प्रखर हिंदुत्ववादी, हिंदू संघटक, शेकडो क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना आपण ओळखतो. जुलमी ब्रिटीश सत्तेला आव्हान देत देशाबाहेर घालवून देण्यासाठी सिद्ध झालेले महानायक म्हणजे वि. दा. सावरकर. स्वातंत्र्याकांक्षेसह आपल्या हिंदू समाजाने एकत्र यावे, आपल्यातील भेद मिटवून एक समाज म्हणून उभे राहावे, यासाठीही सावरकरांनी कार्य केले. आज स्वा. सावरकरांच्या पुण्यातिथीदिनी त्यांच्या हिंदुत्व, हिंदुराष्ट्रासंबंधीच्या विचारांची माहिती देणारा हा लेख...
नुकतेच माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांनी देशात हिंदुत्व ही कल्पना राबविणे योग्य नाही. अल्पसंख्याकांची लोकसंख्या २० टक्के असून ती १५ वर्षांत ३० ते ३५ टकक्यांपर्यंत जाईल. त्यामुळे केवळ हिंदूंच्या दृष्टिकोनातून कारभार चालविला, तर देश टिकणार नाही. धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवणे हे देशाला घातक आहे, असे विचार व्यक्त केले. आता त्यांचा सावरकरांच्या हिंदुत्वावर आक्षेप आहे की नाही, ते यातून स्पष्ट होत नाही, कारण हिंदुत्वाची छंदोबद्ध व्याख्या जरी सावरकरांनी रचून तो शब्द प्रचलित केलेला असला तरी सर्वप्रथमबंगाली साहित्यिक चंद्रहास बसू यांनी ’हिंदुत्व’ हा शब्द त्यांच्या ’हिंदुत्व’ (१८९२) या ग्रंथात उपयोगात आणला होता. त्यानंतर टिळक व आगरकरांनीसुद्धा अनुक्रमे ’केसरी’ व ’सुधारक’मधील लेखात ’हिंदुत्व’ या शब्दाचा उपयोग केला होता. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, काही राजकीय पक्षही वेळोवेळी ’हिंदुत्व’ शब्दाचा उच्चार करत असतात, पण सावरकरांव्यतिरिक्त कोणीही त्यावर सखोल विवेचन केलेले दिसून येत नाही. चला तर मग सावरकर पुण्यतिथीनिमित्ताने सावरकरांचे हिंदुत्व व हिंदूराष्ट्र यावरील विचार जाणून घेऊ व खरंच ते देशाला घातक आहेत की नाही तेही पाहू.
हिंदू शब्दांची व्याख्या :-
|| आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका |
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ||
अर्थः भारत ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू.
पितृभू म्हणजे केवळ वडिलांची भूमी नव्हे. पितृभू म्हणजे पितर किंवा वाड-वडिलांची भूमी, यात आई-वडील, आजी-आजोबा या सगळ्या पितरांचा समावेश होतो. म्हणून मातृभू ऐवजी पितृभू शब्द योजिला आहे. सावरकरांचा मूळ ग्रंथ इंग्रजीमध्ये आहे. त्यात त्यांनी पितृभूला समानार्थी म्हणून ‘ऋरींहशीश्ररपव’ शब्द उपयोगात आणलाय; कारण ’पितर’ला समर्पक इंग्रजी शब्द तोच आहे.
’पुण्यभू’ हा शब्द म्हणे सावरकरांनी मुस्लिमांना वगळण्यासाठी योजिला आहे, असा काहींचा आक्षेप आहे. मुळात हिंदुत्व ही हिंदू कोण?ची व्याख्या आहे. मग त्यात मुसलमानांना वगळण्याचा प्रश्न येतोच कुठे? त्यांना वगळलं नाही तर ते वगळले जात आहेत व मुसलमानही आम्हाला हिंदुत्वात समाविष्ट करून घ्या, असे म्हणत नाहीत, कारण ती भारतीय नागरिकत्वाची किंवा देशभक्तीची व्याख्या नाही. हिंदुत्वाच्या कक्षेत न येणारे मुसलमान व इतर अहिंदू भारतीय नागरिक व देशभक्त आहेत. ते हिंदू नाहीत पण भारतीय आहेत. बरं, फक्त मुसलमान वगळले गेलेत का? तर नाही. ख्रिश्चन, पारशी व ज्यू हेही वगळले गेलेत. तसेच समाजशास्त्रीय व्याख्या कधीही काटेकोर नसते. त्याला अपवाद असतातच, पण अपवाद म्हणजे नियमनव्हे. त्यामुळे ज्यांची पुण्यभूमी या देशात नाही, ते हिंदू नाहीत इतकंच सावरकरांना म्हणायचे आहे, मुसलमानांना किंवा अहिंदूंना सावरकरांनी नागरिकत्व नाकारलेले नाही किंवा ते देशभक्त नाहीत, असेही सावरकर कुठे म्हणालेले नाहीत. (उलट ते अशी आशा व्यक्त करतात की, पुढे भविष्यात असा एक काळ येईल की हिंदू म्हणजे केवळ या देशाचा नागरिक इतकाच अर्थबोध होईल.) इंग्लंड-अमेरिकेत स्थायिक झालेले हिंदू त्या त्या देशाचे नागरिक होऊ शकतात. भारताबाहेर स्थायिक झालेली हिंदू कुटुंबातील दुसर्या, तिसर्या पिढीतील मुले, त्यांचे वडील जरी भारताबाहेर जन्मले तरी त्यांच्या वाडवडिलांची भूमी भारत असल्यामुळे ते हिंदूच ठरतात. हिंदू कोड बिल ज्यांना लागू आहे तेच सर्व सावरकरांच्या व्याख्येनुसार हिंदू ठरतात. म्हणजे सावरकरांचे नाव न घेता नकळतपणे हिंदुत्वाची व्याख्या घटनेला अनुरूप आहे. सावरकरांची व्याख्या अव्याप्ती आणि अतिव्याप्तीच्या दोषापासून मुक्त आहे.
हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म किंवा कळपर्वीळीा नव्हे. हिंदुत्व ही धार्मिक किंवा आध्यात्मिक संकल्पना नाही. हिंदुत्व ही एक ऐहिक, राजकीय व सामाजिक संकल्पना आहे, याला सावरकरांनीच कळपर्वी झेश्रळींू हा समर्पक इंग्रजी शब्द सुचवला आहे. हिंदुत्व म्हणजे इंग्रजीमध्ये ’कळपर्वीपशीी’ किंवा मराठीत ’हिंदूपणा.’ हिंदुत्व ही एक डेलळर-झेश्रळींळलरश्र संकल्पना आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर हिंदूंच्या न्याय्य व नागरी अधिकारांचे संरक्षण म्हणजे हिंदुत्व. फक्त हिंदूंच्याच न्याय्य व नागरी अधिकारांचे संरक्षण करा, असे सावरकर कधीही म्हणालेले नाहीत. तसेच उद्या भारतात अल्पसंख्याक वाढले काय किंवा न वाढले काय भारतीय नागरिकांच्या न्याय्य व नागरी अधिकारांचे संरक्षण करणे घटनेनुसार आवश्यकच आहे, कारण हिंदू या देशाचे नागरिक आहेत. तसेच हिंदुत्व (म्हणजे हिंदूंच्या न्याय्य व नागरी अधिकारांचे संरक्षण) राबविणे अयोग्य नसून ते शासनाचे घटनेने सांगितलेले कर्तव्यच आहे. त्याचा अल्पसंख्याकांच्या लोकसंख्या वाढीशी काहीही संबंध नाही. आता आपण सावरकरांच्या हिंदूराष्ट्राकडे वळूया
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या २१ व्या कोलकाता अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात सावरकर म्हणतात, ’’हिंदू संघटनवादी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार सर्व नागरिकांना समान अधिकार नि कर्तव्ये राहतील. मग त्यांची जात, पंथ, वंश वा धर्म कोणतेही असोत मात्र त्यांनी या हिंदुस्थानच्या राज्याशी पूर्णपणे एकनिष्ठ आणि कृतज्ञ राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. भाषण, विचार, धर्म नि संघ इत्यादी संबंधीचे स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना सारखेच उपभोगता येतील. हिंदुस्थानची भावी राज्यघटना या व्यापक तत्त्वांवर आधारण्यात येईल....सामान्य हिंदी राष्ट्राच्या वाढीशी हिंदू राष्ट्राची कल्पना कोणत्याही प्रकारे विसंगत नाही.’’ तर १९ व्या कर्णावती अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणतात, ’’हिंदी राज्य मात्र, निर्भेळ हिंदीच असू द्या. त्या राज्याने मताधिकार नोकर्या, अधिकाराची स्थाने, कर यांच्या संबंधात धर्माच्या नि जातीच्या तत्त्वांवर कसल्याही मत्सरोत्तेजक भेदाभेदांना मुळीच थारा देऊ नये. कोणताही मनुष्य हिंदू आहे की मुसलमान आहे की ख्रिस्ती आहे की ज्यू आहे, इकडे लक्षच दिले जाऊ नये. त्या हिंदी राज्यातील सर्व नागरिक सर्वसामान्य लोकसंख्येतील त्यांची धार्मिक किंवा जातीय शेकडेवारी विचारात घेतली न जाता त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक गुणावगुणानुसार वागविले जाऊ द्यात....कोणतीही जाती किंवा पंथ, वंश किंवा धर्म विचारात न घेता एक मनुष्य एक मत असा सर्वसामान्य नियमहोऊ द्या. अशा स्वरूपाचे हिंदी राज्य जर दृष्टीपुढे धरावयाचे असेल तर हिंदू संघटनवादी स्वतः हिंदू-संघटनांच्याच हितार्थ त्या राज्याला अंतःकरणपूर्वक पाहिल्याने आपली निष्ठा अर्पितील. मी स्वतः व मजप्रमाणेच सहस्रो ’हिंदुमहासभा’वाले यांनी आपल्या राजकीय चरिताच्या प्रारंभापासून अशा हिंदी राज्याचा आदर्श आमचे राजकीय साध्य म्हणून सतत दृष्टीपुढे ठेविलेला आहे आणि आमच्या जीविताच्या अंतापर्यंत त्याच्या परिपूर्तीकरताच संघर्ष करणे आम्ही चालूच ठेवणार.’’ म्हणजे सावरकरांनी धर्म, वंश, जात, पंथ यावरून भेदभाव केला जाणार नाही, असे सांगून सर्व मानव एकसमान म्हणजे मानवतेचा पुरस्कार केला आहे......हिंदी नागरिक या नात्याने प्राप्तव्य असेल त्याहून काहीही अधिक हिंदू मागत नाही......आम्ही हिंदू या देशात यद्यपि प्रचंड बहुसंख्येने आहोत; तथापि हिंदूजगतासाठी म्हणून आम्ही कोणतेही विशेषाधिकार मागत नाही. म्हणजे सावरकर बहुसंख्याकांना जे अधिकार मागत होते तेच अल्पसंख्याकांना देत होते, कोणालाही संख्याबळानुसार विशेषाधिकार देत नव्हते व काढूनही घेत नव्हते.
’अल्पसंख्याकांचा धर्म, संस्कृती नि भाषा त्यांच्या संरक्षणाची हमी आम्ही त्यांना केव्हाही देऊ, पण तद्वतच आपलाही धर्म, संस्कृती नि भाषा रक्षिण्याच्या हिंदूंच्या समान स्वातंत्र्यावर त्यांचे होणारे कोणतेही अतिक्रमण आम्ही यापुढे सहन करणार नाही. जर अहिंदू अल्पसंख्याकांचे रक्षण व्हावयाला पाहिजे तर हिंदुस्थानातील कोणत्याही अतिक्रामक अल्पसंख्याकांपासून बहुसंख्य हिंदूंचेही रक्षण निश्चितपणे झालेच पाहिजे. सर्व धर्माच्या लोकांना धर्मपालन व धर्मसंरक्षण करायचा अधिकार दिला आहे. आता सांगा सावरकरांची हिंदूराष्ट्र संकल्पना धर्मनिरपेक्ष किंवा इहवादी भारतीय राज्यघटनेच्या/संविधानाच्या विसंगत नाही तर मग सावरकरांचे हिंदुत्व/हिंदूराष्ट्र कसे काय देशाला घातक ठरेल? भारतीय राज्यघटना व सावरकरांनी वर्णिलेले हिंदूराष्ट्र यात कायदेशीरदृष्ट्या काय फ़रक आहे? आमच्या स्वप्नातील हिंदू राष्ट्राचे निर्बंध वेगळे असतील, असे सावरकर कधीही म्हणाले नाहीत. कारण आजचा भारत व भारताचे संविधान हेच सावरकरांचे हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची आवश्यकताच नाही, केवळ आहे त्या नियमांची कोणाचाही अनुनय न करता योग्य व न्याय्य अंमलबजावणी व्हावी इतकीच अपेक्षा आहे. तसेच सावरकरांचा ’भारत’ शब्दालाही आक्षेप नाही, जसे भारताला हिंदुस्थान व खपवळर या इतर नावानेही संबोधितो, त्याच अर्थाने सावरकर ’हिंदूराष्ट्र’ नावाचा उल्लेख करतात व सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदुत्वाच्या व्याख्येतही सावरकर ’यस्य भारतभूमिका’ शब्द वापरतात ’यस्य हिंदूराष्ट्र भूमिका’ किंवा ’यस्य हिंदुस्थान भूमिका’ असे म्हणत नाहीत.
क्रांतिकारक, हिंदुत्व, हिंदूराष्ट्र मांडणारे सावरकर समाजक्रांतिकारकही होते हे विसरता कामा नये, कारण सावरकरांना त्यांच्या आयुष्यातील रोमहर्षक घटनेपेक्षा त्यांचे सामाजकार्य महत्त्वाचे वाटायचे म्हणून सावरकर म्हणायचे,’’मी सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका. समाजसुधारक व समाजक्रांतिकारक यातील फ़रक धनंजय कीरांनी आंबेडकर चरित्रात नोंदविलेला आहे. कीर म्हणतात, ’’सुधारक जुन्याच बांधकामाची पुनर्बांधणी करतो तर क्रांतिकारक जुनी इमारत उद्ध्वस्त करतो व नव्याची उभारणी करतो. सावरकर राष्ट्राची उभारणी कुठल्याही धर्मग्रंथावर न करता विज्ञाननिष्ठेवर करा, असे सांगतात. हिंदूंच्या दृष्टिकोनातून देश चालवा, असे कुठे सावरकर म्हणालेत? (हिंदू दृष्टिकोन म्हणजे हानिकारकच हे कशावरून ठरविले?) सावरकर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून देश चालवा, त्यावर राष्ट्राची उभारणी करा, असे म्हणत होते. भारतीय संविधानानेसुद्धा अनुच्छेद ५१ अ (ह) द्वारे भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यात वाढ केली असून त्यानुसार ’विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन’, ’मानवतावाद’, ’चिकित्सक बुद्धी’ आणि ’सुधारणावाद’ यांचा विकास करणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे असे सांगितले आहे. म्हणजे सावरकरांचे हिंदुत्वाचे व हिंदूराष्ट्राचे विचार कुठेही संविधानाच्याविरोधी नसून उलट तंतोतंत जुळणारेच आहेत.
- अक्षय जोग