शहराच्या विकासात मंडयांचे स्थानही तितकेच महत्त्वाचे असते. तेव्हा, आजच्या भागात मुंबईतील विविध मंडयांचा थोडक्यात परिचय करुन मुंबई महानगरपालिकेचे या मंडयांसंदर्भातील नेमके पुनर्विकास धोरण काय, ते समजून घेऊया.
मुंबईमध्ये अजून ‘फेरीवाला धोरण’ नक्की होऊन ते अंमलात आलेले नाही तरी, मुंबईकर अनेक वर्षांपासून चालू असलेल्या लोकप्रिय मंडयांचा वापर करत आहेत. त्यातील काही खासगी व काही महापालिकेच्या आहेत. अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे घाऊक वा किरकोळ खरेदीला येत असतात. तेव्हाच, अशाच काही मंडयांची आज ओळख करुन घेऊया.
कुलाबा कॉजवे मंडई
ही मंडई अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत रोज उघडी असते. अनेक प्रकारचे तयार कपडे वा अनेक हातकाम केलेल्या वस्तू, पुस्तके, कृत्रिम दागिने, खडे, धातूच्या वस्तू इत्यादी घेण्यासाठी येथे ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. याच बाजारात प्रसिद्ध लिओपोल्ड कॅफे व मोन्देगर हॉटेलं पण आहेत. हा बाजार शहीद भगत सिंग रस्त्यावर आहे.
‘चोर बाजार’
एखादी वस्तू ड्युप्लीकेट किंवा अन्यत्र कुठे सहजासहजी मिळणारी नसेल तर ती चोर बाजारातून आणली का, अशीच विचारणा केली जाते. मंडईचे खरे नाव ‘शोर (म्हणजे गडबडीचा) बझार.’ पुढे त्याचेच रूपांतर ‘चोर बझार’मध्ये झाले. हा बाजार सकाळी ११ ते संध्याकाळी ७.३० पर्यंत खुला असतो, फक्त शुक्रवार सोडून. ही दीडशे वर्षांची मंडई मटण स्ट्रीट व मोहम्मद अली रोड जवळ, मध्यवर्ती ठिकाणी मुस्लीम वस्तीमध्ये स्थित आहे. पुरातन वस्तू, जवाहिर इत्यादी वस्तू येथे मिळतात.
महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट)
रविवार सोडल्यास ही मंडई सकाळपासून रात्रीपर्यंत सुरु असते. ही मंडई जुन्या पद्धतीची व ब्रिटिशकालीन इमारतीची आहे. घाऊक फळफळावळ, विविध भाजीपाला, फुले, मसाल्याचे पदार्थ, मासे व पाळीव प्राणी विक्रीकरिता ही लोकप्रिय झाली आहे. परदेशी खाद्यप्रकार व खेळणीही येथे मिळतात. ही मंडई बोरिबंदर जवळ वसली आहे. मंडईचे आता पुष्कळ विलंबाने दुसर्या टप्प्याचे नूतनीकरण होणार आहे. ते असे - ही मंडई १८६८ मध्ये बांधण्यात आली व ती मोठ्या जागेवर व्यापली आहे. ती वारसावास्तू दर्जा-१ म्हणून जाहीर झाली आहे. अनेक वर्षांच्या काळानंतर इमारत मोडकळीस आली होती व दहा वर्षांपासून तिचे नूतनीकरण लांबणीवर पडले होते. अलीकडे तिचे घड्याळाच्या मनोर्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले व दुसर्या टप्प्याचे काम वास्तुविशारद लं.भा.नारायण यांच्याकडे द्यायचे ठरले आहे. त्यात जुन्या इमारती पाडून अनेक माळ्यांची नवीन इमारत होणार. वारसा किताब मिळालेली दोन कारंजी व प्याऊ पुन्हा उभारणार आहेत. एक एकर जागेवर शोभेची हिरवळ स्थापणार व ते दृश्य जेजेच्या उड्डाणपुलावरून दिसेल. मंडईतील प्रत्येक विक्रेत्याला नवीन जागेत सामावले जाईल. या टप्प्याच्या कामाचे स्थूल प्रकारे मूल्य ३०० कोटी रुपये होईल.
झवेरी बझार
ही मंडईदेखील सकाळपासून रात्रीपर्यंत रविवार सोडून रोज सुरु असते. ही फार जुनी व मोठी अशी देशातील अर्ध्याहून जास्ती व्याप्तीच्या सोन्याचा व्यवहार करणारी मंडई आहे व येथे हजारो विक्रेते आहेत. अनेक दुकाने शतकांहून जुनी आहेत. अनेक इमारती मोडकळीस आल्या असल्या तरी ती दुकाने फार किंमतीचा व्यवहार करणारी सोने, प्लॅटिनम, चांदी, हिर्याच्या वस्तू व कृत्रिम दागिने विकणारी आहेत. काही दुकाने फसव्या व्यवहाराची पण आहेत. तिथून खरेदी करणार्यांनी सांभाळून राहावे. ही मंडई मुंबादेवी मंदिराजवळच आहे.
मंगलदास मंडई व मुळजी जेठा बाजार (MJ Market)
ही मंडई सकाळपासून रात्रीपर्यंत रविवार सोडून रोज उघडी असते. दोन्ही मंडया जवळच आहेत. आशिया खंडातील कापडाचा व शालीचा मोठा व्यवहार या मंडईत चालतो. या मंडयासुद्धा मुंबादेवी मंदिराजवळच वसल्या आहेत.
दादर फुलबाजार
सदैव गजबजलेला दादरचा फुलबाजार. परंतु, ताज्या फुलांची जास्तीत जास्त विक्री दसर्यासारख्या सणांच्या वेळी पहाटे ४ वाजल्यापासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत जास्त होते. येथे फुलांचा घाऊक व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतो. लोक हारांकरिता फुलांचे गुच्छही मोट्या प्रमाणात खरेदी करतात. ही मंडई तुळशी पाईप रोडवर दादर रेल्वे पश्चिम स्थानकाजवळ वसली आहे.
धारावी चामडे बाजार
ही मंडई सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत रोज उघडी असते. या धारावी वस्तीत विविध छोटे-लघु उद्योग व त्यांनी तयार केलेला माल विक्रीला असतो. परंतु, येथील चामड्याच्या विविध वस्तूंचा उद्योग देशातील दुसर्या क्रमांकाचा व जास्त फोफावला आहे. येथील माल परदेशात निर्यात केला जातो. उत्तम दर्जाच्या चामड्याच्या बॅगा, ट्रंका, पैशाची पाकिटे, पट्टे, बूट इत्यादी वस्तूंची अनेक दुकाने आहेत, जिथे परवडणार्या किंमतीत व्यवहार केला जातो. ही मंडई शीव-वांद्रे जोड रस्त्यावर आहे. अशाच तर्हेने शहरातील इतर बाजार म्हणजे भूलेश्वर सीपीटँकचा बांगड्या विक्री बाजार व लग्नाकरिता पोषाख बाजार, फोर्टचा काळा घोडा आर्ट प्लाझा बाजार, फ्लोरा फाऊंटनचा पुस्तक बाजार, लालबागचा मिरची बाजार, बोरिबंदरजवळील बूट, देशी-विदेशी तयार कपडे फॅशन बाजार, ताडदेवचे इलेक्ट्रॉनिक व तयार कपड्यांकरिता हिरा पन्ना शॉपिंग सेंटर बाजार, तयार कपडे (शेरवानी, लेहेंगे इत्यादीकरिता) दादरचे हिंदमाता बाजार अशी लोकप्रिय घाऊक बाजार आहेत. क्रॉफर्ड मार्केटच्या जवळील दुसरे मार्केट भेंडी बाजार. हे नाव ‘बीहाईंड बाजार’वरून आले असावे, असा काहीजणांचा तर्क आहे. हा बाजारही गेले १५० ते २०० वर्षांपासून आहे. या भागात पुनर्विकासाचे काम सुरू आहे.
मुंबई उपनगरांतील बाजार
लिंकिंग रोड बाजार
हा मोठा शॉपिंगचा बाजार सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत उघडा असतो. देशी-विदेशी फॅशनचे तयार कपडे जिन्स, कुर्ते व लहान मुलांचे कपडे मिळतात. हा बाजार वांद्—याच्या लिंकिंग रोडला आहे.
लोखंडवाला मार्केट
हा बाजार दुपारी १२ ते रात्री १०.३०पर्यंत उघडा असतो. अगदी आजघडीचे सुंदर देशी-विदेशी स्टायलिश तयार कपडे विशेषत: पुरुषांचे व लहानग्यांचे तयार कपडे, कॅनवासचे बूट वाजवी भावात येथे मिळतात. हा बाजार अंधेरी पश्चिमेला आहे.
इर्ला मार्केट
सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हे माक्रेट उघडे असते. येथे स्त्री-पुरुषांचे व लहान मुलांचे विविध तर्हेचे तयार कपडे व त्यासारख्या अनेक कॅज्युअल वापराच्या वस्तू वाजवी भावाने मिळतात. हा बाजार विलेपार्ले पश्चिमेला आहे.
नटराज मार्केट
तयार कपड्यांचा घाऊक बाजार, अनेक तर्हेचे पोषाख, बूट, बॅगा वाजवी भावात मिळतात. हा बाजार मालाड पश्चिमेला वसला आहे.
ठक्कर बाप्पा मार्केट, चेंबूर
आशियातील सर्वात मोठे बुटांचे मार्केट हे सध्या फार अस्वच्छ वातावरण व वायुप्रदूषणाने ग्रासले आहे. काही कारागिरांना टीबी रोगाने पछाडले आहे. पालिका याकडे कनाडोळा करते. वाहनेही येथे अनधिकृतपणे उभी करून ठेवलेली असतात.
बाजारांच्या पुनर्विकासाचे धोरण
कांदिवली, वांद्रे पश्चिम, सांताक्रुझ, चेंबूर, घाटकोपर पश्चिम आणि विक्रोळी पश्चिम येथील मार्केटचा पालिका डिसेंबरपासून पुनर्विकास करणार आहे. त्याचप्रमाणे जोगेश्वरी पूर्वेचे नवलकर मार्केट, पाली मार्केट, गोरेगावचे टोपीवाला मार्केट यांचा पुनर्विकास होणार आहे. त्यात अनेक माळ्यांचे मनोरे बनणार आहेत. तसेच दादर, माहीम व धारावीला नवीन मार्केट होणार आहेत.
आठवडी बाजार
राज्य सरकारकडून दोन हजारांहून अधिक ठिकाणी आठवडी बाजाराच्या सक्षमीकरणाची योजना वीज-पाण्यासह सर्व सुविधा होणार आहेत. शेतकर्यांच्या फायद्याकरिता या योजना असतील, मुंबईत २४ ठिकाणी अशा सुविधा असतील व अनेक वस्तू विक्रीला ठेवण्यात येणार आहेत.
पालिकेचा अनागोंदी कारभार
नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचे काम गेली नऊ वर्षे रखडले. कुर्ला पूर्व येथील ‘झोपू’ इमारतीतील पालिका मंडई गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. पाली मार्केटचे काम कंत्राटदाराकडून रखडले आहे. परवानाधारक मासळी विक्रेत्यांकडून संमतीपत्र सादर करण्यात अपयश आल्यामुळे मुंबईतील पाच मंडयांचे पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत. मुंबईतील १०७ मार्केट्सपैकी ९२ मार्केट मोडकळीस आलेली आहेत व त्यांचा पुनर्विकास करावयाचा आहे. काहींना जुना तर काहींना नवीन नियम लावून विकासक फायदा बघत आहेत व पालिकेला त्यांच्याकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. मार्केट इमारतींपैकी काही इमारती प्रकल्पबाधित लोकांना, काही भाडेतत्त्वावर दिल्या गेल्या आहेत, तर काही पालिकेच्या व एमएमआरडीएच्या प्रशासनाला वापरायला दिल्या आहेत. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत कचर्यापासून खतनिर्मिती करण्याच्या कामाकरिता पालिकेला कंत्राटदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने ६७ मंडयांमध्ये कचर्यापासून खतनिर्मिती करणे पालिकेला आजतागायत जमलेले नाही. मुंबई पालिकेचे व्यवस्थित मार्केट धोरण असायला हवे म्हणजे गाळेधारक, विकासक, गिर्हाईक सर्वजण समाधानी होतील. फेरीवाला धोरण अजून मुंबईत राबविले गेले नाही. त्यामुळे ना फेरीवाल्यांना समाधान मिळाले, ना वाहतुकीचा अडथळा दूर झाला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/