नाणं खणखणीत वाजतयं

    08-Nov-2018
Total Views | 33


 

 

सिनेमा हे आधुनिक समाजव्यवस्थेतले सगळ्यात अपरिहार्य माध्यम. सिनेमा आला की सिनेस्टार आलेच आणि सिनेस्टार आले की त्यातून सुपरस्टार जन्माला येतातच. मराठी रंगभूमीलाही असाच एक सूपरस्टार सत्तरीच्या दशकात गवसला होता. डॉ. काशिनाथ घाणेकर; गेल्या दोन महीन्यात या नावाबद्दल खुप बोलले आणि लिहले जाते आहे. गतस्मृतींना उजाळा मिळण्याचे एकमेव कारण म्हणेज सुबोध भावे साकारत असलेली डॉक्टर काशिनाथ घाणेकरांची भूमिका. ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीला गेले दोन महीने वेड लावले होते. सिनेमाच्या प्रमोशनवरून हा सिनेमा सबकुछ सुबोध भावे असणार याची पुरेपुर कल्पना येत होतीच आणि तो तसाच झाला आहे. मराठीतले तेव्हाचे ताकदीचे कलांवत साकारणे हे तसे सोपे काम नाही. आजच्या संचासह ते साकारण्याचे काम व्हायाकॉमने बर्‍यापैकी पेलले आहे.

 

प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, आनंद इंगळे, वैदेही परशुरामी, नंदिता धुरी, अमृता खानविलकर या कलाकरांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. काही व्यक्तिरेखा वगळल्या तर जवळजवळ सगळ्यांनीच आपापल्या भूमिकांना उत्तम न्याय दिला आहे. मनाने अत्यंत दिलदार, झोकून देऊन काम करण्यासाठी डॉक्टर काशिनाथ घाणेकर प्रसिध्द होते. मराठी रंगभूमी आणि सिनेमाला त्यांनी त्यावेळी त्यांच्या बेदरकार स्वभावामुळे अक्षरश: नादाला लावले होते. सुपरस्टार आवडतो सगळ्यांनाच पण तो साकारताना त्याच्या आयुष्यातली वादळे आणि हळवे क्षण साकारणे किंवा समजून घेणे इतके सोपे नसते. समाजाची दांभिक वृत्ती अशा नटांवर नेहमीच त्यांच्या उतरत्या काळात निरनिराळे शिक्के मारते. याला काही प्रमाणात कलावंतही जबाबदार असतातच. पण चूक की बरोबर याच्या पलीकडे जाऊन आताच्या काळात अशा विषयावर सिनेमा साकारणे आणि अशा भूमिकेला न्याय देण्याचे शिवधनुष्य सुबोध भावेने उत्तम पेलले आहे.

 

प्रत्येक क्षणाला आतून अस्वस्थ असणारा नट हाच या सिनेमातला मुख्य धागा या अस्वस्थतेतूनच कधी रंजक तर कधी चिंतेचे प्रसंग सिनेमात येत जातात. श्रीराम लागू आणि डॉ. घाणेकर आणि यांच्यांतला समकालिन असल्याने निर्माण झालेला संघर्ष यात येत असला तरी खरा संघर्ष डॉ. घाणेकर आणि सुबोध भावे असाच आहे. डॉ. घाणेकरांनी अत्यंत वैविध्यपूर्ण अशा भूमिका साकारल्या. यात संभाजी सारखे एतिहासिक पात्र तर आहेतच पण गांरभीचा बापूही आहे. या सगळ्या भूमिका सुबोध भावेने उत्तम साकारल्या आहेत. साठ सत्तरच्या दशकातला सगळाच काळ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या चढत्या कमानीचा काळ होता. भालजी पेंढारकर, सुलोचना अशी मंडळी आपल्या योगदानाने यात भर घालण्याचे काम करीत होती. या सगळ्याला सिनेमात अधिक न्याय देता आला असता. 'पिंजरा' हा डॉ. लागूंचा सर्वोत्कृष्ट सिनेमा. संध्या हे त्यातले सर्वात महत्त्वाचे पात्र. संध्याचे पात्र साकारताना त्यांच्या अत्यंत उत्कट भावमुद्रा साकारणे अमृता खानविलकरला चांगला प्रयत्न करूनही जमलेले नाही.

 

अशा काही लहान मोठ्या त्रुटी सिनेमात असल्या तरीही सिनेमा जरूर पहावा असाच आहे. मराठी सिनेसृष्टी टिकायची आणि वाढायची असेल तर सुबोध भावे सारख्या भूमिकेत प्राण फुकणार्‍या नटाचे असे प्रयोग नक्कीच पाहीलेज पाहीजे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121