गेल्या ३-४ वर्षांपासून टी.व्ही. वरच्या वाहिन्यांपेक्षा यूट्यूबवरील वाहिन्यांमध्ये वाढ झाली आहे. टी.व्ही. वरील रटाळ १००० भागांची मालिका बघण्यापेक्षा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांना वेब सिरीज बघणं जास्त आवडायला लागलं आहे. आणि त्यामुळेच वेब सिरीजला अच्छे दिन आले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या वेब सिरीजनेच तर सुमीत व्यास, मानवी गर्गू, राजकुमार राव आणि मिथिला पालकर सारखे अत्यंत प्रतिभावान कलाकार या सिनेसृष्टीला दिले आहेत.
नुकतेच 'डिजिटल विकी अवॉर्डस्' झाले आणि या वेब सिरीजचं एक वेगळं जग निर्माण झालं आहे, हे ठळकपणे दिसून आलं. जसं झी टेली अवॉर्ड्स सारखे कार्यक्रम असतात, सिनेसृष्टीतील फिल्मफेअर आणि आयफा सारखे पुरस्कार कार्यक्रम असतात, तसेच आता समाज माध्यमांवर झळकणाऱ्या, वेब सिरीजच्या माध्यमातून लोकांच्या मोबाइलमध्ये आणि लपटॉपमध्ये घर करणाऱ्या कलाकारांना देखील त्यांच्या कामाची पोच पावती मिळालेली आहे.
या विकी अवॉर्डस् एक संदेश मात्र नक्की दिला, तो म्हणजे आजच्या काळात कला असेल तर कुठल्याही वाहिनीची, भांडवलाची वाट न बघता स्वत:च्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कला देखील सादर करु शकतो आणि त्या माध्यमातून उत्तम कमवू देखील शकतो. यासाठी आवश्यकता आहे समाज माध्यमांचे ज्ञान आणि कला या दोन गोष्टींची.
या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनय (महिला) या श्रेणीत निम्रत कौर आणि मानवी गर्गू यांनी बाजी मारली आहे. निम्रत कौरला आपण सगळ्यांनी एअर लिफ्ट या सिनेमाच्या माध्यमातून तर बघितलेच आहे, मात्र वेब सिरीजमध्ये देखील ती मोठे नाव कमावते आहे. मानवी गर्गू एक अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे. अनेक वर्षांआधी डिस्ने वाहिनीवर येणाऱ्या 'धूम मचाओ धूम' या लहान मुलांसाठी असलेल्या मालिकेतून ती प्रसिद्ध झाली होती. मात्र त्यानंतर टी.व्ही.एफ. या वेब चॅनलच्या माध्यमातून तिची कला सगळ्यांसमोर आली, आणि तिच्या 'ट्रिपलिंग' या वेब मालिकेला भरपूर प्रतिसादही मिळाला.
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) या गटात राजकुमार राव याने बाजी मारली आहे. सध्या सिनेसृष्टीत देखील अधिराज्य गाजवणारा राजकुमार राव अशाच वेब सिरीज मधून पुढे आला आहे. नुकत्याच आलेल्या न्यूटन आणि बरेली की बर्फी या चित्रपटामधील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली, मात्र त्याहूनही जास्त त्याची 'बोस : डेड / अलाईव्ह' ही वेब मालिका जास्त 'हिट' ठरली आहे.
सर्वोत्कृष्ट जोडी या श्रेणीत पुरस्कार मिळवणाऱ्या निधी आणि सुमीत व्यासचंही तसंच. तुम्हाला इंग्लिश विंग्लिश मधला तो पाकिस्तानी टॅक्सी चालक आठवतोय का, तोच हा सुमीत व्यास. मात्र त्याला प्रसिद्धी मिळाली ते 'परमनेंट रूममेट्स' या वेब मालिकेतील 'मिकेश' या अत्यंत विनोदी मात्र निरागस पात्रामुळे. निधीने देखील या वेब मालिकेत खूप उत्तम काम केले आहे.
एसआयटी या वेब वाहिनीच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली छवी मित्तल, मानसी पारेख यांच्या देखील वेब सिरीज खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्यांचा ज्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यांच्या वेब मालिकांमीधील एकेका भागाला लक्षावधी व्ह्यूज आहेत.
आज रटाळ मालिकांपेक्षा युवावर्गाला या वेब मालिका आवडत आहेत. सगळ्यांची लाडकी मिथिला पालकर याच वेब माध्यमांमधील 'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेब मालिकांमुळे प्रसिद्ध झाली.
वेब सिरीजमुळे सिनेसृष्टीत स्थिरावलेले कलाकार देखील या माध्यमांकडे वळताना दिसत आहेत. तसेच यामुळे त्यांच्या असलेल्या प्रतिष्ठेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. टिस्का चोप्रा, शमा सिंकदर, राजकुमार राव याची प्रमुख उदाहरणे आहेत. मात्र वेब मालिकांचा एक मोठा तोटा म्हणजे याला कुठल्याही प्रकारची सेंसोरशिप नाही, त्यामुळे अनेकदा अतिशय वाईट, प्रसंगी अश्लील प्रकारचा कंटेंट देखील जगापर्यंत पोहोचतो. यामध्ये रामगोपाल वर्मा, विक्रम भट्ट यांच्या अनेक वेब मालिका आणि लघुपट आहेत. या माध्यमाचा उचित वापर केला तरच याचा काही अर्थ आहे.
आज या वेब मालिकांसाठी वेगळे पुरस्कार सोहळे होत आहेत, त्यातील कलाकारांना प्रोत्साहन मिळत आहे आणि यामुळे अनेक उच्च दर्जाचे कलाकार सिनेसृष्टीला मिळत आहेत. मात्र वेब सरीजला अच्छे दिन येण्याचे खरे कारण माहितीये? ते आहे यामधील दर्शकांच्या मनाला भावण्याची क्षमता. आजही टी.व्ही. मालिका कट कारस्थानं आणि मेलोड्रामा यातून बाहेर आलेल्या नाहीत. मात्र इथे तसं नाहीये. तुमच्या आमच्या आयुष्यातलं खरं काही तरी. तुमच्या आमच्या आयुष्यातील काही गोष्टींना, भावनांना स्पर्श करणाऱ्या या मालिका आहेत.
एसआयटी मधील एकमेकांशी छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणारं कपल आपल्याला आपल्याच घरातलं वाटतं, तनु आणि मिकेश (परमनेंट रूममेट्स) आपल्याला आपल्यातीलच एक व्यक्ती वाटतात. बीवी को गुस्सा क्यूँ आता है, यामधील नवरा बायको म्हणजे आपणच आहोत का हा प्रश्न पडतो, गर्ल इन द सिटी मधील मीरा सेहगल असू देत नाहीतर लिटील थिंग्स मधली काव्या कुलकर्णी ही आपल्यातलीच एक वाटते. आणि म्हणून आज या कलाकारांना आणि त्यांच्या वाहिन्यांना दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
तात्काळ एका क्लिकवर उपलब्ध या वेब सीरीज नक्कीच एक उत्तम कंटेंट जगापर्यंत पोहोचवतायेत. त्यामुळे त्यांचे अच्छे दिन आणखी अनेक वर्ष टिकावे आणि अशाच उत्तमोत्तम कलाकृती आपल्याला बघायला मिळत रहाव्यात हीच सामान्य प्रेक्षकाची इच्छा आहे.
- निहारिका पोळ