कान्स फिल्म फेस्टिवल.. एक अत्यंत महत्वाचा असा चित्रपट महोत्सव. प्रत्येक दिग्दर्शकाचं, कलाकाराचं स्वप्न असतं यामध्ये सहभागी होण्याचं आणि आपल्या पहिल्याच कलाकृतीला कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये स्थान मिळणं म्हणजे एक अत्यंत गौरवाचा क्षण. हा क्षण अनुभवते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील मानसी देवधर. 'चाफा' हा तिचा पहिलाच लघुपट येत्या कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकित झाला आहे. आणि अर्थातच तिचा आनंद गगनात मावत नाहीये. तिचा 'चाफा' खऱ्या अर्थाने कान्स मध्ये दरवळणार आहे.
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या २१ वर्षीय मुलीच्या कलाकृतीबदद्ल महाएमटीबीने तिच्याशी गप्पा मारल्या असता तिने सांगितलं, "कुठल्याही फुलाशी आपण आपल्या आयुष्यातील महत्वाच्या स्त्रीला जोडून बघू शकतो. चाफ्याचा दरवळणारा वास मला माझ्या आज्जीची आणि तिच्या बागेची आठवण करून देतो. चाफा एकदा फुलला की १०-१२ दिवस दरवळतो आणि आपल्याला एका वेगळ्याच आभासी विश्वात नेतो. माझा चाफा देखील याच आभासी आणि खऱ्या विश्वाची कहाणी सांगणारा आहे."
चाफ्याची सुरुवात कशी झाली हे विचारले असता ती सांगते, "मला गायन, नाट्य, नृत्य, कविता, लेखन, चित्रकला या सर्व कलांमध्ये रुची होती. मात्र मी सगळंच करु शकत नाही. सगळं करायला गेल्यास एकाही कलेला मला पूर्ण न्याय देता येणार नाही. त्यामुळे या सर्व कलांचा समावेश करुन चित्राच्या माध्यमातून त्याला जगापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याचं एकमेव माध्यम आहे 'चित्रपट किंवा लघुपट.' माझ्या घरात एखादी गोष्ट जर मला आयुष्यभर करायची असेल तर त्याआधी मला प्रायोगिक स्वरूपात ती करावी लागते, हा माझ्या आई वडीलांचा नियम आहे. त्यामुळे मोठी उडी घेण्याआधी मी २० मिनिटांचा लघुपट तयार करावा अशी माझ्या पालकांची इच्छा होती. आणि त्यातूनच सुरुवात झाली चाफ्याची."
मित्र मैत्रीणींच्या मदतीने, आईच्या अमू्ल्य साथीने चाफा या लघुपटाची तयारी सुरु झाली. योग्य वास्तु शोधणं आलं, त्यासाठीचं वेळापत्रक तयार करणं आलं, त्यासाठी काय काय लागणार याची यादी करणं आलं. आणि एकूण १५ दिवसांनंतर चाफ्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. लघुपटात सर्व आपणच करत असल्यामुळे मातीच्या घराला रंगवणं, सारवणं हे काम देखील आम्हीच केलं. पहिलाच लघुपट असल्याने प्रायोजक मिळत नव्हते त्यामुळे कमी पैशात उत्तम कलाकृती आपल्याला तयार करायची आहे हे ही लक्षात होतंच.
आपली कलाकृती जगातील प्रत्येका माणसापर्यंत पोहोचायला हवी. त्यामध्ये कुणालाही भाषेची अडचण येवू नये यासाठी या लघुपटात एकही संवाद नाहीये. असं तिने सांगितलं. संवादाविना पण चाफ्याचा सुवास सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो हे मात्र या लघुपटानं सिद्ध केलं आहे. या संपूर्ण कलाकृतीसाठी पियूष शहा आणि सारंग कुलकर्णी यांची मोलाची साथ लाभली असं ती सांगते. या दोघांनीही या लघुपटाच्या संगीतावर उत्तम काम केलं आहे.
दृकश्राव्य माध्यम हे एक अत्यंत शक्तीशाली माध्यम आहे. याच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय मांडायचं आहे हे माहीत असणं देखील खूप आवश्यक असतं. या लघुपटाच्या माध्यमातून चाफ्याचा दरवळ लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम मानसीनं केलं आहे. आता पर्यंत या लघुपटाला २७ पुरस्कार मिळाले आहेत. आणि अजून देखील मिळतंच आहेत.
महाराष्ट्रातून, चित्रपट निर्मितीचं कुठलंही व्यावसायिक शिक्षण नसताना एका २१ वर्षीय मुलीच्या लघुपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळणं खूप गौरवाची बाब आहे. हातात असलेली कथा लघुपटाच्या रूपात जगासमोर मांडणं खूप कठीण आहे, मानसीनं अत्यंत कमी वयात ते करुन दाखवलं व कान्सनं तिला तिच्या कामाची पोचपावती देखील दिली. तिच्या चाफ्याचा दरवळीचा आनंद लवकरच आपल्यापर्यंतही पोहोचावा आणि तिच्या या कलाकृतीतून अनेक कलाप्रेमींनी प्रेरणा घ्यावी असे तिचे स्वप्न आहे.
म्हणतात ना "विश्वास पंखांवर असावा, उंच झेप आपोआप घेता येते." मानसीच्या पंखांना अजून बळ मिळो या इच्छेसह मानसीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला महाएमटीबीतर्फे खूप खूप शुभेच्छा.
- निहारिका पोळ