रामदास आठवलेंच्या राजकारणाचा उजवेपणा हा की, त्यांनी अशाप्रकारे एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध भडकविण्याचे काम कधीही केले नाही. जातीच्या नावाने कपाळी राख फासून आठवले वा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सौहार्द बिघडवल्याचेही आढळत नाही. मात्र, रामदास आठवलेंसारखी व्यक्ती सत्तेची वाटेकरी झाल्याने ते काही लोकांना चांगलेच जाचते आहे.
शनिवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे एका तरुणाने हल्ला केला. अंबरनाथ येथे एका कार्यक्रमासाठी आलेले असताना कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरून उतरताना प्रवीण गोसावी नावाच्या तरुणाने त्यांना धक्काबुक्की केल्याने चांगलीच खळबळ माजली. प्रवीण गोसावी हा भारिप बहुजन महासंघाचा कार्यकर्ता असल्याचेही नंतर समोर आले. खरे म्हणजे रामदास आठवलेंवरील हल्ल्याची घटना नुसतीच क्लेशकारक नसून चिंताजनकदेखील आहे. महाराष्ट्राच्या बिघडत्या सामाजिक सौहार्दाचे लक्षण असल्याची स्थिती आहे. रामदास आठवलेंच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा, राजकारणाचा विचार केला तर सत्तेसाठी साथीदार बदलणे हाच आरोप त्यांच्यावर केला जाऊ शकतो. अन्य पंथ व जाती गट यांच्याविरोधात विद्वेष निर्माण करून, विखार पसरवून रामदास आठवलेंनी स्वतःच्या खुर्चीचे पाय मजबूत केलेले नाहीत, हेही एक वास्तवच! रामदास आठवलेंच्या राजकारणाची सुरुवात दलित पँथरसारख्या आक्रमक संघटनेतून झाली. एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या रामदास आठवले नावाच्या वादळाने कधीकाळी राज्यभरातल्या वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या.
स्वतःच्या समाजाच्या भल्यासाठी दारोदार, गावोगाव फिरून एक एक माणूस जोडण्याचे, समाजबांधवांच्या मनात स्वाभिमानाची मशाल पेटविण्याचे काम केले. परिणामी राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या आंबेडकरी अनुयायांच्या गल्ल्या-मोहल्ल्यांत ‘आठवले साहेब अंगार है’ सारख्या घोषणादेखील घुमल्या. सध्याच्या प्रसारमाध्यमांच्या जमान्यात कोणीही एखाद्या वादग्रस्त विधानाच्या बळावर स्वतःची प्रसिद्धी करून घेतो व नंतर त्यालाच हितसंबंधी मंडळींकडून नेता म्हणून सादर केले जाते. तसे रामदास आठवलेंबाबत कधीही झाले नाही. त्यांचे नेतृत्व परपोषित नव्हे तर स्वतःच्या हिमतीच्या आणि कष्टाच्या जोरावरच आकाराला आले. सोबतच रामदास आठवलेंनी आपल्या कामातून स्वतःची एक वेगळी ओळखही निर्माण केली. आपल्या समाजाच्या मागण्या आणि उन्नतीसाठी केवळ सत्ताधार्यांवर तोंडसुख घेण्यापेक्षा समाजाला न्याय देण्याचाच हेतू ठेवून त्यांनी पावले उचलली. योग्यायोग्यतेचा अचूक निर्णय घेत देशहिताचाच विचार केला. आठवलेंनी आताची केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मारलेली मजल याच संघर्ष आणि कामाचे मोल आहे.
दुसरीकडे नव्वदच्या दशकात आंबेडकरी विचारांचा अनुनय करणाऱ्या मंडळींनी स्वतःची राजकीय अभिव्यक्ती सिद्ध केली. या अभिव्यक्तीचे शिलेदार होते, कांशीराम व मायावती. यामागची पार्श्वभूमीही माहिती करून घेणे महत्त्वाचे ठरेल. एकाच घराण्याचे नेतृत्व स्वीकारलेल्या काँग्रेसमध्ये नेतृत्व निर्मितीच्या प्रक्रियेचे सपाटीकरण झाले होते. तिथे गांधी-नेहरू घराणे वगळता इतरांना कसलेही महत्त्व मिळूच शकत नव्हते. परिणामी अस्मितेच्या नि अस्तित्वाच्या ज्या राजकारणासाठी बाबासाहेब तहहयात लढले, ती अस्मितेची भूक इथे भागेनाशी झाली होती. कांशीराम व मायावती यांनी हीच कोंडी फोडली. आपल्या समाजाला देशाच्या राजकारणात प्रतिनिधीत्व मिळावे, ओळख निर्माण व्हावी म्हणून दोन्ही नेत्यांनी प्रयत्न केले व त्यातूनच पुढे मायावती उत्तर प्रदेशसारख्या महाकाय राज्याच्या मुख्यमंत्रीपदीही विराजमान झाल्या. मायावतींनी बांधलेली सर्व जाती-पंथांची मोट सोशल इंजिनिअरिंगचे एक उदाहरण म्हणूनही समोर आले. उत्तर प्रदेशव्यतिरिक्त आंबेडकरी विचारांच्या अनुयायांना आपणसुद्धा सत्ताधारी जमात होऊ शकतो, हे भान प्राप्त झाले. पण जातीच्या राजकारणाचा एक पेच असतो. एखाद्या सामाजिक प्रश्नाचे उत्तर जातीच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला की, नंतर समोरुन उपस्थित होणारे मुद्दे पलीकडच्या जातीतूनच येतात. रामदास आठवलेंच्या राजकारणाचा उजवेपणा हा की, त्यांनी अशाप्रकारे एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध भडकविण्याचे, चिथावण्याचे काम कधीही केले नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/