चिदंबरम यांची ‘आराधना’

    04-Mar-2018   
Total Views | 39
 
 
 
चित्रपट गीतामध्ये जशी फरीदा जलाल राजेश खन्नाच्या प्रत्येक गैरलागू प्रश्नांना सहजगत्या उत्तरे देते आणि कुठलाही प्रश्न टाळत नाही, तसेच चिदंबरमसमोर आलेल्या कुठल्याही विषयावर आपले मतप्रदर्शन हक्काने व हट्टाने करीत असतात. मात्र, थेट त्यांच्याशी निगडित वा भिडणारा प्रश्न असला की, ‘‘ना...ना....ना’’ असेही म्हणत नाहीत, तर थेट पळ काढतात. एक गोष्ट आता स्पष्ट झाली आहे की, त्यांच्याच कारकिर्दीत ‘एनपीए’ म्हणजे दिवाळखोरीत गेलेल्या हजारो कोटींच्या कर्जाची परतफेड अशक्य झाली होती आणि ती वसुली करण्यापेक्षा सरकारी दबावाखालीच अशा दिवाळखोरांना अधिकाधिक बुडवेगिरीसाठी आणखी काही हजार कोटी रुपयांची खिरापत वाटली गेली आहे, तर बुडव्यांना असे अधिक दिवाळखोर कर्ज देण्यात कुठले महान अर्थशास्त्र सामावलेले होते?
 
अमिताभच्या आधीचा सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना याला ‘आराधना’ चित्रपटाने खूप मोठा करून ठेवले. त्यात त्याचा डबलरोल होता. यापैकी पुत्र राजेशची प्रेयसी म्हणून फरिदा जलालने अप्रतिम काम केले होते. पण आज तिचे स्मरण त्या अभिनयापेक्षाही त्याच चित्रपटातील एका गीतामुळे होते. काहीसे संवादमय असलेल्या या गीतामध्ये राजेश आपल्या प्रेयसीकडून प्रेम कबूल करण्याच्या प्रयत्नात असतो आणि ती त्यात शब्दाने फसायला तयार नसते, असे गीत होते. ‘‘बागोंमे बहार है?’’ असे प्रश्न तो विचारत जातो आणि नकळत तिने होकार द्यावा, असा मध्येच प्रश्न टाकतो, ‘‘तुमको हमसे प्यार है?’’ त्यावर फरिदा ‘‘ना....ना’’ म्हणून झटकून टाकते. अखेरीस एका वळणावर ती असेही सांगून टाकते, ‘‘लेकीन वो ना कहूँगी, जिसका तुमको इंतजार है.’’ नेमकी तशीच आजकाल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची अवस्था झालेली आहे. ते वाटेल ते बोलतात, कशावरही मतप्रदर्शन करतात पण, पत्रकार वा चिकित्सकांना त्यांच्याकडून ज्या माहिती व तपशीलाची अपेक्षा आहे, त्याबद्दल अवाक्षरही बोलत नाहीत. कोणी विचारण्याचा प्रयास केला तर कॅमेर्‍यासमोरून अक्षरश: पळ काढतात. तो विषय आहे, त्यांचा सुपुत्र ‘कार्टी’ चिदंबरमचा किंवा नुकत्याच उजेडात आलेल्या नीरव मोदींच्या बेताल कर्जलुटीचा! बाकी मोदी सरकारच्या अर्थसंकल्प वा आर्थिक धोरणांविषयी मनमुराद मुक्ताफळे उधळणारे चिदंबरम कार्टी वा नीरवचा विषय आला, मग थेट फरीदा जलाल होऊन जातात. तिने तरी निदान ‘‘ना...ना...ना’’ असे म्हणत उत्तर नाकारले होते. चिदंबरम आपल्याला प्रश्न ऐकूच आला नाही किंवा प्रश्न विचारणारा अस्तित्वातच नाही, असे भासवून काढता पाय घेऊ लागतात. कारण, ज्या गोष्टी विचारल्या जातील, त्याचा इन्कार करणे शक्य नाही आणि कबुलीही देण्याची सोय नाही. त्यापेक्षा पाठ वळवणे आणि जेटलींना शहाणपण शिकवणे सोपे आहे ना?
 
संपुआ सरकारमध्ये दीर्घकाळ चिदंबरम अर्थमंत्री होते आणि त्यात बहुतांश आर्थिक घोटाळ्याचे विक्रम साजरे करण्यात आले. मध्यंतरी काही काळ चिदंबरम यांना आपले लाडके खाते सोडून गृहमंत्री व्हावे लागलेले होते. पण, त्याही काळात गृहखात्याचे विषय सोडून हे गृहस्थ कायम अर्थविषयक मतप्रदर्शन करीत असायचे. आताही त्यांनी ज्या विषयांचे खुलासे करावेत, असे डझनावारी प्रश्न आहेत पण, त्यविषयी एकही शब्द ते बोलत नाहीत आणि आपण अर्थमंत्री असतो, तर काय केले असते? त्याविषयी फुशारक्या मारत असतात. त्यापैकी ताजी वल्गना राजीनाम्याची आहे. आपण जेटलींच्या जागी असतो, तर अमुकतमुक चुकीसाठी राजीनामाच दिला असता, असे चिदंबरम यांनी म्हटलेले आहे. ‘असतो तर’ कशाला? होतात, तेव्हा राजीनामा दिला असता, तर असे अभिमानाने आज म्हणता आले असते. नीरव किंवा विजय मल्ल्या यांना बेताल बिनतारणाची कर्जे दिली गेली आणि देशाची लूटमार चालू होती, तेव्हा राजीनामा देण्याची वेळ होती. कारण, तेव्हा चिदंबरम हेच अर्थमंत्री होते आणि राजीनामा फेकावा, असा दिवाळखोर कारभार चाललेला होता. पण, तिकडे डोळे उघडून बघण्याची हिंमत त्या गृहस्थांना झाली नाही, तर राजीनाम्याची गोष्ट येते कुठे? या दिवाळखोरी माजविणार्‍या शेकडो व्यापारी, उद्योगपतींना जवाहिर्‍यांना बुडवायला हजारो कोटींचे कर्ज कोणी दिले? संपुआ सरकारने ही कर्जे दिली आणि त्यातली अर्थमंत्री चिदंबरमच होते ना? त्याविषयी बोलायची बिशाद नाही आणि रालोआ सरकारने स्वच्छ अभियानासाठी देशात किती शौचालये बांधली वा त्यात पाणीपुरवठा करण्यासाठी जोडण्या कशा दिल्या नाहीत, त्यावर हे अर्थशास्त्री पांडित्य सांगत आहेत. त्यासाठी अर्थमंत्र्याने राजीनामा द्यायला हवा, असे त्यांचे अभ्यासपूर्ण मत आहे. म्हणूनच मग हे अर्थशास्त्री कुठल्या केबिनमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करतात?, असा प्रश्न विचारणे भाग आहे.
 
त्या चित्रपट गीतामध्ये जशी फरीदा जलाल राजेश खन्नाच्या प्रत्येक गैरलागू प्रश्नांना सहजगत्या उत्तरे देते आणि कुठलाही प्रश्न टाळत नाही, तसेच चिदंबरमसमोर आलेल्या कुठल्याही विषयावर आपले मतप्रदर्शन हक्काने व हट्टाने करीत असतात. मात्र, थेट त्यांच्याशी निगडित वा भिडणारा प्रश्न असला की, ‘‘ना...ना....ना’’ असेही म्हणत नाहीत, तर थेट पळ काढतात. एक गोष्ट आता स्पष्ट झाली आहे की, त्यांच्याच कारकिर्दीत ‘एनपीए’ म्हणजे दिवाळखोरीत गेलेल्या हजारो कोटींच्या कर्जाची परतफेड अशक्य झाली होती आणि ती वसुली करण्यापेक्षा सरकारी दबावाखालीच अशा दिवाळखोरांना अधिकाधिक बुडवेगिरीसाठी आणखी काही हजार कोटी रुपयांची खिरापत वाटली गेली आहे, तर बुडव्यांना असे अधिक दिवाळखोर कर्ज देण्यात कुठले महान अर्थशास्त्र सामावलेले होते? त्याचे विवेचन चिदंबरम यांनी केले तर लोकांना हवेच आहे पण, त्याबद्दल विषय निघाला की चिदंबरम पोबारा करतात. उलट अन्य कुठल्या म्हणजे शौचालये वा दुर्गम भागातल्या वीजपुरवठ्याविषयी पांडित्य सांगायला पुढे सरसावतात आणि जेटली यांचा राजीनामा मागतात. त्याच्याही पुढे जाऊन कुठलेही पद हाताशी नसताना त्या पदाचा राजीनामा द्यायला कंबर कसून उभे ठाकतात. इतकीच राजीनाम्याची त्यांना हौस होती तर त्यांनी अर्थमंत्री पदावर असताना मल्ल्या किंवा नीरव मोदींचे अधिकचे कर्ज रोखण्यावरून राजीनामा फेकला असता, तर आज त्यांचे गुणगान जेटलींनी केले असते आणि नरेंद्र मोदींनी सगळ्यांना बाजूला सारून चिदंबरम यांनाच भारताचे अर्थमंत्री म्हणून जबाबदारी घेण्यासाठी पायही धरले असते. पण, जेव्हा वेळ होती, तेव्हा राजीखुशीने अक्कलहुशारीने बुडव्यांना बँका लुटू दिल्या आणि आता राजीनाम्याच्या फुशारक्या मारल्या जात आहेत. माणसे किती निर्लज्ज असू शकतात, त्याचे नमुने पेश करायचे काम त्यांनी हाती घेतले आहे काय?
 
बाकी मोदी सरकार वा त्यांच्या मंत्र्यांना सल्ले देण्याची गरज नाही. त्यांच्या कर्माची वा चुकांची फळे ते भोगतीलच पण, चिदंबरम यांनी आपल्या कारकिर्दीत जे काही दिवे लावले त्याचा उजेड पडू लागलाय. त्याला डोळे उघडून सामोरे जाण्याची जरा हिंमत दाखवावी. त्यावरून मुक्ताफळे उधळत सुटलेल्या आपल्या पक्षाध्यक्षाला समज सल्ले देऊन पोरकट ट्विट करण्यापासून आवरले तरी खूप मोठे काम होईल. मग स्वपक्षीय मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या जावयाच्या कर्जबुडव्या विषयावरून मोदींना जाब विचारण्याचे ट्विट केले जाणार नाही आणि ते मागे घेण्याची नामुष्की काँग्रेसवर येणार नाही. सुरजेवाला यांना पुढे करून बिळात बसायचे आणि जेटलींना सल्ले द्यायचे, हे कुठल्या परदेशी इकॉनॉमिक स्कूलमध्ये शिकवले जाते? हे विषय निघतात, तेव्हा पक्षाची बाजू मांडायला हिमतीने चिदंबरम यांनी पुढे यायला हवे ना? पण तिथे टेपरेकॉर्डरप्रमाणे बोलणार्‍या सुरजेवाला यांना पुढे करून चिदंबरम बिळात बसतात. मिस्टर चिदंबरम, ती वेळ होती राजीनाम्याची, जेव्हा अशा बिनतारणाच्या कर्जाची लूटमार चालू होती तेव्हा राजीनामा फेकला असतात, तर देशाची संपत्ती वाचली असती आणि आज लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतले असते. भले सोनियांच्या काळ्या यादीत गेला असता आणि राहुलने दाराशी उभे केले नसते पण, जनतेने मोदी-जेटलींपेक्षा तुमचेच कौतुक केले असते. आताच्या फुशारक्या म्हणजे नाराजीनामे आहेत. दिले कोणी? घेतले कोणी? आणि होय, कॉंग्रेसमध्ये राजीनाम्याची परंपरा कुठे आहे? कंबरड्यात लाथ घातल्याशिवाय राजीखुशीने खुर्ची सोडतो कोण? शिवराज पाटलांना कसे जावे लागले? अश्विनीकुमार वा पवनकुमार बन्सल कोणत्या मार्गाने गेले? संपुआला लोकांनी राजीनामा घेऊन बाजूला केले नव्हते? हाकलून लावले होते ना? तेव्हा ही आराधना पुरे झाली. खरे बोलायची अडचण असेल तर निदान गप्प राहण्याची सवय तरी लावून घ्या!
 
 
 
 

- भाऊ तोरसेकर
 
 

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121