भाजीवाला ते स्पॅनिश कंपनीचा वितरक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2018   
Total Views |
 


जगातील तिसर्‍या क्रमांकाची औद्योगिक सुरक्षेची उपकरणे तयार करणार्‍या स्पेन देशातील इरुडेक ग्रुपची सिद्धार्थची कंपनी भारतातील एकमेव वितरक आहे. १९९६ ते २०१८ या २२ वर्षांत ‘भाजीवाला ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक’ हा सिद्धार्थचा प्रवास रोमहर्षक आहे.
 
’’ए भाजीवाला...’’ सातवीत शिकणार्‍या चिमुकल्या सिद्धार्थला त्याच्या वर्गातली मुलं चिडवत होती. ‘वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थी’ या निकषावर मॉनिटर झालेला सिद्धार्थ मुलांनी गोंधळ करू नये म्हणून शिक्षिकेच्या अनुपस्थितीत वर्गात उभा होता. सिद्धार्थला रडू आलं. तो घरी आला. आईला बोलला. वर्गातील सगळी मुले मला ’भाजीवाला’ म्हणून चिडवतात. ‘‘मी नाही जाणार शाळेत...’’ निरक्षर असलेल्या आईने सिद्धार्थला जवळ घेतलं. त्याचे डोळे पदराने पुसले. त्याच्या चेहर्‍यावरून मायेने हात फिरवला. ती म्हणाली, ’’आरं, आपण टॅक्सी चालवणार्‍याला ‘ए, टॅक्सीवाला’, पेपर विकणार्‍याला ‘ए, पेपरवाला’ असंच म्हणतो ना? मग आपण भाजी विकतो तर पोरं आपल्याला ‘ए, भाजीवाला’ असंच म्हणणार ना. त्यात काय एवढं वाईट वाटून घ्यायचं? म्हणं, शाळेत जाणार न्हायं. शाळा शिक, मोठ्ठा साहेब हो.’’ आज हा सिद्धार्थ ‘इम्परॅटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा संस्थापक अध्यक्ष आहे. जगातील तिसर्‍या क्रमांकाची औद्योगिक सुरक्षेची उपकरणे तयार करणार्‍या स्पेन देशातील इरुडेक ग्रुपची सिद्धार्थची कंपनी भारतातील एकमेव वितरक आहे. १९९६ ते २०१८ या २२ वर्षांत ‘भाजीवाला ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक’ हा सिद्धार्थचा प्रवास रोमहर्षक आहे. देवराम शिरोडकर, सिद्धार्थचे बाबा तर कलावती ही आई. दोघेही निरक्षर. त्यामुळे काही कागदपत्रांचा व्यवहार करायचा झाल्यास दोघांना शेजार्‍यांची मदत घ्यावी लागत असे. या जोडप्याला तीन मुली आणि दोन मुले. देवराम उदरनिर्वाहासाठी भिंती रंगविण्याची कामे करू लागले. काही महिन्यांनी मुकुंद कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. पैसे साठवून त्यांनी कुर्ल्याला १२ बाय ६ ची एक खोली घेतली. मोठा मुलगा आणि तीन मुली जवळच्याच म्युनिसिपालटीच्या शाळेत शिकली. परिस्थिती नसल्याने हुशार असूनसुद्धा त्यांना पुढे शिकवता आलं नाही. मनात असूनसुद्धा मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवता आलं नाही, म्हणून देवराम आणि कलावती यांनी सिद्धार्थला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं. पोरं जरा मोठी दिसू लागली. त्यांची लग्नं लावून आपण आपल्या कर्तव्यातून मुक्त होऊया, या विचाराने देवरामयांनी आपल्या मोठ्या मुलाचं आणि दोन मुलींची कशीबशी लग्न लावून दिली. धाकट्या मुलीचंसुद्धा लग्न ठरलं. तिच्या लग्नासाठी लोकांकडून कर्ज घेतलं आणि नेमकी देवराम काम करत असलेली कंपनी संपामुळे बंद पडली. घराचं सगळं गणितच कोलमडलं. घर सावरण्याची जबाबदारी सिद्धार्थच्या आईवर आली. त्यांनी भाजीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. पहाटे उठून भायखळा भाजी मार्केटमधून त्या भाजी आणायच्या आणि एका चौकात भाजी विकायच्या.
 
त्यावेळी सातवीत शिकणारा सिद्धार्थ डोक्यावरून पाटी घेऊन घरोघरी जाऊन भाजी विकायचा. त्यामुळेच त्याच्या वर्गातील मुलं त्याला ‘भाजीवाला’ म्हणून चिडवायची. पैसा हीच प्रायॉरिटी असल्याने सिद्धार्थ पतंगसुद्धा विकायला लागला. सिद्धार्थच्या आईने कोंबड्या पाळल्या होत्या. अंडी आणि कोंबड्यांमुळे तेवढेच जास्तीचे पैसे मिळू लागले. आईने बचतीचा कानमंत्र दिल्याने सिद्धार्थने आठवीत असतानाच बँकेत खातं उघडलं होतं. याचवेळी सिद्धार्थला एका दवाखान्यात टेबल सफाईचं काम मिळालं. अर्ध्या तासाचं काम होतं. मोबदला होता महिन्याला फक्त ८० रुपये. पण त्यावेळेस ८० रुपयेसुद्धा भरपूर वाटायचे. ट्यूशनचे पैसे देण्याइतपत ऐपत नसल्याने सिद्धार्थ घरीच अभ्यास करायचा. मात्र, तो हुशार असल्याने ८०-९० टक्के गुण सहज मिळवायचा. त्यांच्या विभागातील एक ट्यूशन घेणार्‍या बाई सिद्धार्थची मेहनत पाहायच्या. त्यांना सिद्धार्थला शिकवायचं होतं. मात्र, अगोदरच त्या एका मुलाला नि:शुल्क शिकवत होत्या. सिद्धार्थलादेखील नि:शुल्क शिकवलं तर इतर पालकसुद्धा अशीच मागणी करतील, या भीतीने त्यांनी सिद्धार्थला शिकवलं नाही. मात्र, एकदा त्यांच्या दहावीच्या व्हेकेशन बॅचला शिकवणं आजारपणामुळे शक्य नव्हतं. ‘‘दोन महिने तू शिकवशील का?’’ असं सिद्धार्थला त्यांनी विचारलं. सिद्धार्थला ती संधी दिसली. त्याने होकार दिला. आता ट्यूशनचे पैसेसुद्धा मिळू लागले. याचवेळी जुहूहून येणार्‍या मुलांनी सिद्धार्थ उत्तम शिकवत असल्याचे त्यांच्या पालकांना सांगितले. त्यातील दोन मुलांची शिकवणी सिद्धार्थने घ्यावी यासाठी त्या पालकांनी सिद्धार्थची मनवळवणी केली. दोन मुलांचे ७०० रुपये शुल्क निश्चित झाले.
 
सिद्धार्थने अकरावीला के. जे. सौमेय्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. सकाळी कॉलेज अन् संध्याकाळी ट्यूशन अशी कसरत सुरूच होती. जुहूला ट्यूशनसाठी आणखी मुले येऊ लागली. ही बहुतांश गुजराती मुले होती. त्याकाळी मोबाईल एवढा प्रचलित नव्हता, पण पेजरवरून ही मुलं ‘बेच डालो,’ ‘थोडा रुको,’ ‘मार्केट ठंडा है,’ असं काहीबाही मेसेजद्वारे बोलायची. सिद्धार्थने त्यांच्याकडून ही भाषा अवगत केली आणि शेअर बाजाराचं बँकेत डिमॅट अकाऊंट सुरू केलं. त्यासाठी त्याने पाच हजार रुपये गुंतविले. बारावीच्या परीक्षेनंतर सिद्धार्थने मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा दिल्या. त्याला खरंतर डॉक्टर व्हायचं होतं. त्याचा मुंबईबाहेर नंबरसुद्धा लागला. मात्र, पैसे नसल्याने त्याने इंजिनिअरिंगचा पर्याय निवडला. इंजिनिअरिंगमधला ’इ’ सुद्धा माहीत नव्हता. एका मुलाने ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची जागा सोडली म्हणून त्याने ती जागा घेतली. कालांतराने तो इंजिनिअर झाला. इंजिनिअरिंगसाठी १४ हजार ४०० रुपये वार्षिक शुल्क होतं. त्याच्याकडे पैसे नव्हते. एक भजनी मंडळ मुलांना शिक्षणासाठी मदत करतं, हे सिद्धार्थला कळलं. सिद्धार्थ अन् सिद्धार्थची आई त्या मंडळाकडे गेली. मात्र, निव्वळ भजन येणार्‍या मुलांनाच आम्ही मदत करतो, अशी मंडळाची अट आहे, हे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. फीचे पैसे मिळावे म्हणून सिद्धार्थ भजनसुद्धा शिकला. त्याला फीचे पैसे मिळाले. २००४ साली सिद्धार्थ पहिल्या श्रेणीत ऑटोमोबाईल इंजिनिअर झाला. थेट मर्सिडीज बेन्झमध्ये त्याला ट्रेनी तांत्रिक सल्लागार म्हणून निवडलं. त्याच्या हुशारीमुळे तो लवकरच वरच्या पदावर पोहोचला. २००६च्या अखेरीस त्याला ‘पोर्श’सारख्या पॉश गाड्यांच्या कंपनीत नोकरी मिळाली. दरम्यान, टाटा मोटर्स जॅग्वार कंपनी खरेदी करण्याच्या प्रयत्नात होती. ती कंपनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना १३ जणांची कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवड करायची होती. अनेक अर्ज आले. त्यातून सिद्धार्थ त्या पदासाठी निवडला गेला. आठ वर्षे सिद्धार्थने तिथे नोकरी केली आणि सलग आठ वर्षे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रमाणपत्रसुद्धा मिळवले.
 
 

 
 
 
आपला स्वत:चा व्यवसाय असावा, हे सिद्धार्थच्या पहिल्यापासून मनात होतं. यासाठी त्याने २०१२ साली ’इम्परॅटिव्ह मॅनेजमेंट ऍण्ड आऊटसोर्सिंग प्रा लि.’ नावाची कंपनी सुरू केली. प्रत्यक्षात २०१६ साली कंपनीच्या कामाला सुरुवात झाली. तोपर्यंत सिद्धार्थने स्वत:चं घर घेतलं, ऑफिस घेतलं आणि कारसुद्धा घेतली. २०१५ साली त्याने नोकरीचा राजीनामा दिला. काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने सिद्धार्थने बाजारपेठेचा अभ्यास केला. त्यावेळेस त्याला आढळले की, ‘आयात आणि सुरक्षितता’ या विषयाला वाव आहे. या क्षेत्रातच आपण व्यवसाय करायचा हे निश्चित करून त्याने औद्योगिक सुरक्षिततेसंबंधीची उत्पादने तयार करणार्‍या ’इरुडेक ग्रुप’ या जगातील तिसर्‍या क्रमाकांच्या कंपनीचे वितरक होण्याचे ठरवले. त्यासाठी मेल, फोनच्या माध्यमातून संपर्क साधला. तो स्पेनला जाऊन कंपनीच्या अधिकार्‍यांना भेटला. त्यांना सिद्धार्थमध्ये व्यवसायाची चुणूक दिसली. त्यांनी सिद्धार्थच्या कंपनीला वितरक म्हणून मान्यता दिली. २०१६ मध्ये सिद्धार्थने ‘इम्परॅटिव्ह इंडिया प्रा.लि.’ या नावाने कंपनीचे नामकरण केले. आज ही कंपनी इरुडेक ग्रुपसाठी वितरण, संशोधन व विकास, पुरवठादार भारतातील भागीदार कंपनी म्हणून काम करते. सोबत सिद्धार्थ शिरोडकर यांनी औषधी उद्योगातसुद्धा उडी घेतली आहे. सध्या ते एका औषधी निर्मितीमध्ये गुंतले आहेत. त्याचं उत्पादन हैदराबादला होतं. नोंदणीकरण उझबेकिस्तानचं आहे, तर ते निर्यात केनिया देशात केलं जातं. स्वत:च्या शिक्षणापेक्षा भिन्न अशा क्षेत्रात सिद्धार्थ शिरोडकरांची घोडदौड सध्या सुरू आहे. मेहनत आणि चिकाटी याचं दुसरं नाव म्हणजेच सिद्धार्थ शिरोडकर, अशी त्यांची ओळख दृढ झाली तर आश्चर्य वाटायला नको.
 
 
 
- प्रमोद सावंत 
 
@@AUTHORINFO_V1@@