सुप्रजा - भाग २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
 
झोप लागली नाही, तुटक लागली, स्वप्न पडली इ. जर घडत असेल, तर ही विश्रांती न मिळाल्याने शरीरातच या मृतपेशी राहतात आणि सकाळी ताजेतवाने वाटत नाही, मलूल वाटते. त्यामुळे उत्साही मनासाठी व शरीरासाठी आरामदायी झोप खूप गरजेची आहे.
 

सुप्रजा-प्रजा. अपत्य ‘सु’ चांगले व्हावे ही अपेक्षा प्रत्येक दाम्पत्याची असते. अपत्य हुशार हवे, दिसायला गोंडस, देखणे असावे, कर्तृत्ववान असावे, त्यात कला असावी. म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक अशा सर्व पातळींचा विचार केला जातो. पण जे आडात नाही ते पोहऱ्यात कसे येणार? जर घरी दाम्पत्याच्या अंगी हे गुण नसतील, तर त्यांच्या अपत्यात ते गुण कसे आणता येतील? इथे संस्कारांची गरज असते. संस्कार म्हणजे चांगले बदल. उदा- जर भाजीला चांगली चव आणि रूप हवे असेल, तर भाजी आधी निवडून, धुवून, चिरून, फोडणीला घालून असे उत्तम ‘संस्कार’ करून मस्त भाजी तयार होते. अशाच पद्धतीने होणाऱ्या आई व बाबांवर काही संस्कार, बदल केल्यास ते होणाऱ्या बालकांत उत्पन्न होतीलअसे बऱ्याच वेळा बघण्यात येते की, मुलगी वडिलांसारखी दिसते आणि मुलगा आईसारखा. हे बीजातून आलेले साधर्म्य. असेच चांगले व वाईट गुणही (आजार) पुढे संक्रमित केले जातात. जसे- मधुमेह, दमा, स्थौल्य, थायरॉईडचा त्रास आणि काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग इ. सर्व आजार आई-बाबांकडून मुलांमध्ये येतात. असे होऊ नये म्हणून Preconception Cleansing (गर्भधारणेपूर्वीचे शोधन) अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये मुख्यत: शारीरिक शोधन केले जाते. वमन-विरेचन आणि बस्ती यांच्याद्वारे अनुक्रमे कफाच्या व्याधींवर, पित्तामुळे होणाऱ्या रोगांवर आणि वाताने उद्भवणाऱ्या त्रासांवर नियंत्रण मिळविले जाते. मातेचे शरीर हे अर्भकावर संस्कार करण्यासाठीचे माध्यम आहे. त्यामुळे चांगल्या सवयी, चांगला आहार, चांगला विहार आणि नित्यचर्या गरजेची आहे.

 

हे कसं करता येईल? याची काही उदाहरणे आहेत. घरात जर सकारात्मक वातावरण असेल, तर नवीन कल्पकता उत्तमरीत्या जागरूक होते. यासाठी मन प्रसन्न आणि शरीर निरोगी असावे. घरात कलह, तंटा नसावा. सायंकाळी देवासमोर दिवा लावून इष्ट देवतेचे स्मरण, नामजप केल्याने एक वेगळ्याच प्रकारची, मन:शांती लाभते. उद्विग्न मन असल्यास विशिष्ट रागाचे संगीत म्हणावे, वाजवावे, ऐकावे. यानेही मन शांत आणि चिंतामुक्त होण्यास खूप मदत होते. भारतीय शास्त्रीय संगीताचे हे वैशिष्ट्य आहे. विशिष्ट राग हा विशिष्ट काळात म्हणावा, ऐकावा, वाजवावा. उदा- भूप राग हा सकाळचा राग आहे. आनंद, उत्साह, नवचेतना देणारा राग आहे, तर भैरवी ही मैफल संपवण्यासाठी, शांत अंतर्मुख करणारा राग आहे. तसेच काही विशिष्ट स्तोत्रांमध्ये मनाची घालमेल कमी करण्याची, भीती घालवण्याची क्षमता आहे. उदा- मारुती स्तोत्र, रामरक्षा, अथर्वशीर्ष इ. मंत्रोच्चारानेही बुद्धिवर्धन व शौर्यात्मक बदल होण्यास मदत होते. अर्थात, यावर दाम्पत्याचा स्वत:चा विश्वास असणे गरजेचे आहे. यापेक्षा अन्य उपायही आहेत. उदा- चित्र रंगविणे. मनातील घालमेल, उद्विग्नता, नकारात्मक विचार असल्यास भडक रंगाने रंगवण्याची इच्छा होते आणि मन शांत झाल्यावर शीत रंग सुचतात. रंगोपचार, संगीतोपचार इ. सर्व उपचार प्रामुख्याने मनासाठी उपयोगी आहेत आणि आयुर्वेदाने हे ठासून सांगितले आहे की, शरीराचा आणि मनाचा खूप घनिष्ठ संबंध आहे. शरीराच्या यातना मनावर प्रतिबिंबीत होतात आणि मनातील नकारात्मकता शरीरव्याधी उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे समूळ उपचारासाठी त्या व्याधीचे मूळ कशात आहे, ते ठरवून त्यानुसार चिकित्सा अवलंबावी लागते.

 

झोपेवर आरोग्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. शांत झोप ही सर्वांना लागत नाही. लवकर झोप न लागणे, खूप विचार करत राहणे, चित्र-विचित्र स्वप्न पडणे, तुटक झोप लागणे इ.मुळे शरीर व मन क्लान्त राहते. विचलित राहते. झोपेच्या वेळेस शरीराचे नैसर्गिकरीत्या सर्व्हिसिंग सुरू असते. शरीरातील विविध पेशींमध्ये दिवसभराच्या कामामुळे झालेला बिघाड दुरुस्त केला जातो. शरीरातील प्रत्येक पेशीचे विविध आयुर्मान असते. प्रत्येक पेशी उत्पत्ती-स्थिती-लयातून जात असते. झीज झालेल्या पेशी मृत होऊन शरीराबाहेर काढल्या जातात आणि त्या ठिकाणी नवीन पेशी उत्पन्न होतात. हे चक्र व्यवहारात सुरू असते. झीज झालेल्या पेशींचा निचरा होत असतो. हे सगळं तेव्हा सुरळीत घडू शकतं, जेव्हा अन्य कार्य बंद असतात. म्हणून रात्री शरीरात सर्व्हिसिंग सुरू असते. पण झोप लागली नाही, तुटक लागली, स्वप्न पडली इ. जर घडत असेल, तर ही विश्रांती न मिळाल्याने शरीरातच या मृतपेशी राहतात आणि सकाळी ताजेतवाने वाटत नाही, मलूल वाटते. त्यामुळे उत्साही मनासाठी व शरीरासाठी आरामदायी झोप खूप गरजेची आहे.

 

ज्या दाम्पत्यांना सुप्रजेची आशा आहे, त्यांनी खालील नियम नक्की पाळावे.

जेवणामध्ये रात्रीच्या आणि झोपण्यामध्ये किमान दोन ते अडीच तासांचे अंतर असावे. जेवण झाल्यावर ते पोटात पोहोचून पचायला एवढा अवधी लागतो. पचन झाल्यावर झोपल्यावर सर्व्हिसिंग अबाधितपणे करता येते. ज्यांना झोप लवकर लागत नाही, त्यांनी १० नंतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स बंद ठेवावी. गाणी केवळ ऐकावीत, ती बघू नयेत. कारण, जेवढी गॅझेट्स (टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल) सुरू असतील तेवढ्या मेंदूतील पेशी कार्यरत राहतात. त्यामुळे झोप येत नाही. म्हणजे झोप लागण्यासाठी रात्री ही गॅझेट्स लावत असाल, तर त्याचा फायदा होणारच नाही. उलट अपायच होईल. शांत दिवे लावल्यासही झोपेला मदत होते. जेवढा भडक दिव्यांचा प्रकाश डोळ्यांवर पडेल तेवढी रात्री झोप उशिरा लागते. मनुष्याला पंचज्ञानेन्द्रियांनी जगाचे ज्ञान होते. पण त्यांना विश्रांती दिली की, झोप चांगली लागते. झोपेसाठी अजून एक उपाय म्हणजे संध्याकाळी अंगाला तेल लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी. या सगळ्या गोष्टींमुळे झोप शांत, गाढ लागते आणि सकाळी ताजेतवाने वाटते.

 

उत्तम आरोग्यासाठी उत्तम झोप (पण अतिझोप नाही) गरजेची आहे. उत्तम आरोग्य आणि उत्तम मन:स्वास्थ्य असल्यास उत्तम प्रजेचा विचार करावा. जसे पेराल तसे उगवेल. शेती करण्यापूर्वी ही शेतजमिनीची मशागत केली जाते. तृणे काढली जातात. त्यानंतर उत्तम बियाणे वापरले जाते, तेव्हा चांगले पीक मिळते. सुदृढ, सुसंस्कृत आणि सुंदर प्रजेसाठी एवढे तर प्रत्येक दाम्पत्याने करावेच आणि हे संस्कार घरा-घरांमधून झाल्यास संपूर्ण प्रजा उत्तम गुणांनी युक्त होईल आणि राष्ट्राची प्रगती करेल.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@