अवंती : मेधाकाकू... अग मी विचार करतीये आहे. आपल्या अभ्यासाला एक वर्षाहून जास्त काळ होऊन गेला. कारण गेल्या वर्षीच तू वर्गात या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्व सांगणारे दिलेले भाषण ऐकलेल आठवतंय मला. आज मी पुन्हा एकदा विचार करतीये की, या म्हणी आणि वाकप्रचारात काही शतकांपूर्वीच्या मराठी संस्कृतीतील महिलांचा – स्त्रीयांचा उल्लेख नक्कीच आला असेल. मात्र यावेळी मीच या चार लोकश्रुती निवडून लिहून आणल्या आहेत आपल्या अभ्यासासाठी. काही तरी सांग ना मला याविषयी. हा बघ पहिला वाकप्रचार असा आहे.
सीता गेली वनवासा आणि पाठी लागली अवदसा.
मेधाकाकू : अरेच्या... फार छान वाकप्रचार निवडलास, अवंती. या पहिल्या ‘सीता’ या शब्दातच आपल्या प्राचीन संस्कृतीतील संपूर्ण स्त्री वर्गाला संबोधित केले आहे. आपली संस्कृती म्हणजे उत्तम कुटुंब संस्था आणि विवाहानंतर उत्तम दाम्पत्य व्यवहार. मात्र या सीतेला स्वतः चा पती निवडण्याचा अधिकार होता. पतीने वनवास स्वीकारल्यानंतर याच सीतेने, स्वतः च्या निर्णयाने आपल्या पतीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. हाच उत्तम दाम्पत्य व्यवहार असे म्हणायला हवे. याच वनवासात रावणाने अपहरण केले आणि सीतेवर अनेक संकटे कोसळली. त्या सर्वांना ती धैर्याने सामोरी गेली. आता या वाकप्रचारातुन अगदी साधा आणि सरळ भावार्थ असा की, सुखाच्या आणि दुख: च्या प्रत्येक प्रसंगात आणि प्रत्येक परिस्थितीत पती - पत्नीने एकमेकांची साथ कधीच सोडू नये. ही खरी भारतीय कुटुंबसंस्था. बाहेरून आयात केलेल्या अनेक विचार प्रणालींनी आणि काही मुठभर विरोधकांनी या भारतीय संस्कृतीची हेटाळणी जरी केली तरीही ही मुल्ये प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात खोलवर रुजलेली आहेत. आजच्या दिवशी अभ्यासाला उत्तम विषय निवडलास बघ, अवंती.
अवंती : आहा मस्त मेधाकाकू. ! आता लगेच याच सीतेचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने आलाय या पुढच्या वाकप्रचारात. काय म्हणावे याला...!!!
सीतेसारखी नारी पण तीही गेली चोरी.
मेधाकाकू : ओह्ह्ह अच्छा. फारच वेगळा संदर्भ आणि सूक्ष्मार्थ आहे या लोकश्रुतीमध्ये आणि त्याबरोबरच सावधानतेचा सल्ला ही आहे प्रत्येक स्त्रीला. पुन्हा एकदा या सीतेच्या विलक्षण गुणवत्तेचा संदर्भ असे सांगतोय की, कुटुंबाच्या आणि पतीवरच्या प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी ऊभे रहातानाच स्वतः वर येणाऱ्या अनपेक्षित संकटांचा सामना तुम्हाला कधीतरी एकटीने करावा लागेल. त्यासाठी प्रत्येक क्षणी सावध राहा आणि धैर्यशील बना.
अवंती : बघ मेधाकाकू... याचा अर्थ काही शतकांपूर्वीसुद्धा स्त्रीला असा सल्ला द्यावा लागत होता अशी परिस्थिती त्याही काळात असणारच. म्हणजे अगदी रामायणाच्या काळापासूनच, स्त्रीला असे स्वावलंबी होणे आवश्यक असावे की काय मला मोठाच प्रश्न पडलाय आता हा वाकप्रचार फारच वेगळा दिसतोय, काय असेल यातले इंगित.
तू मी सारखी चल जाऊ द्वारकी.
मेधाकाकू : अरे व्वा... अवंती फारच गंमतीशीर पण तशीच फार महत्वाचे काही सांगणारी ही लोकश्रुती. असे बघ ज्या काळांत आजच्यासारखे संपर्काचे साधन नव्हते तेव्हा समविचारी मैत्रिणीची वैयक्तिक भेट हाच प्रत्येक स्त्रीचा विरंगुळा असावा. अशा मैत्रीत, एकमेकींच्या व्यक्तिमत्वातील आणि स्वभावातील गुण-दोषांचा परिचय झाल्यावर उत्तम संसार साधनेचाच विचार होत असणार. हेच इंगित आहे तू मी सारखी या पहिल्या चार शब्दातले. चल जाऊ द्वारकी हे पुढचे तीन शब्द फार गमतीचे वाटले तरी फार अर्थवाही आहेत. द्वारकानगरी म्हणजे श्रीकृष्णाने वसवलेले नगर. हे नगर उत्तम समाज आणि समाजव्यवहार यासाठी तत्कालीन समाजात वाखाणले गेले. द्वारकेला जाणे याचा सूक्ष्मार्थ असा की आपण दोघी मिळून आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कार आणि उत्तम समाज व्यवहाराप्रती घेऊन जायचे आहे ज्या योगे अपेक्षित कुटुंबकल्याण दोघीनाही साध्य होईल.
अवंती : व्वा... एकदम सही... मेधाकाकू. एक अफलातून गुगली आहे, हा वाक्प्रचार. वरवर दिसतो त्यापेक्षा खूप काही महत्वाचा सल्ला मिळतोय आजही यातून. समविचारी दोन व्यक्तींमधील वैयक्तिक स्नेह कसा ऊर्जादायी असावा याचे उत्तम उदाहरण.
मेधाकाकू : असे बघ अवंती... आज आपण फार उथळ झालो आहोत. देखल्या देवा दंडवत असा आपला व्यक्त होण्याचा प्रकार आहे. एक महिला दिन, आधी चार दिवस चर्चेत येतो आणि मग पुढचे वर्ष त्याचे आपल्याला जणू विस्मरण होते. आपल्या पूर्वजांनी मात्र स्त्रीच्या प्रत्येक स्वभाव वैशिष्ठ्यांची, तिच्या गुण दोषांची नोंद लोकश्रुतींच्या माध्यमातून अक्षर केली आहे. आता आजचा हा शेवटचा वाकप्रचार संसारी स्त्रीचे एक व्यवहार वैशिष्ठ्य फार स्पष्टपणे मांडतो.
बायकोचा कावा न कळे ब्रम्हदेवा.
मेधाकाकू : इथे बायको म्हणजे कोणा संसारी गृहस्थाची गृहलक्ष्मी. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास तिने केलेला आहे. त्यांचे स्वभाव, विचारधारणा, आवडी निवडी, लकबी, सवयी आणि प्रत्येकाची कुवत याचे तिला पक्के भान आहे. दैनंदिन घरगुती व्यवहार, मंगलकार्य, मुलांचे शिक्षण या बरोबरच आर्थिक व्यवहार आणि भाविष्यासाठीची बचत आणि तजविज या साठी ती घेत असलेले निर्णय फार विचार पूर्वक घेतलेले असतात. यात बायकोचा कावा न कळे ब्रम्हदेवा या शब्दांत गूढ असे काही नसते, तर प्रत्येक वेळी तीचे निर्णय, फार कोणाशी चर्चा न करता चौफेर विचार चाणाक्षपणे घेतलेले असतात इतकेच. आपल्या या सगळ्या लोकश्रुती आजही मार्गदर्शक आहेत हे कधीही विसरू नकोस.
अवंती : आहा... मेधाकाकू... महिला दिनाचा फारच छान सल्ला मला दिलास तू आज. पुन्हा एकदा अवाक झालीये मी. त्यातही आपल्या चतुर पूर्वजांना नमन.
- अरुण फडके