उन्हाळा तसा माझा नावडताच ऋतू. एप्रिल - मे मध्ये अंगाची नुसती काहिली होत असताना मला पुण्यात फिरणं नकोनकोसं होऊन जातं. पण पुण्यातल्या उन्हाळ्यालाही उः शाप असतो. फुलांचा सुंदर, रंगीत, देखणा उः शाप. सध्या पुण्यातल्या रस्त्यारस्त्यातून कितीक तऱ्हेचे वृक्ष फुली फुलून आलेत. भर दुपारी आपण पुण्यातल्या एखाद्या रस्त्यावरून शिणलेले पाय ओढत चालत असतो. उन्हाच्या तलखीने गळा सुकलेला असतो, डोळे चुरचुरत असतात, डोकं भणभणत असतं आणि अश्या वेळी अचानक गुलाबी फुलांनी नखशिखांत डवरलेलं एखादं झाड दिसतं आणि थंडगार उसाचा रस घटाघट प्याल्यागत मन शांत शांत होतं.
हिवाळा सरता - सरता कितीतरी वृक्षांना बहर येतो. आंब्याचा मोहोर तर माझा प्रचंड आवडता. नुकत्याच कढवलेल्या तुपाच्या रंगाच्या सोनेरी, नाजूक मंजिऱ्या काळपट हिरव्या पानांना मागे सारून धीटपणे पुढे येतात. सगळीकडे एक मंद - धुंद सुवास पसरतो. इवले इवले काळे भुंगे त्या मंजिऱ्यांच्या आगेमागे रुंजी घालतात आणि बघता बघता झाडाला गुंजेएवढी हिरवीगार फळे धरतात. त्यातली काही टिकतात, मोठी होतात, बरीचशी म्लान होऊन गळून पडतात. झाडाखाली मऊ पडलेल्या, पिवळ्या चिमुकल्या कैऱ्यांचा खच पडतो. जशा झाडावर उरलेल्या कैऱ्या मोठ्या होत जातात, तशा कुठूनकुठून खारी येतात त्या कैऱ्यांचा वास लागून. कैऱ्या मला एकदम माझ्या लहानपणीच्या गोव्यात घेऊन जातात. थोड्या कैऱ्या मोठ्या झाल्या की, गोव्यात दगड फेकून कच्च्या कैऱ्या पाडल्या जातात, आणि एकाघरचं मीठ, दुसऱ्या घरची मिरचीपूड, तिसऱ्या घरचं तेल घालून कैऱ्या कागदात दगडाने ठेचून चमचमीत करम बनवली जाते. आंबट तिखट अशी ती करम खाताना दात आंबतात, जीभ भाजते, पण खाणं काही कुणी सोडत नाही. आज इतकी वर्षं झाली तरी ती करम आठवली की माझी जीभ खवळतेच अजून!
आंब्याचा मोहोर तसा लक्ष न वेधून घेणारा, पण रंगांचा नखरा पहावा तो बहाव्याचा. पिवळ्या धमक, तेजस्वी फुलांनी लगडलेला बहावा बघतच रहावा इतका सुंदर वाटतो. लांबच लांब झुंबरांसारखी दिसणारी बहाव्याची फुले रस्त्याच्या कडेला ऊन पांघरून हेंदकाळताना पाहिली की, उन्हाळाचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. बहाव्याला इंग्रजीत लॅबर्नम असे नाव आहे आणि हिंदीत अमलताश. अमलताश हे नाव मला खूप आवडते. संस्कृतमध्ये म्हणजे बहाव्याला कर्णिकार असे नाव आहे. बहाव्याइतकाच झळझळीत दुसरा वृक्ष म्हणजे पळस. त्याच्या दाहक लाल-केशरी अग्निज्वालेसारख्या धगधदगीत फुलांमुळे पळसाला इंग्रजीत फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असे सार्थ नाव आहे. पण संस्कृत पलाश मध्ये जो गोडवा आहे तो दुसऱ्या कुठल्याच नावात नाही, त्यामानेने पळस हे नाव अगदीच गद्य वाटते. पळसाची फुलं पोपटाच्या चोचीसारखी बाकदार असतात. पांढऱ्या रंगाचे खोड आणि त्याला आलेला लाल-केशरी फुलांचा भरगच्चं बहर, ह्यामुळे पळस फार दुरून पण आपल्याला दिसतो. पळसाची फुले सुकवून पाण्यात उकळली की सुंदर केशरी रंग तयार होतो. होळीला मी अजूनही शक्य झालं तर आवर्जून पळसाच्या फुलांचा रंग बनवते.
साधारण पळसाच्या फुलांच्याच रंगांची पण किंचित फिकट फुले येणारा पुण्यात बऱ्याच ठिकाणी दिसणारा अजून एक वृक्ष म्हणजे काटेसावर. काटेसावरीची फुले गोल आकाराची साधारण बशीएवढी असतात आणि त्यांना खालच्या बाजूने गुलाबसर रंगाची छटा असते. संस्कृतमध्ये शाल्मली हे सुंदर नाव असणाऱ्या वृक्षाचं मराठीकरण करताना आपण काटेसावर हे रुक्ष नाव देऊन ह्या मोहक फुलांवर अन्याय केला आहे असं मला नेहमी वाटतं. इंग्रजीमध्ये सावरीच्या झाडाला सिल्क कॉटन ट्री असं म्हणतात. पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात एक सावरीचं प्रचंड मोठं झाड आहे. त्याच्या खाली सावरीच्या जाडसर पाकळ्यांचा उन्हाळ्यात नुसता खच पडलेला असतो.
ह्या लाल-गुलाबी उष्ण रंगाच्या अगदी विरुद्ध रंगछटेची फुलं असणारा वृक्ष म्हणजे निळ्या-जांभळ्या फुलांनी लगडलेला जॅकारंडा किंवा नीलमोहोर. नीलमोहोर हा तसा परदेशी पाहुणा. मूळ दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेला नीलमोहोर आता इथलाच झालाय. पुण्यातल्या कितीतरी रस्त्यांवर आता हा निळ्या फुलांचा भार अंगावर मिरवणारा जॅकारंडा दिसतो. कधी भर दुपारी एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावरून चालत असताना नीलमोहोराचा निळा-जांभळा सडा रस्त्यावर गालिच्यासारखा पसरलेला दिसला की त्यावरून चालत जाताना निळ्या मोरपिसांच्या गादीवरून नाजूक डौलदार पावलं टाकत जाणाऱ्या राजकन्येसारखं भारी वाटतं मला स्वतः लाच. नीलमोहोराचा बाहेर आर्जवी, हलकेच कानात कुजबुजणारा. त्याच्याच गुलमोहोर नावाच्या परदेशी भाऊबंदासारखा लक्षवेधी नव्हे.
उन्हाळ्याच्या ऐन भरात गुलमोहर फुलतो. लालभडक फुलांनी लगडलेला. प्रचंड मोठी खोडे आणि वाळून वाकड्या-तिकड्या झालेल्या चपट्या, तलवारीसारख्या दिसणाऱ्या शेंगा. पुणे विद्यापीठातल्या ऐलीस पार्क मध्ये तर गुलमोहराची दोन मोठ्ठी झाडे फुलांनी इतकी कचकचीत भरून गेलेली दिसतात की एक हिरवं पान दिसत नाही औषधालादेखील. डोक्यावर फक्त रक्तवर्णी मोहोराची जाळीदार छत्री आणि वर निरभ्र, कोऱ्या पाटीसारखे गडद निळे आकाश. पायाखालचा रस्ता गळून गेलेल्या पाकळ्यांनी लालबुंद झालेला असतो नुसता. त्यावरून चालताना वाटतं निसर्गाने केलेलं हे खरं 'रेड कार्पेट' स्वागत!
मुलं लहान होती तेव्हा आठवड्यातून दोन - तीन दिवस तरी मी त्यांना पुणे विद्यापीठात घेऊन जायचे. तिथल्या हिरवळीवर मुलं मनसोक्त बागडायचीं, तिथल्या भल्या-मोठ्या वटवृक्षांच्या पारंब्यामागे लपून लपंडाव खेळायचीं, तिथेच एक खूप म्हातारं जांभळीचं झाड आहे, त्याच्या खाली मऊ, गोड, पिकल्या जांभळांचा खच पडलेला असतो ह्या दिवसांत. ती जांभळं खाऊन त्यांच्या इवल्या जीभा मस्त निळ्या-जांभळ्या व्हायच्या. मुलं गुलमोहराच्या शेंगा गोळा करून शिवाजी-शिवाजी खेळायची. खरंच जे मुल लहानपणी गुलमोहराच्या शेंगांची तलवार करून शिवाजी-शिवाजी खेळलं नाही, ते मराठी मूलच नव्हे!
ह्या गडद रंगांच्या रंगपंचमीत कॅशिया उठून दिसतो तो त्याच्या सौम्य गुलाबी रंगामुळे. हाही वृक्ष पुण्याचा पाहुणा. ब्रह्मदेशातून आलेला. पण सध्या पुण्याच्या रस्तोरस्ती दिसतो. फिक्कट गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचं मिश्रण असलेल्या कॅशियाच्या फुलांना जलरंगात रंगवल्यासारखी अर्धपारदर्शकता असते. गुलमोहोराचा, बहाव्याचा लक्षवेधी रंग डोळ्यात ताजा ताजा असतानाच अवचित कुठेतरी कॅशियाचा सौम्य बहर दिसतो आणि उन्हाच्या भाजत्या झळा आपल्याही नकळत सौम्य होतात. ह्याच तऱ्हेच्या गुलाबी रंगांची फुले येणारा दुसरा वृक्ष म्हणजे टेबुबिया. हा ही परदेशी पाहुणा. दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेला. बंगळुरू मध्ये टेबुबिया रस्तोरस्ती दिसतो, पुण्यात त्यामानाने कमी. पण टेबुबिया जेव्हा पूर्ण बहरात असतो तेव्हा त्याचा दिमाख खरंच पाहण्याजोगा असतो. झाड पूर्ण फिक्कट गुलाबी रंगांच्या गुच्छांनी भरून गेलेलं असतं, आणि खाली कागदासारख्या फुलांचा सडा.
रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या रंगीत फुलांच्या मालिकेतली काहीशी दुर्लक्षित पण मला मनापासून आवडणारी फुलं म्हणजे बोगनवेलीची. तशी बोगनवेलीची फुलं वर्षभर आपल्याला कुठे ना कुठे दिसत असतात. त्यांना कसलाच वास नसतो पण रंगछटा मात्र इतक्या सुरेख आणि विविध की त्यांची नेमकी नावंही आपल्याला पटकन आठवणार नाहीत. बाकीच्या फुलांकडे लोक जातायेताना बघतात तरी, क्वचित कुणी फोटो काढतं, खाली पडलेलं एखादं पळसाचं, बहाव्याचं, चाफ्याचं फूल पटकन हातात धरलं जातं, पण बोगनवेलीच्या नशिबात मात्र ते भाग्य क्वचितच येतं, तरीही अपरंपार फुलांचा भार अंगावर घेऊन बोगनवेल आपल्याच मस्तीत उभी असते. बोगनवेलीचं आत्ममग्न सौंदर्य म्हणूनच मला खूप भावतं.