आकाशाशी जडले नाते - छायागीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018   
Total Views |


“या या, सुमित शेठ!”, आबा सुमितचे स्वागत करत म्हणाले.

“आबा आज ग्रहणा बद्दल तुम्ही आणखी काही सांगणार आहात.”, सुमितने आठवण केली.


“ओके! आज आपण पृथ्वीवरून दिसणारी विविध ग्रहणे पाहू.”, आबा म्हणाले.


“आबा, पृथ्वी वरून दिसणारी दोनच ग्रहणे - एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण. एकदा चंद्रावर पृथ्वीची सावली आणि एकदा पृथ्वीवर चंद्राची सावली. ती दोन्ही ग्रहणे आपण पहिलीत की!”, सुमित म्हणाला.


“विसरतोयस मित्रा! चंद्राशिवाय ग्रहण आणणारे आणखी काही ग्रह आहेत आपल्या आकाशात! ग्रहण म्हणजे काय सुमित, तर एका ग्रहाची सावली दुसऱ्या ग्रहावर पडणे. बरोबर? कधी कधी सूर्याभोवती फिरणाऱ्या आतल्या ग्रहांची सावली पण पृथ्वीवर पडते. बुध आणि शुक्रची सावली!”, आबा म्हणाले.


“ओह! म्हणजे Mercury आणि Venus! त्यांची सावली पण पृथ्वीवर पडू शकते? काय आहे हे ग्रहण, आणि ते दिसते कसे?”, सुमितने आश्चर्याने विचारले.


“आपण मागे पहिले की, चंद्र जेंव्हा पृथ्वीपासून थोडा दूर असतो तेंव्हा कंकणाकृती ग्रहण दिसते. तसेच जेंव्हा बुध किंवा शुक्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतात तेंव्हा कंकणाकृती ग्रहण दिसते. हे असे -



“पण बुध किंवा शुक्र पृथ्वीपासून फारच अंतरावर असल्याने, ते कंकण भलतेच जाड असते. इतके की आपल्याला सूर्याच्या समोरून एक चिलट गेल्या सारखे दिसते! आणिक काय आहे सुमित, त्यांची पृथ्वीपर्यंत पोचणारी सावली इतकी हलकी असते, की नाहीच जणू. जशी उडणाऱ्या विमानाची सावली पडत नाही, पण विमानाचे silhoutte म्हणजे त्याच्या सावलीचा आकार दिसतो. तस आपण बुध किंवा शुक्राची सावली अनुभवत नाही, पण त्याचे sillhoutte सूर्याच्या समोरून जातांना दिसते.


Transit of Venus, 2004. PC: Degania A, Israel


“सूर्याच्या सौंदर्याला नजर लागू नये म्हणून शुक्राने तीट लावल्यासारखे दिसते! शंकरराव, अशा सूर्यग्रहणाला काही वेगळे नाव आहे का?”, दुर्गाबाईंनी विचारले.


“याला म्हणतात Transit! लहान ग्रहाचे मोठ्या ग्रहाच्या समोरून जाणे.”, आबा सांगत होते, “आता होते काय की, बुध, शुक्र आणि पृथ्वी अगदी एका प्रतलात नाहीत. त्यांच्या सूर्याभोवती फिरण्याचे मार्ग एकमेकांना थोडा कलला आहे. त्यामुळे अशा Transits सारख्या सारख्या होत नाहीत. अगदी क्वचित पाहायला मिळतात.”


“आबा जसे या दोन ग्रहांची Transit पृथ्वीवरून दिसते, तशी पृथ्वीची Transit सुद्धा मंगळ किंवा गुरु वरून दिसत असेल ना?”, सुमितने विचारले.


“दिसते तर! मंगळावरून पृथ्वीचा जाडसर बिंदू आणि तिच्या भोवती फिरणारा चंद्राचा बारीकसा कण, सूर्याच्या समोरून जातांना दिसतात. पण सर्वात सुंदर देखावा म्हणशील तर Uranus वरून दिसणारा शनीचा सूर्याच्या समोरून होणारा प्रवास. असे वर्तवले जाते की ७०० वर्षांनी, ही घटना Uranus वरून दिसणार आहे. आपले ५० – ६० चंद्र आणि कितीतरी कड्यांचे फिरते अलंकार मिरवत जाणारा शनी अप्रतिम दिसेल! अशी घटना मात्र हजारो वर्षातून एकदा कधीतरी घडते. आणि ते पाहायला Uranus आणि Neptune वर कोणी नसते!”, आबा म्हणाले.


“शंकरराव, आपण इतक्यात फार सावल्या पहिल्या. प्रकाशापासून दूर नेणारी सावली, जरा भीतीदायक वाटते. एक अनामिक हुरहूर घेऊन येते.”, दुर्गाबाई म्हणाल्या.


“सावल्यांमुळे जीवाला हुरहूर लागते हे खरे आहे. अगदी रोज संध्याकाळी सावल्या लांब लांब झाल्या आणि सूर्य अस्ताला गेला की सांजेला उदास वाटते. तो संध्या काल प्रसन्न करायला कुणी सूर्यास्ताला अग्निहोत्र करतात, कुणी देवाजवळ दिवा लावून परवचा म्हणतात, कुणी सुगंधी धूप घालतात, कुणी तुळशी जवळ बारीकशी रांगोळी रेखतात, कोणी मोकळ्या मैदानात सांघिक खेळ खेळतात, तर कोणी झांज वाजवून देवाची आरती करतात. अशा लहान लहान positive rituals ने ती anxiety दूर घालवली की रात्रीच्या सुंदर गडद सावलीची जादू दिसायला लागते.”, आबा म्हणाले.


सुमितकडे वळून आबा म्हणाले, “पण तुम्हा आजकालच्या तरुणांना संध्याकाळ फक्त रविवारी मिळते. आणि प्रत्येक संध्याकाळी न चुकता येणारा उदासपणा, केवळ रविवारी अनुभवला जातो. तो कसा handle करायचा हे माहित नसल्याने, TV पाहून किंवा पिक्चरला जाऊन किंवा shopping करून तो घालवायचा प्रयत्न केला जातो. अर्थातच ते काही सफल होत नाही!


“असो. सांगायचे काय, तर सावली समजून घ्यायला हवी. असे पहा, की प्रकाश आहे म्हणून सावली आहे! सूर्यसिद्धांत मध्ये तर, छायाला सूर्याच्या पत्नीचा मान दिला आहे. प्रकाशाच्या बरोबर जी येते, प्रकाशाला जी नेहेमी साथ देते, ती छाया! जी सतत मागे मागे फिरते, जिथे जाऊ तिथे सोबत करते, ती छाया. ती आपल्यावर छत्र धरते, म्हणून रात्र आहे! तिच्यामुळे चांदणे आहे! दिवस – रात्रीचे आरोह अवरोह, सकाळ-संध्याकाळच्या ताना आणि ग्रहणाची फिरकी घेत छाया – प्रकाशाचे द्वंद्वगीत रंगते!”, आबा म्हणाले.


“आबा, हे छायागीत खरोखरच मन लावून ऐकायला हवे! आबा आता आपली सर्व प्रकारची ग्रहणे पाहून झाली का?”, सुमितने विचारले.


“मित्रा, आणखी एक महत्वाचा ग्रहण प्रकार राहिला आहे. तो तुला पुढच्या वेळी सांगतो!”, आबा म्हणाले.


- दिपाली पाटवदकर 
@@AUTHORINFO_V1@@