जल महात्म्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



परवा पुण्याहून येताना रेल्वेमध्ये एक गृहस्थ सांगत होते, “अ ब क डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा मी सदस्य आहे. त्यांचे डाएट प्लान खूप सुंदर आणि प्रभावी आहे. सकाळी ८.३० आणि रात्री ९ वाजता मी जेवतो...” इत्यादी. मग दुसऱ्या सहप्रवाशाने विचारले, “मधल्या वेळात भूक लागली तर?” त्यावर त्यांचे उत्तर होते, “पाणी पितो.” असा त्यांचा संवाद रंगत होता. पाण्याला पचवायला लागत नाही का? किती पाणी प्यावे? कितीची गरज आहे? अतिजलपान असे काही असते का? इ. गोष्टींचा कधी विचार होतो का? आजच्या लेखातून या मुद्द्यांवर चर्चा करूया...


अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत. अन्नाचे चार प्रकार आयुर्वेदात सांगितले आहेत. ते म्हणजे, पान, आशन, भक्ष्य आणि लेह्य. अन्नाच्या स्वरूपानुसार हे प्रकार आहेत. ‘पान’ म्हणजे पिणे. जे प्यायले जाते, असा सगळा द्रवाहार म्हणजे ‘पान’ होय. यालाच ‘पीत‘ असाही शब्द आहे. ‘आशन’ म्हणजे घन आहार जो चावून खाल्ला जातो. ज्याला तोडावे लागते. तुकडे करावे लागतात. ज्यामध्ये दातांनी तोडून, चावून, लगदा तयार करून खाल्ला जातो, असा आहार ‘आशन’ या वर्गात गणला जातो. यालाच ‘आशित‘ असेही म्हटले जाते. ‘भक्ष्य’ आहार म्हणजे घन आहार. जो मऊ आहे, ज्यात स्निग्धांश आणि ओलावा आहे, खूप चर्वण करण्याची ज्यात गरज नसते, असे सॉफ्ट अन्नपदार्थ ‘भक्ष्य’ या अन्नप्रकारात मोडतात. ‘लेह्य’ म्हणजे चाटून खाणे. जीभेवर ते बोटाने लावले जाते. ज्याचे स्वरूप घन आहारापेक्षा लहान व द्रव आहारापेक्षा घन असे असते. त्याला ‘लेह्य’ किंवा ‘लीढ’ असे म्हणतात. अशा चारही प्रकारच्या अन्नांचा समावेश आहारात होणे अपेक्षित आहे. ज्या अन्नपदार्थांना अधिक चर्वण करावे लागते, ते तोंडातील लाळ त्यांच्यात नीट मिसळून त्यांचा लगदा झाल्याखेरीज गिळू नये. अशाप्रकाराचे घन (solid), लेह्य (semi solid) आणि द्रव (Liquid) या अन्नपदार्थांचा समावेश प्रत्येक आहारात असावा. आयुर्वेदानुसार पोटाचे चार भाग योजावेत, कल्पना करावी. पोटाचे निम्मे म्हणजे दोन भाग घन आहाराने भरावे, पोटाचा एक भाग द्रव आहाराने भरावा. आता उरलेला एक भाग रिकामा ठेवावा. असे असेल तेव्हा पचनासाठी पोकळी राहते आणि आमाशयाचे व्यवस्थित चलनवलन, क्रिया होते. या विवेचनावरून असे लक्षात येईल की, द्रव आहार हादेखील आहाराचा घटक आहे. जसे पोट भरण्यासाठी घन आहाराची गरज असते, त्यानुसारच द्रव आहाराचे फायदे आहेत. द्रव आहार म्हणजे केवळ पाणी नाही, तर ताक, वरण, आमटी, कढी, रस्सम, सांबार, बासुंदी, मठ्ठा इ. सर्व द्रव आहारात येतात. तसेच सूप व ज्युस (फळांचा रस) हेदेखील द्रव आहारांचा भाग आहे. जसे भूक लागणे ही संवेदना आहे. तशीच तहान लागणे हीदेखील संवेदनाच आहे. शरीरात ज्याचे प्रमाण कमी होऊ लागते, शरीराला जी गोष्ट हवीशी वाटू लागते. उदा. थंडीत उष्णता कमी असल्याने उब मिळण्यासाठी शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्वचेवरील रोमरंध्र बंद होतात. घाम कमी येतो आणि शरीरातील उष्णता तापमान रोखले जाते. लहानं मुलंही काही वेळा पाटीवरची पेन्सिल खाताना आढळतात. त्याचा अर्थ असा की, शरीराला कॅल्शियमची गरज आहे. तशाच या भुकेच्या आणि तहानेच्या संवेदना आहेत. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्याच त्यावेळी देणे अपेक्षित आहेत. म्हणजे भूक लागल्यावर पाणी पिणे आणि तहान लागल्यावर खाणे असे विरोधी कार्य करू नये.

 

पाण्याला ‘जीवन’ म्हटले आहे. अन्नाशिवाय थोडे दिवस जगता येते असे परीक्षणांनी लक्षात आले आहे की, साधारणपणे अन्नप्राशनाशिवाय तीन आठवडे जगता येते. पण, निरोगी व्यक्ती १०० तासांच्या वर पाण्याशिवाय जगू शकत नाही. शाळेतूनच आपण सर्व शिकत आलो आहोत की, शरीर हे तीन-चार म्हणजे तीन चतुर्थांश जलीय तत्त्वाने बनलेले आहे. म्हणजे, शरीरातील विविध स्राव, रक्त, लसिका, मूत्र, स्वेद इ. घटक जे द्रव स्वरूपात आहेत, या सगळ्याचे प्रमाण इतके आहे. शरीराची यंत्रणा कायम स्वरूपी सुरू असते. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे चक्र प्रत्येक केशिकेचे सतत, अव्याहतपणे चालू असते. शरीरातील मल भाग तसेच उष्मांक निर्माण होतो, त्याचे शरीरामार्फत बहिर्गमन केले जाते. या सर्व प्रक्रियेमध्ये जलीय तत्त्वाचे प्रमाण कमी होते आणि त्याची गरज भासते, संवेदना निर्माण होतात. तहान लागली म्हणजेच संवेदना उत्पन्न झाली. जर तहान लागूनही पाणी प्यायले नाही, तर तोंडाला आणि घशाला कोरड पडते, तो शोष पडतो. थकल्यासारखे, गळून गेल्यासारखे जाणवते, अंगात साद (कडकपणा) निर्माण होतो. क्वचित प्रसंगी कर्णबधिरता आणि हृत्पीडाही होऊ लागते, (अतिप्रमाणात तहानेची संवेदना थोपवून ठेवल्यास) असे शास्त्रात सांगितले आहे. तसेच खूप वेळ पाणी न प्यायल्याने शरीरातील जलीय तत्त्वाचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशनही घडू शकते. आयुर्वेदाने अशा वेळेस फक्त पाणी प्या, असे केवळ सांगितले नाही, तर शीत गुणांचे, तर्पण करणारे, तृप्ती देणारे असे मन्थ (घुसळून तयार केलेले) व यवागू (पेजेसारखे पाणीदार) इत्यादींचे सेवन करण्यास सांगितले आहे. जलीय द्रव्यामुळे शरीरात ओलावा (उपक्लेद), स्निग्धता (स्नेह), सांध्यांमध्ये बांधून राहण्याची क्षमता (बंध), मृदुता/मुलायमपणा (मार्दव) आणि आल्हाददायीपणा षीशीह षशशश्रळपस (प्रह्लाद) ही कर्म घडतात.

 

असे जीवन असणारे पाणी किती प्यावे? कधी प्यावे? कोणी प्यावे? इ. सर्वाची माहिती शास्त्रात आहे. बरेचदा सकाळी पाणी पिणे हे आरोग्यासाठी उत्तम आहे, असे ऐकले जाते आणि त्यामुळे ते आचरलेही जाते. पण, आयुर्वेदातब्राह्म मुहूर्तावर (म्हणजे सूर्योदयापूर्वी एक-दीड तास) उठून जलपान केल्यास ते आरोग्यदयायी आहे, असे सांगितले आहे. मग अशी विचारणा होते, पाणी पिऊन परत झोपले तर चालेल ना? इ. तर शास्त्रात उठल्यावर सर्व प्रथम शौचशुद्धी व मुखशुद्घी सांगितली आहे. ती झाल्यावर अभ्यंगस्नान, व्यायाम इ. दिनचर्या आचरावी असे लिहिले आहे. पाणी पिऊन पुन्हा झोपा असे कुठेही लिहिले नाही. असे ब्राह्म मुहूर्तावर प्यायलेले पाणी शरीरासाठी अमृतासमान आहे. पण, सूर्योदयानंतर प्यायलेले पाणी आम्लपित्त करणारे, तसे कफ वाढविणारे ठरते. अशाच पद्धतीने प्रत्येक प्रकृतीनुसार, पाण्याची गरज बदलते. ऋतूला अनुरूप हे पाण्याचे प्रमाण बदलावे लागते. काही लोकांच्या मते, दिवसांतून आठ ग्लास पाणी प्यावे. हा नियम असला तरी वय, ऋतू, प्रकृति आणि आरोग्यस्थितीच्या अनुरूप याचे प्रमाण बदलते. उदा. किडनीच्या त्रासांनी ग्रस्त रुग्णांना पाण्याचे प्रमाण आटोक्यात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच अंगाला सूज, पोटात पाणी (ascites)दमा इ.मध्येही अतिजलपान वर्ज्य आहे. म्हणजे ‘अति सर्वत्र वर्ज्येत।’

 

शरीरातील पचनसंस्था ही आपल्या पाचकाग्निवर निर्भर आहे. वारंवार पाणी प्यायल्याने हा अग्निस्वरूप पाचकस्रावही मंदावतो. (Gastric juices dilute होतात) पचनसंस्था नाजूक झाली, बिघडली की, संपूर्ण यंत्रणा अस्ताव्यस्त होते. काही परीक्षणांमधून आता असेही सिद्ध झाले की, अतिपाण्यामुळे (पाणी पिण्यामुळे) थकवा, मळमळ, उलटी, गांगरणे, डोकेदु:खी इ. लक्षणे उत्पन्न होतात. तसेच शरीरातील सोडियमचे प्रमाण रक्तात विरघळते. क्वचित प्रसंगी हे घातक ठरू शकते. जशी सृष्टी जलप्रलयाने उद्ध्वस्त होते, तसेच काहीसे शरीरातही घडू शकते. कारण, पाणीसुद्धा पचनशक्तीला पचवावेच लागते आणि वृक्कांवरही अति ताण पडतो. यावर उपाय म्हणजे, जेवतानाही थोडे पाणी प्यावे. खूप तहान लागल्यावर पाणी पिते वेळी तोंड लावून पाणी प्यावे. (कारण, शोष हा मुखाचा आणि गळ्याचा होतो. तिथे तर्पण होणे अधिक महत्त्वाचे) तसेच बाहेरून आल्यावर लगेच पाणी न पिता थोडा गुळाचा खडा चोखावा आणि नंतर थोडे थोडे पाणी प्यावे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@