नुकतीच शाळांची परीक्षा संपली आहे. दिवसेंदिवस ऊन वाढत चाललयं, सूर्य नुसता आग ओकतोय. मात्र त्याहूनही महत्वाचं म्हणजे आता लहान मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या या खूप महत्वाच्या असतात. कारण तेव्हा आपल्याला ती जाणीव जरी नसली तरी खरंच एका ठराविक काळानंतर आपल्याला ही सुट्टी परत कधीच अनुभवता येणार नसते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मनसोक्त जगायंच, नुसती धम्माल, गप्पा, मज्जा, मामाच्या गावाला महीनाभर जाणं, आज्जी आजोबांच्या गोष्टी, लाड, आईस्क्रीम, खाऊ, पत्ते आणि भरपूर काही. आज याच उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण एक चक्कर मारून येवूयात.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते मामाचं गाव. "झुकु झुकु झुकु झुकु अगीन गाडी, धुरांच्या रेशा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जावूया." अगदी हेच दृश्य आपल्या डोळ्यांसमोर जीवंत होतं. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची धम्माल असायची. सुट्टी लागली रे लागरी की मामाकडे कधी जातो असं व्हायचं. आज्जी आजोबांचे भरपूर लाड, मामीने केलेला खाऊ, भावंडांसोबतची धम्माल, एकत्र आमरस करणे, मनसोक्त चिंचा आणि कैऱ्या पाडणे, आंबे खाणे, गावभर फिरायला जाणे, शेतावरची मज्जा आणि पहाटे उठून पोहायला जाणे. अशा कितीतरी जमती जमती अनेकांनी लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत केल्या असणार.
गावाकडची माती :
त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत 'समर कॅम्प' किंवा 'शिबिरं' वगैरे प्रकार नसायचा. महिलांना देखील मुलांच्या निमित्ताने का होईना, महीनाभर माहेरी रहायला मिळायचे. रात्री गच्ची वर चांदण्या मोजत, गार हवेत झोपण्याची मजा कुणी कुणी अनुभवली आहे? बदाम सात, मेंढीकोट, पाच तीन दोन, सात - आठ, चूप, गुलाम चोर आणखी अगदीच कच्चा लिंबू असलेल्यांचा खेळ म्हणजे भिकार सावकार असे किती तरी पत्त्यांचे खेळ शिकायला मिळायचे या उन्हाळ्याच्या सुट्टीत. यामुळे सख्या चुलत, आते मामे भावडांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हायचे. तेव्हा फॅन्सी हॉलिडे पॅकेज नसतील कदाचित, मात्र मामीच्या हातच्या लाडवांनी आणि शेतावरच्या गार हवेनीच वर्ष भराचा सगळा शीण निघून जायचा. आजोबा पेट्या भरून हापूस आणून ठेवत असत आणि आजी, मामी, आई या मिळून त्याचा रस करत, मामी माहेरी गेल्यावर तिच्या माहेरी देखील सगळं सारखंच. त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपलेपणाच्या होत्या, सहवासाच्या होत्या आणि मायेच्या होत्या.
भावंड आणि व्हिडियो गेम्स :
९० च्या दशकातील शहरी मुलांची कथाही काही फार वेगळी नाही. त्यावेळी नवीनच 'व्हिडियो गेम्स' आले होते. यामध्ये कार रेसिंग पासून, मारियो बॉस पर्यंत किती तरी खेळ असायचे. भाड्याने व्हिडियो गेम आणून खेळायचा जणू त्याकाळी ट्रेंडच सेट झालेला असायचा. या व्हिडियोगेम पायी भावंडांमध्ये अक्षरश: भांडणं व्हायची. मग आई सगळ्यांना वेळ वाटून द्यायची. एकाचे खेळणे होत असताना बाकीचे खेळ बघतील. गम्मत अशी की आताच्या मोबाईलवरच्या गेम्स प्रमाणे ते एकाकी नसायचे, या व्हिडियोगेम्सची मज्जा सगळीच भावंड घेत असत. दुपारी आई हातात रस्ना, लिंबू सरबत, कोकम सरबत, अशा अनेक प्रकारच्या शीतपेयांचा ग्लास द्यायची आणि भावंड मंडळी भर दुपारच्या उन्हात बाहेर जायचे नाही म्हणून घरीच, नाव गाव वस्तु प्राणी, शब्दकोडे, पत्ते असे अनेक खेळ खेळत बसायची. मग संध्याकाळी भरपूर मैदानी खेळ. सोसायटी मधील सर्वच मुले एकत्र येवून डब्बा ऐस पैस, चोर पोलिस, लगोरी असे किती तरी खेळ खेळायचे. रात्री ९ वाजता अखेर आयांना ओढत आपल्या लेकरांना घरी आणावे लागायचे. कधी कधी तर रात्रीचे जेवण एखाद्या मित्राकडे मैत्रीणीकडे असायचे, तर कधीतरी सगळा बालचमू आपल्या घरी. घरातली माऊली त्या दिवशी सर्वच पिल्लांची आई असायची.
व्ही.सी.आर आणि सिनेमाची गम्मत :
तेव्हा डिश टी.व्ही. नव्हते, सी.डीज नव्हत्या, कम्प्यूटर देखील सर्रास सगळ्यांकडे नसायचे. अशा वेळी घरच्या टी.व्हीवर व्हीसीआर कॅसेट आणून सिनेमा बघणे म्हणजे एक मोठा कार्यक्रम असायचा. आई बाबा, दादा ताई, मामा मावशी काका, आत्या, आज्जी आजोबा... झाडून सगळे बसायचे. चिवड्याची ताटं आणि सगळ्यांसाठी लिंबू सरबत. मज्जाच असायची. आता चित्रपट मोबाईलमध्ये ही डाऊनलोड करता येतो, एकांतात एखाद्या सीन वर आपण हसतो, मात्र पुन्हा त्या सीनवर आत्याची काय प्रतिक्रिया होती असे आठवून पहिल्यापेक्षाची मोठ्यानं हसण्याची मजा मात्र घेता येत नाही.
वहीच्या कोऱ्या पानाच्या नव्या वह्या, चित्रकला आणि भरपूर कलाकारी आणि कल्लाकारीही :
शाळेच्या वह्यांमध्ये कोऱ्या राहिलेल्या पानांना व्यवस्थिती फाडून त्याला शिवून त्याची नवीन वही करण्याचा उद्योग त्यावेळी सगळ्याच घरांमध्ये होत असत. काही वह्या 'होम वर्क' साठी असायच्या. काहीमध्ये 'तुला आवडेल ते कर' अशी मुभा असायची. अशा वेळी आत असल्या नसलेल्या सर्व कला एकदम उतू जायच्या. चित्रकला, कॅलीग्राफी, अक्षर सुधारणे अशी बरीच कलाकारी या वह्यांमध्ये व्हायची. आणि मग "आई बघ दादाने माझी वही घेतली", "आई बघ चिनूने माझी वही खराब केली." अशी कल्लाकारी देखील बघायला मिळायची.
जेवणात टरबूज, खरबूज आणि आंबे :
उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी कधी रात्रीचे जेवण म्हणजे टरबूज पार्टी असे ठरले असायचे. कोणाच्या फोडीतून किती बिया निघतात याची पैज लागायची. संपूर्ण शरीर बरबटेपर्यंत आंबे खायचे असा अलिखित नियमच होता घरातला. खरबूजांचे देखील तेच. परिस्थिती कशीही असो नातवंडांचे लाड पुरवण्यासाठी आजी आजोबा कधीही काहीही कमी पडू देत नसत. आता काही घरांमध्ये आजी आजोबाच नाहीत, तर काहींमध्ये त्यांना देखील मोबाईल घेवून देण्यात आले आहेत. त्यांची इच्छा असो वा नसो नातवंडांचा बराचसा वेळ त्यांच्याच मोबाईलवर गेम खेळण्यात जातो. आणि ते.... त्या इवल्याशा डब्यात एवढं काय आहे या कुतुहलापायी केवळ त्या मोबाईलवर खेळणाऱ्या पिल्लांकडे बघत बसलेले असतात.
जाने कहाँ गये वो दिन :
असे एक नाही अनेक अनुभव आहेत. मात्र यातून सगळ्या जास्त काय जाणवतं माहितीये? आधी यामुळे आपसातील सहवास वाढायचा. संवाद, प्रेम, जिव्हाळा या कितीतरी शब्दांचा अर्थ लागायाचा. आते मामे भावंडामध्ये वाढल्यामुळे, त्यांच्यासोबत ही अशी सुट्टी दरवर्षी अनुभवल्यामुळे केवळ आपल्याला "अटेंशन" मिळायला हवं अशी भावना ही त्यावेळी मनात येत नसत. त्या काळचे लेटेस्ट गॅजेट्स म्हणजेट टी.व्ही आणि व्हिडियो गेम्स असायचेच हातात. मात्र मिळून वापर केल्यामुळे आपल्यातलं थोडं समोरच्याला देण्याची वृत्ती विकसित व्हायची. केवळ १० वर्षांआधी पर्यंत देखील चित्र आजपेक्षा खूप वेगळं होतं. पालकांना आपल्या मुलाला सुट्टीचा आनंद घेता यावा असं वाटायचं, त्यानं ऑलराउंडर झालंच पाहीजे असं नाही. मुलांना देखील त्या व्हिडियोगेम्सचं व्यसन नसायचं कारण त्याची वेळ मर्यादा ठरवून देण्यात आली असायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाला माणसं हवी असायची. आते मामे भावंडांची आतुरतेनं वाट बघणारी मुलं असायची. मामीला स्वत:च्या माहेराची ओढ लागली असतानाही स्वत:च्या लेकरापेक्षा जास्त लाड भाचे कंपनीचे व्हायचे. आपल्या एक महिना थांबण्याने यांना त्रास तर होणार नाही ना असा विचार आईच्या मनात यायचा नाही आणि बापरे नणंदबाई एक महिना येणार असा विचार भावजयेच्या मनात देखील यायचा नाही. वर्षभर आपल्या परिवारासाठी पैसा साठवणारा मामा या उन्हाळ्याच्या सुट्टीत लाड करताना कधीच मागे पुढे बघायचा नाही, कारण माणसाला माणसं हवी होती.
मोबाईल गरजेची वस्तु असताना संपूर्ण सुट्टी त्याच्या गेम्स मध्ये जाणं हे लहानपणीच्या सुट्टीला बघता खूप भितीदायक वाटतं. तंत्रज्ञानानं आपल्याला खूप काही दिलं. मात्र ही उन्हाळ्याची सुट्टी हिरावून घेतली ते मात्र खरं...
- निहारिका पोळ