
बलाढ्य अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी ‘ब्लूमबर्ग’चे मालक; ५० अब्ज डॉलरच्या मालमत्तेसह जगातली दहावी सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे अमेरिकन उद्योगपती, इंजिनिअर, लेखक, न्यूयॉर्कचे माजी महापौर मायकेल ब्लूमबर्ग यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अप्रत्यक्षपणे एक चपराक लगावली आहे. ब्लूमबर्ग यांनी नुकतीच पॅरिस हवामान कराराच्या अंमलबजावणीसाठी ४५ लाख डॉलर्सची मदत जाहीर केली. वास्तविक ब्लूमबर्ग यांचा आणि पॅरिस हवामानविषयक कराराचा थेट संबंध नाही. मात्र, काही महिन्यांपूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती आणि पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेकडून केली जाणारी मदत थांबवली होती. ’‘सरकार नाही तर मग आपण मदत करूया,’’ असं म्हणत ब्लूमबर्ग यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
हवामान बदल, जागतिक तापमान वाढ या संकटांना तोंड देण्यासाठी जागतिक सामंजस्य घडवून आणून प्रत्येक देशाने ठोस कृती कार्यक्रम आखावा आणि राबवावा, या हेतूने १२ डिसेंबर २०१५ रोजी पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत जागतिक करार करण्यात आला. या करारावर अमेरिकेसहित १९५ देशांनी सह्या केल्या होत्या. त्यावेळी बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. या करारामध्ये सर्व राष्ट्रांनी आपापलं कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचं मान्य केलं होतं. तसंच विकसित राष्ट्रांनी विकसनशील राष्ट्रांना प्रदूषण कमी करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. या करारातल्या सगळ्या अटी अमेरिकेने त्यावेळी मान्य केल्या होत्या, मात्र डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले आणि अमेरिकेने घूमजाव केलं. डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक तापमानवाढ वगैरे गोष्टी खोट्या मानणारे आहेत. जानेवारी महिन्यात त्यांनी पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडणार असल्याची अधिकृत घोषणा केली. पॅरिस करारानुसार अमेरिकेने दरवर्षी ‘ग्रीन डॉलर फंड’ अंतर्गत संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विभागाला ७५ लाख डॉलर इतकी आर्थिक मदत द्यायचं कबूल केलं होतं. मात्र, यावर्षी अमेरिकेने शब्द मोडला आणि फक्त ३० लाख डॉलरचीच मदत देऊ केली. ‘‘७५ लाख डॉलर ही रक्कम खूपच जास्त आहे,’’ असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र, त्याच अमेरिकेतले मायकेल ब्लूमबर्ग यांनी स्वत: ४५ लाख डॉलर्सची मदत जाहीर केली. ब्लूमबर्ग यांचं हे कृत्य पाहता त्यांना ‘कर्तव्यदक्षतेचा महामेरू’ असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वास्तविक ही ब्लूमबर्ग यांची जबाबदारी मुळीच नव्हती, पण त्यांनी आपल्या कृत्यातून ट्रम्प यांना चांगलीच चपराक लगावली आहे.
‘‘अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना शब्द दिला होता; पण सरकार जर शब्द पाळत नसेल तर एक नागरिक म्हणून तो शब्द पाळणं हे मी माझं कर्तव्य समजतो; माझी आर्थिक क्षमता असल्यामुळे मी सरकारने न दिलेली रक्कम स्वत: संयुक्त राष्ट्रांना देणार आहे,’’ असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ‘‘जागतिक तापमानवाढ या संकटाचा अमेरिका हासुद्धा एक मोठा भागीदार आहे. या संकटाचा सामना करायची मोठी क्षमतासुद्धा अमेरिकेत आहे. त्यामुळे अमेरिकेने या बाबतीत पुढाकार घेतलाच पाहिजे. अमेरिकेकडून टाळली जाणारी मदत आम्ही स्वत:च्या पैशांनी भरून काढू,’’ असंही त्यांनी म्हटलं. एका देशाने पाळायची जबाबदारी एका व्यक्तीने स्वत:वर घेणं, ही आजपर्यंतच्या इतिहासातली एक आश्चर्यकारक घटना म्हणावी लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॅरिस करारातून बाहेर पडायच्या निर्णयावर जगभरातून शाब्दिक टीका खूप झाली. पण, ट्रम्प हे कोणालाही न जुमानणारे आहेत. ‘‘मी अशी आशा करतो की, ट्रम्प आपलं धोरण बदलतील,’’ असंही ब्लूमबर्ग म्हणाले. ट्रम्प बदलतील की नाही ते येणारा काळच ठरवेल, पण या घटनेमुळे जगभरात ब्लूमबर्ग यांच्याबद्दलचा आदर वाढून ट्रम्प यांच्यासमोर स्वत:ची लोकप्रियता टिकविण्याचं आव्हान उभं राहणार आहे.’’
- हर्षद तुळपुळे