आपल्या देशाच्या राजकारणात जसे प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहे तसेच घराणेशाहीचेसुद्धा आहे. जवळपास प्रत्येक प्रादेशिक पक्ष म्हणजे घराणेशाहीचा आविष्कारच. याच घराणेशाहीमुळे आणि नंतरच्या पिढीच्या राजकीय महत्त्वाकांक्षांनी २००६ साली शिवसेनेतून बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे बाहेर पडले होते व त्यांनी स्वत:चा वेगळा पक्ष ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ स्थापन केला होता. आज अशीच परिस्थिती हरियाणातील ‘इंडियन नॅशनल लोक दल’ या पक्षासमोर उभी आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा म्हणजे ओमप्रकाश चौटाला. त्यांच्या दोन पुत्रांमध्ये, अजय व अभय यांच्यात पक्षावर कोणाची पकड असावी यावरून गेले अनेक महिने भीषण वाद सुरू आहे. सरतेशेवटी ओमप्रकाश चौटाला यांनी अजयची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. अर्थात, यामुळे पक्षासमोरचा प्रश्न सुटेल असे नाही. ओमप्रकाश चौटाला यांनी पुत्र अजयला पक्षातून निलंबित केले आहेच, त्याच्याबरोबर त्याचे दोन पुत्र दुष्यंत आणि दिग्विजय यांनासुद्धा बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हा निर्णय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतला आहे. अपेक्षेप्रमाणे अजयने स्वत:चा पक्ष काढत असल्याची घोषणा केली व अलीकडेच पक्षाचे नावसुद्धा जाहीर केले आहे. त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे ‘जननायक जनता पार्टी.’ या नव्या पक्षाची घोषणा त्यांनी रविवार, दि. ९ डिसेंबर रोजी केली. हा नवा पक्ष राज्यातील सर्व म्हणजे दहा लोकसभेच्या जागा लढवणार आहे व पुढच्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकासुद्धा. आता कुठे हरियाणात महाभारत सुरू झाले आहे.
असा प्रकार फक्त हरियाणात होत आहे, असे समजण्याचे कारण नाही. तामिळनाडूत करूणानिधी यांच्या मृत्यूनंतर करूणानिधींनी जाहीर केलेला उत्तराधिकारी स्टालिन आणि त्याचा मोठा भाऊ अळीगिरी यांच्यात वादावादी सुरू आहे. अशा वादावादी अटळ आहेत व काही प्रमाणात अपरिहार्यसुद्धा आहेत. अजय चौटाला यांनी ही घोषणा आताच करण्यामागे एक प्रकारची रणनीती आहे. ओमप्रकाश चौटाला यांना पक्षाची धुरा अभय चौटाला यांच्याकडे असावी असे वाटत आहे. पण अजय चौटाला पुरेसे महत्त्वाकांक्षी असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी अलीकडेच गोहाना येथे ७ ऑक्टोबर, २०१८ रोजी झालेल्या पक्षाच्या एका मेळाव्यात अभय चौटाला यांना धक्काबुकी केली. हा प्रकार म्हणजे एका प्रकारे आपल्या नेतृत्वाला दिलेले आव्हानच आहे, असे वाटून पक्षाध्यक्ष ओमप्रकाश चौटाला यांनी अजय व नातवांना पक्षाच्या बाहेर काढले आहे. या प्रकारे पक्ष फुटू नये, म्हणून अनेक ज्येष्ठांनी प्रयत्न केले होते. यात प्रामुख्याने नाव घ्यायचे म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल. बादल व ओमप्रकाश चौटालांचे वडील व अजय/अभय यांचे आजोबा देवीलाल चौटाला यांच्याशी खास मैत्री होती. आपल्या मित्राच्या पक्षात दुफळी माजू नये, म्हणून बादल यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण व्यर्थ! ‘इंडियन नॅशनल लोक पार्टी’ हा पक्ष देवीलाल यांनी ऑक्टोबर १९९६ मध्ये स्थापन केला. भारतातील अनेक प्रादेशिक पक्षांप्रमाणे हा पक्ष फक्त हरियाणा राज्यापुरताच सीमित आहे. हा पक्ष मूलत: जाट समाजाचा पक्ष असून थोडासा राजस्थानात प्रभाव राखून आहे. भारतीय राजकारणात १९९० च्या दशकात अशी काही परिस्थिती निर्माण झाली होती की, जेव्हा देवीलाल यांच्यासारखा हरियाणासारख्या छोट्या राज्याचा नेतासुद्धा भारतासारख्या खंडप्राय देशाच्या उपपंतप्रधानपदी विराजमान होऊ शकला. तेव्हा देशाचे पंतप्रधान होते व्ही.पी. सिंग.
हा पक्ष जरी एकाच राज्यात प्रभाव असलेला असला तरी, हरियाणात या पक्षाचा जबरदस्त प्रभाव आहे यात वाद नाही. देवीलाल यांनी १९७४ साली ‘भारतीय लोक दल’ हा पक्ष स्थापन केला होता. १९९८ साली या पक्षाचे नाव बदलून ‘इंडियन नॅशनल लोक दल’ करण्यात आले. हा पक्ष १९९८ ते २००४ दरम्यान भाजपप्रणित ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त घटक पक्ष होता. आज ज्याप्रमाणे अजय व अभय यांच्यात पक्षवर्चस्वासाठी भांडणं सुरू आहेत, तशीच भांडणं एकेकाळी ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचे बंधू रणजीतसिंग यांच्यातसुद्धा झाली होती. १९८९ साली देवीलाल हरियाणाचे मुख्यमंत्री होते व त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे सुपुत्र रणजीत चौटाला शेती खात्याचे मंत्री होते. तेव्हा पक्षाच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश चौटाला होते. तेव्हा पक्षात असे वातावरण होते की, देवीलाल यांनी रणजीतला त्यांचा वारस म्हणून पक्के केले आहे. पण देवीलाल यांनी अचानक ओमप्रकाश चौटाला यांना मुख्यमंत्रिपदी बसवले. तेव्हा देवीलाल यांनी ओमप्रकाश चौटाला यांची बाजू घेतली व त्यांची सरशी झाली होती. नाराज झालेल्या रणजीतला नंतर राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. पण ते तेथे प्रभाव पाडू शकले नाहीत. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण, तेथेसुद्धा ते चमकू शकले नाही. आता तेच ओमप्रकाश चौटाला हे अभय चौटालाची बाजू घेत आहेत. पक्षाच्या दुर्दैवाने ओमप्रकाश चौटाला व अजय चौटाला यांना शिक्षक भरती प्रकरणात केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल २०१३ साली दहा वर्षे तुरुंगात जावे लागले आहे. या शिक्षेचाच एक भाग म्हणून दोघांना इ.स. २०१९ च्या निवडणुका लढवता येणार नाहीत. तेव्हापासून पक्षाची धुरा अभय चौटाला व त्यांचा पुतण्या दुष्यंत वाहत आहे. अशा स्थितीत अजय चौटालाने त्याचा मुलगा दुष्यंतला समोर आणायला सुरुवात केली. हे महाशय हिस्सार मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. आज हरियाणा विधानसभेतील एकूण ९० जागांपैकी या पक्षाचे १८ आमदार आहेत. अभय चौटाला यांनी केलेल्या दाव्यानुसार यातील किमान १५ आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. अभय चौटाला हरियाणा विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. अभय चौटाला यांचे दोन सुपुत्र करण आणि अर्जुन अद्याप राजकारणात यायचे आहेत.
पुढच्या वर्षी हरियाणा विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. अशा स्थितीत तेथील प्रमुख विरोधी पक्षात सुंदोपसुंदी असणे हे चांगले लक्षण नाही. हरियाणातील एकूण दीड कोटी मतदारांत जाट समाजाचे १/३ मतदार आहेत. आज तेथे भाजपचे सरकार आहे. ओमप्रकाश चौटाला यांचा पक्षातील फुटीचा फायदा भाजपला होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाचे हरियाणातील प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांनी दुष्यंत चौटालांचे आमच्या पक्षात स्वागत आहे, असे जाहीर केलेले आहे. दुष्यंत चौटाला यांचे चारित्र्य स्वच्छ आहे व अशा लोकांचे ‘आप’मध्ये स्वागत केले जाते असेही ते म्हणाले. आप आणि या पक्षात फारसे सख्य नाही. इंडियन नॅशनल लोक दलाचे नेते रामपाल माजरा यांनी तर असा आरोप केला आहे की, ओमप्रकाश चौटाला दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. त्यांना तेथे ठेवण्याऐवजी पंजाबातील एखाद्या तुरुंगात ठेवावे ही विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फेटाळून लावली होती. आता आपचे नेते बंडखोरांचे नेते दुष्यंत यांना ‘आमच्या पक्षात या’ असं आमंत्रणं देत होते. यातून नेमकं काय होईल, हे येत्या चार-सहा महिन्यांत कळेलच. मात्र, या प्रकारे जेव्हा एखादा प्रादेशिक पक्ष फुटतो तेव्हा इतर राजकीय शक्तींचा फायदा होतो. मात्र, होतोच असे नाही. वर शिवसेनेचे उदाहरण दिले आहे. राज ठाकरे यांनी २००६ साली शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केले व स्वत:चा पक्ष स्थापन केला. याचा अर्थ त्यानंतर म्हणजे २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांत इतर पक्षांना फायदा झाला का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. याचा एकच परिणाम झाला व तो म्हणजे शिवसेनेची मतं दोन पक्षांत वाटली गेली. ती मतं तिसर्या पक्षाकडे गेली नाहीत. सेनेतील फुटीचा फायदा ना भाजपला झाला, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादी काँग्रेसला. असे काहीसे हरियाणातही होण्याची शक्यता आहे. घोडेमैदान जवळ आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/