नौदल दिनाच्या निमित्ताने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018   
Total Views |



भारतीय नौसेनेला एक इतिहास आणि समर्थ वर्तमान तर आहेच, पण भविष्याकडे पाहण्याची दृष्टीही आहे. ४ डिसेंबरच्या नौदल दिनाच्या निमित्ताने साजरा करण्यात आलेल्या भारतीय नौसेनेच्या सध्याच्या कामाची समीक्षा करणे जरुरी आहे.


सागरी आक्रमणास प्रत्युत्तर देण्याची आपली क्षमता आहे, हे देशवासीयांना समजावे, हाही भारतीय नौदल दिवस साजरा करण्यामागील एक उद्देश असतो. आपल्या खंडप्राय देशाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारतीय नौदल हे पाकिस्तानपेक्षा शक्तिशाली असले तरी, चीन भारतीय नौदलापेक्षा आघाडीवर आहे. चीनकडे ७८ पाणबुड्या आहेत. त्यापैकी १४ अणुइंधनावर चालणाऱ्या पाणबुड्या व ५७ पारंपरिक पाणबुड्यांचा समावेश आहे.

 

नौदलाची लढाऊ जहाजे

 

सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात एक विमानवाहू युद्धनौका, पाणबुड्या मिळून एकूण १३७ नौकांचा समावेशआहे. २०२७ पर्यंत २०० नौकांचा ताफ्यात समावेश करून सर्वसमावेशक अशी ‘ब्ल्यू वॉटर नेव्ही’ बनण्याची भारतीय नौदलाची महत्त्वाकांक्षा आहे. त्या दृष्टीने देशभर विविध प्रकल्प राबवले जात आहेत. स्वदेशी बनावटीच्या विविध श्रेणीच्या युद्धनौका, पाणबुड्या नौदलात दाखलही झाल्या आहेत. सध्या देशभरातील विविध गोदींमध्ये ३४ युद्धनौका व पाणबुड्यांची बांधणी सुरू आहे. भारताची पहिली आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ने नुकतेच आपले पहिले गस्त अभियान पूर्ण केले. भारताकडे १५ पारंपरिक पाणबुड्या आहेत. दोन अणुइंधनावर चालणाऱ्या आणि बॅलॅस्टिक क्षेपणास्त्र डागणाऱ्या पाणबुड्या आहेत. एखादी पाणबुडी पाण्याखाली असताना त्यात बिघाड झाल्यास त्यात अडकलेल्या नौसैनिकांच्या सुटकेसाठी नौदलाने नुकतीच नवी यंत्रणा सक्रिय केली आहे. ‘डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल’ (डीएसआरव्ही) पाणबुडी बचाव वाहन नौदलाच्या पश्चिमी ताफ्यात दाखल झाली आहे. ‘आयएनएस विराट’ निवृत्त झाल्यानंतर भारतीय नौदलाची मदार ‘आयएनएस विक्रमादित्य’ या एकमेव विमानवाहू युद्धनौकेवर आहे. अनेक महिने ‘आयएनएस विक्रमादित्य’ कोचीन शिपयार्डमध्ये होती. ७०० कोटी रुपये खर्चून तिची डागडुजी करण्यात आली. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘विक्रांत-२’ या विमानवाहू युद्धनौकेची बांधणी कोचीन शिपयार्डमध्ये सुरू आहे. ती पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी २०२२-२३ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

 

पोलिसिंगची भूमिका

 

वाढत्या सागरी गुन्हेगारीच्या घटनांमुळे नौदलाला कराव्या लागणाऱ्या पोलिसिंगच्या कामगिरीवर प्रकर्षाने लक्ष केंद्रित झालेले आहे. या भूमिकेचे महत्त्व या वस्तुस्थितीने स्पष्ट होईल की, जगातील एक तृतीयांश नौदलांकरिता हा त्यांच्या कार्यवाहींचा प्रमुख भाग आहे. या भूमिकेत दलांना देशाच्या कायद्याच्या अंमलबजावणीकरितातैनात केले जाते किंवा आंतरराष्ट्रीय कर्तव्याकरिता कार्य करावे लागते. दलास केवळ स्वसंरक्षण वा पोलिसिंगची भूमिकाच निभवावी लागते. सागरी सुरक्षा करणे हे भारतीय नौदलाचे एक प्राथमिक कर्तव्य असते. यात निम्न तीव्रतेच्या सागरी कार्यवाहींपासून ते समुद्रावरील सुव्यवस्था सांभाळण्यापर्यंत भूमिका अंतर्भूत असतात. भारताच्या सागरी क्षेत्रातील, पोलिसिंगच्या भूमिकेतील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य तटरक्षक दल आणि सागरी पोलीस सांभाळत असतात. नौदलाची पोलिसिंग या पैलूला जरी कायदेशीर अधिकृतता नसली तरी, ‘पोलिसिंगची भूमिका’ हा वाक्प्रचार नौदलानेच वापरलेला आहे. भारताच्या महासागरीक्षेत्राबाहेरील पोलिसिंगची भूमिका नौदलाचेच कर्तव्य असते. अवैध मासेमारीविरुद्धच्या गस्ती, सोबत करण्याची (एस्कॉर्ट) कर्तव्ये, भारतीय नागरिकांची इराकमधील वा येमेनमधील युद्धभूमीतून सुटका करणे अशा अनेक भूमिका नौदल करत आहे.

 

किनारी आणि सागरी सुरक्षा

 

दहशतवादाचा आवाका विस्तारल्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी नौकानयन आणि मासेमारी धोकादायक होत आहे. अंमली पदार्थ व्यापार, आंतरदेशीय गुन्हेगारी संघटना आणि दहशतवादी संघटना नौका पळवून त्यांच्या कारवायांकरिता वापरू शकतात. बंदरांवर, पायाभूत सुविधांवर, सागरी तेल आस्थापनांवर आणि इतर जागांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी सामान वाहून नेण्याकरिता अशा नौकांचा वापर केला जाऊ शकतो. या धोक्याचा सामना करण्याकरिता योग्य पावले उचलली पाहिजे.

 

झोन सुरक्षा (आर्थिक क्षेत्राची)

 

आपल्या आर्थिक क्षेत्रातील संसाधने, अवैध मासेमारी, सागरी हल्ल्यांपासून आपल्या सागरी आस्थापनांचे संरक्षण करणे हे काम नौदलाने तटरक्षक दलाच्या संगतीने हाती घेतलेले आहे. यास हवाई संरक्षण पुरवण्याचे कर्तव्य भारतीय वायुदलाने अंगीकारले आहे.

 

समुद्रावरील कायदा व सुव्यवस्था

 

समुद्रावरील सुव्यवस्था राखणे हा या भूमीवरील शांतता, स्थैर्य आणि आर्थिक विकास सुनिश्चित करण्यातील एक घटक आहे. समुद्रावरील सुव्यवस्था हल्ली वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे धोक्यात आलेली आहे. समुद्रावरील कायदा व सुव्यवस्था राखणे हे तटरक्षक दलाचे कर्तव्य आहे. काही वेळेस ते नौदलाचे साहाय्याने पार पाडले जाते.

 

घुसखोरीविरोधातील कार्यवाही

 

भारताच्या लांबलचक सच्छिद्र किनारपट्टीचा वापर, तस्कर आणि दहशतवाद्यांनी, सामान व राष्ट्रविरोधी व्यक्तींना उतरवण्याकरिता अनेकदा केलेला आहे. समुद्रावरील घुसखोरीविरोधी कार्यवाहीत, गस्त घालणे आणि ओळख पटवणे, सामान तपासणे याकरिता नौकांचा तपास करणे यांचा समावेश होतो.

 

अवैध मासेमारीविरोधातील कार्यवाही

 

अवैध मासेमारीविरुद्धची ऑपरेशन, अवैधरीत्या भारताच्या सागरी क्षेत्रातील आर्थिक संसाधनांचे दोहन करण्यापासून रोखते. राष्ट्रीय मासेमारीक्षेत्राची देखरेख करणे आणि परकीय घुसखोरांपासून त्याचे संरक्षण करण्यात नौदल तटरक्षक दलास मदत करते. अंमली पदार्थांची तस्करी, व्यापारांतर्गत शस्त्रास्त्रांची तस्करी ही हातात हात घालून वावरत असते. दहशतवादी संघटनांचा बव्हंशी अर्थपुरवठा अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून होत असतो. सर्व सुरक्षादलांना, इतर नौदलांना आणि कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या दलांना अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधातील कार्यवाहींचे कर्तव्य दिलेले असते. विशेषत: बांगलादेशच्या संबंधात वाढत्या अवैध स्थलांतरितांचा मुद्दाही महत्त्वाचा ठरत आहे. तेथे समुद्रमार्गे मानवी तस्करी केली जाते. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनारी भागांत, समुद्रमार्गे घुसखोरी करून, अवैध बांगलादेशी स्थलांतरितांनी ते भाग व्यापून टाकले असल्याबद्दलच्या अहवालांनी माध्यमे भरून वाहत आहेत.

 

समुद्री दरोडेखोरांविरोधात मोहीम

 

देशाच्या सागर किनाऱ्याच्या सुरक्षेसोबतच जागतिक पटलावर राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्येही नौदलाला भाग घ्यावा लागतो. अनेक देशांचे सैनिक प्रशिक्षणासाठी भारतात येतात, परदेशातूनही नौदलातील सैनिकांना प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येते. नौदल संयुक्त कवायतींसाठी इतर देशांच्या नौदलाला पाचारण करते. नौदल मॉरिशस, मालदीव, सेशेल्स, श्रीलंका, दक्षिणपूर्व आशियाच्या सामुद्रधुन्या आणि आफ्रिकेतील समुद्रतटीय देशांना सागरी संरक्षण सातत्याने देत आहे. सन २००८ पासून मध्य पूर्वेच्या आखातात नौदलाने सुमारे दोन हजार व्यापारी जहाजांचे संरक्षण केले आहे. समुद्री दरोडेखोरांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहीम राबवून १५० पेक्षा अधिक डाकूंना जेरबंद केले आहे. ऑक्टोबर २००८ पासून एडनच्या आखातात नौदल चाचेगिरीविरोधात भाग घेत आह़े तसेच सोमालियन चाच्यांकडून त्यांचे प्रभावक्षेत्र वाढविण्याचे प्रयत्नही हाणून पाडत आहे.

 

नौदलाची चाचेगिरीविरोधी ऑपरेशन

 

भारतात चाचेगिरीविरुद्ध असा विशिष्ट कायदा अस्तित्वात नाही. भारतीय दंडविधानांतर्गतही चाच्यांवर खटला चालवण्याची तरतूद नाही. त्यामुळे जरी नौदल वा तटरक्षकदल चाच्यांना पकडू शकत असले तरी, भारतीय न्यायालयात त्यांचा निवाडा करणे अवघड होते. गेल्या दशकातील सर्वाधिक चाचेगिरीच्या घटना ज्या दोन भागांत घडून आलेल्या आहेत ते भाग म्हणजे मल्लाक्काची सामुद्रधुनी आणि एडनचे आखात हे आहेत. भारताच्या दृष्टीने पाहता, सामुद्रधुनी चाचेमुक्त राखण्यातच आपले हित आहे. कारण, आपल्याकरिता ते पूर्वेचे महाद्वार आहे. म्हणूनच भारताने जपान पुरस्कृतआशियातील चाचेगिरी आणि नौकांविरुद्धच्या सशस्त्र दरोडेखोरीचा सामना करण्याच्या प्रादेशिक सहकार्य करारास (रिजनल को-ऑपरेशन अॅग्रिमेंट ऑन कॉम्बॅटिंग पायरसी अॅण्ड आर्म्ड रॉबरी अगेन्स्ट शिप्स) ही सहमती दिलेली आहे. सुमारे २० ते २४ भारतीय ध्वज धारण करणाऱ्या नौका दरमहा एडनच्या आखातातून पार होत असतात. जरी हा संपूर्ण व्यापाराचा केवळ १३ टक्के हिस्साच असला तरी, परकीय ध्वज असलेल्या अनेक नौकांचे कर्मचारीही भारतीय नागरिक असतात.

 

शिफारसी

 

दहशतवादी व आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगताने घडवून आणलेली अवनती यापासून मुंबई आणि चेन्नईमधील गोद्यांतील विमानवाहू नौका, पाणबुड्या, युद्धनौका, विनाशिका यासारख्या महागड्या आणि महत्त्वाच्या नाविक संसाधनांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. कोचीन येथील गोदीत विकसित करण्यात आलेल्या सर्वसमावेशक संरक्षण प्रणालीसारख्या प्रणाली सर्व महत्त्वाच्या नौदल तळांवर आणि गर्दी असणाऱ्या गोद्यांतून विकसित करणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांची तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगताने घडवून आणलेली अवनती, दहशतवादी संघटना, अवैध मासेमारी, चाचे व त्यांचे साहाय्यकर्ते याबाबतचे गुप्तवार्तांकन अत्यंत निकृष्ट आहे. कृतीयोग्य गुप्तवार्तांकन ही काळाची गरज आहे. कारण, संसाधने नेहमीच अपुरी असणार आहेत. विशेषत: शेजारी देशांत गुप्तवार्तांबाबत आंतरराष्ट्रीय सहकार विकसित करण्यात नौदलाने पुढाकार घेतला पाहिजे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@