सामान्यातील असामान्य!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2018   
Total Views |
 
 
 
बाळा तंगू जगताप हे सकृतदर्शनी चमत्कारिक वाटणारे नाव कोणा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव नाही. त्यामुळे त्यांच्या निधनाची चार ओळींची बातमी वृत्तपत्रात येण्याची सुतराम शक्यता नाही. हा माणूस राजकारणी नाही. सामाजिक कार्यकर्ता वा सेलेब्रिटी नाही. मग कोण आहेत हे बाळा तंगू जगताप?
 
१९४५ च्या सुमारास जेमतेम पंधरा वर्षांचा एक मिसरुड न फुटलेला युवक पोटापाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथे आला. हे गाव साखर कारखान्यासाठी व टॉफीसाठी प्रसिद्ध होते. या गावात आलेला आणि ‘प्रल्हाद’ या टोपणनावाने ज्ञात असलेला हा युवक कारखान्याच्या ऑफीसमध्ये प्यून म्हणून नोकरीला चिकटला. पुढे त्याची हुशारी पाहून त्याला पिठाच्या गिरणीत वसुलीचे काम देण्यात आले. नोकरीला लागला तेव्हा तो जेमतेम सातवीपर्यंत-म्हणजे तेव्हाची व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिकला होता. याच काळात तो रा. स्व. संघाच्या संपर्कात आला व स्थानिक संघशाखेत जाऊ लागला. गावातील अनेक स्वयंसेवकांच्या घरी त्याची उठबस सुरु झाली. या गावात तसे काँग्रेसचे प्राबल्य होते. पण, त्या काळातील एकूणच वातावरण सौहार्दाचं व सहिष्णुतेचे असल्यामुळे संघ शाखाही तेथे भरभराटीला आली होती.
 
त्या शाखेत हा तरतरीत व उत्साही तरुण जाऊ लागला व त्याच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले. माझे वडील संघाचे बालपणापासून स्वयंसेवक तेही कारखान्यात नोकरीला होते. बेतासबेत परिस्थिती असूनही आमच्या घरी पु.भा.भावे यांचा ‘साप्ताहिक आदेश’, ‘साप्ताहिक विवेक’ व ‘केसरी’ ही वृत्तपत्रे येत असत. दर रविवारी शाखा सुटल्यावर या वृत्तपत्रांचे सामुदायिक वाचन होत असे. त्यात प्रल्हादचा सहभाग असायचा त्याला वाचनाची व त्यावर चर्चा करण्याची आवड होती. अनेक घरातून त्याचा उत्तम संपर्क होता. गोरापान, उंचनिंच आणि पिळदार शरीरयष्टीचा हा युवक त्या लहानशा गावात लवकरच लोकप्रिय झाला!
 
प्रल्हाद हा एक अस्वस्थ आत्मा होता. ‘जिद्द’ व शिक्षणाविषयी प्रेम त्याच्या नसानसात भिनलेले होते. त्यामुळे चिकाटीने अभ्यास करुन तो मॅट्रिकची परीक्षा बहिस्थ विद्यार्थी म्हणून उत्तीर्ण झाला. शिक्षणशास्त्राचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमपूर्ण करुन तो गिरणीतून बाहेर पडला व रावळगावच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला. प्रगतीची पहिली पायरी त्याने पार केली.
 
लवकरच उत्तम व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून तो नावारुपाला आला. आता त्याचे ‘प्रल्हाद’ हे टोपणनाव गळून पडले व आपले मूळचे नाव तो अभिमानाने मिरवू लागला. संघशाखेमुळे कबड्डी, खोखो, आट्यापाट्या या खेळांत तो तरबेज झाला. शाखेतील बौद्धिकांमुळे त्याची वैचारिक जडणघडणही होत गेली. प्राथमिक शाळेत शिकवता शिकवता ते स्वत: शिकत राहिले. हिंदीच्या एकामागून एक परीक्षा ते देत गेले. अगदी राष्ट्रभाषा कोविद या बी. ए. च्या समकस परीक्षेपर्यंत त्यांनी उत्तम यश मिळविले. जोडीला गणित, इतिहास-भूगोल व मराठी शिकविण्यातही त्यांचा हातखंडा होता. हिंदीवर त्यांनी असामान्य प्रभुत्व मिळविले. त्यांचे हिंदी भाषेचा लहेजा सांभाळत अस्खलित बोलणे ऐकत राहावे असे होते. याच काळांत चौथी व सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी, विद्यार्थ्यांना तयार करणे, ही त्यांची ख्याती होती. त्यांचा लौकिक असा की, ग्रामीण भागातील निम्म्यापेक्षा अधिक शिष्यवृत्त्या ते रावळगावात खेचून आणीत. असे शेकडो स्कॉलर्स त्यांनी तयार केले. होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना ते विनाशुल्क शिकवीत. घरातील सामान्य परिस्थितीमुळे मी त्यांचा नादार विद्यार्थी होतो आणि स्कॉलरही होतो!
 
वाचन आणि अध्ययन हा सरांचा श्वास होता. पुढे ते बी. ए., झाले. हिंदी विषयात ऑनर्स मिळविला. शिक्षणशास्त्रातील बी. एड् ही पदवी त्यांनी संपादित केली. पण, त्यांची ज्ञानलालसा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी प्रथम श्रेणीत एम.ए.ची पदवी संपादन केली व शिक्षण शास्त्रातील सर्वोच्च पदवी एम. एड् त्यांनी गाठीला बांधली. प्राथमिक शाळेतून हायस्कूलमध्ये दाखल झाल्या नंतरची त्यांची ही गरुडझेप होती. शाळेत शिकवायचे आणि घरात शिकायचे असा हा सिलसिला अनेक वर्षे सुरु होता. या सर्व काळात संघशाखा, ग्रंथालयातील वाचन व मैदानावरील खेळ यात कधीच खंड पडला नाही, हे विशेष. त्यांची शिकवण्याची हातोटी इतकी उत्तमकी, कडक शिस्तीचे असूनही आम्हा विद्यार्थ्यांचे ते लाडके सर होते. प्रगतीच्या आलेखात पुढे ते शाळेचे पर्यवेक्षक व शेवटची सात-आठ वर्षे मुख्याध्यापक झाले व त्यांनी शाळा नावारुपास आणली. ‘ऑफीस बॉय ते मुख्याध्यापक’ असा हा थक्क करणारा त्यांचा प्रेरणादायी प्रवास होता.
 
पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे ते सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक नामवंत साहित्यिक व वक्ते रावळगावात व्याख्यानासाठी येऊन गेले. वाचनाच्या गोडीमुळे ते तेथील ग्रंथालयाच्या व्यवस्थापनातही सक्रीय होते. मानद ग्रंथपाल म्हणून त्यांनी अनेक वर्षे कार्य केले. ग्रंथालय समृद्ध केले. विद्यार्थ्यांना व नागरिकांना वाचनाची गोडी लावली. चोखंदळ वाचक व अभ्यासू वक्ते म्हणून ते सर्वश्रुत होते. गणेशोत्सव, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन यातही त्यांचा सहभाग लक्षणीय होता. एकूणच रावळगावचे सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यात सरांचा मोठा वाटा होता. आपल्या प्रभावी शिकवण्यातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविल्या. ‘जगताप सर’ हा रावळगावातील परवलीचा शब्द होता. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी रावळगाव एज्युकेशन सोसायटीच्या कामात लक्ष घातले. कार्यवाह या नात्याने संस्थेच्या कार्याला उत्तम वळण दिले. ‘कामातील बदल हीच विश्रांती’ हे त्यांचे ब्रीद होते.
 
पंचाहत्तरीनंतर सर नवी मुंबई येथे मुख्याध्यापिका असलेल्या आपल्या लेकीकडे योगिनी पोतदारकडे राहावयास आले. पण, तेथेही ते स्वस्थ बसले नाहीत. आता ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यात लक्ष घालू लागले. त्यांच्या कार्यालयातील ग्रंथालयाची धुरा त्यांनी सांभाळली. निरनिराळ्या कार्यक्रमांचे, व्याख्यानांचे आयोजन करुन समाजप्रबोधनाचे कार्य ते शांतपणे व निरलसपणे करीत राहिले. एक सामान्य व्यक्ती अफाट जिद्दीच्या व ज्ञानलालसेच्या जोरावर अनामिक राहून किती असामान्य होऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे जगताप सर... ते केवळ शिक्षकचं नव्हते, तर समाजशिक्षकही होते!
 
व्यक्तिश: माझ्या आणि आम्हा चारही भावांच्या जडणघडणीत सरांचा मोठा वाटा राहिला आहे. प्राथमिक शाळेत ते माझे इयत्ता सहावीला वर्गशिक्षक होते, तर पुढे अकरावीला त्यांनी मला अंकगणित व हिंदी असे परस्पर विरोधी विषय शिकविले. त्यांच्यामुळेच आम्ही भावंडे ‘स्कॉलर’ झालो. शाखेतील त्यांच्या सहवासामुळे माझी वैचारिक जडणघडण झाली व ग्रंथालयामुळे उत्तमोत्तमग्रंथ वाचनात आले. त्यांच्याशी गप्पा मारणे हा आमच्या बौद्धिक आनंदाचा विषय होता. हा अनुभव माझाच नव्हे, तर शेकडो विद्यार्थ्यांचा होता.
 
त्यांच्या संबंधातील दोन संस्मरणीय आठवणी सांगून या लेखाचा समारोप करतो. ‘‘नवी मुंबईचा ज्येष्ठ नागरिक संघ फारसे मानधन देऊ शकणार नाही,’’ असे ते बोलून गेले. तेव्हा, ‘‘तुमच्याविषयी कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी मी येणार आहे. मानधनाचा विचारही मनात आणू नका,‘’ असे मी त्यांना म्हणालो. त्यांनी व्याख्यानाआधी माझा अतिशय हृदय असा परिचय करुन दिला. त्यामुळे मी खूपच भाराहून गेलो. माझे डोळेही पाणावले. त्यांच्या प्रत्येक शब्दात कौतुकाचे भास मला जाणवत होते. माझ्या लेखी तो सोन्याचा दिवस होता.
 
पुढे माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही वर्षे आम्ही प्रतिवर्षी व्याख्यान आयोजित करीत होतो. त्याच व्याख्यानात संशोधन कार्यासाठी आम्ही एखाद्या संस्थेला कृतज्ञता निधी देत होतो. एके वर्षी आम्ही सर्व भावडांनी या कार्यक्रमाला जगताप सरांचा प्रकट सत्कार करण्याचे ठरविले. मात्र, त्यांना तशी पूर्ण कल्पना दिली नाही. कारण, ते तशा परिस्थितीत कार्यक्रमालाच आले नसते! त्यांना काहीही न सांगता त्यांना आम्ही कार्यक्रमाच्या स्थानी आणले. त्यांचा मी सविस्तर परिचय करुन दिला व त्या व्याख्यानाचे महनीय व्याख्याते शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. द. ना. धनागरे यांच्या हस्ते सरांचा यथोचित सन्मान केला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व अकरा हजार एकशे अकरा (११, १११/-) गुरुदक्षिणा असे त्या सन्मानाचे स्वरुप होते. सर भारावून गेले होते. माझ्या वडिलांच्या प्रतिमेला त्यांनी प्रणामकेला. माझी आईही त्या कार्यक्रमास उपस्थित होती. आश्र्चर्य म्हणजे, स्वत: डॉ. धनागरे व्यासपीठावरुन खाली उतरले आणि त्यांनी माझ्या आईला व सरांना वाकून नमस्कार केला!
 
आमच्या दृष्टीने तो कार्यक्रम संपला होता. पण, सर नेहमीप्रमाणे आमच्यापेक्षा सवाई निघाले. पुढे दोन आठवड्यानंतर सरांचे एक पाकीट पोस्टाने आले. त्यात एक चेक व पत्र होते. आम्ही त्यांना जी कृतज्ञतापूर्वक गुरुदक्षिणा दिली होती, त्यात एक हजार एक रुपयांची भर टाकून त्यांनी तो चेक पाठविला होता. पत्रात त्यांनी लिहिले- ‘‘तुमचे वडील हनुमंतराव हे माझे जिवाभावाचे मित्र होते. त्यांच्यामुळे मला रा. स्व. संघाचा परिसस्पर्श झाला व वडील भावाचे प्रेम मिळाले. माझे जीवन उजळून गेले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तुम्ही जे समाजकार्य करीत आहात, त्यात फूल ना फुलाची पाकळी म्हणून माझे हे अल्पशे योगदान समजावे. माझ्या मनातील कृतज्ञ भाव तुम्ही समजून घ्याल असा विश्वास वाटतो.’’ अशी अनासक्त व निस्पृह माणसे आमच्या जीवनात आली व प्रेरणा देऊन गेली, हे आमचे भाग्यं!
 
असा निगर्वी, निर्लोभी आत्मविलोपी व सात्विक वृत्तीचा माणूस खरोखरच विरळा. समाजात आदर्श नाहीत, आयकॉन नाहीत असे कसे म्हणावे? शोधायला दृष्टी मात्र हवी. ती संघसंस्कारांची कृपा आयुष्यभर विद्यार्थीवृत्तीने जगणार्‍या या निष्ठावंत शिक्षकाला व ध्येयनिष्ठ स्वयंसेवकाला विनम्र श्रद्धांजली !
 
 
 

प्रा. श्याम अत्रे (९३२४३६५९१०)
 
@@AUTHORINFO_V1@@