मागचे काही दिवस साहित्यातून येणारी रामकथा पहिली. वेगवेगळ्या देशातील, काळातील, धर्मातील व भाषेतील - नाटक, काव्य व कथा रूपातली रामकथा पहिली. आज रामकथेचा चित्र, शिल्प, नृत्य व नाट्य अविष्कार.
विविध चित्रशैली पाहतांना, मंदिरातली शिल्पे पाहतांना, वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य पाहतांना हे जाणवते की भारतीय जीवन सर्वांगानी रामकथेने मोहरून गेलं आहे. रामकथेचा भारतीय मनावर, कुटुंब व्यवस्थेवर व जीवन मुल्यांवर असलेला परिणाम मोजता येणे शक्यच नाही. त्याचा काही प्रमाणात अंदाज येऊ शकतो तो या वरून की - रामकथा कथन, गायन, नृत्य व चित्रण ही उपजीविकेची साधने आहेत. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा रामकथा सादरीकरण हे उपजीविकेचे साधन आहे.
उत्तरप्रदेश मध्ये रामकथा कथन आणि रामलीला सादरीकरण या रामायणावर आधारित कला आहेत. शारदीय नवरात्रोत्सवात उत्तर भारतात सर्वत्र रामलीला सादर होते. नऊ दिवसात संपूर्ण रामायण नाट्यरूपात सदर केले जाते व दसऱ्याला रावणदहानाने समाप्त होते. अयोध्येत संपूर्ण वर्षभर रामलीला प्रयोग चालू असतात. तसेच कोकणातील दशावतार कलाकार, विष्णूच्या दहा अवतारांशी संबंधित नाटक सादर करतात. केरळ मधील कथकली नृत्य रामायण व महाभारतातील कथांवर आधारित असते. तसेच इंडोनेशिया मधील रामायण बॅले हे सुद्धा रामाच्या कथेवर आधारित नृत्यनाट्य आहे.
बिहार मधील मिथिला या प्रांतातील – भाषा, लिपी व चित्रशैलीचे नाव आहे – मैथिली. अर्थात सीतामाई! असे म्हटले जाते की सर्वात पहिले मैथिली चित्र जनक राजाने तयार करवून घेतले होते. आणि ते चित्र होते राम व सीतेच्या विवाहाचे.
विजयनगर, हम्पी येथील हजारराम मंदिरावर संपूर्ण रामकथा शिल्पात कोरली आहे. तर आग्नेय आशिया मधील अनेक मंदिरांमध्ये रामकथेतील देखावे कोरले आहेत.
भिल्ल, गोंड, खासी, बोडो आणि इतर आदिवासी समाजात स्थानिक रामकथा प्रचलित आहेत. मिझो लोकांमध्ये – रामकथा कथन (वारी लिबा), रामाच्या पोवाड्यांचे गायन (पेना सकपा) आणि जत्रेत रामायण नाट्य स्वरूपात सादर केले जाते.
म्हणींमध्ये, वाक्प्रचारामध्ये सुद्धा रामाशिवाय पान हलत नाही. “अमक्या तमक्यात राम राहिला नाही”, “रामायण सांगून झाल्यावर म्हणे रामाची सीता कोण?” पासून “अमक्याने राम म्हटला!” इथपर्यंत वाक्यावाक्याला रामाची गरज पडते. जात्यावरच्या ओव्यांपासून, भजन, अभंग, दोहे, करत करत लोकगीतापर्यंत सगळ्यात राम दिसतो.
रामाला राज्याभिषेक झाल्यावर, सीतामाईने हनुमाला एक पाणीदार मोत्याची माला दिली. हनुमानाने एक एक मोती तोडावा आणि फेकून द्यावा असे घडले. सगळ्यांनी त्याला वेडात काढले, अरे इतके सुंदर मोती, तू का तोडत आहेस? तेंव्हा हनुमान म्हणाला, ज्या मध्ये राम नाही तो मोती सुंदर नाही!
काळाच्या ओघात, निसर्ग निर्मित व मानव निर्मित संकटातून, ज्या ज्या सौंदर्यपूर्ण कला टिकल्या आहेत, त्याचे कारण असे की - त्यामध्ये राम आहे!
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या रामकथेवर आधारित काही कला -