काही दिवसांआधी बाघी -२ या चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर चित्रित करण्यात आलेलं गाणं "एक - दो - तीन" आलं. आणि एकच सगळीकडून या गाण्याविषयी चर्चा झाली. त्याचं मुख्य कारण होतं, त्या गाण्यातील नाचाची आणि तेजाब चित्रपटातील "एक दो तीन" या गाण्यावरील माधुरी दीक्षितच्या नाचाची आपसात तुलना. १९८८ मध्ये जेव्हा तेजाब हा चित्रपट आला त्यावेळी या एका गाण्यामुळे माधुरीला एक वेगळी ओळख मिळाली जी आज तागायत कायम आहे. या गाण्याला ऐकलं की आजही "मोहिनी मोहिनी" म्हणत माधुरीची एंट्री डोळ्यांपुढे येते. त्यानंतर जॅकलीनचे नृत्य बघितले तर तो केवळ "स्किन शो" वाटतो या व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. यावर ट्विटर आणि फेसबुकवर चर्चा ही रंगली. माधुरीच्या अदा जॅकलिन मध्ये येणं कसं शक्य आहे, अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स वाचायला मिळाल्या. मात्र यावरुन पुन्हा एकदा लक्षात आले की सध्या कुठल्याही चित्रपटाच्या प्री पब्लिसिटीसाठी जुन्या गाण्यांचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. प्री पब्लिसिटीचा हुकमी एक्का म्हणून आता जुनी गाणी नवीन स्वरूपात येत आहेत.
नवीन पिढीला जरी ही गाणी आवडत असली तरी एक मोठा प्रेक्षक वर्ग असा देखील आहे, ज्यांनी ८० - ९० च्या दशकातील अजरामर गाणी अनुभवलेली आहेत. त्यांच्या कानांवर तम्मा तम्मा लोगे पडले तर त्यांना माधुरीच आठवणार आलिया भट्ट नाही. तरी देखील जुन्या गाण्यांचा ट्रेंड आपल्याला सर्रास आताच्या चित्रपटांमध्ये बघायला मिळत आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे यामुळे सिनेमाच्या प्रचाराला खूप मोठा हात भार लागतो.
चित्रपटाची परिस्थिती, काळ आणि कलाकार सगळेच भिन्न असताना हा प्रयोग यशस्वी ठरेल का?
अशा पद्धतीचे अधिकांश प्रयोग फसवे ठरले त्याचे मुख्य कारण म्हणजे जुन्या गाण्यांचा वापर ज्या चित्रपटात करण्यात आला होता, त्या चित्रपटाचा काळ वेगळा होता. कथेच्या गरजेनुसार गाणी ठरविली जायची. त्यांचे संगीत आणि नृत्य दिग्दर्शन देखील तसेच असायचे. मात्र आताच्या काळात केवळ पब्लिसिटीच्या दृष्टीने या गाण्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे संपूर्ण काळच वेगळा असल्याने, तसेच चित्रपटातील परिस्थिती वेगळी असल्याने आणि कलाकारही वेगळे असल्याने हा संपूर्ण प्रयोग यशस्वी ठरेलच असे नाही.
चित्रपटाचाच जर रीमेक करायचा ठरवला तर गाणी तशीच्या तशी घेतल्यास कदाचित वावगे वाटणार नाही, मात्र अचानक अनेकदा जुन्या गाण्यांचा नवीन वापर उगाच केल्यासारखा वाटतो.
तम्मा तम्मा ते हम्मा हम्मा
१९९० मध्ये आलेला चित्रपट "थानेदार" यामधून प्रसिद्ध झालेले तम्मा तम्मा लोगे हे गाणे माधुरी दिक्षीत हिच्यावर चित्रित करण्यात आले होते. माधुरीचे नृत्य आणि तिचे हाव भाव खूप जीवंत असायचे, त्यामुळे या गाण्यावर तिचीच छाप होती. तसेच अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहरी यांनी गायलेलं हे गाणं त्याकाळी खूप प्रसिद्ध झाले होते. मात्र गेल्यावर्षी आलेल्या बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटातून पु्न्हा एकदा हे गाणे आले. हे गाणे "आलिया भट्ट" आणि "वरुण धवन" यांच्यावर चित्रित करण्यात आले. याला मात्र प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. संजय दत्त, माधुरी दिक्षीत आणि बप्पी लहरी यांनी स्वत: या नव्या गाण्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिसाद दिला. त्यामुळे सिनेमाच्या पब्लिसिटीसाठी याचा उत्तम उपयोग करण्यात आला. मात्र प्रत्येकाच गाण्याला असा प्रतिसाद मिळेलच असे नाही.
९० च्या दशकात 'बॉम्बे' या चित्रपटातून गाजलेले गाणे "हम्मा हम्मा" पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आले 'ओके जानू' या चित्रपटातून. गम्मत अशी आहे की, या गाण्याचे सुद्धा संगीत संयोजन "ए. आर. रेहमान" यांनीच केले. तरी देखील पहिल्या हम्मा हम्माची सर या गाण्याला आली नाही असे सोशल मीडियावरुन प्रेक्षकांचे मत झाले. मात्र यूट्यूबवर उत्सुकता पोटी का होईना या गाण्याला २२३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आवडत असेल किंवा नसेल मात्र यामुळे सिनेमाची मात्र चांगलीच प्रसिद्धी होते.
हे असे केवळ एक दोन नाहीत तर अनेक उदारहणे आहेत. काही दिवसांआधी अब्बास मस्तान यांच्या मुलाला 'लाँच' करणारा "मशीन" हा चित्रपट येवून गेला. हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कळालेच नाही. मात्र या चित्रपटाचे केवळ एक गाणे खूप प्रसिद्ध झाले ते म्हणजे "तू चीझ बडी है मस्त मस्त". १९९४ मध्ये आलेल्या मोहरा या चित्रपटातून हे गाणे प्रसिद्ध झाले होते. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गण्याला त्याकाळी खूप प्रसिद्धी मिळाली. त्या गाण्याच्या 'रीमेक' मुळे या चित्रपटाला प्रसिद्धी मिळाली.
हा प्रयोग यशस्वी झाल्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे रेड चित्रपटातील "सानु इक पल चैन न आवे सजना तेरे बिना" हे गाणं. या गाण्याला सोशल मीडयावर उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच अनेकांना नवीन वर्शन जुन्याही पेक्षा जास्त आवडलं अशी प्रतिक्रिया रसिक प्रेक्षकांनी नेंदवली. त्याचे एक कारण चित्रपटात परिस्थितीला साजेसे हे गाणे होते.
२०१६ मध्ये आलेल्या काबिल या चित्रपटात देखील जूली या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे "दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाये" या गाण्याचे रीमेक वर्शन वापरण्यात आले होते. मात्र त्याचा वापर देखील निव्वळ पब्लिसिटीसाठीच करण्यात आला. विशेष म्हणजे प्रत्यक्ष चित्रपटात हे गाणे वापरण्यातच आले नाही.
२०१३ मध्ये अक्षय कुमारच्या बॉस चित्रपटात देखील ८० च्या दशकातील प्रसिद्ध गाणे "हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार झिंदगी में" या गाण्याचा वापर चित्रपटात्या पब्लिसिटीसाठी करण्यात आला होता. अशी एक नाही अनेक गाणी आहेत. सनी लेओनीचे लैला मैं लैला गाणे असू देत नाही तर क्वीन चित्रपटातील हंगामा हो गया. यादी खूपच मोठी आहे.
मुद्दा असा आहे की म्हणतात ना जुनी फॅशन परत येतेय. तसेच काहीसे झाले आहे. आता पुन्हा जुन्या गाण्यांना नवे कोरे दागिने घालून तयार करावे तसे थोडे नवीन संगीत देवून किंवा, थोडे फार शब्दांमध्ये बदल करून प्रदर्शित करण्यात येतं. तसा एक ट्रेंडच सेट झाला आहे. नुकतीच एक घटना घडली बाघी -२ बघायला गेल्यावर "एक दो तीन" या गाण्यावर जॅकलीन समोर आल्या आल्या लोकांनी "माधुरी माधुरी" ओरडण्यास सुरुवात केली. आणि क्षणार्धात संपूर्ण सिनेमागृह माधुरीच्या नावाने दुमदुमले. त्यामागचे कारण असे की त्या गाण्यासोबत तिची ओळख जोडली गेली आहे. त्यामुळे कितीही प्रेक्षकांना जुन्या गाण्याची आठवण करुन देण्यासाठी किंवा कशाहीसाठी म्हणा जुन्या गाण्यांचा वापर प्री पब्लिसिटीसाठी केला तरी जुन्या गाण्याची सर, त्यातील अदांची सर नवीन गाण्याला येईलच असे नाही.
नवीन पिढीतील "मोह मोह के धागे" किंवा "बोल ना माही बोल ना" सारखी गाणी अतिशय सुंदर आहेत. जुन्याचा वापर केवळ पब्लिसिटीसाठी करणे कितपत योग्य आहे, ते चित्रपटनिर्माते आणि दिग्दरर्शकांनी ठरवावे. मात्र आमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर एक दो तीन म्हटले की माधुरीच येते आणि हम्मा हम्मा म्हटले की सोनाली बेंद्रेच.
चित्रपट सृष्टीत अनेक मातब्बर कलाकार आहेत. नवीन पिढी तयार झाली आहे. अरिजीत सिंह, श्रेया घोषाल, सोना मोहापात्रा यांच्या सारखे गायक तयार झाले आहेत. नवीन कलाकृती देखील घडतातच आहेत त्यात वाद नाही. तसेच जुन्या कलाकृती पुन्हा येतायेत यात चुकीचे काही नाही. मात्र चित्रपट सृष्टीला आणखी नवनवीन कलाकृती दिल्यास जुन्याचे महत्व देखील तसे राहते आणि नव्याचे महत्व नव्याने तयार होते.
जुनी गाणी वापरून तयार करण्यात आलेल्या काही नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडल्या. मात्र अशा कलाकृतींचा वापर करण्यामागे केवळ प्री पब्लिसिटी हे उद्येश्य नसावे. पटकथेची गरज असल्यास, किंवा अतिशय उत्तम कलाकृतीमध्ये खूप बदल न करता त्याचे माधुर्य तसेच ठेवत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशी गाणी निवडल्यास प्रेक्षकांचा त्याला आणखी चांगला प्रतिसाद मिळेल.
कसं असतं लिंबाचे लोणचे जितके जुने असेल तितके अधिक चांगले लागते, त्या प्रमाणेच आंब्याच्या नवीन लोणच्याच्या करकरीत फोडींची मजा देखील वेगळी असते. दोन्हींची चव घेतल्यास जेवण आणखी चवदार होते नाही.. या गाण्यांचेही तसेच आहे...
- निहारिका पोळ