माओवाद -नक्षलवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू

    05-Nov-2018
Total Views | 24

‘तरुण भारत’ आयोजित व्याख्यानात कॅप्टन स्मिता गायकवाड यांचे प्रतिपादन

 
अमळनेर, 4 नोव्हेंबर - माओवाद आणि नक्षलवाद या एकाच नाण्याचा दोन बाजू असून नाव वेगळे असले तरी देशात अस्थिरता आणि अशांतता निर्माण करणे हेच त्यांचे ध्येय आहे.
 
त्यामुळे समाजाने विशेषत: तरुणांनी त्यांच्या फसव्या चेहर्‍याला बळी न पडता त्यांचे खरे स्वरूप समजून घेतले पाहिजे. त्यासाठी सजग राहिले पाहिजे असे प्रतिपादन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी रविवारी येथे बोलतांना केले.
 
 
माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित ‘तरुण भारत’तर्फे ‘शहरी नक्षलवाद’ या राज्यस्तरीय दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि त्यांचे ‘नक्षली चळवळी’ विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यान येथील बस स्टॅण्ड मागील जुना टाऊन हॉल येथे झाले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रदीप पाटील होते, तर व्यासपीठावर आणि माधव बहुद्देशीय प्रतिष्ठानचे संचालक दिलीपदादा पाटील होते.
 
 
प्रास्ताविकात दिलीपदादा पाटील यांनी माधव बहुद्देशीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रकाशित होणार्‍या तरुण भारत आणि दिवाळी अंकाबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात तहसीलदार पाटील यांनी देशासमोरील संकटांचा मुकाबला करण्यासाठी तरुणांनी सज्ज झाले पाहिजे आणि आघाडीवर असले पाहिजे असे आवाहन केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आल्यावर दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
 
 
कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानाचा प्रारंभ भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर करून या घटनेतील सत्य शोधून काढण्यासाठीच आम्ही काही व्यक्तींनी सत्यशोधन समिती स्थापन करून त्याद्वारे या घटनेतील सत्यता समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
 
 
त्या म्हणाल्या की, काही व्यक्ती आणि शक्ती समाजात तसेच जाती-जातीत फूट पाडण्याचे कारस्थान करीत असतात. कारण त्यांना देशात शांतता नको असते. त्यामुळे आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्यासाठी त्यांच्या कारवाया सुरू असतात. समाज अशांत झाला की, तो आपल्या संरक्षणाचा विचार सर्वात आधी करतो आणि त्यासाठी प्रसंगी हाती शस्त्रही धरतो.
 
 
नक्षलवाद्यांना हेच अपेक्षित असते. त्यामुळे युवकांनी माथेफिरू समाजकंटकांपासून सावध असावे असा इशारा देतांना अमळनेर येथे झालेल्या रिपब्लिकन पँथरच्या अधिवेशाची आठवणही त्यांनी करून दिली.
 
 
नक्षलवाद्यांचा भारतीय संविधानावर विश्वास नसून त्यांना त्यांचे संविधान देशात आणायचे आहे. असे झाल्यास देशाची एकात्मता आणि स्वातंत्र्यही धोक्यात आल्यावाचून राहणार नाही, हे सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे.
 
 
त्यासाठी विविध सेवाभावी संघटनांच्या नावावर माओवाद आणि नक्षलवाद समाजात रूजवू पाहणार्‍यांच्या चेहर्‍यावरील मुखवटा दूर केल्यास त्यांचे खरू स्वरूप समोर येईल. हे काम युवकांनी करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
 
सूत्रसंचालन शरद चौधरी यांनी केले तर भाग्यश्री जोशी आणि मानसी भावसार यांनी गायिलेल्या वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विविध स्तरातील श्रोते उपस्थित होते.
 
 
कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल, माजी प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी, विद्यापीठातील सिनेट सदस्य दिनेश नाईक, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष निरज अग्रवाल, ‘मसाप’चे अध्यक्ष नरेंद्र निकुंभ, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव पाटील, विकास जोशी, प्रकाश ताडे, राजेंद्र निकुंभ, प्रा. धीरज वैष्णव, प्रा.ज्ञानेश्वर मराठे, धीरज महाजन आदी उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121