लिखित साहित्यातील चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018   
Total Views |


 


मराठी संत साहित्याचा अभ्यास केला, तर लक्षात येईल की, सर्वच संत कवींनी त्यांच्या लिखित साहित्यांमधून अशा अनेक चिह्न आणि प्रतीकांचा वापर आपल्याला अमूर्त संकल्पना मांडण्यासाठी केला. ज्ञानेश्वर माऊलींनी प्राचीन लिखित संस्कृतीचा परिचय सामान्य जनतेला प्राकृत भाषेत करून दिला आणि बोली मराठी भाषेला सन्मान प्राप्त झाला.

 

चिह्नसंस्कृतीचा अभ्यास करताना आपण प्राचीन भारतीय शिल्प-मूर्ती-प्रतिमा यांच्यासह अशाच प्राचीन इजिप्शियन संस्कृतीमधील चिह्नांचा परिचय करून घेतला. टन दगड, लाकूड, धातू अशा माध्यमांतून या चिह्न आणि चिह्नसंस्कृतीचा वापर आणि विस्तार मानवी इतिहासाच्या अगदी आदिम काळापासून झालेला आहे, असे आपल्या लक्षात येते. याच माध्यमात प्रथम भाषा आणि मग तिच्या लिपीचा वापर सुरू झाला. त्याबरोबरच लिखित साहित्य निर्माण झाले. प्रथम झाडाच्या टिकाऊ पानावर आणि मग कागदाचा शोध लागल्यावर पुस्तक स्वरूपात लिखित साहित्य अस्तित्वात आले. अर्थातच, लिपी आणि लिखाणाच्या या प्राथमिक अवस्थेतील नव्या माध्यमातसुद्धा चिह्न आणि चिह्नसंकेतांचा वापर सुरू झालाच. वर्तमानातील प्रगत समाज माध्यमांचा वापर जेव्हा सुरू झाला त्याक्षणीच ‘इमोजी’ आणि ‘इमोटीकॉन’ या व्यंगचित्र-अर्कचित्र या आधुनिक स्वरूपातील चिन्हांचा मुक्त वापर सुरू झाला. आज आपल्या मोबाईलवर ‘चॅट’ या सुविधेवर लिखित संवाद करताना, एखादी भावना व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण शब्दांऐवजी अशा चिह्नांचा वापर मुक्तहस्ते करत असतात. या लिखित साहित्यातील चिह्नसंस्कृतीची अक्षरउपस्थिती फारच रंजक आहे. आपण स्वत: आणि आपल्या सभोवतालच्या समाजातले अनेक लोकं ज्यावेळी एखादे पुस्तक वाचतात, चित्रपट अथवा नाटक पाहतात, एखादे चित्र न्याहाळतात किंवा संगीताचा आस्वाद घेतात, त्यावेळी बऱ्याचवेळा अशा प्रत्येक कृतीतून ते एखादा लपलेला किंवा एखादा गूढार्थ शोधण्याचा प्रयत्न नकळत करतात. अनेक वेळा या अशा गोष्टीतून एखादा जुना अनुभव डोके वर काढतो किंवा आपले मन एखादा अज्ञात अर्थ शोधू लागते.

 

मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे, असा गुढार्थ शोधण्याचा प्रयत्न अथवा दृष्टिकोन प्रत्येक कादंबरीत किंवा प्रत्येक चित्रात किंवा प्रत्येक चित्रपट पाहताना बाळगायलाच हवा असे मात्र नाही. आपल्याला वाचक म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून असा एखादा गुढार्थ सापडण्याची शक्यता कमीच असते. कारण असे की, एखादा लेखक, चित्रपट दिग्दर्शक अथवा चित्रकार असा एखादा निश्चय करून ती कलाकृती बनवत नसतो. अशा वेळी वाचक आणि प्रेक्षकाने त्या कलाकृतीचा सखोल अभ्यास करून त्या लेखक किंवा चित्रकाराचा, त्या कलाकृती मागचा हेतू आणि उद्देश लक्षात घेणे आवश्यक असते. पुढील परिच्छेदात उल्लेख केल्यानुसार प्रत्येक वाचक किंवा प्रेक्षक आपली स्वत:ची दृष्टांत संकल्पना नक्कीच मांडू शकतो. नाट्यगृहात रंगमंचासमोर चौथी भिंत म्हणून बसलेला प्रत्येक प्रेक्षक, त्याच्या अनुभवाशी समोरचे नाटक ताडून पाहत असतो. मात्र, अशा वेळी कलाकृतीच्या निर्मात्याने जाणीवपूर्वक समोर ठेवलेला उद्देश आणि प्रेक्षक किंवा वाचकाने काढलेला दृष्टांत संकल्पना किंवा मथितार्थ यात फरक असतो आणि असा फरक असणे आवश्यक असते, तरच अशा चिन्हाला अमूर्ताचे अलिखित नियम लागू होतात. आता आपण वळूया चिन्हांच्या मथितार्थाकडे अथवा गूढार्थाकडे. याला आपण ‘प्रतीक,’ ‘रूपक’ किंवा ‘दृष्टांत’ असेही म्हणायला हरकत नाही. अमूर्त संकल्पना निर्माण करताना लेखक, कवी किंवा चित्रकार एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या विशिष्ट जागेचा, प्राणी किंवा पक्ष्याचा, दोन किंवा जास्त व्यक्तींमधील संवादाचा अथवा एखाद्या मुळाक्षराचा वापर करतात. उदाहरणादाखल सांगायचे, तर गरुड पक्ष्याचे चित्र ‘स्वातंत्र्य’ या अमूर्त संकल्पनेचे रूपक आहे. चेटकिणीचे चित्र पाहिल्यावर त्या गोष्टीतला दुष्टपणा अभिप्रेत असतो.

 

मराठी संत साहित्याचा अभ्यास केला, तर लक्षात येईल की, सर्वच संत कवींनी त्यांच्या लिखित साहित्यांमधून अशा अनेक चिह्न आणि प्रतीकांचा वापर आपल्याला अमूर्त संकल्पना मांडण्यासाठी केला. कुठल्याही समाजामध्ये ‘श्रद्धा’ आणि ‘भक्ती’ या दोन भावनांना आणि ‘करूणा’ आणि ‘वात्सल्य’ या दोन अंगभूत गुणवत्तांना पर्याय नाही. मात्र, ज्ञानेश्वर माऊली आणि संत एकनाथांच्या काळातील तत्कालीन समाजमनावर अंधश्रद्धेचा प्रभाव आणि पगडा वाढला होता. मूळ संस्कृत भाषेतील देवाच्या उपासनेच्या मूळ संस्कार आणि संकल्पना आणि त्याच्या व्यक्त प्रणालीचा अपभ्रंश झाल्याने अनिष्ट प्रथा निर्माण झाल्या होत्या. समाजातील मूळ व्यवस्थेमध्ये वर्णभेदाचा प्रवेश झाला होता. ज्ञानेश्वर माऊलींनी प्रथम, या प्राचीन लिखित संस्कृतीचा परिचय सामान्य जनतेला प्राकृत भाषेत करून दिला आणि बोली मराठी भाषेला सन्मान प्राप्त झाला. ज्ञानेश्वर माऊलींनी ७०० वर्षांपूर्वी प्राकृत भाषेतील ज्ञानेश्वरीतून आणि संत एकनाथांनी सोळाव्या शतकांत आपल्या अनेक अभंगांमधून आणि ३०० भारूडांमधून असे चिह्नसंकेत आणि अमूर्त संकल्पना, माऊलींवर श्रद्धा असणाऱ्या आणि विठ्ठलाची मनोभावे भक्ती करणाऱ्या बहुतांशी अशिक्षित असणाऱ्या समाजासमोर ठेवल्या. श्रद्धाळू भक्तांनी त्या अजरामर केल्या. संत चोखामेळा महाराजांनी या चिह्नसंकेतांचे अगदी समर्पक वर्णन आपल्या एका अभंगात केले आहे. ‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, का रे भुललासी वरलिया रंगा..’ जीवनाकडे डोळसपणे पाहण्याचा उपदेश करणारा हा अभंग, आपला हा विषयसुद्धा दोन ओळीत अगदी चपखलपणे मांडतो. वरकरणी दिसणारा एखाद्या चिह्नाचा किंवा चिह्नसमूहाचा अर्थ, प्रत्यक्षात प्रत्येक दर्शकाच्या किंवा प्रेक्षकाच्या समजुतीप्रमाणे अगदी वेगळा असतो. दर्शकाला हे चिह्न सांगत असते, ‘बाबा रे, मला पाहून तुला समजलेला मतितार्थ अगदी बरोबर आहे. परंतु, नीट निरखून पाहिलेस, तर माझ्यामध्ये लपलेले आणखी वेगळे अर्थ तुला नक्की जाणवतील.’

 

दत्तात्रय केशव पाठक यांनी त्यांच्या ‘अमृतानुभव’ या पुस्तकात संत ज्ञानेश्वरांच्या समग्र साहित्यकृतींची समीक्षा करताना एका प्राचीन भारतीय भागवत धर्मातील समृद्ध ज्ञानपरंपरेचा विस्ताराने उल्लेख केला आहे. या पुस्तकातील विस्तारित विश्लेषणात, पाठक, ज्ञानेश्वर नेवाशाला परत आल्यानंतरच्या एका अनुभवाचे वर्णन करतात. पतीचा मृत्यू झाल्याने शोकमग्न असलेली एक महिला श्री ज्ञानदेवांना पाहून त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे आली. माऊलींनी ‘पुत्रवती भव।’ असा आशीर्वाद तिला दिला. गोंधळलेल्या महिलेने पती निधनाचे वृत्त सांगून त्याच्या प्रेताकडे बोट दाखवले. माऊली पुढे होऊन प्रेताजवळ गेले आणि प्रेताला त्याचे नाव विचारले. त्याक्षणी तो मृतदेह सजीव झाला. याचे वर्णन श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या निर्मितीच्या आधी असे केले आहे.

 

शवाचे नाव सच्चिदानंद ।

ऐकुनी झाले ज्ञानदेव सखेद ।

काय सत्-चित्-आनंद।

प्रेतरूप जाहला॥१॥

मग निकट जाऊनी ज्ञानदेव।

चाळवूनी पाहिले शव।

तव देह जाहला सजीव।

उठुनी उभा राहिला ॥२॥

ज्ञानेश्वरीचा लेखक ।

म्हणौनी ज्याचा उल्लेख॥

त्या ग्रंथांती केला सकौतुक। सच्चिदानंदबाबा तोच हा॥३॥

 

कालांतराने, ज्ञानेश्वरीच्या अखेरीस श्री ज्ञानदेवांनी एका ओवीत याचा उल्लेख असा केला आहे...

 

शके बाराशते बारोत्तरे ।

तैं टीका केली ज्ञानेश्वरे ।

सच्चिदानंदबाबा आदरे लेखकू जाहला ॥

 

आता नेवाशातला एका गृहस्थाच्या मृत्यूचा प्रसंग आणि ज्ञानेश्वरीत याचे आलेले उल्लेख यातला चिह्नसंकेत काय असेल, त्याचे तात्त्विक विश्लेषण आपल्याला करायचे आहे. याला अन्य संदर्भ असा आहे की, श्री ज्ञानेश्वरांच्या सदेह समाधीनंतर माऊलींचे समकालीन श्री नामदेवांनी एक कवन लिहिले आहे. त्यातील पहिली चार पद अशी आहेत...

 

गेले दिगंबर ईश्वरविभूति ।

राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥

वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानीं । आतां ऐसे कोणी होणें नाहीं ॥ २ ॥

सांगतील ज्ञान म्हणतील खूण ।

नयेची साधन निवृत्तीचें ॥ ३ ॥

परब्रह्म डोळां दाऊं ऐसे म्हणती ।

कोणा न ये युक्ति

ज्ञानोबाची ॥ ४ ॥

 

यातल्या तिसऱ्या पदातला उल्लेखसांगतील ज्ञान म्हणतील खूण’ असा आहे आणि त्यातील ‘खूण’ या शब्दाचा वापर स्पष्टपणे श्री ज्ञानदेवांच्या चिह्न आणि चिह्नसंकेतांच्या वापराकडे आपले लक्ष वेधून घेतो. श्री नामदेवांच्या नजरेतून श्री ज्ञानदेवांच्या या विलक्षण चिह्नसंकेतांचे झालेले दर्शनसुद्धा चेतनादायी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@