भारतीय शिल्पकलेला पडलेले सर्वात सुंदर स्वप्न - वेरूळचा कैलास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018   
Total Views |



शिल्पकारांच्या अनेक पिढ्या ह्या कामात खपल्या, पण इतके भव्य-दिव्य काम करून देखील त्यांनी कुठेही आपली नावे ह्या मंदिरात कोरून ठेवलेली नाहीत. 'इदं न मम्' ही उदात्त धर्मभावना असल्याशिवाय असले अलौकिक काम कुठल्याही माणसाच्या हातून घडणेच शक्य नाही.





शिल्पकथा ह्या सदरात आतापर्यंत आपण देशभरातली सुटी-सुटी अनेक शिल्पे पाहिली, पण आज आपण बघणार आहोत तो भारतीय शिल्पकलेचा मुगुटमणी, वेरूळचे एका अखंड पाषाणात कोरून काढलेले कैलास लेणे. गुंफा क्रमांक सोळा ह्या गद्य नावाने कैलास लेण्याची कागदोपत्री नोंद असली तरी हे पूर्ण मंदिर आहे, आणि तरीही, एका महाकाय पाषाणखंडातून कोरून काढलेले असल्यामुळे हे मंदिर एक अद्वितीय शिल्पदेखील आहे. वेरूळच्या लेण्यामध्ये बौद्ध, जैन आणि हिंदू अश्या तिन्ही भारतीय धर्मपंथांची लेणी आहेत, पण ह्या सर्व लेण्यांच्या सुंदर हाराच्या मधोमध असलेले कैलास लेणे हे त्या हारातले रत्नजडित सुवर्णपदक आहे.

राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत सातव्या शतकात वेरूळमध्ये काही हिंदू लेण्या कोरण्यात आल्या होत्या. कदाचित त्याच वेळी ह्या ठिकाणी शिवमंदिर कोरायचा बेत आखला गेलेला असेल, पण दंतिदुर्गाच्या मृत्यूनंतर त्याचा काका, कृष्ण पहिला हा गादीवर आला. हा राजा महापराक्रमी होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने बदामीचे चालुक्य आणि कांचीचे पल्लव ह्या दोन्ही राजघराण्यांना राष्ट्रकूटांचे मांडलिकत्व स्वीकारायला भाग पाडले होते. असे म्हणतात की कृष्णराजा कांचीच्या स्वारीवर गेलेला असताना त्याने आणि त्याच्या राणीने म्हणजे माणकावतीने तिथे पल्लवांनी पाचव्या शतकात बांधलेले भव्य कैलासनाथाचे मंदिर पाहिले आणि त्या मंदिराने भारावून जाऊन असेच भव्य मंदिर आपल्याही राज्यात बांधवून घ्यावे असा त्याने संकल्प केला. कांचीच्या कैलासनाथ मंदिराचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून चालुक्यांची राणी लोकमहादेवी हिने बदामीजवळच्या पट्टडक्कल येथे आपल्या नवऱ्याच्या नावाने भव्य विरुपाक्ष मंदिर उभारले होते. तिथे काम करणारे शिल्पी तिने खास कांचीहून आणवले होते. कृष्णराजाने बहुतेक त्याच शिल्पकारांकडून वेरूळचे कैलास लेणे खोदवून घेतले असावे कारण कैलास लेण्याची शिल्पशैली पल्लव व चालुक्य शिल्पशैलीचा स्पष्ट प्रभाव दाखवतात.

'आधी कळस मग पाया रे' अश्या स्वरूपात खोदवून काढलेल्या ह्या भव्य शैलमंदिराचा मूळ गाभारा राजा कृष्णराजाच्या कारकिर्दीत पूर्ण होऊन इथली प्राणप्रतिष्ठा झाली होती. पण त्यानंतरच्या राजांच्या काळातही ह्या मंदिराचे काम सुरूच होते. मुख्य मंदिराभोवतीच्या शिल्पमंडित ओवऱ्या, सरितामंदिर, लंकेश्वर लेणे, यज्ञशाळा तसेच मातृकामंदिर हे भाग नंतर खोदण्यात आले. राष्ट्रकूट राजांच्या अनेक पिढ्यांची धर्मभावना, दातृत्व आणि कलादृष्टी ह्यातून कैलासनाथाचे हे सुंदर शैलमंदिर साकार झाले. शिल्पकारांच्या अनेक पिढ्या ह्या कामात खपल्या, पण इतके भव्य-दिव्य काम करून देखील त्यांनी कुठेही आपली नावे ह्या मंदिरात कोरून ठेवलेली नाहीत. 'इदं न मम्' ही उदात्त धर्मभावना असल्याशिवाय असले अलौकिक काम कुठल्याही माणसाच्या हातून घडणेच शक्य नाही.

शिखरापासून सुरवात करून खालपर्यंतचे तीन मजले कोरत आणणे, तेही अधिष्ठान, नंदीमंडप, अंतराळ, रंगमंडप, गर्भगृह, प्रदक्षिणा पथ, द्रविड शिखर ह्या सर्व मंदिर वैशिष्ट्यांसकट हे सोपे काम नव्हे. त्यासाठी निव्वळ कलादृष्टीच नव्हे तर मंदिर स्थापत्याची कल्पना, ज्या माध्यमामधून हे काम केले जात होते, त्या माध्यमावरची म्हणजे सह्याद्रीच्या ज्वालामुखीजन्य दगडावरची पकड आणि पूर्ण झाल्यानंतर मंदिर कसे दिसणार आहे त्याचा काल्पनिक आराखडा ह्या सर्व गोष्टी नितांत आवश्यक होत्या. दगड हे माध्यम तसे अक्षमाशील. एक छोटी चूक जरी झाली तरी ती दुरुस्त करता येण्यासारखी नव्हे. त्यातही सह्याद्रीचा हा वोल्कॅनिक अग्निजन्य खडक कोरायला सोपा नव्हे. तरीही आठव्या शतकात आपल्याकडे हे आव्हान स्वीकारणारे शिल्पी होते आणि त्यांनी हे काम करून दाखवलं.

आधी डोंगराच्या उतरत्या कडेला इंग्रजी यू ह्या अक्षराच्या आकाराचा एक मोठा चर खणून गोपुर आणि मुख्य मंदिरासाठी आवश्यक तेवढी मोठा पाषाणखंड मुख्य डोंगरापासून विलग केला गेला. हा चर थोडाथोडका नव्हे तर ३० मी. रुंद आणि तितकाच खोल होता. असे म्हटले जाते की हा चर खोदताना जवळजवळ २५०,००० टन दगड-माती खोदून काढावी लागली. त्या एवढ्या मातीचं काय झालं असेल हे आजही पुरातत्व तज्ज्ञांना न उलगडलेले कोडे आहे. चर खोदून झाल्यानंतर मधोमध असलेल्या ६० मी. लांब व ३० मी. रुंद अश्या महाकाय दगडातून मुख्य कैलासनाथ मंदिराची इमारत कोरली गेली. चौकोनी गाभारा, वर द्रविड पद्धतीचे शिकार, आत प्रचंड मोठे शिवलिंग, गाभाऱ्याच्या बाहेर उघडा प्रदक्षिणा पथ आणि त्याला लागून पंचायतनाची पाच छोटी मंदिरे, गाभाऱ्याबाहेर विस्तीर्ण रंगमंडप, त्या रंगमंडपाला तोलून धरणारे घटपल्लवयुक्त चौकोनी खांब, व सभामंडपासमोर थोड्या अंतरावर असलेला नंदिमंडप व दोन्ही मंडपांना जोडण्यासाठी खोदलेला दगडाचाच पूल ही कैलासनाथ शिल्पमंदिराची वैशिष्ट्ये. मंदिराच्या वास्तूचा सबंध तळमजला भरीव प्रस्तरखंड आहे. मंदिराचे अधिष्ठान किंवा जगती चांगली पुरुषभर उंच आहे. ती जगती तोलून धरण्यासाठी म्हणून शौर्य आणि शक्ती ह्यांचे प्रतीक म्हणून हत्ती, सिंह आणि व्याल यांच्या प्रचंड मूर्ती खोदलेल्या आहेत. मंदिरातले स्तंभ, देवकोष्ठे, छपरे, विमान व शिखर सर्वांवर पल्लव शिल्पशैलीची छाप आहे.

कैलासनाथ मंदिराची ही मूळ वास्तूच इतकी देखणी, प्रमाणबद्ध आणि भव्य आहे की मंदिराच्या बाह्य भिंतीवर एकही शिल्प कोरलेले नसते तरी आपण ह्या मंदिराच्या भव्यतेने दिपूनच गेलो असतो. पण आपले पूर्वज इतके अल्पसंतुष्ट नव्हते म्हणून त्यांनी मुळातच सुंदर असलेल्या ह्या मंदिराला उत्कृष्ट शिल्पकलेचा साज चढवलेला आहे. कांचीच्या कैलासनाथ मंदिराच्या भिंतीवर श्री शिवशंकरांच्या मूर्तींचे जितके म्हणून विविध शिल्पाविष्कार कोरलेले आहेत, त्यापैकी बहुतेक आपल्याला वेरूळच्या कैलासनाथ मंदिरातही सापडतात. पार्वतीशी विवाह करणारा कल्याणसुंदर शिव, मार्कंडेयाला यमपाशातून सोडवणारी मार्कंडेयानुग्रह मूर्ती, रावणाचे गर्वहरण करणारे शिव, कार्तिकेयासहित सोमस्कंदशिवमूर्ती, तांडव करणारी तांडवमूर्ती, अंधकासुराचा वध करणारे रौद्र शिव, त्रिपुरान्तकशिवमूर्ती वगैरे शिवागम ग्रंथांत वर्णिलेले शिवमूर्तींचे सर्व प्रकार ह्या मंदिरात अंकन केलेले आहेत. पुढचे काही आठवडे आपण कैलास लेण्यामधली सुटी शिल्पे आणि त्यामागच्या कथा जाणून घेणार आहोत.

वेरूळचे हे कैलास लेणे माझे अत्यंत आवडते. मी जवळजवळ आठ वेळा कैलासाचे दर्शन घेऊन आलेय. तरीही प्रत्येक वेळी वेरूळवरून परत आल्यानंतर काही दिवस मला काहीच सुचत नाही. जे बघितलं, अनुभवलं ते लाख प्रयत्न करूनही शब्दात उतरवता येत नाही. जीवाची खूप तडफड तडफड होते. स्वतः ची तुटपुंजी शब्दसंपदा आणखीनच दरिद्री, कळाहीन वाटायला लागते. तिथल्या कलाकारांच्या छिन्नी-हातोड्याच्या एकेक घावागणिक जीव ओवाळून टाकावा इतकं त्यांचं थोर कसब. एका प्रचंड प्रस्तरातून कोरून काढलेलं तीन मजली मंदिर, गर्भगृह, प्रदक्षिणापथ, दोन-दोन सभा मंडप, दोन उत्तुंग विजयस्तंभ, दोन्ही बाजूंना असलेल्या दीर्घिका, प्रत्येक भिंतीवर कोरलेली अप्रतिम शिल्पे. किती किती आणि काय काय म्हणून बघायचं? घरी परत आले तरी डोळ्यांसमोर दिसतात ती कैलास लेण्यांमधली शिल्पे, हाडामासाची माणसे नव्हे. विख्यात मूर्तीतज्ञ डॉ. देगलुरकरांच्या शब्दात सांगायचं तर नुसते 'शिल्पबंबाळ' होऊन परततो आपण!



या लेखाचा वाचून जसा आपण आनंद घेतलात त्याचप्रमाणे याचा एक व्हिडियो आपण पाहूयात... 
 
 
 
 
- शेफाली वैद्य
@@AUTHORINFO_V1@@