चरितम् रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् |
रामाचे चरित्र मधुर आहे. त्याच्या कथेची गोडी अवीट आहे. रामाबद्दल कितीही लिहिले तरी कमीच आहे. रामाचे वर्णन करणारे शत कोटी श्लोक जरी लिहिले, तरी आता रामाबद्दल काही लिहायचे शिल्लक नाही, असे होणार नाही. म्हणूनच मोठमोठ्या ऋषींनी, संतानी, पंडितांनी, शास्त्रींनी, कवींनी, अभ्यासकांनी अनेक रामायणे लिहिली, तरी त्यातला गोडवा कमी झाला नाही!
सहस्रावधी वर्ष मानवाला भुरळ घालणाऱ्या कथेचा नायक राम, कसा आहे? कशामुळे त्याच्यावर इतके लिहिले गेले? हजारो वर्षानंतरसुद्धा त्याच्याबद्दल का लिहावेसे वाटते? त्याचे एक कारण तो समर्थ आहे. म्हटलेच आहे – || श्रीराम समर्थ ||
सुकुमार रामाला युवराज केले, तर तो योग वासिष्ठचा अधिकारी होतो. षोडश वर्षीय रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवले तर तो त्राटिकेचा वध करून यज्ञाचे रक्षण करतो! मिथिला पाहायला नेले तर शिवधनुष्य तोडून स्वयंवराचा पण जिंकतो! वनवासात पाठवले तर तिथे दुष्टांचे मर्दन व सुष्टांचे रक्षण करतो! भार्या पळवली तर हनुमंतासारख्या दूताकरवी समुद्रापार तिचा शोध घेतो! वनवासात राहणारा, वल्कले धारण करणारा, जटाधारी धनुर्धर; सुग्रीवासारखा राजा मित्र म्हणून मिळवतो, सैन्य जमवतो, समुद्रावर सेतू बांधतो, बिभीषणासारखे शत्रूची मर्मस्थळे फोडून लंकाधिपती रावणाला युद्धात हरवतो! आणि सिंहासनावर बसवले तर आदर्श असे रामराज्य निमार्ण करतो! हे केवळ समर्थाचेच कार्य होय!
“How to live a powerful life” – यावर अनेक मॉडर्न गुरु बोलतात. त्या Powerful Life चे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीराम! आणि म्हणूनच - श्रीराम समर्थ आहे. केवळ राम नाही, तर रामचे नाम आणि त्याचे चरित्र सुद्धा सामर्थ्य देणारे आहे!
रात्री अंधारात कुठे एकट्याने जायची भीती वाटली तर मनुष्य, “राम, राम, राम, राम ...“ म्हणून धैर्य मिळवतो. तसे भारतावर जेंव्हा जेंव्हा परकीय सत्तांच्या भीतीचे सावट पसरले तेंव्हा तेंव्हा रामाच्या चरित्राने धैर्य दिले आहे! मुघल राज्याच्या काळात तुलसीदासांच्या रामचरितमानस ने समाजाला बळ दिले. आदिलशाही – निजामशाहीच्या काळात एकनाथांच्या भावार्थ रामायणाने समाजाला आधार दिला. औरंगझेबच्या काळात रामदास स्वामींच्या रामाने महाराष्ट्राला लढायची प्रेरणा दिली. आणि इंग्रजांच्या राजवटीत गांधीजींच्या “रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम” ने भारतवासीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी एकत्र बांधले.
रामाच्या चरित्राने भारताला कठीण प्रसंगात सामर्थ्य दिले तर वैभवशाली काळात नम्रता दिली. भारताच्या सुवर्णयुगात कालिदासाच्या रघुवंशासारखे काव्य जन्मले, तर स्वातंत्र्योत्तर काळात ‘गीत रामायण’ सारखे काव्य प्रसवले. ज्या देशातली प्रभात राम चिंतनाने होते, दिवसाची सुरुवात राम प्रहाराने होते, कोणतीही भेट ‘जय रामजी की’ ने होते, आणि देहाचा शेवट सुद्धा रामनामाने होतो; त्या देशाच्या हृदयाला कान लावला तर त्यामधून रामाचे नाव येईल यात शंकाच नाही!
|| रामकथा ||
जो मनाला रमवतो तो राम, अशी ज्याच्या नावाची व्युत्पत्ती आहे, त्या रामाने वाल्मिकींपासून गदिमांपर्यंत हजारो कवींना भुरळ घातली! महान कवींना रामकथा लिहिल्याशिवाय राहवलं नाही हे जितके खरे, तितकेच हेही खरे की त्यांनी रामकथा लिहिल्याने ते कवी महान झाले! वाल्मिकी ऋषींची ओळख त्यांच्या रामायणामुळे आहे. एकाहून एक सुंदर काव्य निर्माण करणाऱ्या कालिदासाला ‘रघुकार’ म्हणूनच ओळखले जाते. तर अनेकोत्तम गीते लिहिणारे ग.दि.मा गीत-रामायणाचे कवी म्हणूनच स्मरणात राहतात.
रामायण हा खरेतर स्वतंत्र ग्रंथ आहे. पण रामकथेच्या प्रचीनतेमुळे आणि सौंदर्यामुळे प्रत्येकला ही कथा आपली वाटली. आपल्या साहित्यात रामाची कथा असावी असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक होते. आणि म्हणूनच ती कथा महाभारतात येते. जैन साहित्यात येते. बौद्ध साहित्यात येते. गुरुग्रंथ साहेब मध्ये येते. विष्णू पुराण, भागवत पुराण आदि पौराणिक साहित्यात रामकथा येते. संस्कृत काव्यात, नाटकात येते. प्राकृत साहित्यात येते. लोकगीतात येते. भारतीय चित्रपटात येते. विदेशी चित्रपटात येते. भारतीय नृत्यात येते. विदेशी बॅले मध्ये येते. चित्रात आणि शिल्पात येते. म्हणी आणि वाक्प्रचारात येते. रामाची कथा भारताच्या बाहेर नेपाळ, तिबेट, चीन, कोरिया, जपान, मोंगोलिया, म्यानमार, इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स, वीएतनाम आणि श्रीलंकेतील साहित्यात सुद्धा येते.
|| रामकथामाला ||
अति मधुर अशा हजारो रामाकथांपैकी काही निवडक साहित्यकृती -
वाल्मिकी रामायण – वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण.
भासाची रामायणावर आधारित नाटके – प्रतिमा नाटक व अभिषेक नाटक.
कालीदासाचे महाकाव्य – रघुवंश.
बौद्ध रामायण – बौद्ध साहित्यात अनेक रामकथा आहेत. त्यापैकी जातक कथा संग्रहातील दशरथजातक ही एक. ही रामकथा फक्त वनवासाची आहे. राम, लक्षमण व सीता यांना वनवास, त्या दरम्यान त्यांचे हिमालयात वास्तव्य, व त्यानंतर पुनश्च वाराणसी येथे आगमन व राज्याभिषेक. या मधील राम हा बुद्धाचा पूर्वजन्म असून, यशोधरा पूर्वजन्मातील सीता आहे.
जैन रामायण – पउमचरीय अर्थात पद्मचरित हे जैन साहित्यातील अनेक रामायणा पैकी मुख्य रामायण. आचार्य विमलसुरी यांनी जैन महाराष्ट्री भाषेत लिहिलेले आहे. जैन धर्माला अनुसरून, या मधील राम अहिंसक आहे. सहजच रावणाचा वध लक्ष्मण करतो. या मधील सर्व पात्रे (लक्ष्मण व रावण सोडून) जैन धर्म स्वीकारतात, व मृत्यू नंतर स्वर्गात जातात.
शीख रामायण – गुरु गोविंद सिंग यांनी गुरु ग्रंथ साहिबच्या दशम ग्रंथात रामाची कथा वर्णिली आहे.
सेरीराम, रामकियेन / रामकेर्ती - आग्नेय आशिया मधील रामायणाची संस्करणे.
महावीरचरित व उत्तररामचरित ही भवभूतीने ७ व्या शतकात रामकथेवर लिहिलेले दोन नाटके. ही नाटके कल्पी येथील सूर्याच्या कालप्रियनाथ नामक मंदिरात सादर होत असत.
बालरामायण - कवी राजशेखरने लहान मुलांसाठी लिहिलेले रामायणावरील १० अंकी नाटक.
अध्यात्म रामायण, आनंद रामायण, अद्भुत रामायण, तत्त्वसंग्रह रामायण आदी रामायणे १४ व्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंत लिहिली गेली.
स्थानिक भाषेतील रामायणे - ‘रंगनाथ रामायणम्’ या तेलगु रामायणात, रामाने खारीच्या पाठीवर हात फिरवला ती गोष्ट येते. कवी कम्बर यांनी लिहिलेले तमिळ ‘कंबरामायण’, असामी ‘सप्तकांड रामायण’, प्रेमानंदचे गुजराती रामायण, बंगाली ‘कृत्तीवासी रामायण’, उडिया ‘दंडी रामायण’, कन्नड भाषेतील ‘तोरावे रामायण’, मल्याळी ‘अध्यात्म रामायण’, हिंदी ‘तुलसीरामायण’, मराठी ‘एकनाथी रामायण’ अशी लांबच लांब रामकथामाला आहे.
लक्ष्मणाचार्य यांनी लिहिलेले १०८ श्लोकांचे नाम-रामायण. ज्यामध्ये रामाच्या नावांमधून रामकथा सांगितली आहे. आणि हे आहे एक-श्लोकी रामायण ज्या मध्ये एका श्लोकात रामकथा सांगितली आहे.
आदौ राम तपोवानदि गमनं हत्वा मृगं कांचनम् |
वैदेही हरणं जटायू मरणं सुग्रीव संभाषणम् |
बाली निग्रहणम् समुद्र तरणं लंकापुरी दाहनम् |
पश्चात् रावण कुंभकर्ण हननं एतद्धी रामायणम् ||
या रामनवमी निमित्त रामकथेच्या कथा वाचत रहा ...
रामकथेने जातीच्या, धर्माच्या, देशाच्या, काळाच्या सर्व प्रकारच्या सीमा ओलांडल्या. १७ व्या शतकातील ही रामायणाची पोथी त्याचेच एक उदाहरण आहे. महाराणा जगत सिंग यांनी ४०० चित्रे असलेली रामायणाची पोथी करवून घेतली. लेखनिक महात्मा हिरानंद हा जैन. याने जैन पद्धती प्रमाणे मध्ये चौकटीची नक्षी सोडून लिहिले आहे. आणि चित्रकार साहिब दिन, ज्याने मुघल पद्धतीने चित्रे काढली आहेत.
चित्राच्या पहिल्या भागात रुसलेल्या कैकेयीची दशरथ विचारपूस करतांना दिसतो. पुढच्या भागात कैकेयी दशरथाकडे दोन वर मागत आहे. त्यानंतर दशरथ कैकेयीचे पाय धरून विनवणी करतो, दुसरे काहीतरी माग! पण ती काही बधत नाही. तर रामच्या राज्याभिषेका संबंधी काही बोलायला मंत्री सुमंत दारात येऊन उभा आहे.
- दिपाली पाटवदकर
References –
१. रामकथा उत्पत्ती और विकास – फादर कमिल बुल्के
२. British Online Gallery, Ramayana