चिह्न निमित्त - सरस्वती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018   
Total Views |

Universal अथवा generic symbol, specific symbol आणि individual symbol यातला नक्की फरक आपल्या लक्षात आला. आता यातला चिह्नार्थ या नाम विषयी थोडेसे. याला Allegory असा इंग्लिश शब्द वापरला गेला. हा शब्द allegoria या मूळ ग्रीक शब्दाचे इंग्लिश नाम झाले. या मूळ ग्रीक शब्दाचा इंग्लिश अर्थ आहे speaking otherwise म्हणजे दिसते त्यापेक्षा वेगळेच काही सुचवणे.

चिह्न किंवा प्रतिक यामधे जे दिसते यापेक्षा वेगळेच काही असते. चिह्नाचा चिह्नार्थ, वेगळाच काही सूक्ष्मार्थ आणि गुढार्थ सांगतो. सिम्बॉल सगळ्यांना माहित असते, ते स्वतः च आपला अर्थ सांगू शकते. मात्र त्यासाठी त्याचा अभ्यास करावा लागतो.

लिहिलेले शब्द, केलेले प्रवचन आणि भाषण यांना शेवटी मर्यादा आहेतच आणि त्यातून नवन काही प्राप्त होत नसते. याचे कारण असे कि अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत वक्त्यांची अशी भाषणे अथवा विद्वानांची निरुपणे ध्वनिमुद्रित करण्याची सोय उपलब्ध नव्हती. यामुळेच लिहिलेले ग्रंथ कंठस्त करणे म्हणजे पाठांतर करणे आणि अशा लिखित शब्दांच्या सततच्या वाचनाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसे. हे काम फार कालव्यय करणारे होते. यामुळेच प्राचीन काळातील तत्वज्ञ आणि संशोधकांनी त्यांचे संशोधन आणि त्याचे आवर्तन – अध्यापन (योग्य विद्यार्थ्याला शिकवणे), विद्याहीन आणि अज्ञानी लोकांपासून सुरक्षित राहावे, त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये या धारणेने असे संशोधन आणि ज्ञानसंचय शाश्वत – चिरायू – चिरस्थायी बनेल याची दक्षता घेतली.

अशी दक्षता घेतली म्हणजे त्यांनी असे ज्ञान काही सिम्बॉल अर्थात चिह्नप्रतीकांचा वापर करून हे चिह्नांकित करून ठेवले. हे कसे केले, ते समजून घेणे फार महत्वाचे आहे. असे ज्ञानसंचय कुठेही लपवले गेले नाही, कुठेही अधृष्य केले गेले नाहीत...!!..आज भारतखंडात उपलब्ध हजारो संस्कृत ग्रंथांमधे; काही हजार देवळे आणि देवळांच्या कमानकला – अर्थवाही अंतर्गत रचनेमधे, हजारो लेण्यातील आणि गुंफातील चित्र आणि शिल्पांमधे, हजारो वास्तूंमधे – स्तंभांमधे आणि विषेशाने देव-देवतांच्या मूर्तींमधे हा ज्ञानाचा संचय परावर्तीत झाला-संचयित झाला...!!..अभ्यासाशिवाय तो कोणालाही सहज दर्शनाने वाचता येणार नाही, उमजणार नाही... मात्र उत्सुक अभ्यासू विद्यार्थ्याला तो निश्चितच वाचता येईल आणि उमजेल सुद्धा...!

पतंजली योगसूत्रातील चित्त आणि वृत्ती यावर भाष्य करताना स्वामी विवेकानंद म्हणतात, You are the only sentient being; mind is only the instrument through which you catch the external world. इथे त्यांनी जी only sentient being अशी शब्दावली किंवा अर्थपूर्ण शब्दसमूह वापरलाय तो फार महत्वाचा आहे. याचा अर्थ आहे ज्ञानेंद्रियांचा उपयोग करू शकणारा सजीव. ऐकलेले आणि वाचलेले शब्द आपल्या प्रत्येकाशी मनातल्या मनात बोलतात. मात्र जे अर्थ लिहिता किंवा सांगता येत नाहीत ते मनाच्या म्हणजे अर्थातच हृदयाच्या भाषेला समजतात आणि अक्षर अथवा श्राव्य नसूनही जे आपल्याला अभ्यासाने उमजतात ती असते चिन्हांची प्रतीकांची – Symbol ची भाषा.

असीम, अपरिमित, अनंत अशा वैश्विक संकल्पना कुठल्याही लिपीत शब्दांत लिहिता येत नाहीत. त्यांना शब्दार्थात सीमित करता येत नाही. कुठल्याही परिमाणात मांडता येत नाही. अशा संकल्पना पार्थिव म्हणजे मर्त्य मानवाच्या समजुतीसाठी चिह्न प्रतीकात मांडल्या गेल्या. समृद्ध शिल्पशैलीत, मूर्तीकलेत आणि अर्थवाही चित्रशैलीत चिरंतन झाल्या. अशी वैश्विक – चिरंतन चिह्न, अशी प्रतीके कधीही शब्दांसारखी (अर्थ समजल्यावर) नि: शेष होत नाहीत. चिन्हे आणि प्रतीके सतत कायम आपल्याला आव्हान देत रहातात. “तू समजतोयस तो अर्थ ठीक आहे पण माझ्यात अजूनही खूप काही समजण्यासारखे शिल्लक आहे.” असा इशारा देत राहतात.

चिन्हांचा – प्रतीकांचा अभ्यास करताना एखाद्या चिन्हाचे, विचारमग्न  चिंतनशील धारणेने सतत निरीक्षण केले जाते. चित्त आणि वृत्ती एका तालात, एका लयीत काम करू लागल्या की, मन म्हणजेच हृदयाला अशा चिंतनशील अवस्थेत चिन्हांचे अगणित अर्थसंकेत उलगडायला लागतात. असे चिह्नसंकेत उलगडणे याला निश्चितच खूप अर्थ आहे. अशा चिंतन-मननात, जुन्या चुकीच्या संदर्भांना स्मृतींच्या पाटीवरून पुसून टाकावे लागते (to unlearn) आणि नव्याने जाणवलेले संदर्भ आणि संकेत स्मरणपटलावर नव्याने लिहिता येतात (to relearn). मात्र चित्त+वृत्ती दोन्हींच्या एका लयीत येण्यासाठी, असा अनुभव घेण्यासाठी, निष्ठेने काही ध्यास धारण करावे लागतात...!

अशा चिंतन-मनन अनुभवाअंती, चिह्नांचे संकेत; रूपकं, दृष्टांत, अन्योक्ती म्हणजेच लपलेले सूक्ष्मार्थ – गूढार्थ जाणवू लागतात आणि असे गूढार्थ, दडवून ठेवण्यातले आणि त्याबरोबरच ते अभ्यासू विद्यार्थ्याला प्रकट करण्यातील नैपुण्य, कौशल्य लक्षात येते...!!..खरे सांगायचे तर हे सर्व श्रेय चिन्हांच्या त्या अनामिक निर्मात्यांना द्यायला हवे...!

अनेक चिह्न आणि प्रतीके मिळून एक संयुक्त प्रतिमा तयार होते. अशा संयुक्त प्रतिमेतील प्रत्येक चिह्नाला स्वतः चा एक संकेत आणि अर्थ असतोच. मात्र या चिह्नांचा एकमेकांच्या संयुक्तिक संदर्भात काही वेगळाच अर्थसंकेत मिळतो. विशेषकरून चित्र, शिल्प आणि मूर्तींमध्ये अंकित केलेल्या चिह्नांचा अभ्यास या पद्धतीने केला जातो. देवी सरस्वतीच्या अशा संयुक्त प्रतिमेचा या संदर्भासाठी आपण प्रथम विचार करूया. वाचकांना नक्की लक्षात येईल की ही चैतन्यदायी प्रतिमा पारंपारिक असून हिंदू धर्मनिष्ठेत सर्वमान्य आहे.



देवी सरस्वती


लक्षपूर्वक निरीक्षण करताना या प्रतिमेतील देवी सरस्वतीसह, तिच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात एक मोर, दोन्ही पायांजवळ दोन हंस आणि कमळाचे फूल अंकित झालेले दिसतात. या बरोबरच देवीला चार हात असून तीच्या उजव्या वरच्या हातात एक जपमाळ, डाव्या वरच्या हातात एक पुस्तक आणि पुढच्या दोन हातात देवीने वीणा धारण केली आहे हे लक्षात येते. यातील प्रत्येक चिह्न कशाचे तरी निश्चित प्रतिक आहे त्या चिह्नाला स्वतः चा अर्थसंकेत – दृष्टांत आहे. मात्र देवी सरस्वतीच्या विशिष्ट मुद्रेतील बैठकीसह या सर्व चिह्नांना विशेष संयुक्तिक अर्थसंकेत – दृष्टांत खूप वेगळा आहे.

चिह्नांचा आणि चिह्नसंकेतांचा एक वेगळाच अभ्यास करताना मानवी रूपातील देवता अथवा देव किंवा अन्य मानवी प्रतिमा आणि त्या प्रतिमेच्या हातात एखादी निर्जीव वस्तू अशा संयुक्त चिह्नांचा (Composite icon) निर्माण होणारा संकेत फार विलक्षण असतो. वरच्या प्रतिमेतील देवी सरस्वतीच्या हातातील वीणा, महादेवाचे अन्य रूप खंडोबाच्या हातातील खंड म्हणजे तलवार, विष्णूच्या उजव्या वरच्या हातातील सुदर्शनचक्र आणि उजव्या खालच्या हातातील गदा आणि न्युयॉर्क शहराच्या समोर समुद्रातील बंदरात उभी असलेली स्वातंत्र्यदेवता आणि तिच्या उजव्या हातातील उंच धरलेली तळपती मशाल ही अशाच काही वैश्विक आणि सर्वव्यापक संयुक्त चिह्नांचा चिह्नसंकेत आणि चिह्नार्थाची उत्तम उदाहरणे.


- अरुण दिनकर फडके
@@AUTHORINFO_V1@@