दिवाळीत, डिसेंबरमध्ये पाऊस, मार्च महिन्यात पाऊस इत्यादी. मार्च महिन्यातच, वसंत ऋतू सुरु असताना उकाडा कमालीचा जाणवतोय. उष्मांकही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या सगळ्या विकृत ऋतुचक्राचे शरीरावरही अनिष्ट परिणाम होतात. उन्हाळ्यात सामान्यतः होणारे त्वचेतील बदल, त्वचेच्या तक्रारी आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल आज थोडे जाणून घेऊया.
वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशीर असे सहा ऋतू. वसंत आणि ग्रीष्मामध्ये उकाडा जाणवतो. थंडी कमी होत जाते आणि उकाडा वाढत जातो. वसंताची सुरुवात आपल्या नवीन वर्षाने, गुढीपाडव्याने होते. नवीन पालवी, फुले बहरतात. हा ऋतू आल्हाददायी असतो. वसंत ऋतू हा चैत्र आणि वैशाख अशा दोन महिन्यांचा असतो. या सुमारास उन्हाची तीव्रता हळूहळू वाढू लागते आणि ग्रीष्मऋतूमध्ये तर उन्हाची प्रखरता सर्वाधिक असते. ग्रीष्मऋतू म्हणजे ज्येष्ठ आणि आषाढ हे महिने. म्हणजे चार महिन्यांचा उन्हाळा. यात सुरुवातीस मंद तीव्रता असते जी हळूहळू वाढत जाते. पण, हल्ली हे ऋतुचक्र बिघडलंय आणि याचा आपण सर्वच अनुभव घेतोय. उन्हाळयात त्वचा गरम होते, लालबुंद होते, त्वचा तापते, भाजते. तसेच त्वचा काळवंडते. अधिक घाम येणार्या व्यक्तींमध्ये अंगाला कंडही येऊ लागते. बारीक पुरळ येतं. घामोळ्या येतात. अधिक घाम असल्यास, मुरुम अधिक येण्याची शक्यता असते. त्वचा कोरडी, निस्तेज होते आणि त्वचेवर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण वाढते, यासाठी काही सर्वसामान्य उपाय आणि प्रतिबंधात्मक उपाय आहेत. ते केल्यास हे त्रास कमी करता येतात.
त्वचा उष्णतेमुळे अधिक तापते. अंगातील जलांश कमी होऊ शकतो. पायाचे तळवे, अधिक गरमहोतात. टाळू, डोळे आणि हाताचे तळवे यातून झळा आल्यासारखे जाणवते. फक्त अधिक पाणी पिऊन ही आग कमी होत नाही, तसेच लघवीला ही जळजळ आणि लघवी पिवळी होऊ शकते. या सगळया लक्षणांवर सिद्धजल प्यावे. सिद्धजल म्हणजे औषधी द्रव्यांचा पाण्यावर संस्कार करुन तयार केलेले पाणी. हे तीन पद्धतींनी करता येते क्वाथ, फाष्ट आणि प्रथीप्त. क्वाथ म्हणजे काढा. विशिष्ट प्रमाणात औषधी द्रव्यांची भरड पाण्यातून घेऊन (भरड आणि पाण्याचे मान चतुर्थांश, अष्टमांश किंवा षोडांश म्हणजे १/४, १/८ आणि १/१६ इतके असते) उकळवून, आटवून (निम्मा १/४ प्रमाणात) हा काढा तयार केला जातो. फाष्ट म्हणजे पाणी उकळवायचे आणि उकळत्या पाण्यात औषधी द्रव्ये घालायची आणि झाकून बाजूला ठेवायचे. स्वत:हून थंड झाले की, हा फाष्ट तयार झाला म्हणावा. तिसर्या प्रकारच्या सिद्ध जलामध्ये अग्निसंस्कार (उकळवणे, आटवणे इ.) काही केले जात नाही. पाण्यामध्ये विशिष्ट औषधी द्रव्ये ठराविक कालावधीसाठी भिजत ठेवली जातात आणि नंतर ते पाणी पिण्यास वापरले जाते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे वाळ्याचे पाणी. पाण्याच्या माठात वाळ्याचे गवत घालून ते पाणी उन्हाळ्यात प्यायची बर्याच घरांतून पद्धत आहे. लहान मुलांना झाल्यावर गवती चहा, मिरी, लवंग इ. घालून काढा जो केला जातो, तो क्वाथ प्रकारातला आहे आणि सोन्याचा तुकडा वळसं पाण्यात घालून, पाणी उकळवणे हेदेखील क्वाथाचेच उदाहरण आहे. या प्रकारच्या पाण्याला ’सुवर्णसिद्धजल’ म्हणतात. हे पाणी प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी, वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. उन्हाळ्यातील त्वचेच्या बाह्य जळजळीसाठी, पाय पाण्यात बुडवून बसावे. डोळ्यांची, हाताची, डोक्याची होणारी आग याने कमी होते. त्यात थोडे गुलाब पाणी घातले तरी आल्हाददायी वाटते. प्लास्टिक आणि सगळ्या ऋतूत वापरत्या येणार्या चपला/बूट उन्हाळ्यात टाळावेत. त्याने शरीराची (हाता-पायांच्या तळव्यांची आग होण्याची शक्यता अधिक वाढते. डोळ्यांच्या चुरचुरण्यावरही गुलाब पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. काकडीच्या कापांनी ही डोळ्यांची चुरचूर कमी होते. चंदनाचा लेप टाळूला लावल्याने डोके शांत लवकर होते. डोळ्यांनाही लावल्यास आरामपडतो. एक खूप जुनी घरगुती पद्धत आहे. पायांना तेल लावून काश्याच्या वाटीने घासणे, अंगातली उष्णता निघू लागली की ती वाटी काळी होऊ लागते. हे रात्री झोपताना केले की झोपही शांत आणि गाढ लागते. वरील सर्व बाह्योपचार आहेत, तसेच काही आभ्यंतर उपचारही बघूयात. नुसते सारखे पाणी पिण्याने अंगाची आग कमी होत नाही. फक्त पोटाला तडस मात्र लागते. यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे ’सुवर्णसिद्धजल’ प्यावे वाळ्याचे पाणी उत्तमकार्य करते.
तसेच धणे-जिर्याचे पाणीही खूप गुणकारी आहे. पिण्याच्या पाण्यात धणे आणि जिरे रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी हे पाणी पिण्यास घ्यावे, चवीसाठी खडीसाखर घातली तरी चालेल ऑफिसला जाणार्या लोकांनी बाटलीतच एकेक चमचा अख्खे धणे आणि जिरे घालावे आणि ती बाटली पाणी भरून, किमान चार तास ठेवावी. नंतर दिवसभर तेच पाणी प्यावे. पाणी संपले की पुन्हा पाणी भरावे. पण, धणे-जिरे त्यात तसेच राहू द्यावे. दिवसभर असे पाणी प्यायल्यावर संध्याकाळी ते भिजलेले धणे-जिरे चावून खावे व दुसर्या दिवशीसाठी पुन्हा हीच पद्धत अवलंबावी. कधी त्यात काकडीचे काप, पुदिन्याची पाने, कलिंगडाचे तुकडे इत्यादी घातले तर त्याचीही चव चांगली लागते. गुलाबाच्या पाकळ्या, वेलची व तत्सम त्यात आवडीनुसार घालता येईल. धणे-जिर्याच्या पाण्याने तहानही लवकर भागते आणि जळजळही कमी होते. पोटातील आग व लघवीत जळजळ होत असल्यास ही याचा फायदा होतो.
त्वचा लालबुंद होत असल्यास वारंवार साध्या पाण्याने तोंड धुवावे, कोरडे करावे आणि गुलाबपाणी लावावे. काकडीच्या रसाने आराम पडतो. तसेच चंदनाचा लेपही उपयोगी ठरतो. उन्हातून जाणे कटाक्षाने टाळावे. हलक्या रंगाचे सुती कपडे आवर्जून घालावेत. डोक्यावरही छत्री, टोपी असावी. अंगात सनकोट असावा. छत्री सहसा काळी नसावी. तसेच टोपी स्कार्फही गडद रंगाचा नसावा. कारण, गडद रंग ऊन-उष्मा अधिक शोषून घेतात. तसेच चहा-कॉफी उत्तेजक पेयांचा मारा या ऋतूत तरी कमी करावा. जसा परिसरात, वातावरणात बदल होतो, तसा मनुष्याच्या खानपानाच्या सवयीत आणि पेहरावातही बदल घडून यायला हवा. बाराही महिने आपली भूक आणि तहान सारखीच नसते. उन्हाळ्यात तहान अधिक तर थंडीत भूक अधिक लागणे स्वाभाविक आहे. तसेच पावसाळ्यात पचनशक्ती स्वाभाविक आहे. तसेच पावसाळ्यात पचनशक्ती स्वाभाविकरित्या मंद झाल्याने भूक आणि तहान दोन्ही बेताचीच लागते. शरीराचे हे संकेत माणसाने जाणून घेणे आणि त्याला अनुसरून बदल करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण असे न केल्यास याच गोष्टी आजारांचे व रोगांचे कारण म्हणून प्रकट होतात.
वारंवार उन्हात गेल्याने त्वचा तापते, भाजते, काळवंडते. Sun-burnt skin peel हा त्रास होऊ शकतो. एका ओळखीतील व्यक्तीने किस्सा सांगितला की, ’’लेकीचा स्पोर्ट्स डे. म्हणून पूर्ण दिवस मैदानावर होते आणि संध्याकाळी त्वचा भाजल्यासारखी होऊन लालबुंद होऊन निघू लागली होऊ लागली. याचे कारण ’अतितीव्र उन्हात खूप काळ राहणे’ हे होय. यामुळे त्वचा भाजलीच जाते. असे झाल्यावर त्याला तूप, (जुनं गाईचं असल्यास अधिक गुणकारी) लावावे. जुन्या तुपामध्ये शास्त्राचे घाव, भाजलेली त्वचा पूर्ववत करण्याची क्षमता आहे. पिकलेल्या केळ्याच्या सालीचा आतील भाग भाजलेल्या त्वचेवर चोळावा. आश्चर्यकारक परिणामदिसून येतात. तसेच बटाट्याचे कापा त्वचेचर फिरवावेत. या सगळ्याने उन्हाने करपलेली त्वचा पूर्ववत होण्यास मदत होते. दिवसातून दोन ते तीन वेळा वरील उपाय करावेत आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब अधिक करावा. सनकोट, कार्बोनेटेड ड्रिंक्स ऐवजी वरील प्रकारचे ’सुवर्णसिद्धजल’ प्यावे. कोकम, लिंबू व आवळ्याचे सरबत हे पित्तशामक असल्याने, पित्तातील उष्ण गुण आटोक्यात ठेवण्यास मदत होते. पचायला हलका, सुपाच्य आहार घ्यावा. खूप मसालेदार, खारट किंवा तेलकट खाऊ नये. विशेषतः उन्हाचा त्रास ज्यांना होतो, त्यांनी तरी हे नक्कीच टाळावे. पुढील लेखात त्वचा काळवंडणे व अन्य समस्यांबद्दल जाणून घेऊ.
- वैद्य कीर्ती देव