शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच

    16-Nov-2018
Total Views |
जळगाव, 15 नोव्हेंबर
जळगाव शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे. वाहतूक कोंडीमुळे जागोजागी काही किरकोळ अपघात होण्याचे प्रकार वाढत असल्याने यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
 
काही ठळक ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत असल्याने याठिकाणी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
फुले मार्केट परिसर, गोलाणी मार्केट परिसर, बेंडाळे महाविद्यालय चौक, नेहरू चौक, सुभाष चौक याठिकाणी हे प्रकार सर्वाधिक पाहायला मिळत असल्याने पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
लहान आणि मोठी वाहने ही अडथळा निर्माण करत असल्याने किरकोळ वादाचे प्रकार होत आहेत. यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
रोडरोमिओंचा त्रास
 
काही रोडरोमिओ हे या चौकांतून धूम स्टाईल वाहने चालवून हीरोपंती करत असल्याचे तरुण भारतच्या निदर्शनास आले आहे. मात्र, तरी पोलीस प्रशासन हातावर हात ठेवून बघत असल्याचे दिसून येते. जेव्हा कोणी व्यक्ती तक्रार घेऊन येते, तेव्हाच त्यावर ठोस पावले उचलली जातात. सुटी संपल्यावर आता महाविद्यालय परिसर गजबजू लागल्याने उपाययोजन होणे गरजेचे बनले आहे.