अवंती : मेधाकाकू...कालचे फुला-फळांचे प्रदर्शन किती छान होते...आम्ही सगळ्या मुलांनी खूप नविन फुले पहिली...आणि प्रदर्शनाची मांडणी मला इतकी आवडली कि मी त्याचे फोटो सुद्धा काढले...!!...गुलाबाच्या फुलांच्या इतक्या जाती...कमळाच्या फुलांचे इतके रंग...खूप नवे-नवेसे ... खूप हवे-हवेसे...!!
मेधाकाकू : झक्कास...म्हणजे शाळेचा हा उपक्रम नक्की यशस्वी झालाय...!!..अवंती, विद्यार्थ्यांना अशा प्रदर्शनात नेताना फक्त वेगवेगळी फुले-फळे पहाणे या बरोबरच शाळेच्या संचालकांचे अन्य हेतू सुद्धा असतात. अशी आकर्षक फुले-फळे-वनस्पती पाहिल्यावर; त्याची विविधता जाणवल्यावर, त्याच्या मागच्या निर्मितीच्या गोष्टी, बागायती जमीन, लावणीचे तंत्र, हवामान, विक्री व्यवस्था या बद्दल आणि अर्थात आपल्या समृद्ध निसर्गाबद्दल तुमच्या मनात उत्सुकता निर्माण, असा विचार सुद्धा केलेला असतो...!! याच दिशेने प्रत्येकाला विचार करायला लावणारा, काही शतकांपासून लोकश्रुती बनलेला, असा योग्य मार्गदर्शन करणारा आपला आजचा वाकप्रचार...फक्त सहा शब्दांत किती निश्चित टिप्पणी करतोय, बघ...!!..
तू फिरलास झाडोझाड मी फिरलो पानोपान
अवंती आपला निसर्ग एक महान शिक्षक आहे, त्याच्याकडून काय आणि कसे शिकायचे ते मात्र समजायला हवे. एक विद्यार्थी गुरुजीना सांगतो “आता मी सगळे शिकलोय तुमच्या कडून, आता मला आशीर्वाद द्यावा, मी एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू होतो आहे”. हे ऐकून गुरुजींनी अशा अर्धवट ज्ञानाने शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्याला दिलेला हा सल्ला. “तू माझ्याकडे शिकलास, ते एखादया बागेतल्या झाडांभोवती फेऱ्या घालण्या सारखेच होते की...!!...अभ्यास आणि ज्ञानप्राप्ती अशी होत नसते. त्यासाठी प्रत्येक झाडाच्या प्रत्येक पानाचा अभ्यास करावा लागतो”...!!..अवंती, मात्र हा सल्ला प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक अर्धवट तज्ज्ञाला दिला गेला पाहिजे. आज समाज माध्यमातून असे अर्ध्या हळकुंडाने गोरे झालेले तज्ज्ञ आपल्याला नियमित भेटत असतात, एखाद्या क्षेत्रात यश मिळाले कि उत्साहित होऊन असे अर्धे तज्ज्ञ प्रत्येक विषयांत प्रतिक्रिया देतात आणि त्यांचे मूर्ख विश्लेषण प्रेक्षकांना ऐकावे लागते.
अवंती : अरे व्वा...खरंच, गुरूचा किती सडेतोड सल्ला...आपल्या अर्धवट विद्यार्थ्याला...!! मेधाकाकू, वास्तवाचा चटका देणारे असे शिक्षक असतात का गं...हल्लीच्या शाळातून...??
मेधाकाकू : अवंती...या वर तुला अपेक्षित असलेली टिप्पणी नाही करणार मी...कारण आता शिक्षकालाच विद्यार्थ्याचा सन्मान आणि संवेदना सांभाळायचे काम दिले गेले आहे...!! परंतु आपल्या लोकश्रुती आणि निसर्ग एक प्रकारे आपल्या शिक्षकाचेच काम करत आहेत...असे लक्षात घे...!! मातृभाषेत आयुर्वेद शिकवताना किती सोपा करून शिकवला गेला असेल आपल्या पुर्वजाना...या एका सहा शब्दाच्या म्हणीवरून आपल्या लक्षात येते...!! पुन्हा एकदा...निसर्गाशी आपले मैत्र...!!..
नाय, निर्गुड, माका सर्व औषधांचा काका
नाय-निर्गुड-मका या तीन औषधी वनस्पती...अनेक व्याधींवर रामबाण उपाय योजना...!! म्हणून यांना संबोधन दिले गेले...”सर्व औषधांचा काका”...!! शब्दार्थच इतका प्रभावी...कि याचा वेगळा मथितार्थ सांगायची गरजच नाही...!!
अवंती : अरेच्या...मेधाकाकू...म्हणजे मधेच चर्चा ऐकू येते...मातृभाषेतील शिक्षण...या विषयाची...!!..ते योग्यच असावे असे वाटायला लागलंय मलाही...!!..आपला शिक्षक निसर्ग...किती मस्त कल्पना...फारच छान...!! मेधाकाकू मात्र हा शिक्षक अबोल आणि मूक असेल ना...!!
मेधाकाकू : अवंती...इथे मात्र तू थोडीशी चूक करत्येस...!!..निसर्ग अबोल हे एका अर्थाने खरेच...!! मात्र तो जेवढा स्पष्टपणे वास्तवाचे वर्णन करतो ते आणि तसे करणे खूप बोलणाऱ्या अन्य शिक्षकाला जमणार नाही कदाचित. आता हि म्हण किती स्पष्टपणे वास्तवाची शिकवणी देते आहे बघ...!!..
काठी मारल्याने पाणी वेगळे होत नाही
मेधाकाकू : कुठलाही द्वयार्थ नाही...अगदी सहज आणि स्पष्ट असा सल्ला...!! पाण्याचा साठा किती मोठा आणि एखाद्याने त्यावर काठीने प्रहार करावा आणि पाण्यानेच काठी परत उलटी फेकावी. एखाद्या संघटनेत – एखाद्या खेळाडूंच्या संघात – एखाद्या उद्यमशील कुटुंबात फूट पाडण्याचे प्रयत्न, पातळयंत्री व्यक्ती आणि प्रतिस्पर्धी करतच असतात. घट्ट नात्यांची वीण असलेल्या संघटना-संघ आणि कुटुंब व्यवस्थेमुळे, विघ्नसंतोषी मंडळींच्या अशा छोट्या प्रयत्नांना फारसे यश मिळत नसते. मात्र हा सल्ला प्रत्येकाने लक्षात घ्यावा आणि नात्यांची वीण कायम घट्ट ठेवावी.
अवंती : आहा...आहा...मेधाकाकू...हा बघ तू वर्णन करतेस तसा लिखित चिन्ह संकेत...!! बरोबर आहे का माझे...?? काठी मारून काही जोड्या फोडता येतात...पाण्याला फोडून वेगळे करणे अगदी अशक्य गोष्ट...!! अरेच्या...हे मस्तय कि...!!
मेधाकाकू : एकदम बरोबर...अवंती...!! आता तू, एखाद्या विषयाचे असे योग्य विश्लेषण करायचा प्रयत्न करत रहा...तुला नक्की जमतंय असा अभ्यास करणे...!! आता अजून एक गम्मत बघ अवंती...निसर्ग-फुले-फळे-झाडे यांचा संदर्भ बऱ्याचवेळा उपहासाने सुद्धा वापरला गेलाय आपल्या लोकश्रुतींमधे...!!
पान ना फुल पण कमळी माझी सून
मेधाकाकू : ह्या गमतिशीर वाकप्रचारात असलेली ‘कमळी’ म्हणजे एक गृहीतक आहे, अस्तित्वात नसलेली कोणी व्यक्ती आहे...!! या वाकप्रचारातच एक स्पष्ट उल्लेख पहिल्या तीन शब्दांत केलेला आपल्याला दिसतोय... ‘पान न फुल’...म्हणजे काही नाते अथवा कुठलाही व्यवहार नसताना, एखाद्याने दुसऱ्याच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करणे, जे पुढच्या तीन शब्दांत, ‘कमळी माझी सून’ असे मांडले गेले आहे...मात्र असे गळे पडू वागणे त्या दुसऱ्याला आवडलेले नाही. यातला सूक्ष्मार्थ असा कि एखाद्याशी विनाकारण खूप जवळीक करण्याचा प्रयत्न करणे. काही रसिक मंडळी बऱ्याचवेळा यशस्वी कलाकाराच्या जवळ उभे राहून ‘सेल्फी’ चा प्रयत्न करताना आपल्याला पहायला मिळतात...हा त्यातलाच प्रकार. योगायोगाने...आजच्या राजकीय पक्षांच्या व्यवहार मधे...हा वाकप्रचार प्रत्यक्षात साजरा झालेला दिसतो...!! राज्याच्या मंत्रिमंडळात तर राहायचे आहे, हि कमळी माझी सून म्हणून मिरवायचे हि आहे...तरीही रोज नव्या नव्या विषयांमधे विधाने करताना राज्याच्या मुख्यमंत्र्याचा आणि राष्ट्राच्या पंतप्रधानाचा जाहीर उद्धार करताना पाणउतारा सुद्धा करायचा आहे... पान ना फुल पण कमळी माझी सून असा जप करत, राजकीय फायद्यासाठी कमळाला कवटाळून बसायचे आहे.
अवंती : आहा...आहा...मेधाकाकू, हा खरा उपहास...नक्की पटलय मला...!!
- अरुण फडके