समाज प्रबोधन व सामाजिक सुधारणा यांची प्रदीर्घ परंपरा भारतात असूनसुद्धा येथे समाजपरिवर्तन कासवाच्या गतीने का होते आणि होते ते स्थायी स्वरुपाचे का होत नाही?, हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. दीर्घकाळ सामाजिक कार्याचा प्रत्यक्ष अनुभव असणारे समाजसुधारक आणि या विषयाचा तात्त्विक अंगाने विचार करणारे समाजशास्त्रज्ञ यांच्यासमोरही हे प्रश्न आव्हान स्वरूपात उभे आहेत. हे प्रश्न मूलतः समाजाच्या मानसिकतेशी, मनःपरिवर्तनाशी जोडलेले आहेत, हे लक्षात घेऊन त्यांचे आकलन यथायोग्यपणे केल्याशिवाय त्यांची गुंतागुंत उकलणार नाही व उत्तराची दिशाही सापडणार नाही. या व्यापक पार्श्वभूमीवर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत. समाजपरिवर्तनाच्या चळवळीतून उत्पन्न झालेल्या अपेक्षा आणि समाजस्थितीचे प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव यांच्यात असणार्या अंतरावर आणि त्यांच्यावरील परस्पर संबंधांवर या प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत, असे मला वाटते. या अर्थानेसमाजपरिवर्तनाचे गतिशास्त्र हे व्यक्तीच्या व समाजाच्या मानसिक परिवर्तनाशी जोडलेले आहे, असे वाटते. राजकीय क्रांती ही सत्तापरिवर्तनासाठी असते व त्याचे परिणाम झटकन दिसून येतात. मात्र समाजपरिवर्तन हे क्रांतीच्यामार्गातून होत नाही. तर तेथे उत्क्रांती (Progressive Development) आवश्यक असते, तरच तेथे स्थायी परिणाम दिसू शकतात आणि उत्क्रांती ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. क्रांतीचे ज्या गतीने परिणाम अनुभवायला मिळतात तसे ते उत्क्रांतीत संभवत नाहीत. समाजपरिवर्तन हा विषय केवळ बुद्धीशी, तर्काशी जोडलेला नसून तो भावनेशी अधिक जोडलेला आहे. हा विषय डोक्यापेक्षा(Head) हृदयाशी (heart) अधिक संबंधित असल्यामुळे मनःपरिवर्तन(Change of Mind Set) येथे अधिक प्रभावी व परिणामकारक असते. उत्क्रांतीला गर्भवहन काळ(Gestation Period) द्यावा लागतो. तसा तो दिला नाही तर किंवा सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात क्रांतीची अपेक्षा केली तर ते सर्व प्रयत्न निष्फ़ळ (Abortive) ठरण्याची शक्यता अधिक असते. ‘पी हळद नि हो गोरी’ हे उत्क्रांतीत किंवा मानसिक परिवर्तनात शक्य नसते. या सार्याचा गंभीर विचार केल्याशिवाय सामाजिक परिवर्तनाचे गतिशास्त्र लक्षात येणार नाही व त्याच्याशी निगडित असलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळू शकणार नाहीत.
पुढे एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात समाजप्रबोधन व सामाजिक सुधारणा या चळवळींना मोठी गती व वेगळी दिशा मिळालेली दिसते. या क्षेत्रातील सुधारकांच्या प्रेरणा पाश्र्चात्त्य चिंतनातून व विचारविश्वातून आल्या होत्या. थेट राजा राममोहन रॉय यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक समाजसुधारकांनी व विचारवंतांनी या चळवळींना वैचारिक बैठक व कृतीची जोड दिलेली दिसते. वृत्तपत्रीय लेखन, ग्रंथलेखन, व्याख्याने या प्रबोधनपर कार्याच्या जोडीला प्रत्यक्ष आंदोलने व चळवळीही त्यांनी उभ्या केल्या. परिवर्तनाचा झंझावात उभा करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. असे असूनही या चळवळी, हे लढे पुन:पुन्हा का उभे करावे लागतात?, याची उत्तरे भल्याभल्या विचारवंतांना मिळत नाहीत. हे सर्व लक्षात घेऊन सामाजिक परिवर्तन मुळापासून करू इच्छिणार्या विचारवंतांना व कार्यकर्त्यांना आपल्या धोरणाची, उद्दिष्टांची व विषयसूचीची पुनर्मांडणी करावी लागेल. आपली कार्यपद्धती अधिक समाजाभिमुख व सामाजिक परिवर्तनाला अनुकूल अशी करावी लागेल.
समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेची नस राजा राममोहन रॉय यांना अचूक सापडली होती, असे दिसते. भारतीय जनमानस-विशेषत: हिंदू जनमानस हे धर्मप्रधान होते, हे त्यांनी ओळखले होते. या समाजात स्थायी स्वरूपाचे सामाजिक परिवर्तन घडवून आणायचे असेल तर धर्मविचारात व धर्माचारात प्रथमपरिवर्तन झाले पाहिजे, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. धर्म हे समाजाचे हृदय आहे आणि त्यांच्या सर्व व्यवहारात जर परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर त्यांच्या हृदयात, मानसिकतेत परिवर्तन झाले पाहिजे म्हणजे प्रथमआत्म्याचीच उन्नती झाली पाहिजे, असे राजा रायमोहन रॉय व समकालीन समाजसुधारकांचे मत होते. त्यामुळे सुधारणेचा वा परिवर्तनाचा क्रमलावताना त्यांनी पहिली धर्मसुधारणा, दुसरी समाजसुधारणा व तिसरी राजकीय सुधारणा अशी मांडणी केली होती. धर्मसुधारणा याचा अर्थ हृदयपरिवर्तन. धर्मविचार, धर्मभावना व धर्माचार यात परिवर्तन. त्याला पर्याय नाही. ज्या समाजाच्या सर्व व्यवहारांवर धर्माचे नियंत्रण असते त्या समाजाच्या सर्वांगीण परिवर्तनासाठी हाच मार्ग असू शकतो, असे त्यांचे प्रतिपादन होते. याचा अर्थ समाजपरिवर्तनाचे गतिशास्त्र त्यांना समजले होते.
दुसरे असे की, समाजपरिवर्तनाचा वसा घेतलेल्या विचारवंतांनी व समाजसुधारकांनी समाजाच्या फार तर दहा पावले पुढे असले पाहिजे. आगरकर किंवा सावरकर यांच्यासारखे विचारवंत समाजाच्या व काळाच्या फार पुढे होते. त्यामुळे समाज त्यांच्यामागे जाऊ शकला नाही. हे दोघेही विचारवंत बुद्धिवादी, तर्कनिष्ठ व वैज्ञानिक वृत्तीचे होते. पण ‘गाय हा उपयुक्त पशु आहे,’ किंवा ‘श्रृतिस्मृति पुराणोक्त नव्हे तर अद्ययावत’ हे सावरकरांचे विचार समाजाच्या पचनी पडणारे नव्हते. व्यावहारिक जीवनात भावनेला व श्रद्धेलाही महत्त्व असते. त्यामुळे दोष त्या विचारवंतांचा नाही तर समाजपरिवर्तनाच्या गतिशीलतेच्या मर्यादेचा आहे. त्या तुलनेत लोकमान्य टिळक व रानडे हे समाजसुधारक म्हणून अधिक यशस्वी ठरले, कारण सामाजिक परिवर्तनाच्या गतिशास्त्राचे भान ठेवून समाजाच्या चार पावले पुढे जाऊन त्यांनी समाजाचे नेतृत्व केले व आपल्या पाठीमागे समाज येतो आहे, आपण समाजाच्या दृष्टीच्या टप्प्यात आहोत, याचे त्यांनी भान ठेवले व परिवर्तनाचा रथ पुढे नेला.
म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रामुख्याने दलित, शोषित, पीडित व वंचित समाजाच्या परिवर्तनाचे प्रवक्ते व नेते होते. ते स्वतः याच समाजगटातून आलेले असल्यामुळे त्यांना त्यांनी भोगलेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव होता. त्यामुळे त्यांनी अत्यंत तीव्र व परखड भाषेत व क्रांतिकारी पद्धतीने आपले विचार प्रक्षोभकरित्या मांडलेले दिसतात. त्यांच्या पूर्वीचे समाजसुधारक हे उच्चवर्णीय व उच्चवर्गीय समाजाच्या प्रश्नाशी निगडित होते तर फुले-आंबेडकरांनी प्रथमच बहुजन समाजाच्या व्यथांना तोंड फोडलेले दिसते व त्या विरोधात चळवळी उभारलेल्या दिसतात. हा मूलगामी फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. म. फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाचा, लेखणीचा व चळवळींचा मार्ग स्वीकारला व समाजमन जागे करण्याचा प्रयत्न केला तर डॉ. आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा,’ हा विधायक व रचनात्मक मार्ग निवडला. लेखन, वक्तृत्व व सामाजिक चळवळी यांच्यामार्फत समाजमनात परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र आपल्या या प्रयत्नांना हिंदू समाजातील धुरीण व धर्माचार्य योग्य तो प्रतिसाद देत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या हयातीतच आपल्या समाजबांधवांच्या जागृतीला योग्य ती दिशा देण्यासाठी धक्कातंत्र वापरून धर्मांतराचा मार्ग स्वीकारला. तो स्वीकारतानाही त्यांनी या देशातील संस्कृतीशी, मातीशी व भावविश्वाशी इमान राखणारा बौद्ध धर्म धर्मांतरासाठी निवडून आपल्या संयमी व विवेकपूर्ण नेतृत्वाची ग्वाही दिली. राष्ट्रहिताचाच विचार डोळ्यासमोर ठेवला. याबद्दल आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे.
फुले-आंबेडकर यांच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी त्यांच्या विचारांचा, व्यवहाराचा व चळवळींचा खरा अर्थ समाजाला कळू लागला. त्याचे जनमानसावर झालेले परिणामदिसू लागले. आज बहुजन समाज दीर्घ निद्रेतून सर्व अर्थाने जागृत होताना व आत्मभान आलेला दिसतो आहे. समाजपरिवर्तनाच्या चक्राला गती मिळाल्याचे आपण पाहात आहोत. या दोन्ही काळात जे अंतर आपल्याला दिसते, जाणवते त्यालाच समाजपरिवर्तनाच्या गतिशास्त्रात गर्भवहन काळ (Gestation Period) असे म्हणतात. असा काळ देणे अपिरहार्य असते. तसा तो दिला की ते प्रयत्न हे निष्फळ (Abortive) ठरत नाहीत. याचा अनुभव आपण वर्तमानकाळात घेत आहोत.
मात्र आज समाजाच्या सर्व अंगोपांगांवर राजकारणाचा, विशेषतः सत्तेच्या राजकारणाचा प्रभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजात जी उलथापालथ होत आहे त्यातून नवनवे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. सत्तेची भूक समाजाच्या सर्व गटांत निर्माण झाली आहे. आपण लोकशाहीचा स्वीकार केला आहे. त्यामुळे मतपेढीचे व निवडणुकीचे राजकारण अटळ व अपरिहार्य झाले आहे. ‘जात’ हे एकगठ्ठा मताचे संघटित केंद्र बनल्यामुळे जातीअंत तर सोडाच, जातभावना अधिकाधिक घट्ट होत गेल्या आहेत. जातीजातीतील सत्ताकेंद्री संघर्षाचा समाजस्वास्थावरही विपरीत परिणामहोताना दिसत आहे. ही सर्व परिस्थिती नव्या प्रश्नांना जन्मदेते आहे आणि या नव्या प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजसुधारणेच्या नव्या परिप्रेक्ष्यात विचार करून त्यांची उत्तरे शोधावी लागतील. आजच्या विचारवंतांसमोर व समाजसुधारकांसमोर हे नवेच आव्हान उभे आहे. त्यांनी समाजपरिर्वनाच्या गतिशास्त्राचा वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध अभ्यास करून समाजमानस बदलण्याचा व त्याद्वारे परिवर्तनाला गती देण्याचा दूरमागी विचार केला पाहिजे.
या विषयाचा आणखी एक पैलू आपल्यासमोर मांडतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा काही वर्षांपूर्वी पुण्यात एक कार्यक्रमझाला. निवडक पत्रकार बंधूंबरोबर अनौपचारिक गप्पागोष्टी, वार्तालाप असा तो कार्यक्रमहोता. पत्रकार विविध प्रश्न उपस्थित करीत होते. त्यावेळी एका ज्येष्ठ संपादकाने प्रश्न विचारला, “संघाने व संघपरिवाराने अग्रहाने मांडलेल्या स्वदेशी व समरसता या संकल्पनांना म्हणावा तसा पाठिंबा मिळताना का दिसत नाही? प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवर त्या तितक्या यशस्वी होताना वा स्वीकाराहर्र् अशा का दिसत नाहीत?’’ या प्रश्नांना मोहनजींनी जे उत्तर दिले ते अतिशय मार्मिक व विचारप्रवर्तक होते. त्या उत्तराचा आशय असा : “काही विचार व संकल्पना या माणसाच्या बुद्धीला पटतात. विचारांना व तर्काला पटतात. ही प्रक्रिया माणसाच्या मेंदूत म्हणजेच डोक्यात चालते पण त्याच बाबी माणसाच्या भावनेला म्हणजेच हृदयाला पटतात, भिडतात, असे दिसत नाही. कोणतीही गोष्ट बुद्धीइतकीच भावनेला पटते, असे नाही, डोक्याइतकीच ती हृदयाला भिडत नाही तोपर्यंत ती आचरणात, व्यवहारात उतरत नाही. हे अंतर कमी करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. ते विषय बौद्धिक आकलनाइतकेच मनाला भिडणे आवश्यक असते. स्वदेशी व समरसता याबाबतचा आमचा म्हणजे संघ व संघ परिवाराचा अनुभव याच स्वरूपाचा आहे. मूळ तत्त्व न सोडता काही तडजोडी कराव्या लागतात, कारण संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जायचे असते. त्यामुळे अपरिहार्यपणे या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरण्यासाठी काही काळ जावा लागेल पण या दोन्ही बाबी समाज मनापासून आज ना उद्या, स्वीकारेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी Hasten Slowly हाच स्थायी समाजपरिवर्तनाचा मंत्र आहे, असा संघाचा अनुभव आहे.’’ योगायोगाने मी व ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर या अनौपचारिक संवादाचे साक्षीदार आहेत याचाच अर्थ समाजपरिवर्तनाचे रहस्य व त्याचे गतिशास्त्र संघाला व त्यांच्या कार्यपद्धतीला अचूक समजले आहे, असा होतो. तात्पर्य समाजासमोरील समस्या समाजाच्या सामूहिक शहाणपणातून सुटू शकतात. त्यासाठी घिसाडघाई करणे योग्य नाही, असाच याचा मतितार्थ आहे.
या संदर्भात ग्रेट ब्रिटनमधील थोर विचारवंत अल्डस् इक्सले यांनी आपल्या The Planned Society या अत्यंत विचारप्रवर्तक निबंधात जे चिंतन मांडले आहे, ते मला अतिशय हृद्य, मार्मिक व महत्त्वावे वाटते. ते म्हणतात,
''Most human beings are conservative, that even desirable changes beget opposition that no change which has to be imposed by great and prolonged violance is ever likely to achieve the desirable results expected of it. From this it follows, first, that only strictly necessary raforurs should be undertaken, second, that no change to which there is likely to be widespread and violent oppositon should to imposed, however intrinsically desirable it may be, except gradually and by instalments, and thirdly, the desirable changes should be made, wherever possible, by the application to wider fields of methods with which people are already familiar and of which they approve."
या दीर्घ उदाहरणाचा अर्थ असा : “बहुतेक माणसे स्वभावतः स्थितीप्रिय किंवा मंदसुधारणवादी असतात त्यामुळे त्यांचा इष्ट सुधारणांनाही विरोध होतो. कोणतीही सुधारणा जर समाजावर मोठ्या व दीर्घकालीन हिंसेच्या मार्गाने लादली गेली तर त्याचे अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत. त्यातून जे निष्कर्ष निघतात ते असे : एक, केवळ अत्यावश्यक सुधारणांचाच आग्रह धरावा वा त्या हाती घ्याव्यात. दोन, ज्या सुधारणा हाती घेतल्यामुळे मग त्या स्वाभाविकरित्या कितीही इष्ट असोत, समाजात सार्वत्रिक व हिंसक विरोधाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या सुधारण समाजावर लादू नयेत. जर त्या लागू करायच्याच असतील तर हळूहळू व टप्प्याटप्प्याने अमलात आणाव्यात आणि तीन, इष्ट असे बदल वा सुधारणा करतानाही जेथे जेथे शक्य असेल तेथे त्या अशा पद्धतीने अंमलात आणाव्यात की ज्या पद्धती लोकांना परिचित असतील व त्यांना त्या मान्य असतील.’’
समाजपरिवर्तनाचे गतिशास्त्र ज्यांना माहीत आहे, असे विचारवंतच इतक्या सखोलपणे व पारदर्शकरित्या त्याचे विश्लेेषण स्पष्ट शब्दांत करू शकतात. समाजपरिवर्तनाचा मार्ग हा दीर्घ पल्ल्याचा आहे. तो पार करताना समाजपरिवर्तनाचे हे गतिशास्त्र ध्यानात ठेवले तर परिवर्तन स्थायी व दीर्घकाळ टिकू शकेल. सामाजिक प्रश्नांचा विचार करणार्या विचारवंतांनी व समाजसुधारकांनी समाजपरिवर्तनाचे हे गतिशास्त्र लक्षात ठेवले तर त्यांचे परिश्रम सार्थकी लागतील, असे वाटते.
प्राचार्य श्याम अत्रे