विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018   
Total Views |





मेधाकाकू : अवंती... आता आपल्या या म्हणी आणि वाकप्रचारांच्या अभ्यासाला एक वर्ष पूर्ण झालय. या शेवटच्या तीन आठवड्यांमध्ये आपण काही खूप वेगळ्या लोकश्रुतींचा अभ्यास करणार आहोत. वेगळ्या म्हणायचे कारण असे की, वाचून याचा शब्दार्थ पटकन समजणार नाही. त्यासाठी या लोकश्रुती समजून घेऊन त्याचा सूक्ष्मार्थ आणि गुढार्थ जाणून घ्यावा लागेल. मला फारच आश्चर्य वाटते नेहमीच की, असा शब्दांचा खेळ दीड – दोन शतकांपूर्वी आपल्या चतुर मातृभाषा प्रेमींनी रचला आहे. आता हा वाकप्रचार बघ काही उमजतंय का ते...?


दुमात्री काना कौ.


अवंती : अरेच्या... मेधाकाकु काहीतरी फारच वेगळा आहे हा वाकप्रचार. सांग... सांग... सांग.. आता माझी उत्सुकता वाढली आहे. 


मेधाकाकू : हो.. हो... हो... समजतंय मला तुला इतकी उत्सुकता का वाटतीये. कारण सुरुवातीला माझेही असेच झाले होते. आता बघ... या तीन शब्दांत तीन व्यक्ती आहेत आणि आत्ताच्या Gossip या शब्दातली ही गंमत आहे. दोन गृहिणी दुपारी शिळोप्याच्या गप्पा मारत बसल्या आहेत. एकमेकींच्या कानाला लागून त्या बहुधा वाड्यात बाजूच्या बिऱ्हाडात रहायला आलेल्या नव्या विवाहिते बद्दल कानगोष्टी करतायत. कानगोष्टी करणाऱ्या या दोघी म्हणजे या वाक्प्रचारातील ‘क’ या अक्षरावरील दोन मात्रा (दुमात्री) आणि जिच्याबद्दल कानगोष्टी चालल्या आहेत ती म्हणजे ‘क’ अक्षरावर दिलेला काना. ’क’ वर दोन मात्र आणि एक काना दिला की होतो ‘कौ’. म्हणून आता तुझ्या लक्षात येईल या ‘दुमात्री काना कौ’ ची गंमत. असा हा शतकांपूर्वीचा शब्दांचा खेळ. खरे म्हणजे या शब्दांच्या खेळातून स्त्रियांच्या कान गोष्टी आणि त्या मागची स्त्रीसुलभ Gossip ची उत्सुकता इतकी समर्थपणे आपल्या मातृभाषेत मांडली गेली. एखादी गोष्ट आडवळणाने सांगायची कशी याचे, पर्यायोक्ती अलंकाराचे हे उत्तम उदाहरण.


अवंती : आता पुन्हा एकदा माझ्यासाठी अवाक होण्याची ही एक जागा. काय अफलातून आणि एकदम सही भाषा आणि त्यातली गंमत. मान लिया मेधाकाकू तुला. 


मेधाकाकू : अवंती... हे भाषेचे खेळ कितीतरी संदर्भ घेऊन येतात ते समजून घेणेही फार गमतीचे आहे. तुला आठवतंय ’र’ ची ‘ट’ ची भाषा, आपण सगळे लहानपणी बोलायचो. अजूनही कोणाला काळता कामा नये असे काही मित्र-मैत्रिणीला सांगायचे असेल तर आजही आपण अशी र ची भाषा वापरतो. दोन-चार वाक्य बोलताना. या निवडक वाक्प्रचारांचा मुळ उद्देश तसाच काहीसा असावा. आता हा वाकप्रचार फारच गंमतीचा आणि कष्टकरी कामगार वर्गात जास्त प्रचलित असलेला.


फुकट आणि तीन दम
मेधाकाकू : दगड फोडण्याचे अथवा असेच अंग मेहनतीचे काम झाले की दम घेण्यासाठी चार-सहा बाप्ये एकत्र बसत. अशा वेळी त्यांचा मुकादम तंबाखू ठासलेल्या दोन-तीन चिलीम शिलगावून त्यांच्या हातात देत असे. आणि मग प्रत्येक कामगाराची हीच धारणा असे. चिलीम फुकट मिळालीये मार तीन दम. चिलीम ओढताना साधारणपणे एक मोठ्ठा झुरका मारून ती शेजारच्याकडे दिली जाते. इथे मात्र फुकटची चिलीम  निदान तीन दम मारूनच हातावेगळी होते. काहीही फुकट मिळाले की, त्याचा दाम दुपटीने उपभोग घेण्याची प्रवृत्ती, या वाकप्रचारात नेमकेपणे सांगितली आहे.


अवंती : मेधाकाकू... तुला माहितीये का... आता माझे काय होणार आहे उद्यापासून. ? वाचलेला आणि ऐकलेला प्रत्येक शब्द, आता मी तपासून पहाणार आहे.. या अशा तीन चार शब्दांत किती चमत्कारिक अर्थ ठासून भरले आहेत. आता त्याची मजा मी सुद्धा घेणार आहे.


मेधाकाकू : व्वा... अवंती... आपल्या आभ्यासाचा तुझ्यावर असा परिणाम झाला असेल तर मला ही फार बरे वाटेल. नक्की... प्रत्येक शब्दांत नाही तरी समोर घडणाऱ्या प्रसंगात अथवा समोरच्याचे बोलणे ऐकण्यात चित्त आणि वृत्ती सावध असावी. असे करणे प्रयत्नपूर्वक जमतेच आता ही लोकश्रुती बाघ काय वेगळेच सांगून जाते...!!..



घटिका पाणी पिते आणि घड्याळ टोले खाते.

मेधाकाकू : इंग्रजांचे राज्य आल्यानंतर आपल्या देशात घड्याळ अवतरले. तोपर्यंत कालमापनासाठी वाळूचे घड्याळ आणि घाटिकापात्र यांचा उपयोग केला जाई. वाळूचे घड्याळ म्हणजे साधारण डमरूच्या आकाराच्या काचेच्या बाटलीत वाळू भरलेली असे आणि त्यातील वाळू खाली सरकली की पुन्हा ते भांडे उलटे करून ठेवावे लागे. घाटिकापात्र हे पितळी घंगाळीच्या आकाराचे भांडे असते आणि त्याच्या बुडाला एक भोक असते. हे भांडे पाणी भरलेल्या मोठ्या घंगाळात ठेवले जाते आणि तळावरील भोकातून यात पाणी शिरते आणि काही ठराविक वेळाने भांडे भरून खाली बुडू लागते. असे भांडे भरण्यासाठी लागणारा वेळ साठ पळे इतका असतो. साधारण चोवीस मिनिटे इतका हा वेळ. लग्नाचा मुहूर्त ठरला की लग्नाच्या दिवशी सूर्योदयाला असे घटिकापात्र पाण्यात टाकले जात असे आणि पळ आणि घटिका मोजून लग्नाचा मुहुर्त मिळत असे. त्या नंतर घटिकापात्र आणि घडयाळ अशा दोन्हीचा उपयोग संस्थानिकांच्या काळात सुरु झाला. जो पर्यंत टोल्याची घड्याळे आली नव्हती तो पर्यंत घटिका पात्र भरले की दर साठ पळ किंवा चोवीस मिनिटे झाल्यावर मोठ्या आणि जाड पितळी थाळीवर टोले दिले जाऊ लागले. यथावकाश, दर तासाला टोले देणारी घड्याळे इंग्लंड मधून आयात झाली आणि हि पितळी थाळीवर (इंग्लिश भाषेत GONG) टोले देण्याची पद्धत बंद झाली .मात्र या वाकप्रचाराचा संदर्भ फारच वेगळ्या ठिकाणी लावला गेला. घटिका पाणी पिते आणि घड्याळ टोले खाते. चोरी किंवा गुन्हा एकाने केला मात्र शिक्षा दुसऱ्यालाच झाली...अशा अर्थाने ही लोकश्रुती गेल्या शतकांत वापरली गेली. मी तुला नेहमीच सांगत आले आहे...की या लोकश्रुती आणि लोकोक्ती म्हणजे आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणारी पुस्तकेच...!!..


अवंती : आता तुझ्या पहिल्या वाक्याची चिंता वाटतीये मला की आता फक्त तीन आठवड्यांचाच अभ्यास शिल्लक आहे. वरची सगळी गंमत आहेच, पण मनात रुखरुख रहाणारे. 

- अरुण फडके
@@AUTHORINFO_V1@@