रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्याविषयी श्री गोळवलकर गुरुजींनी भाष्य केले आहे. डॉक्टरांच्या नजरेत असलेले संघाचे स्वरुप श्रीगुरुजींनी व्यापक केले. डॉक्टरांची गुरुजींशी पहिली भेट, त्यानंतर गुरुजींच्या मनातली संघकार्याची ओढ, श्रीगुरुजींच्या नजरेतून डॉ. हेडगेवार कसे होते आदी मुद्द्यावर या लेखात सविस्तर माहिती दिली आहे.
भारतीय संस्कृतीत गुरू-शिष्य यांच्यातील नातेसंबंधांना केवळ वैचारिक वा तात्विक अधिष्ठान नसते तर ते भावनिक व आत्मीयतेचेही असते. घडविणारा आणि घडणारा असेही ते एक उत्कट नाते असते. आई मुलाला जसे घडविते तसे गुरू शिष्याला घडवित असतो. म्हणूनच कदाचित गुरुला ‘गुरुमाऊली’ असे म्हटले जाते. प्राचीन भारतात गुरू-शिष्य परंपरेची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. अर्वाचीन काळात श्रीरामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद, नामदार गोखले-म.गांधी, डॉ. हेडगेवार- गोळवलकर गुरुजी अशी उज्ज्वल परंपरा पाहावयास मिळते. पाश्चात्त्य ग्रीक संस्कृतीत सॉक्रेटिस-प्लेटो-ऍरिस्टॉटल अशी गुरू-शिष्यांची गुंफण दिसते, पण त्यांच्यातील नाते भावबंधापेक्षा वैचारिक स्वरूपाचे अधिक असते. या पार्श्र्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि प्रा. माधवराव गोळवलकर तथा श्रीगुरुजी यांच्यातील वैचारिक नाते व भावबंध समजावून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.
भारतीय संस्कृतीत गुरू-शिष्यांच्या या नात्याला अनेक पदर आहेत. केवळ कनिष्ठ जातीत जन्माला आल्यामुळे एकलव्याला गुरू द्रोणाचार्यांनी शिष्यत्व नाकारले. तेव्हा एकलव्याने आपल्या गुरुंचा पुतळा तयार केला आणि त्याच्या साक्षीने धनुर्विद्येचे धडे गिरवून ती विद्या आत्मसात केली व तो ज्ञानसंपन्न कुशल धनुर्धर झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या त्रिमूर्तींना- गौतमबुद्ध, कबीर व म.फुले आपले गुरू मानले, त्यापैकी त्यांनी ‘याचि देही, याचि डोळा’ पाहिलेही नव्हते. या उलट रामकृष्ण-विवेकानंद आणि डॉ. हेडगेवार-श्रीगुरुजी यांचे गुरू-शिष्याचे नाते प्रत्यक्ष आत्मानुभूतीवर आधारलेले होते, प्रत्यक्ष सहावासात फुललेले होते. श्रद्धा, निष्ठा, समर्पण या भावबंधावर या सर्वच गुरू-शिष्यांची नाती विकसित झाली हे महत्त्वाचे.
रामकृष्ण-विवेकानंद यांच्या चरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर हे नाते कसे उलगडत गेले याचा आलेखच पाहायला मिळेल. येथे या नात्यात गुरू हा शिष्याला पावलोपावली पारखून घेतो, असे दिसते तर बुद्धिवादी व तर्कनिष्ठ असलेला शिष्यही गुरुची कसोटी पाहिल्याशिवाय व प्रत्यक्ष खात्री करून घेतल्याशिवाय रामकृष्णांचा गुरू म्हणून स्वीकार करीत नाही. हेडगेवार व श्रीगुरुजी यांच्याबद्दलही थोड्याफार फरकाने असेच म्हणता येईल. मात्र स्वीकाराची ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की, शिष्याच्या मनांत जो सेवाभाव, समर्पण वृत्ती व श्रद्धा जागृत झालेली दिसते. त्याला तोड नाही. रामकृष्ण-विवेकानंद तसेच हेडगेवार-गुुरुजी या गुरू-शिष्यांच्या जडणघडणीत व वाटचालीत विलक्षण साम्य दिसते. तेही लक्षणीय आहे. डॉ. हेडगेवारांनी गुरुजींच्या संदर्भात अनेक ठिकाणी भाष्य केलेले दिसते. तसेच भाष्य श्रीगुरुजींनी डॉक्टरांच्या संदर्भातही केले आहे, हा सगळा वैचारिक व भावनिक प्रवास विलक्षण सुंदर आहे. त्यातून आपल्या डोळ्यासमोर गुरुजींच्या नजरेतून दिसणारे डॉक्टरांचे भव्य व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.
श्रीगुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी एक पदर आहे. त्याचा जाता जाता फक्त उल्लेख करतो. स्वभावत: आध्यात्मिक वृत्तीचे एकांतप्रिय व विरागी असणारे गुरुजी रामकृष्ण मिशनकडे स्वाभाविकपणे ओढले गेले होते. रामकृष्ण, विवेकानंद व त्यांचे गुरूबंधू अखंडानंद यांचा गुरुजींवर खूप प्रभाव होता. त्याच तंद्रीत ते सारगाछी येथील अखंडानंदांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या चरणी लीन झाले. ते अगदी स्वामीजींच्या अंतापर्यंत. तेथे त्यांनी अखंडानंदांची अगदी तहानभूक विसरून मनापासून व निरलसपणे सेवा केली. सेवेचे सामर्थ्य अद्भुत असते. ते सेवकांच्या मनातील अहंकाराचा निचरा करते. याचा साक्षात अनुभव गुरुजींनी घेतला. उभयतांच्या आध्यात्मिक विषयावर दीर्घ चर्चाही झाल्या. आपल्या देहत्यागापूर्वी स्वामीजींनी गुरुजींना रीतसर दीक्षाही दिली. स्वामीजींनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार गुरुजींनी आपला केशसंभार व दाढी जन्मभर तशीच ठेवली. गुरुप्रती असणारा भक्तीभाव गुरुजींनी असा व्यक्त केला. मात्र गुरुजींच्या जीवनातील या गूढ आणि आध्यात्मिक अध्यायाचा वेध घेणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. येथे आपण फक्त डॉ. हेडगेवार व श्रीगुरुजी यांच्या नात्यातील वैचारिक भागावर व भावबंधावर लक्ष केंद्रित करणार आहोत.
डॉक्टरजींनी संघस्थापनेनंतरच्या आपल्या कार्यकाळात हिंदू धर्म व हिंदू समाज यांच्यासंबंधी जे मूलभूत चिंतन केले, ते एक द्रष्टाच मांडू शकतो. मात्र त्यांनी केलली मांडणी ही सूत्ररूपाने केलेली आढळते. ही मांडणी करताना ते जरी तत्त्वचिंतन करीत असले तरी त्यांचे पाय जमिनीवर घट्ट होते. त्यांना वास्तवाचे सुस्पष्ट भान होते. त्यांच्या दृष्टीतील रा. स्व. संघाचे स्वरूप हे रेखाचित्रासारखे होते. त्यात श्रीगुरुजींनी आपल्या असामान्य प्रतिभेने रंग भरले. त्याचा आशय व्यापक केला. एका अर्थाने त्यांनी संघविचाराचे सिद्धांतन केले.
१९३० च्या मे महिन्यात श्रीगुरुजी काशी विद्यापीठात प्राणिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे ते भय्याजी दाणी व अन्य संघ स्वयंसेवकांच्या सपर्ंकात आले व संघशाखेत जाऊन त्या कार्यात रस घेऊ लागले. गुरुजी शिकवता शिकवता शिकतही होते. काशी विद्यापीठाच्या संपन्न ग्रंथालयातील हजारो पुस्तके त्यांच्या तीन वर्षांच्या मुक्कामात त्यांनी वाचली होती. या बुद्धिमान व विद्धान प्राध्यापकाच्या संघाविषयीच्या आत्मीयतेबद्दल व आस्थेबद्दल तिकडील कार्यकर्त्यांच्या पत्रातून डॉक्टरांना कळत असे. डॉक्टरांचे वैशिष्ट्य असे की, संघाजवळ येऊ लागलेल्या अशा तरुण व बुद्धिमान कार्यकर्त्यांविषयी त्यांच्या मनात अतीव आस्था असे. स्वाभाविकपणे डॉक्टर माधवरावांशी संबंधित असलेल्या नागपुरातील स्वयंसेवकांजवळ त्यांच्याविषयी मायेने चौकशी करीत असत. तेव्हापासून या तरुणावर डॉक्टरांचे लक्ष होते. एप्रिल १९३२ मध्ये गुरुजी सुट्टीत नागपूरला आले होते. एके दिवशी ते रस्त्याने चालले असता डॉक्टरांना गुरुजी दिसले. तेव्हा त्यांना थांबवून डॉक्टरांनी त्यांना विचारले,‘‘आपले नाव माधवराव गोळवलकर आहे काय?’’ त्यावर गुरुजींनी ‘हो’ म्हटले. तेव्हा गुरुजींना डॉक्टर म्हणाले, ‘‘आपल्या सवडीने एकदा माझ्या घरी अवश्य या.’’ हीच डॉक्टरांची व गुरुजींची पहिली भेट. त्यांच्या पुढील भेटीत त्या उभयतांत संघाविषयी निश्र्चितच चर्चा झाली असणार.
१९३२ च्या विजयादशमीच्या उत्सवासाठी डॉक्टरांनी विचारपूर्वक व योजनापूर्वक काशी विद्यापीठातील श्री सद्गोपालजी व श्रीगुरुजी यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलाविले. नागपुरातील विजयादशमी उत्सवाला संघरचनेत विशेष महत्त्व असते. म्हणून दूरदृष्टीने डॉक्टरांनी हे निमंत्रण दिले असावे. त्या समारंभात ‘काशी शाखेतील आपले उत्साही व विद्वान कार्यकर्ते’ अशा शब्दांत त्यांची उपस्थितांना ओळख करून दिली. या उत्सवात डॉक्टरजी प्रमुख भाषण करताना म्हणाले, ‘‘आपल्या धर्माचे, समाजाचे व संस्कृतीचे रक्षण करणे, हे संघाचे ध्येय आहे. काही लोकांना स्वधर्माचे रक्षण करणे म्हणजे परधर्माचा द्वेष करणे, असे वाटते. पण स्वधर्माचे रक्षण करणे म्हणजे दुसर्यांचा द्वेष कसा होतो, हेच मला कळत नाही. संघाच्या कार्यपद्धतीत पंथोपपंथ, जातीय मतभेद इत्यादी भानगडी उपस्थित होऊ शकत नाहीत. संघ संपूर्ण समाजाचा एकत्वाने विचार करणारा आहे. संघात सर्व जातींचे लोक एका ध्वजाखाली कामकरीत असल्यामुळे संघातून अस्पृश्यता केव्हाच नाहीशी झालेली आहे. आपल्यावरील मारक हल्ल्यापासून आपले रक्षण करण्यासाठी हिंदू समाजाने सिद्ध असावे म्हणूनच संघाची स्थापना झाली आहे.’’
अगदी सोप्या,सरळ परंतु प्रभावी शब्दांत डॉक्टरजींनी संघाचा विचार व व्यवहार तसेच ध्येयवाद श्रोत्यांसमोर मांडला. कोणाच्याही मनाला थेट भिडणारे ते भाषण होते. खरे तर ही मांडणी करताना डॉक्टरांच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने श्रीगुरुजी असणार, हे निश्र्चित. कोणत्याही तत्त्वाचे, तंत्राचे अवडंबर न माजवता डॉक्टरांनी आपला विषय पारदर्शकरित्या मांडला, त्याचा प्रभाव निश्र्चितच गुरुजींच्या मनावर पडला असणार. एका तप:पूज्य योग्याचे ते शब्द होते. त्या शब्दांपेक्षा त्यापाठीमागे ते बोलणार्या व्यक्तमत्वाचे सामर्थ्य होते, हे गुरुजींच्या नक्कीच लक्षात आले असणार!
अर्थात गुरुजींच्या मन, बुद्धीवर प्रभाव टाकणे, इतके सोपे नाही याची डॉक्टरांना जाणीव होती. पण त्यांनी योग्य दिशेने पाऊल टाकले होते. डॉक्टरांना हे माहीत होते की, समाजात पदवीधरांची असलेली प्रतिष्ठा लक्षात घेता जितके पदवीधर तरुण कार्यकर्ते संघाचा विचार आपल्या कृती, उक्तीतून समाजात प्रकट करू लागतील, तितक्या प्रमाणात संघाचे वजन वाढून, संघाचा विस्तारही दुतगतीने होऊ लागेल आणि गुरुजी तर पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असामान्य तरुण होते आणि एका नामवंत विद्यापीठात प्राध्यापक होते.
डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजी म्हणजे दोन जबरदस्त व्यक्तिमत्त्वे होती. त्यांच्या जीवनातील सुरुवातीचा काळ म्हणजे कधी परस्पर अनुकूलतेचा, तर कधी विरोधी दिशांनी ताणल्या जाणार्या त्यांच्या इच्छाशक्तीचा, चित्त दंग करून टाकणार्या चढउतारांचा विलक्षण काळ होता. डॉक्टरांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंतर्बाह्य संघरूप होऊन गेलेले व्यक्तिमत्त्व होते, तर गुरुजींचे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रकांड पंडित, आत्मप्रवण, काहीसे आपल्या मतांवर ठामअसणारे आणि आपल्या स्वतंत्र बुद्धीनुसार जगण्याची प्रबल प्रवृत्ती असणारे व्यक्तिमत्त्व होते, गुरुजींच्या ठायी असामान्य गुणांचा ठेवा होता, हे डॉक्टरांनी ओळखले होते. कोणताही विषय सुलभ करून शिकवण्याची त्यांची हातोटी डॉक्टरांना ज्ञात होती. त्यांच्या अध्यापनाला धनलालसेचा स्पर्श नाही, हेही त्यांनी ओळखले होते. कुशाग्र बुद्धी, निरलस वृत्ती, सेवाभाव, मनमोकळा स्वभाव, तरतरीतपणा हे गुरुजींच्या ठायी असलेले गुणत्यांनी हेरले होते. कोणत्याही विषयात तरलस्पर्शी वृत्तीने लक्ष घालण्याची त्यांची आकांक्षा त्यांनी अचूक ओळखली होती. दुसर्या बाजूला गुरूजींचे आध्यात्मिक व इतर ग्रंथांचे अफाट वाचन होते. ध्यानधारणा, विरागी वृत्ती व एकांतवासाची त्यांची आवड याची डॉक्टरांना जाण होती. नागपुरातील श्रीरामकृष्ण आश्रमाची गुरुजींना ओढ होती, हेही डॉक्टरांना ठाऊक होते.
खरे तर डॉक्टरांचे स्वतःचे जीवन म्हणजेच एक चालते बोलते वैराग्य होते. मात्र त्यांची वैराग्याची संकल्पना वेगळी होती. गिरीकंदरात किंवा वनात जाऊन एकांतवासात तपश्चर्या करणे, म्हणजे वैराग्य ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती. समाजापासून दूर राहून केवळ आत्मानंदात आत्मसुख सागरात रमणारे वैराग्याचे रूप असते, हे डॉक्टरांना ज्ञात असले तरी ते त्यांना रूचणारे नव्हते. देशकाल परिस्थितीचा विचार करता प्रत्यक्ष समाजात राहून कमलपत्रांवरील जलबिंदूप्रमाणे पाण्यात असून नसल्यासारखे अलिप्त राहून प्रकट होणारे चालतेबोलते कर्मयोगी वैराग्य त्यांना हवे होते. त्यांचे स्वतःचे जीवन म्हणजे अशा वैराग्याचा हृदयंगमआविष्कार होता. स्वाभाविकपणे गुरुजींसारख्या लोकोत्तर पुरुषाची वृत्ती वनवासी व गिरीवासी न होता जनवासी व्हावी, अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणूनच गुरुजींना आपल्याप्रमाणेच संघरूप, समाजरूप झालेले पाहण्यासाठी डॉक्टर आतुर झालेले होते. हे कार्य कठीण असले तरी अशक्य नव्हते. डॉक्टर त्या दिशेने प्रयत्न करीत होते, मात्र त्यांना त्याची जाणीव होती की एक स्वच्छंद, खळाळता व निर्मळ जीवनप्रवाह पात्राच्या मर्यादेत सुनिश्चित दिशेने मार्गस्थ करणे, हा एक महाप्रयास होता. डॉक्टरांची चिकाटी अशी की, या प्रयासात ते कालांतराने यशस्वी झाले.
हा तरुण आज संघकार्यात प्रत्यक्ष हिरीरीने भाग घेत असला तरी त्याच्यातील वैराग्य केव्हा उसळी मारून वर येईल याचा नेमनाही, अशी गुरुजींच्याबाबत डॉक्टरांना शंका वाटत असते. अशावेळी म्हणजे ऑक्टोबर १९३६ मध्ये श्रीगुरुजी एकाएकी घरातून निघून गेले आहेत, हे कळल्यावर डॉक्टरांच्या मनाची काय घालमेल झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यांच्या जाण्याने डॉक्टरंाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. राष्ट्रीय मोक्षप्राप्तीचे आव्हान पुढे असताना व सगळा समाज दुरवस्थेत पिचत असताना अशा मेधावी तरुणांनी व्यक्तिगत मोक्षाच्या मागे का लागावे? देशात आकाश फाटल्याप्रमाणे एकूण भयानक अवस्था झाली असता कर्त्या व सुविद्य तरुणांनी प्राण पणाला लावून व आपल्या सर्वस्वावर निखारे ठेवून गगनाला गवसणी घालण्याच्या आत्मविश्वासाने पुढे येणे आवश्यक व अपेक्षित नाही काय? अशावेळी गुरुजींसारखा एक कर्तृत्ववान तरुण आपल्या शक्तीचा वापर देशातील संघटनेची उणीव भरून काढण्यासाठी न करता घरातून अज्ञात स्थळी निघून का जातो? असे प्रश्न डॉक्टरांना सतावत होते. हे प्रश्न उपस्थित करण्याचा डॉक्टरांचा अधिकार होता; कारण त्यांनी स्वतः सारे जीवन मातृभूमीसाठी समर्पित करून टाकले होते. आपला जिवंत आदर्श त्यांनी युवकांसमोर ठेवला होता. अर्थात विशिष्ट लोकोत्तर व्यक्तीच्या जीवनात होणार्या अशा प्रकारच्या अनाकलनीय उलथापालथीतही नियतीचे काही सूत्र असावे, अशी स्वतःच्या मनाची समजूत काढून डॉक्टर त्यावेळी तरी गप्प बसले. सारगाछीला गेल्यापासून सहा महिन्यांच्या आत म्हणजे २ फेबु्रवारी १९३७ रोजी स्वामी अखंडानंद कालवश झाले. मार्च १९३७ मध्ये गुरुजी नागपूरला परत आले. डॉक्टरांच्या लक्षात आले की वैयक्तिक जीवनाच्या दृष्टीने गुरुजी आता पूर्ण विरागी झाले आहेत. ते परतल्याचा स्वाभाविकपणेच डॉक्टरांना विशेष आनंद झाला. ज्या व्यक्तिच्या अंगी कर्तृत्व, बुद्धिमत्ता व वैराग्य आहे, अशी व्यक्तीच राष्ट्राचा संसार करू शकते, असा डॉक्टरांचा विश्वास असल्यामुळे गुरुजींचे हे पुनरागमन डॉक्टरांना अतिशय आश्र्वासक वाटले.
सारगाछीहून परतल्यानंतर डॉक्टरजींच्या लोभस व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने श्रीगुरुजी संघाच्या दैनंदिन कार्यात अधिकाधिक लक्ष घालू लागले. ते कधी डॉक्टरांबरोबर तर कधी स्वतंत्रपणे प्रवासावर जाऊ लागले. त्यांच्या सहवासात डॉक्टरांना गुरुजींचा एक पैलू प्रकाशात येताना दिसला. गुरुजींचे संपूर्ण जीवनच हळूहळू संघसमर्पित होत गेले. असे म्हणतात की, ’तुझे कार्यक्षेत्र नागपूरलाच आहे,’ असे त्यांच्या गुरूदेवांनी म्हणजे स्वामी अखंडानंदांनी त्यांना सूचित करून ठेवले होते. हिमालयात जाऊन एकांतात तपःसाधना करण्याचा मार्ग स्वामीजींनीच बंद करून टाकला होता. श्री अमिताभ महाराज या गुरुजींच्या गुरूबंधूंच्या निवेदनानुसार डॉ. हेडगेवार यांच्याबरोबर श्रीगुरुजींनी कामकरावे, असाच त्यांच्या सद्गुरूंचा आदेश होता. श्रीगुरुजींचे मोठेपण असे की, तो आदेश त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत पाळला. श्रीरामकृष्णांनी विवेकानंदांना अशाच प्रकारचा आदेश देऊन त्यांना समाजाभिमुख केले होते.
न त्वहमकामये राज्यम्, न स्वर्गमन पुनार्भवं!
कामये दुःख तप्तानामप्राणिनामआर्तिनाशनं!!
या भूमिकेत विवेकानंदांना त्यांच्या गुरुंनी आणून सोडले. स्वामी अखंडानंदांनी थोड्याफार फरकाने हेच कार्य श्रीगुरुजींच्या संदर्भात केले, याचा डॉक्टरजींना आनंद होता. स्वामी अमिताभ एके ठिकाणी म्हणतात, ’’सारगाछीच्या आश्रमात राहून गुरुजींनी अत्यंत परिश्रमपूर्वक व धैर्यपूर्वक साधना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गुरुजींच्या रूपाने एक नरेंद्रच नेतृत्वपदी लाभला आहे.’’
यानंतरच्या काळात डॉक्टर व गुरुजी यांच्यात नियमित चर्चा होत असत. त्या चर्चेतून डॉक्टर राष्ट्रासंबंधी सखोल व सर्वांगीण चिंतन गुरुजींसमोर मांडत. संघासारखी राष्ट्रव्यापी संघटना निर्माण करण्याची आवश्यकता का निर्माण झाली, याची मीमांसा करीत ते म्हणत, ’’भारताच्या पारतंत्र्यासाठी इतरांना दूषणे देत न बसता आपल्याच अवगुणामुळे आपला घात झाला, हे मान्य केले पाहिजे. राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव दूर करून उत्कट देशभक्तीचा संस्कार समाजावर घडविणे, ही मूलभूत राष्ट्रीय आवश्यकता आहे. दुसरे म्हणजे इंग्रजी सत्तेचा केवळ विरोध म्हणजे राष्ट्रभक्ती नव्हे. या राष्ट्राच्या स्वरूपाची भावात्मक कल्पना आपण लोकांच्या मनावर ठसविली पाहिजे. इंग्रज गेल्यानंतर आपल्या देशात बेशिस्त, स्वार्थीपणा व क्षुद्र कलह निर्माण होण्याची शक्यता अशा भावात्मक आदर्शवादाने उरणार नाही. तिसरे म्हणजे हिंदू संस्कृती हाच ज्याचा आत्मा आहे, असे आपले इतिहासप्रसिद्ध हिंदू राष्ट्र आहे. या राष्ट्रात हिंदू समाजाला निर्भयपणे गौरवाने आणि त्यांच्या सांस्कृतिक आदर्शांना अनुसरून राहता आले पाहिजे. हिंदू समाजाकडे कोणी वाकडा डोळा करून पाहणार नाही, एवढे आपण समर्थ झाले पाहिजे. त्यासाठी निर्दोष व सुसंघटित समाजाची निर्मिती करावी लागेल.’’
हे कसे साध्य करता येईल याची चर्चा करताना डॉक्टर म्हणाले, ’’असा सामर्थ्यशाली सुसंघटित व राष्ट्रभक्तीने रसरसलेला ध्येयवादी हिंदू समाज केवळ संघटनेतूनच निर्माण होईल. अशी संघटना उभारण्यासाठी निव्वळ भाषणबाजी, सभा वा ठराव यांचा उपयोग नाही तर राष्ट्रभक्तीचा दैनंदिन संस्कार करणारी शाखात्मक कार्यपद्धतीच उपयोगी पडू शकेल. शाखात्मक दैनंदिन कार्याविना संघ व संघटित समाजजीवन उभे करणे केवळ अशक्य आहे.’’ इतक्या साध्या व सोप्या शब्दांत डॅक्टरांनी संघाची सैद्धांतिक मांडणी केली. आपल्या ३३ वर्षांच्या नेतृत्वकाळात श्रीगुरुजींनी याच भूमिकेला तात्त्विक बैठक दिली. त्यांनी मंाडलेल्या सूत्रांचा विस्तार केला. त्यातून गुरुजींनी मांडलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला, संघमंत्र व स्वातंत्र्याला आकार मिळाला, असे दिसते. त्यांनी राष्ट्रवादाचा सांस्कृतिक आशय उलगडून दाखविला, या अर्थाने श्रीगुरुजी हे डॉक्टरांच्या चिंतनाचे भाष्यकार होते.
डॉक्टर व गुरुजी यांच्या ऋणानुबंधाची चर्चा करताना फेबु्रवारी १९३९ मध्ये सुरू झालेली दहा दिवसांची सिंदी येथील चिंतन बैठक मैलाचा दगड ठरेल, इतकी महत्त्वाची आहे. दररोज आठ तास ही बैठक चालत असे. रा. स्व. संघाची तात्त्विक भूमिका, शाखातंत्राची व्यावहारिक भूमिका आणि सध्याची राजकीय व सामाजिक स्थिती यांची सखोल व तपशीलवार चर्चा या बैठकीत झाली. या बैठकीतील गुरुजींच्या सहभागाकडे डॉक्टरांचे बारकाईने लक्ष होते. या चर्चेच्यावेळी एखाद्या विषयाच्या दोन्ही बाजू समजावून घेऊन व त्यातील बारकावे न्याहाळून प्रतिपादन करण्याची गुरुजींची हातोटी डॉक्टरांच्या नजरेतून सुटली नाही. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वातील समतोलपणा गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात, त्यांच्या मांडणीत व व्यवहारात दिसू लागला. भक्तीभावाने ज्या गोष्टीचे चिंतन करावे, तसे वळण आपोआप व्यक्तींच्या वृत्तीला व व्यवहाराला येत असते, याची अनुभूती डॉक्टरांना येत गेली व त्यांना समाधान वाटले. या बैठकीनंतर डॉक्टरांनी मोठ्या विश्वासाने गुरुजींची सरकार्यवाहपदी नियुक्ती केली.
डॉक्टरांच्या अंतिमकाळात गुरुजींनी त्यांची मनोभावे सेवाशुश्रूषा केली. अगदी स्वामी अखंडानंदांची केली तशी. डॉक्टरांना मृत्यू खुणावू लागला तसे ते म्हणाले, ‘‘माधवराव, आता लंबर पंक्चर करण्यापर्यंत वेळ आली आहे. मी यातून राहिलो तर आहेच. नाही तर यापुढे हे संघाचे कार्य तुम्ही सांभाळा.’’ गुरुजी म्हणाले, ’’डॉक्टर हे आपण काय सांगता आहात? यातून आपण लवकरच बरे व्हाल!’’ तेव्हा डॉक्टर एवढेच म्हणाले, ’’ते खरे आहे, पण मी सांगितले ते मात्र अवश्य लक्षात ठेवा.’’ गुरुजींचे यापुढील जीवन संघमय व कर्मयोगी असेच राहील, या विश्र्वासापोटीच डॉक्टरांनी सरसंघचालकपदाची जबाबदारी श्रीगुरुजींच्या समर्थ खांद्यावर टाकलेली दिसते.
९ जून १९४० रोजी नागपुरातील संघाच्या तृतीय वर्षासमोर डॉक्टरांचे अखेरचे भाषण झाले. त्यात ते म्हणाले, ’’संघाच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत सद्भाग्याचे आहे. आज माझ्यासमोर हिंदू-राष्ट्राचे छोटे स्वरूप मी पाहत आहे. जे करण्याच्या कृतनिश्र्चयाने तुम्ही येथे आलात, त्या कार्याच्या पूर्तीस्तवच तुम्ही स्वस्थानी जात आहात. जोपर्यंत शरीरात प्राण आहेत, तोपर्यंत संघाला विसरणार नाही, अशी प्रतिज्ञा करा. कोणत्याही मोहाने आपण विचलित होऊ नका. आसेतुहिमाचल पसरलेल्या हिंदू समाजाला आपल्याला संघटित करावयाचे आहे. महत्त्वाचे कार्यक्षेत्र संघाबाहेरच आहे. संघ केवळ स्वयंसेवकांपुरता मर्यादित नाही. संघाबाहेरील लोकांसाठीही संघ आहे. राष्ट्रोद्धाराचा खरा मार्ग समस्त हिंदूंना दाखवून देणे हे आपले कर्तव्य आहे. हा मार्ग आक्रमण करता करता असा एक सोन्याचा दिवस उगवेल की, ज्या दिवशी संपूर्ण हिंदुस्थान संघमय झालेला दिसेल.’’
डॉ. हेडगेवारांच्या चिंतनावर पुढील तेहेतीस वर्षे श्रीगुरुजींनी भाष्य केलेले दिसेल. डॉक्टरजींच्या दूरदृष्टीत दिसणारे संघाचे स्वरूप श्रीगुरुजींनी आपल्या कार्यकाळात व्यापक केले. त्याच्या चिंतनाला युगानुकूल आशय व अर्थ दिला आणि हे कार्य सर्वव्यापी व सर्वस्पर्शी करण्याचा प्रयत्न केला.
आता लेखाच्या या टप्प्यात श्रीगुरुजींच्या नजरेतून डॉक्टरजी कसे होते, हे आपण पाहणार आहोत. डॉक्टरजी आणि श्रीगुरुजी यांचा प्रत्यक्ष सहवास जेमतेमसात वर्षांचा होता, पण हा काळ दोघांच्याही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. ऐन तारुण्यात संन्यासदीक्षा व आध्यात्मिक जीवन की व्यावहारिक जीवन, असा पेच गुरुजींच्या मनात होता. फेब्रुवारी १९२९ साली लिहिलेल्या एका पत्रात श्रीगुरुजी लिहितात, ‘‘हिमालयात निघून जाण्यासंबंधीचा माझा पूर्वीचा विचार तितकासा निर्दोष नसावा. लौकिक जीवनात राहून जगरहाटीचा सारा व्याप सांभाळून व सहन करून तसेच सर्व कर्तव्ये ठीक पार पाडीत आपल्या रोमारोमांत सन्यस्त वृत्ती बाणविण्याचा प्रयत्न आता मी करीत आहे. मी आता हिमालयात जाणार नाही. हिमालय माझ्याकडे येईल. त्याची नीरव शांतता माझ्याच अंतरात राहील.’’ मग त्यांच्या मनात सारगाछी आश्रमात जाण्याचा विचार का आला असेल? पुढे एके ठिकाणी ते म्हणतात, ‘’स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाशी, उपदेशाशी किंवा कार्यपद्धतीशी माझे हे वर्तन सुसंगत आहे. माझ्यावर त्यांच्याइतका प्रभाव दुसर्या कोणत्याच विभूतीच्या जीवनाचा वा उपदेशाचा पडला नाही.’’ हे त्यांच्या मनातील अंतर्द्वंद्व त्यांच्या स्वतंत्र व परिणत प्रज्ञेची खूण आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे कंगोरे डॉक्टरांना पूर्ण माहीत होते.
श्रीगुरुजींच्या वागण्यात एक प्रकारचा स्वच्छंदीपणा होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र वृत्तीचे होते. कोणत्याही नियमांनी वा कोणाच्याही नियंत्रणाने त्यांचे जीवन बांधले गेले नव्हते. त्यांच्या जीवन व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणला तो डॉक्टरजींनी. गुरुजी एके ठिकाणी म्हणतात, ‘’माणसे पारखण्यात माझी वृत्ती चोखंदळ आहे. अगदी सुरुवातीला, एका वेगळ्या पद्धतीचे कार्य करणारे पुढारी या पलिकडे डॉक्टरांसंबंधी दुसरी भावना माझ्या मनात नव्हती, परंतु सततचा सहवास घडून येताच, सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागणार्या या पुरुषात असामान्य असे काही तरी आहे, असे मला दिसून आले. एकदमभडक रंगात न दिसणारे पण संथपणे व्यक्तीच्या वृत्तीत पालट घडविणारे असे डॉक्टरांचे असामान्य व प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वाने कोणाचेही हृदय अंकित करण्याची व त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे, हे मला जाणवले.
ऑगस्ट १९३६ मधील लाहोरच्या प्रवासात गुरुजी हे डॉक्टरांसोबत होते. त्यांच्या त्या सहवासावर भाष्य करताना गुरुजी म्हणतात, ‘‘या संपूर्ण प्रवासात माझ्या मनावर एक गोष्ट पूर्णपणे ठसली व ती म्हणजे लोकसंग्रह करण्यासाठी मनाचा समतोलपणा अगदी अवश्य हवा. दुसर्यांचे मन ओळखून एकाच वाक्यात थोडक्यात आपले तत्त्व त्यांना पटवून देणे आणि भिन्न भिन्न व्यक्तींचा विरोध नाहीसा करून त्यांना एका सूत्रात गुंफणे, ही योजकता डॉक्टरांमध्ये पूर्णपणे बसत आहे. म्हणून डॉक्टरांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यांसमोर नेहमी ठेवला पाहिजे.’’ या त्यांच्या उद्गारांतून डॉक्टरांबद्दल त्यांच्या मनात असलेला उत्कट भक्तीभावच दिसून येतो.
डॉक्टरांसंबंधी आपल्या मनात कोणत्या भावना आहेत, हे स्पष्ट करताना ते स्वामी विवेकानंदांची साक्ष काढतात. स्वामीजी आपल्या गुरुंबाबत- रामकृष्ण परमहंसांबाबत- आपल्या परदेशातील चाहत्यांना सांगत, ‘‘बाबांनो, तुम्ही माझे गोडवे गाता, मला मोठा म्हणता. मात्र कल्पना करा की, ज्यांची कृपा माझ्यावर झाली व ज्यांच्या पदधुळीचा एक कण मी स्वतःला समजतो, ते माझे गुरू श्री रामकृष्ण परमहंस किती मोठे असले पाहिजेत.’’ हे सांगून झाल्यावर गुरुजी म्हणत, ‘‘माझी डॉक्टरांसंबंधीची भावना हीच आहे.’’
डॉक्टरांच्या कार्यकौशल्याची उंची आणि माणसाचे जीवन अंतर्बाह्य बदलून टाकण्याचे त्यांचे असीमसामर्थ्य याचा उल्लेख करून गुरुजी विचारतात, ‘‘मला नवल वाटते की, ही किमया डॉक्टरांना साधली कशी? माणूस हेरून त्याला जवळ करणे आणि उत्तमोत्तम गुणांनी भरलेले त्याचे जीवन संघमय करून सोडणे, ही डॉक्टरांची क्षमता विलक्षण व आश्चर्यजनक आहे.’’
फेब्रुवारी १९३९ मध्ये सिंदी येथे १० दिवसांची संघाची जी चिंतन बैठक झाली, त्यातील एक निरीक्षण बोलके आहे. तसेच ते गुरुजींच्या मनात डॉक्टरांबद्दल जो विश्वास व असीमश्रद्धाभाव होता, तो अधोरेखित करणारे आहे. ते निरीक्षण संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पाजी जोशी यांनी नोंदवले आहे. या बैठकीच्या कामकाजात गुरुजींनी मनापासून भाग घेतला. न पटणार्या विचारांवरील त्यांचे हल्ले आवेशपूर्ण व धारदार असत, पण एकदा डॉक्टरांनी समालोचन करून निर्णय दिला की, ते शांत वृत्तीने अगदी मनापासून तो निर्णय स्वीकारीत.’’ याचे एक उदाहरण देताना आप्पाजी म्हणाले, ‘‘संघस्थानांवर स्वयंसेवकांनी ध्वजाला प्रणामकेल्यानंतर कोणाला प्रणामकरावा यासंबंधी पद्धती ठरविण्याचे कामसुरू होते. काही बाबतीत माझे मत व गुरुजींचे मत एकमेकांशी जुळत नव्हते. गुरुजींनी त्यांचे मत हिरीरीने व घटनात्मक संकेतांचा आधार देऊन मांडले. संघाच्या कौटुंबिक पद्धतीच्या रचनेनुसार कोणती पद्धत योग्य हे मी प्रतिपादन केले. अखेरीस डॉक्टरांनी विचारांती जो निर्णय दिला तो मला अनुकूल होता. गुरुजींचे मत अग्राह्य ठरले. मी गुरुजींच्या चेहर्याकडे अतिशय बारकाईने पाहत होतो. त्यांच्या चेहर्यावर नाराजीची एक छटाही मला दिसली नाही. पुढे बोलताना कटुता लेशमात्र डोकावली नाही.’’ डॉक्टर व गुरुजी यांच्यातील अंतरंग संबंध व भावबंध कसे होते, हे यावरून स्पष्ट होते.
डॉक्टरांच्या चरणी गुरुजींनी आपले जीवन का व कसे वाहिले याबद्दल बोलताना गुरुजी एका बैठकीत म्हणाले, ‘‘मी मोठा उच्च उडाणटप्पू! मग माझ्यावर संघाचा संस्कार कसा झाला? एकदा चुकून डॉक्टरांचे भाषण ऐकले. स्वतःच्या बुद्धीबद्दल मोठा अभिमान बाळगणारा मी! मला त्यात कोठे युक्तीवाद आढळला नाही. ऐतिहासिक दाखले नव्हते, तत्त्वज्ञान नव्हते, की मोठी प्रमेये नव्हती. डॉक्टर काय बोलले? ‘‘स्वयंसेवक बंधूंनो! कामकरा, निष्ठेने कामकरा, प्रेमाने कामकरा.’’ मी म्हटले, ‘‘ही तर पोपटपंची. यात काय विशेष आहे? तर काही नाही!’’ त्यामुळे त्याचे मोल वाटले नाही. विद्वान होतो ना त्यावेळी! आता मात्र ते सारे विसरलो. त्या भाषणात मला विद्वत्ता दिसली नाही. त्यातला ओलावा कोरड्या हृदयाला कसा कळणार? पण ते त्यांचे भाषण झिरपत गेले खरे. मी विद्वान तर डॉक्टरांच्या भाषणात तळमळ होती आणि ते झिरपले कसे? तर तत्त्वांसंबंधी विचार न करताच अधूनमधून त्यांच्या ज्या काही भेटी झाल्या, जो सहवास लाभला, त्याने काही तरी बदल घडला नि जीवनाला निश्चित वळण लागले!‘’ ते पुढे म्हणतात, ‘‘डॉक्टरांच्या त्या अंतःकरणाच्या विशालतेत शत्रूमित्र अशा सर्वांनाच स्थान होते. त्यामुळे प्रत्येक जण त्यात सापडायचा. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत संघ भरलेला असे. अशा प्रकारची मनाची अत्युत्कट अवस्था असणार्या त्यांच्या ज्ञानसंपन्न मौनातदेखील व्याख्यान असे. हवेतून अंतः करणात ठोके पडतात, असे वाटे.’’
डॉक्टरांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारा कार्यक्रमनागपूर येथे ३ जुलै १९४० रोजी झाला. त्यात द्वितीय सरसंघचालक या नात्याने श्रीगुरुजींनी जे भाषण केले, ते त्यांच्या व डॉक्टरजींच्या भावबंधावर प्रकाश टाकणारे आहे. ते म्हणाले, ‘‘आईने मुलावर प्रेमकरावे, तसे प्रेमत्यांनी आमच्यावर केले. केवळ निरपेक्ष वृत्तीची व्यक्तीच असे प्रेमकरू शकते.’’ हीच भावना यापूर्वी स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुंविषयी व्यक्त केली होती. खरे प्रेमकरावे तर रामकृष्णांनीच. त्यांच्याइतके प्रेममाझ्यावर कोणीही केले नाही. केवळ त्या प्रेमाच्या बळावर त्यांनी मला जिंकले. गुरुजी पुढे म्हणाले, ‘‘मातेचे वात्सल्य, पित्याची जबाबदारीची जाणीव आणि समर्थ अशा गुरुंचे ज्ञान देण्याचे सामर्थ्य या सार्यांचे एकत्रित दर्शन डॉक्टरांच्या ठायी होत होते. परस्परांशी कोणतेही नाते न मानणार्या या सर्वस्वी विस्कळीत अशा हिंदू समाजात, पत्थरातून मूर्ती घडवावी, तशा प्रकारे डॉक्टरांनी पंधरा वर्षांत एक लाख स्वयंसेवक संघाच्या छत्राखाली आणले. हेच त्यांच्या महापुरुषत्वाचे पुरेसे प्रमाण आहे. एक एक स्वयंसेवक जवळ करीत आणि त्यांची चिंता वाहत डॉक्टरांनी ही संघटना उभी केली.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘आपले वेगळेपण बाजूला ठेवून या संघरूपी विशाल समूहात पूर्णपणे विलीन होऊन जाणे, हाच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा खरा मार्ग आहे. त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करणे हेच त्यांचे खरे अनुसरण आहे.’’ ‘शिवो भूत्वा शिवम् यजेत्’ असं आपल्या शास्त्रग्रंथात म्हटले आहे. आपण स्वतः शिवरूप होऊन म्हणजे साक्षात परमेश्वराच्या पदवीवर पोहोचून त्यांचे पूजन करावे, तोच मार्ग इथेही आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सरसंघचालक पद म्हणजे डॉक्टरांनी माझ्यावर सोपवलेली फार मोठी जबाबदारी आहे. पण हे विक्रमादित्याचे सिंहासन आहे. एखाद्या गुराख्याचे पोर नाही. या सिंहासनावर बसवले तरी ते योग्य असाच न्याय देईल. आज या पदावर आरूढ होण्याचे काममाझ्यासारख्या एका सामान्य माणसाकडे आले आहे. पण डॉक्टर पाठीशी आहेत. ते माझ्याकडून हे कामयोग्य त्या प्रकारे करून घेतील.’’ शेवटी ते म्हणाले, ‘‘रा. स्व. संघ म्हणजे एक अभेद्य किल्ला आहे. डॉक्टरांनी बांधलेल्या या किल्ल्याच्या तटाला जे कोणी टक्कर देऊ पाहतील, ते स्वतःच जायबंदी होतील.’’
डॉक्टर हेडगेवार व श्रीगुरुजी यांच्यातील भावबंधाचा हृद्य आलेख हा असा आहे.
(संदर्भ ग्रंथ - १) डॉ. हेडगेवार - ना. ह. पालकर, २) केशव - संघनिर्माता - चं.प. भिशिकर, ३) तीन सरसंघचालक - डॉ. वि. रा. करंदीकर, ४) तेजाची आरती - ह. वि. दष्ट्ये, ५) श्रीगुरुजी - चं. प. भिशिकर, ६) गोळवलकर गुरुजी - रंगा हरी.)