विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५९

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2018   
Total Views |
 


 
 
अवंती : मेधाकाकू... आता अभ्यास संपत आल्याची थोडीशी नाराजी असली तरीही मला उत्सुकता आहे ती आज तू काय सांगणार आहेस याची. कारण मागच्या आठवड्यातील म्हणी फारच वेगळ्या होत्या.
 
मेधाकाकू : अवंती... अगदी सुरवातीला तू मला प्रश्न विचारला होतास. या लोकश्रुती, लोकोक्ती म्हणजेच म्हणी आणि वाक्प्रचार कसे निर्माण झाले. कोणी निर्माण केले...? आज आपल्या अभ्यासाच्या शेवटी मी तुला याच्या निर्मितीची कथा सांगणार आहे. मूळ संस्कृत भाषेतील न्यायशास्त्र आणि त्यातील न्यायसूत्रे हे या तर्कसंगत लोकश्रुती, लोकरूढी, नितीवाक्य अर्थातच म्हणी, वाक्प्रचार, कहावत या सर्वांचे मूळ स्त्रोत आहे. उपयुक्त दृष्टांत, साधर्म्य, उपमान, अनुरूपता, साधृश्यता, तुल्यभाव, विरोधाभास आणि साम्यस्थळे हे आपल्या लोकश्रुतींचे मुलभूत गुणधर्म आहेत.
या न्यायसूत्राचे प्रथम रचनाकार अक्षपाद अर्थात गौतम ऋषी. अक्षपाद म्हणजे ज्याच्या पायालाही डोळे आहेत असा विद्वान. यांचा कालावधी ख्रिस्तपूर्व ४०० वर्षाचा मानला जातो. या न्यायसूत्रावर पुढील काळात वात्स्यायन ऋषींनी टीका रचना केली. या टीकेच्या रचनेवरच पुढे उद्योतकर या विद्वान पंडिताने वार्तिका लिहिली म्हणजे भाष्य केले. या वार्तिकेवरच पुढील काळात वाचस्पती मिश्र, उदयनाचार्य आणि वर्धमान उपाध्याय यांनी पुढील संस्कार करून आपापली भाष्य लिहिली. अशा संस्कारांनी आपली प्राचीन न्यायसूत्रे विकसित होऊन परिपूर्ण झाली.
 
अवंती : मेधाकाकू... न्यायशास्त्र आणि या सगळ्या लोकश्रुतींचा उगम यात आहे. हे कसे ?
 
मेधाकाकू : हा तुझा प्रश्न अगदी म्हणजे तुझी साहजिक उत्सुकता आहे कारण ते दोन शब्द न्यायशास्त्र आणि न्यायसूत्र बरोबर आहे ना ? मग आता लक्षात घे की ‘न्याय’ हे मराठी व्याकरणातले नाम आहे आणि त्याचे विविध अर्थ सुद्धा समजून घेऊया आपण. नैतिकता किंवा नीति - नियम, औचित्य, कायदा-कानून-नियम, नैसर्गिक समतोल स्थिती, धर्म (नीति) आणि कुठल्याही विषयातील समान पातळीवरची स्थिती म्हणजे न्याय. आता वर म्हटले तसे दृष्टांत हा लोकश्रुतीचा मूलभूत गुणधर्म आहे. न्यायसूत्र असे धृष्टांत देते जे काही विलक्षण घटनेवर अथवा तुलना करताना समाजाला योग्य मार्ग सूचित करते. म्हणूनच आपल्या म्हणी आणि वाक्प्रचारांची निर्मिती या गौतम ऋषींच्या न्यायसूत्रातून झाली. या न्यायसूत्रांची दुसरी ओळख म्हणजे जे सांगायचं आहे ते अनेक गुणावत्ता अथवा दोषांना, तत्वज्ञानात, अगदी संक्षिप्त स्वरूपात व्याकरणाचे सर्व नियम पाळून एकत्र जोडून, आडवळणाने आपल्या विद्वान पूर्वजांनी सादर केले. म्हणूनच लिखित साहित्यातील ही चिन्ह संस्कृती आहे हे निश्चित.


अवंती : आहा... सही मेधाकाकू एकदम सही... आज, काही तरी लपवलेला खजिना उघडत्येस असं वाटायला लागलंय मला आणि माझी उत्सुकता आता जास्त ताणू नकोस...!


मेधाकाकू : प्राचीन काळातील कूप म्हणजे विहिर आणि त्यातील यंत्रघटिका म्हणजे पाणी काढणारे रहाटगाडगे, यांची वैशिष्ट्ये सर्वपरिचित आहेत. त्याची उपमा वापरून जीवनातील आर्थिक परिस्थितीचे चढ-उतार, जय-पराजय, आनंद-दु:ख असे व्यक्तीचे टोकाचे अनुभव व्यक्त करताना ही मूळ संस्कृत म्हण वापरली गेली.


कूपयंत्रघटिका न्याय


मेधाकाकू : रहाटगडग्‍याचे पोहरे किंवा लोटे ज्‍याप्रमाणें क्रमानें पाणी भरून वर जाऊन रिकामे होऊन पुन्हा खाली येतात व पुन्हां पाणी भरून वर जातात त्‍याप्रमाणें जीवन कालावधीत टोकाचे प्रसंग-परिस्थिती प्रत्येकाला अनुभवाला येत असतातच. वापरातल्या अवजारांचे वैशिष्ट्य उपमेय म्हणून वापरताना असे उपमानाचे म्हणजे वास्तवाचे वर्णन या दोन शब्दांत ठासून भरलेले आहे.

अवंती : आहा... पुन्हा एकदा अवाक आणि अचंबा. मेधाकाकू... किती मागे घेऊन गेलीस आज अभ्यास करताना. मस्त... मस्त... मस्त..!
 
 
मेधाकाकू : अवंती... परवाच्या अभ्यासात तुला, आपण लहानपणी बोलतो त्या ‘र’ आणि ‘ट’ च्या सांकेतिक भाषेचा संदर्भ दिला होता. आता इतके संक्षिप्त वाक्प्रचार किंवा म्हणी या उत्तम व्यवहार कौशल्याचे संकेत म्हणूनही वापरल्या गेल्या असाव्यात अशी माझी खात्री आहे. काही व्यवहार करण्यासाठी खाजगी बैठक सुरु आहे आणि परिस्थितीचे वर्णन पटकन दोन शब्दांत आपल्या सहकार्याला करण्यासाठी याचा वापर निश्चित केला गेला असणार. माझ्या अभ्यासात अशा संक्षिप्त स्वरूपाच्या किमान दीडशे म्हणी - वाक्प्रचार माझ्या वाचनात आले आहेत.

काकतालीय न्याय
 
मेधाकाकू : एक पांथस्थ वाटेत विश्रांतीसाठी एका ताडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी झोपला आहे आणि त्याचे लक्ष झाडावर बसलेल्या कावळ्याकडे आहे. तो कावळा फांदीवरून पटकन उडतो आणि नेमके त्याचवेळी ताडाचे एक फळ खाली पडते. वास्तव असे की ते फळ पिकल्यामुळे निसर्गक्रमाने गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने कावळा उडाला त्याचवेळी जमिनीवर पडणारच होते. मात्र हे फळ कावळा उडाल्यामुळेच माझ्या डोक्यावर पडले अशी या पांथस्थाची पक्की खात्री आहे. अशा वेगवेगळ्या घटना परस्पर संबंध नसूनही जेंव्हा एकमेकांना जोडल्या जातात तेंव्हा असंगती अलंकारात सजलेली ही म्हण वापरली जाते. कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असणे हे या असंगती अलंकाराचे वैशिष्ट्य आहे.


अवंती : वोव्व... व्वोव मेधाकाकू... अफलातून आहे हे सगळे... सांग पुढे... अजून खूप काही...!!!..


मेधाकाकू : अवंती... अनेक उत्तम संस्कार आणि व्यक्तिगत धारणांवर टिप्पणी करतानासुद्धा अशा संक्षिप्त लोकश्रुती काही सहस्त्र वर्षांपासून प्रचलित झाल्या आहेत. यातूनच आपल्याला तत्कालीन समाजाचा उत्तम संस्काराप्रती असलेला प्रभाव आपल्याला निश्चितपणे जाणवतो.

देहलीदीपक न्याय

मेधाकाकू : यातील देहली म्हणजे घराचा मुख्य उंबरठा. या देहालीवरच दीपक म्हणजे पणती ठेवली कि घराच्या बाहेर आणि आत एकाचवेळ उजेड पडेल अशी ही धारणा. एकाच प्रयत्नातून दोन कामे सिद्ध होऊ शकतात अशा सकारात्मक शिकवणीची आणि सामान्य चातुर्याचे वर्णन दोनच शब्दांत करणारी हि लोकश्रुती. एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधणे असा सार अलंकार. निव्वळ दोनच शब्दातून सार अलंकाराचे सार्थ उत्कर्ष दर्शन हे या लोकश्रुतीचे वैशिष्ट्य.

अवंती : मेधाकाकू आज अजूनही समाधान झालेले नाही... अजूनही खूप उत्सुकता आहे पुढचे ऐकण्यासाठी.

मेधाकाकू : हो अवंती... आज माझेही तसेच झालंय आज. आता ही एक खूप छान सुवासिक लोकश्रुती.

चंपकपटवास न्याय.

मेधाकाकू : यातला चंपक म्हणजे सोनचाफा. हा सोनचाफा कधीतरी अंगावरच्या कपड्याच्या खिशात राहून जातो. सोनचाफा सुकून गेला तरी कपड्यांवरचा सुवास मात्र खूप दिवस रेंगाळत राहतो. एखादी व्यक्ती घर सोडून दूरदेशी गेली तरी त्याच्या लहानपणी कुटुंबाचे त्याच्यावर झालेले संस्कार असेच टिकून रहातात अशी खात्री देणारी ही लोकश्रुती. चेतनागुणोक्ती अलंकाराचा अगदी उत्तम नमुना. या अलंकारात निर्जीव वस्तू सजीव आहे असे कल्पून त्या सजीवांप्रमाणे कृती करतात असे वर्णन असते.

अवंती : मेधाकाकू... तुझ्या या सोनचाफ्याचा सुगंध असाच खूप दिवस दरवळत रहाणार आहे...!!

- अरुण फडके
@@AUTHORINFO_V1@@