वडोदऱ्याचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलोत यांनी ३१ डिसेंबरसाठी एक विशेष परिपत्रक जारी केले आहे. ’३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी समाजकंटक पार्टीचे आयोजन करतात, किंवा काही ठरवलेल्या लोकांच्या माध्यमातून ते पार्टी आयोजित करतात. या पार्टीदरम्यान मद्यपान केले जाते. त्यामुळे असभ्य वर्तन केल्याच्या अनेक घटना घडतात. अशाप्रकारचे सेलिब्रेशन हे लहान मुलांसाठी तसेच आपल्या सुसंस्कृत समाजासाठी हानिकारक ठरेल.’ असे या परिपत्रकात पोलीसांनी म्हटले आहे.
‘सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून असभ्य वर्तन करणे, वेगाने वाहन चालवणे, स्टंटबाजी करणे यावर निर्बंध घालण्यात आले’ असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच ‘३१ डिसेंबर रोजी रात्री १० नंतर फटाके फोडल्यास किंवा लाऊडस्पीकरचा आवाज केल्यास त्रास झाल्यामुळे कोणी तक्रार दाखल केली, तर संबंधित व्यक्तींवर कडक कारावाई करण्यात येईल.’ असा इशारा वडोदरा पोलीसांनी दिला आहे. तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन करण्यासाठी पोलीसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. असेदेखील या परिपत्रकात म्हटले आहे. वडोदरा पोलीसांनी नागरिकांसाठी ३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचे परिपत्रक काढून नागरिकांना कायद्याची आठवण करून दिली म्हणून वडोदरा पोलीसांचे कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे पोलीसांनी परिपत्रकात सुसंस्कृत समाज असा शब्दप्रयोग करणे हे कितपत योग्य आहे. यावरून टीका केली जात आहे.