले.

“Quite interesting! आबा, ग्रीक आणि रोमन आकाश देवतेचे काय?”, सुमितने विचारले.

“सुमित, पर्शियाच्या पश्चिमेला आजच्या ग्रीस, तुर्की, इराक पर्यंतच्या भागात - द्यौस् पितृ हा Dyeus Phiter म्हणून पूजला जात असे. ग्रीस मध्ये तो ‘झ्यूस पॅटर’ झाला. इंग्रजी मध्ये ते नाव Zeus Pater / Zeus Father असे लिहिले जाते. झ्यूस हा ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव. झ्यूस मध्ये द्यौस् आणि इंद्र या दोन्ही देवांचे गुण दिसतात. निसर्गातील वादळे, गडगडाट, विद्युत्‌पात, पर्जन्य, आकाश या सर्वांवर झ्यूसची सत्ता चालते असा समज होता. तो स्वर्गाचा, आकाशाचा आणि सर्व देवांचा स्वामी होता. स्वर्गाचा सम्राट म्हणून झ्यूसने देवांचे नेतृत्व करून राक्षसांचा पाडाव केला. आणि त्याचे शस्त्र होते वीज!

“गंमत बघ सुमित! जसे द्यूस् चा पुत्र मित्र आहे, तसे झ्यूसचा मुलगा आहे अपोलो, अर्थात सूर्य! अपोलो हा सुद्धा ग्रीकांचा अतिशय लाडका देव होता.





झ्यूसची भग्न मूर्ती. दक्षिण तुर्कस्तान. ख्रिस्त पूर्व १ ले शतक


“त्या पलीकडे इटली मधील रोमन संस्कृतीमध्ये झ्यूस पॅटर सारखी देवता म्हणजे – ‘ज्यु पितर’, अर्थात Jupiter. ज्युपीटर हा सर्वश्रेष्ठ रोमन देव. ज्यूपिटर हा आकाशाचा आणि प्रकाशाचा देव. अवर्षणाच्या वेळी तो पाऊस आणणारा पर्जन्यदेव होता. त्यामुळे शेतकरी त्याची उपासना करीत असत. शिवाय तो विद्युल्लतेचा देव होता. त्याचे आयुध अर्थातच वीज! वादळाचा व विजेच्या कडकडाटाचा देव म्हणून तो पूजला जाई. ज्यूपिटरमुळेच युद्धात विजय मिळतो अशी रोमन लोकांची धारणा होती. इंद्र – वरुणाप्रमाणे तो सुद्धा शपथ, करार, तह यांचा देव होता. ज्यूपिटरच्या मूर्तीला हात लावून शपथ घेण्याची प्रथा रोमन लोकात होती. अजूनही ‘By Jove!’ हा वाक्प्रचार इंग्रजी मध्ये वापरला जातो, तो ‘ज्युपिटरची शपथ’ या अर्थाने!

“नंतरच्या काळात, ज्युपिटर बरोबरच मित्र देवाची उपासना युरोप मध्ये popular झाली. इसवी सनाच्या चौथ्या शतकापर्यंत इटली, जर्मनी, फ्रांस, स्पेन, इंग्लंड, सिरिया मध्ये मित्र पूजकांचा मोठा पंथ होता. या सर्व देशात आजही अनेक मित्र मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात.

“असो. इथे आणखी एका आकाशदेवाचे स्मरण करायला हवे. तो म्हणजे नॉर्स देव – थॉर! (Thor) ख्रिस्तपूर्व जर्मनी मधला हवामानाचा, वादळाचा आणि विद्युलतेचा देव. Thunder God! इंद्राने वृत्र या सर्पाला मारले, तसे या थॉरने World Serpent ला मारले अशी आख्यायिका आहे.”, आबा म्हणाले.





Still from Marvel film Thor: Ragnarok, 2017 


“वाह! काय अप्रतिम मालिका आहे ही आकाशाच्या देवांची. आबा युरोप मधले हे आकाश देव नंतर तिथल्या लोकांच्या विस्मृतीत गेले का ?”, सुमितने विचारले.

“काय झालं सुमित? पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्माचा उदय झाला होता. रोमन राज्यात या धर्माचा प्रचार आणि प्रसार पण सुरु झाला. प्रसार होण्यासाठी रोमन, नॉर्स, Druids, इत्यादी Pagan लोकांचे धर्मांतर करायचे होते. बर, या लोकांच्या आराध्य देवता होत्या - ‘आकाश पिता’ ज्युपिटर, त्याचा पुत्र अपोलो, अर्थात सूर्य आणि रोम मधील मित्रपूजकांचा देव - मित्र हा पण सूर्यच! ख्रिश्चन धर्माची स्पर्धा या अत्यंत लोकप्रिय देवतांशी होती.

“चौथ्या शतकापर्यंत ख्रिश्चन धर्मात अनेक मतेमतांतरे निर्माण झाली होती. त्यावेळी रोमन सम्राट कॉन्स्टनटीनने, नायसीया येथे पहिली धर्म परिषद बोलावली. या परिषदेत Trinity च्या संकल्पनेला मान्यता मिळाली. ज्या गटाचा Trinity ला विरोध होता, त्यांना हद्दपार करून त्यांनी लिहिलेलं एक एक पुस्तक मिळवून ते जाळण्यात आले. तर, ही Trinity म्हणजे – The Father, The Son and The Holy Spirit. यापैकी Father म्हणजे ‘आकाशातला पिता’, Son म्हणजे येशू ज्याच्यावर आतापर्यंत मित्राचे गुण आरोपित केले गेले होते, आणि Holy Spirit म्हणजे ज्या शक्तीद्वारे देव आपले कार्य करतो ते.


“कसे आहे, ज्या ज्यू धर्मात ख्रिश्चन धर्माचा जन्म झाला त्यामध्ये Trinity नाही. पण, या आकाश पिता पुत्रावर देवत्व बहाल केल्यामुळे युरोप मधील देवभोळ्या लोकांचे धर्मांतर करणे सोपे होणार होते. सामान्यजनांच्या लाडक्या देवता ख्रिश्चन धर्मात आल्या होत्या. लवकरच रोमन सम्राट कॉन्स्टनटीनचे धर्मांतर करून त्याला सुद्धा ख्रिश्चन धर्मात आणले आणि मग ख्रिश्चन धर्म युरोपभर पसरला.”, आबा म्हणाले.


“Wow! आबा, द्यौस to Father via Zeus and Jupiter हा प्रवास एकदम भारी आहे!”, सुमित म्हणाला.

“शंकरराव, आणि Trinity मधील तिसरे Holy Spirit म्हणजे देवाची ‘शक्ती’, असे समजायचे का?”, दुर्गाबाईंनी विचारले.

“दुर्गाबाई, या शक्ती बद्दल नंतर कधीतरी सविस्तर सांगेन.”, आबा म्हणाले.

पुन्हा एकदा आबांच्या खांद्याभोवती हात ठेवत सुमित म्हणाला, “आबा, ऋग्वेदपूर्व काळापासूनच्या द्यौस् पितृला खरेतर आकाशातला ‘आबा’ च म्हणायला हवे! द्यौस् पितामह की जय!”

 
संदर्भ -

१. Varuna and his decline – Shrinivas Rao

२. मराठी विश्वकोश, द्यौस्

३. वरुण देवता – अरूप बरत

४. Ancient History Encylopedia, Thor
 
५. Vedic Mythology – A. A. Macdonell

६. Religious History of Ancient India – Vol I
 
७. Encyclopædia Britannica, Zeus Oromasdes
 
८. TRINITY - 8. Kaufmann Kohler, 8. Samuel Krauss


- दिपाली पाटवदकर
@@AUTHORINFO_V1@@