रोहिंग्यांचा १३५ राष्ट्रीय वांशिक गटात समावेश नसल्यामुळे व त्यांना नागरिकत्वाचे अधिकार नसल्यामुळे रोहिंग्या अनेक अधिकारांपासून वंचित आहेत.
१. म्यानमारमध्ये रोहिंग्यांच्या मुक्तसंचारावर बंधन आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या अनुमतीशिवाय ते गावाची सीमाही ओलांडू शकत नाहीत व रखिन राज्याअंतर्गत व बाहेरही संचार करू शकत नाहीत. मुक्तसंचारावर बंधन असल्यामुळे त्यांच्या रोजगारावर व व्यवसायावर त्याचा परिणाम होतो.
२. सैनिकी तळाची बांधणी व देखरेख, सैनिकांसाठी हमालीची कामे, मत्सशेतावर व इतर शेतजमिनीवर मजूर अशी कष्टाची कामे त्यांच्याकडून सक्तीने करून घेतली जातात व क्वचितच त्याचा मोबदला त्यांना दिला जातो.
३. सैनिकी तळ बांधण्याच्या सबबीखाली रोहिंग्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जातात. रोहिंग्यांना हाकलून किंवा ताब्यात घेतलेल्या जमिनीवर पॅगोडा, मठ, शासकीय इमारत बांधल्या जातात किंवा त्यावर बौद्धांना वसवले जाते. ह्याची परिणती उत्तर रखिन राज्याच्या लोकसंख्या बदलात होत आहे. १९५०च्या दशकात सुरू झालेली मुस्लिमांच्या बळकावलेल्या जमिनीवर रखिन बौद्धांना वसवण्याची ही प्रक्रिया 'आदर्श गाव' म्हणून ओळखली जाते. १९९७ पर्यंत जवळजवळ १०० आदर्श गावे स्थापन करण्यात आली आहेत.
४. रोहिंग्यांची मुलांना प्राथमिक शिक्षण घेण्यास परवानगी आहे, पण माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेण्यास अनुमती नाही. ते कुठल्याही शासकीय नोकरीसाठी अर्ज करू शकत नाहीत; तसेच संपूर्ण आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासही मज्जाव आहे.
५. लग्न करण्याआधी रोहिंग्यांना राज्याची अधिकृत अनुमती घेणे बंधनकारक आहे. माँगडाँव व बुथिडाँग ह्या बांगलादेश सीमेलगतच्या ९५% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या उपनगरात रोहिंग्यांच्या बहुपत्नीत्वावर बंदी आहे. दोनपेक्षा जास्त मुल होऊ देणार आहे असे शपथपत्र त्यांना द्यावे लागते.१
६. रोहिंग्यांना नवीन प्रार्थनास्थळ बांधण्यास अनुमती नाही व विद्यमान असलेल्या मशिदींच्या दुरूस्तीसाठी परवानगी मिळणे फारच कठीण असते.
७. पारंपारिक मुस्लिम सुट्ट्या साजऱ्या करण्यावरही निर्बंध आहेत व जमावबंदीही आहे.२
रोहिंग्यांवर २ अपत्यांचे बंधन असूनही बांगलादेशाच्या सीमेजवळ व किनारपट्टी भागात मुस्लिमांची लोकसंख्या ८०-९६% पेक्षा जास्त आहे. २०१२ च्या दंगलीनंतर घेण्यात आलेल्या विविध स्थानिक सर्वेक्षणानुसार म्यानमारबाहेर राहणाऱ्या रोहिंग्यां विस्थापितांचा समावेश रखिन राज्यात केल्यास रोहिंग्यांची लोकसंख्या अंदाजे ६२.७% इतकी होईल.३
रखीन राज्य-प्रवक्ता विन म्येंग अनुसार रोहिंग्या मुस्लिमांच्या लोकसंख्यावाढीचे प्रमाण रखीन बौद्धांच्यापेक्षा १० पटीहून जास्त आहे. ८ लक्षाहून अधिक रोहिंग्या बांगलादेशातील निर्वासित छावण्यात राहत आहेत. ज्या निर्वासित छावण्यात लहान जागेसाठी मारामारी चालते तेथेही रोहिंग्या कुटूंबनियोजनाच्याविरुद्ध आहेत. कारण काही रोहिंग्या महिलांनी सांगितल्याप्रमाणे कुटूंबनियोजन पाप आहे व काहींनी 'एएफपी'ला सांगितल्यानुसार कुटूंबनियोजन किंवा संततीनियमन हे इस्लामी-तत्वाच्याविरुद्ध आहे. काही पालकांना १९ अपत्य आहेत व बऱ्याच रोहिंग्यांना एकापेक्षा जास्त बायका आहेत. त्यामुळे कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, औषधे इत्यादी संततीनियमनाचे उपाय फोल ठरल्यावर आता बांगलादेश सरकार महिलांसाठी कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया व पुरूषांची नसबंदी हे उपाय अमलात आणण्याचा विचार करत आहे. ४
संदर्भ :
१. गोडबोले, डॉ.श्रीरंग; बौध्द-मुस्लिम संबंध- आजच्या संदर्भात, तक्षशिला प्रबोधिनी प्रकाशन, २००९, पृष्ठ ११५ ते ११७
२. Ahmed, Fayas. The Situation of Rohingya from the Burma’s Independence up to the present, Kaladan Press Network, 20 July 2007
३. Rohingyas – Myanmar Following Ethnic Cleansing, Islamic Voice, 15 October 2017
४. Bangladesh to offer sterilisation to Rohingya in refugee camps, The Guardian 28 October 2017
- अक्षय जोग