मुंबई : भारताला हजारो किलोमीटरची सागरी सीमा लाभली आहे. पण गेल्या कित्येक वर्षांपासून भारताच्या सागरी सुरक्षेकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झाले. सागरी सुरक्षेकडील अनास्था नष्ट करणे, हे आपल्या सर्वांपुढील प्रमुख लक्ष्य आहे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मिर अध्यासन केंद्राचे संचालक अरुण कुमार यांनी केले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या कान्होजी आंग्रे मेरीटाईम रिसर्च इन्स्टिट्यूट आणि भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक आणि मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट आफ सिव्हिक्स अण्ड पालिटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०१८ या कालावधीत दोन दिवसीय इंडियाज कोस्टल सिक्युरिटी – अ वे अहेड या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन शुक्रवारी विद्यापीठाच्या फिरोजशहा मेहता भवन येथे झाले. चर्चासत्राला प्रमुख अतिथी म्हणून अरुण कुमार उपस्थित होते. यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. चर्चासत्राच्या उद्घाटनावेळी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह हेमंत देशपांडे, काम्रीचे संचालक आर. एस. धनकर, प्रमुख वक्ते अलोक बन्सल, कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डा. दिलीप बेलगावकर, डिपार्टमेंट आफ सिव्हिक्स अण्ड पालिटिक्सचे प्रमुख लियाकत अली अयुब खान उपस्थित होते. सोबतच विद्यार्थी आणि प्राध्यापकांचीही उपस्थिती होती.
आपल्या उद्घाटनपर संबोधनात अरुण कुमार म्हणाले की, कान्होजी आंग्रे मेरी टाईम रिसर्च इन्स्टिट्यूट सागरी तटवर्ती सुरक्षा या विषयात सर्वांना एकत्रित घेऊन जाणारी एक निश्चित भूमिका या निमित्ताने तयार केली आहे. भारतीयांनी सागराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नेहमीच केला जातो. पण इतिहासात असे अनेक दाखले आणि पुरावे मिळतात की, ज्यातून भारतीय सागराचा, सागरी मार्गांचा व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात वापर करत होते. युरोपशी भारताचा व्यापार सागरी मार्गानेच होत असे. भारतीय उद्योगांचे जवळपास १९ देशांमध्ये स्वतंत्र कार्यालय समुद्री क्षेत्रातील व्यापारात यादरम्यान राहिलेले आहेत. हा इतिहास गेल्या दीड हजार वर्षाचा आहे. दक्षिण भारतातील राज्यकर्ते, व्यापारी आणि स्थानिकांनी सागरी मार्गाच्या माध्यमातूनच युरोपपासून इजिप्त, आफ्रिका, पूर्व आशिया संपर्क व संबंध स्थापन केले. त्यामुळे भारतीयांनी सागराकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप निराधार ठरतात.
सागरी सुरक्षेबद्दल अरुण कुमार म्हणाले की, सागरी सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची यावरुन नेहमीच बोलले जाते तसेच ही जबाबदारी सरकारची असल्याचेही म्हटले जाते. पण खरे म्हणजे सागरी सुरक्षेची जबाबदारी ही ज्याचा देश आहे, त्या सर्वांचीच असते. त्यामुळे त्यावरुन एकमेकांकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही. दक्षिण पूर्व आशियामध्ये बौद्ध आणि हिंदू संस्कृती क्रमाक्रमाने विकसित होत गेली आहे. सीमावर्ती समाज, राजकीय नेतृत्व, सागरी क्षेत्रातील भागीदार हे महत्वाचे घटक राहिले आहेत. सागरी तटवर्ती सुरक्षेच्या संदर्भात या सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही अरुण कुमार यांनी सांगितले. दरम्यान, चर्चासत्राच्या सुरुवातीला हेमंत देशपांडे, कोमोडोर आर. एस. धनकर, अलोक बन्सल, प्रमोद कुलर्णी, दिलीप बेलगावकर आणि लियाकत अली अयुब खान यांनीही आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅ. विक्रांत कावळे यांनी केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/