मुंबई : महानगर टेलिफोन निगमच्या मुंबई आणि दिल्ली येथील ३३ हजार कर्मचाऱ्यांना ५ डिसेंबरला वेतन दिले जाणार आहे, अशी माहिती महानगर टेलिफोन निगमने एका पत्रकाद्वारे दिली. कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळालेला नाही. हा पगार महिन्याच्या शेवटी २८ किंवा २९ तारखेला होत असतो पण, तो झाला नसल्याने सगळेच कर्मचारी चिंतेत होते. मात्र, आता त्यांचा हा पगार ५ डिसेंबरला दिला जाईल, असे महानगर टेलिफोन निगमतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
निधीच्या कमतरतेमुळे एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार दिला जाणार नाही, अशी माहिती मुंबई आणि दिल्लीच्या कार्यकारी संचालकांनी पत्रकाद्वारे दिली होती. आता मात्र हा पगार ५ डिसेंबरला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. एमटीएनएलच्या लँडलाईनपेक्षा मोबाईल स्वस्त असल्यामुळे एमटीएनएलची ग्राहकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/