#Savetheelephantday करूयात हत्ती वाचवण्याचा संकल्प..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018   
Total Views |



जंगलाचा राजा जरी वाघ, सिंह असला तरी जंगलाचे खरे महत्व त्याच्या सगळ्यात मोठ्या प्राण्यामुळे म्हणजेच हत्तीमुळे असते. मात्र आज वाघांप्रमाणेच या हत्तींना देखील वाचवण्याची वेळ आली आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अफ्रीकेतील हत्तींची संख्या दशलक्षांमध्ये होती तर आशिया खंडातील हत्तींची संख्या १ लाखाहून अधिक होती. मात्र आता ही संख्या आफ्रीकेत ४-५ लाख आणि आशिया खंडात ३५-४० हजारांपर्यंत येवून पोहोचली आहे. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे आज "सेव्ह द एलिफंट डे" आहे.
 
 
 
 
 
भारत सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार २०१७ मध्ये भारतात २३ प्रदेशांमध्ये केवळ २७ हजार ३१२ हत्ती उरले आहेत. गेल्या ५ वर्षांमध्ये हत्तींच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. २०१२ मध्ये ही संख्या ३१७११ होती. भारतात कर्नाटक येथे हत्तींची संख्या ६०४९ आहे, तर आसाम येथे ५७१९, केरळ येथे ३०५४ आहे. तर भारताच्या पूर्वोत्तर भागात हत्तींची संख्या १०१३९ आहे. तसेच पश्चिम भागात ३१२८ आणि उत्तरेत २०८५ आहे. दिवसेंदिवस हत्तींच्या संख्येत घट होण्यामागे काय कारण आहे?

 
 
 
हवामान बदल, हत्तींची तस्करी आणि बरंच काही :

वर्ल्ड वाईल्डलाईफ ऑर्गनाझेशनच्या एका अहवालानुसार भारतात दर वर्षी हत्तींची संख्या १० टक्क्यांनी कमी होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये वाढ झाली आहे. त्याचे मोठे कारण हवामान बदल आणि हत्तींची तस्करी देखील असल्याचे सांगण्यात येते. भारतात हस्तीदंत म्हणजेच "हत्तीच्या दातांचे दागीने" खूप प्रसिद्ध आहे. तसेच हत्तीच्या चामड्यापासून अनेक वस्तु तयार करण्यात येतात. यावर भारत सरकारतर्फे प्रतिबंध लावण्यात आलेले आहेतच. मात्र तरी देखील भारतात दिवसेंदिवस हत्तींची संख्या कमी होत आहे, त्यामागे आणखी काय कारण असेल असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरीकरण, हत्तींच्या घरांवर माणसाचे आक्रमण :

हत्ती भारतासाठी आणि आशिया खंडासाठी केवळ एक सांस्कृतिक ओळखच नाहीत तर ते भारतातील आणि गवताळ प्रदेशाच्या वास्तव्याचा अखंडपणा टिकवून ठेवण्यास मदत करतात. भारतातील वाढत्या शहरीकरणामुळे जंगलांच्या जागी सीमेंटचे जंगल उभे रहायला लागले आहे. असे करत असताना मनुष्य हत्तींच्या घरांवरच आक्रमण करत आहे, हे त्याला जाणवत नाही. भारतात हत्तींची संख्या कमी होण्याचे मोठे कारण म्हणजे शहरीकरण देखील आहे.या शहरीकरणाचा मोठा परिणाम असा की हत्ती खाद्याच्या शोधात सरळ शेतकऱ्यांच्या शेतात शिरून लाखोंची नास-धूस करतात. हत्ती हा मोठा आणि अजस्त्र प्राणी असल्याकारणाने त्याला आवर घालणे कठीण असते, आणि आवर घालण्याच्या त्या प्रक्रियेत अनेकदा हत्तींना इजा होते, किंवा त्यांचा मृत्यु देखील होतो. केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक येथे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.

हत्तींवर होणारे अत्याचार :

असे म्हणतात जंगल सफारी, किंवा जंगलातील पर्यटनात सगळ्यात मोठे आकर्षणाचे केंद्र हत्तीच असते. हत्तीवर बसून वाघ बघणे म्हणजे कान्हा आणि बांधवगढ अभयारण्यातील मोठा आकर्षण बिंदू. तसेच आता सरकशीत प्राण्यांच्या वापरावर बंदी आली, मात्र इतके वर्ष हत्ती सारखा प्राणी सरकशीची 'जान' असायचे असे म्हणणे ही वावगे ठरणार नाही. तसेच विविध प्राणी संग्रहालयांमध्ये देखील हत्तीचे विशेष महत्व असते. मात्र आपल्या मजेसाठी करण्यात येणाऱ्या हत्तीच्या सफरीमुळे त्यांना मात्र मोठ्या अत्याचारांना सामोरे जावे लागते.




हत्तींच्या पायांमध्ये मोठ्या मोठ्या साखळ्या बांधण्यात येतात. त्याचे कारण केवळ इतकेच की हत्ती पळून जावू नये. मात्र त्याला यामुळे अशक्य यातना होतात. तसेच होणाऱ्या जखमांमुळे अनेकदा त्याच्या अंगात जंतूसंसर्ग होतो, ज्याचा परिणाम पुढे मृत्यूतही होतो.

अशा प्रकारच्या कामांसाठी, हत्तीच्या सफरीसाठी हत्तीला त्याच्या कळपापासून वेगळं करण्यात येतो. एका सर्वेक्षणात असे सिद्ध झाले आहे की हत्ती हा एक खूप भावनिक प्राणी असतो. त्यामुळे त्याला त्याच्या कळपापासून विभक्त केल्याने त्यावर त्याचा भावनिक परिणाम होतो. त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. हत्तींसाठी हे खूप यातनादायी असते.




भारतामध्ये हत्तींच्या संरक्षणासाठी करण्यात आलेले उपाय :





द एलिफंट टास्क फोर्स :

भारतात हत्तींच्या संरक्षणासाठी अनेक उपाय करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक आहे "एलीफंट टास्क फोर्स". भारत सरकारतर्फे या टास्क फोर्सच्या माध्यमातून हत्तींसाठी वनविभागाला येणार खर्च, त्याती तरतूद, हत्तींच्या तस्करीची प्रकरणे त्यावर केली जाणारी कावाई, तसेच हत्तींच्या संरक्षणासाठी करण्यात येणारे उपाय यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते.

प्रोजेक्ट एलिफंट :

तसेच यासाठी प्रोजेक्ट एलिफंट देखील सुरु करण्यात आले आहे, ज्यामाध्यमातून हत्तींच्या संरक्षणासाठी त्यांच्यासाठी अनुकूल हवामान तयार करण्यासाठी काम करण्यात येते. तसेच हत्तींच्या संरक्षणासंदर्भात जागरुकता कार्यक्रम देखील ठिकठिकाणी आयोजित करण्यात येतात. याची सुरुवात १९९२ मध्ये करण्यात आली होती. 
 
 
सुजाण नागरिक म्हणून हत्तींच्या संरक्षासाठी आणि संवर्धनासाठी आपण शक्य ते पाऊल उचलणे आवश्यकच आहे. हत्तींच्या पाठीवर सफर टाळणे, किंवा पर्यटन क्षेत्रात हत्तीला ईजा न होवू देणे, पर्यावरण आणि प्रदूषणाची काळजी घेणे तसेच हस्तीदंताचे दागिने विकत न घेणे अशा काही गोष्टी वैयक्तिक पातळीवर आपण करु शकतो. माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्या जगातील या प्राण्यांचे संरक्षण देखील तितकेच आवश्यक आहे, ही बाब आता लक्षात घेण्याची वेळ आली आहे, ते न केल्यास एक दिवस मनुष्य संवर्धनाविषयी जागरुकता पसरविण्याची वेळ येईल.
- निहारिका पोळ
@@AUTHORINFO_V1@@