उत्तर प्रदेश : हरदोई येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानुसार हा शिक्षक विद्यार्थांना ‘सलाम वालेकूम’ असे म्हणावयास भाग पाडायचा. शिक्षकाचे नाव इश्तियाक खान असून या शिक्षकाला प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, इश्तियाक खान हा या शाळेत उर्दू विषय शिकवत असून विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंगऐवजी ‘सलाम वालेकूम’ म्हणावयास भाग पाडायचा. काही विद्यार्थ्यांनी या शिक्षकाची तक्रार आपल्या पालकांकडे केल्यानंतर पालकांनी शाळेत धाव घेऊन या प्रकरणाचा जाब विचारला. हा प्रकार समोर आल्यानंतर संदिला शहरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारी नंतर स्थानिक प्राथमिक शिक्षण अधिकारी हेमंत राव यांनी या शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस पाठवली. यावेळी राव यांनी सांगितले की, "खान या शिक्षकाने विद्यार्थ्यांना ‘सलाम वालेकूम’ म्हणण्यास सांगितल्याची तक्रार पालकांनी केल्यानंतर कारणे दाखवा नोटीस पाठवली गेली. या नोटिसीला शिक्षकाने योग्य उत्तर न दिल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल."
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/