दि. ९ जानेवारी २०१४ ला ‘रोजावा’ या उत्तर सीरियामधील कुर्दबहुल प्रदेशात स्वायत्ततेची घोषणा करण्यात आली. अनेक क्रांती पाहिलेला मध्य आशिया या ‘रोजावा क्रांती’कडे कसे पाहील? आजपासून दर गुरुवारी या नवीन सदरातून...
इराक कुर्दिस्तानमधील सुलेमानिया शहराबाहेर झाहर्जी गावाजवळ काझ कपान लेण्यांमध्ये एक धार्मिक सभा भरली होती. धर्मोपदेशक पवित्र श्लोकांचा उद्घोष करत होते. वातावरणात उत्साह भरला होता. इतिहासाने नवे वळण घेतले होते. इस्लामबहुल मध्य आशिया अचंबित झाला होता. कारण, ते धर्मोपदेशक झोराष्ट्रीयन होते व ती सभा म्हणजे ’समन’ नावाच्या मासेविक्रेत्याचा धर्मांतराचा सोहळा होता. समन इस्लाममधून झोराष्ट्रीयन धर्मात धर्मांतरित झाला होता. झोराष्ट्रीयन म्हणजेच भारतातील पारशी. इराणमध्ये मूळ असलेल्या चांगले आचार, विचार व बोलणे या त्रिसूत्रीवर आधारित एकेश्वरी व अग्निपूजक झोराष्ट्रीयन धर्माचे आता जगभरात दोन लाखांहून कमी अनुयायी उरले आहेत. मध्य आशियातील मुस्लीमबहुल देशांच्या सान्निध्यात राहूनही का हा समन प्राचीन व आता केवळ काहीच अनुयायी शिल्लक असलेल्या धर्मात धर्मांतरित झाला? हा एकटाच नाही तर स्थानिक सूत्रांनुसार, गेल्या तीन ते चार वर्षांत इराक कुर्दिस्तानमध्ये जवळपास एक लाखांहून जास्त लोकांनी झोराष्ट्रीयन धर्म स्वीकारला आहे, म्हणजेच झोराष्ट्रीयन लोकसंख्या एकदम ५० टक्क्यांनी वाढली आहे. २०१५ मध्ये ’कुर्दिस्तान प्रदेश संरक्षक घटक निर्बंध क्रमांक पाच’ नुसार झोराष्ट्रीयन धर्माला अधिकृत मान्यता मिळाली व १४०० वर्षांनंतर ऑगस्ट २०१७ ला ’किएंशा’ या पहिल्या अधिकृत झोराष्ट्रीयन अपत्याचा जन्म झाला. २०१६ ला इराक कुर्दिस्तानमधील सुलेमानिया शहरात झोराष्ट्रीयन मंदिर खुले झाले व अजून १२ मंदिरांच्या उभारणीसाठी अनुमती मागितली गेली.
या झोराष्ट्रीयन अनुकूल घडामोडींचे कारण काय? मूळच्या इराणमधील धर्माला इस्लामबहुल इराकमध्ये कसा काय पाठिंबा मिळतोय? ‘इसिस’चे हल्ले, अत्याचार यामुळे गांजलेल्या जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती व शांततेच्या शोधात असलेली जनता झोराष्ट्रीयन धर्माकडे आकर्षित होत आहे का? झोराष्ट्रीयन हाच त्यांचा मूळ धर्म आहे का? म्हणजे ही झोराष्ट्रीयन घरवापसी आहे का? इस्लाम-चिकित्सा व पुनर्विचार व ‘इसिस’ने निर्माण केलेली पोकळी झोराष्ट्रीयन धर्म भरून काढत आहे का? जितक्या जोरात ही लाट आली आहे तितक्याच जोरात ती निघूनही जाईल का? खदखदणार्या, अरब क्रांतीतून पूर्णपणे न सावरलेल्या व ‘इसिस’पासून अजून पूर्ण मुक्त न झालेल्या मध्य आशियात या झोराष्ट्रीयन धर्माच्या आकर्षणामुळे शांतता निर्माण होण्यास साहाय्य होईल की मध्य आशिया अजून यादवी युद्धाकडे जाईल? जगभरातील इतर झोराष्ट्रीयनांची यावर काय प्रतिक्रिया आहे? ‘इसिस’विरोध, कुर्द वंश, कुर्दिस्तान लढा, मध्य आशियाचा भूगोल, तेल, अमेरिका, चीन, युरोपचे यात गुंतलेले हितसंबंध असे अनेक कंगोरे या घटनेला आहेत व त्यात आता अजून एक कुर्द वंश, कुर्दिस्तानशीच संबंधित, ‘इसिस’विरोधी व महिला सबलीकरणाशी निगडित असा अजून एक कंगोरा दिसतो आहे तो म्हणजे उत्तर सीरियातील रोजावा क्रांती.
दि. ९ जानेवारी २०१४ ला ’रोजावा’ या उत्तर सीरियामधील कुर्दबहुल प्रदेशात स्वायत्ततेची घोषणा करण्यात आली. इस्लामी क्रांती, साम्यवादी क्रांती, अरब स्प्रिंग यासारख्या अनेक क्रांती पाहिलेला मध्य आशिया या ‘रोजावा क्रांती’कडे कसे पाहील? ज्या ‘इसिस’शी लढताना अमेरिकेलाही नाकीनऊ येत आहेत, त्या ‘इसिस’चा पराभव ‘रोजावा क्रांती’ने कसा केला? लोकशाही संघराज्य, स्त्रीवाद व सामाजिक पर्यावरणशास्त्र यावर आधारित ही क्रांती अशांत सीरियात कशी यशस्वी झाली? मध्य आशियामध्ये ही क्रांती शांतता निर्माण करेल की कुर्दिश हुकूमशाहीकडे वळेल? मार्क्सवादीही नाही, भांडवलशाहीवादीही नाही, धार्मिकही नाही, राष्ट्रवादीही नाही, स्वतंत्र राष्ट्राची मागणी नाही, स्वायत्तता मागितली तरी मूळ देशातून फुटून निघण्याची मागणीही नाही, मग काय आहेत ‘रोजावा क्रांती’ची तत्त्वे व वैशिष्ट्ये? बुरख्यात राहणारी स्त्री ते लिंग समानता हा प्रवास कसा झाला? महिलांचा शासन सहभाग, सामाजिक सहभाग इतकेच नव्हे, तर रणांगणावरही सहभाग हा महिला सबलीकरणाचा प्रवास कसा झाला? कोण आहे याचा प्रेरणास्रोत? युद्धमान प्रदेशात ही आमूलाग्र परिवर्तन घडवणारी क्रांती कशी घडली? जाणून घेऊया पुढील भागात....
- अक्षय जोग