सावरकर आवेदनात स्वत:सह अंदमानातीलच नव्हे, तर भारतातील राजबंदिवानांना व परदेशात अडकून पडलेल्या सर्वांना राजक्षमेचा लाभ मिळावा, अशी सामूहिक मागणी ब्रिटिशांकडे करत होते. ‘फक्त मलाच सोडा किंवा निदान मला तरी सोडा,’ अशी स्वार्थी मागणी त्यांची नव्हती. त्यासंबंधी सावरकरांच्या तसेच इतर लेखकांच्या ग्रंथातील संदर्भांचा घेतलेला हा आजच्या दुसऱ्या भागातील आढावा...
पहिले महायुद्ध १९१४ साली सुरू झाल्यावर सावरकरांनी हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडले. ते पत्र मुळातूनच वाचावे. मी त्याचा मुख्य आशय उद्धृत करतो- हिंदुस्थानाला औपनिवेशक स्वायत्तता (Colonial-Self Government) द्यावी. वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधीचे निरपवाद बहुमत व त्याबदल्यात क्रांतिकारक इंग्लंडला महायुद्धात साहाय्य देतील अशा मागण्या केल्या होत्या व युरोपात बहुतेक राष्ट्रे आपआपली अंतर्गत राजबंदी सोडून देत होती, आयरिश राजद्रोही बंदीही सुटली होती, अशी उदाहरणेही दिली होती. तसेच ”सरकारने मला न सोडता अंदमानातल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अडकून पडलेल्या राजबंदिवानांस तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल.” (माझी जन्मठेप, पृष्ठ २१९-२२०) अशी नि:स्वार्थी मागणीही केली होती. म्हणजे, सावरकरांची आवेदनपत्रे, मागण्या क्रांतिकारकांच्यावतीने व सर्व क्रांतिकारकांच्यासाठी होत्या, केवळ स्वत:करिता नव्हत्या. ‘अंदमानच्या अंधेरीतून’ या ग्रंथात आपला लहान भाऊ म्हणजे डॉ. नारायणराव सावरकरांना दि. ६ सप्टेंबर, १९२०ला पाठवलेल्या पत्रात उल्लेख आहे की, २ एप्रिल, १९२०ला सावरकरांनी अर्ज केला. त्यात ब्रिटिशांकडे मागणी केली की, अद्यापही बंधनात असलेल्या आणि त्याप्रमाणेच राजकीय कारणासाठी परदेशात अडकून पडलेल्या अशा सर्वांना लाभ मिळेल, अशा रीतीने या क्षमादानाची मर्यादा वाढवली पाहिजे, अशी विनंती मी केली आहे. याच पत्रात सावरकर सांगतात, ”जरी आम्ही दोघे या क्षमादानाच्या कक्षेच्या बाहेर पडतो, असे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आम्हाला या कोठडीत खितपत पडावे लागत आहे तरी; आपल्या सांगाती कष्ट सोशीत असलेल्या आणि राजकारणात आपल्याशी सहकार्य केलेल्या शेकडो देशभक्तांच्या मुक्ततेच्या दिसणाऱ्या दृश्याने आमचे कष्ट हलके झालेले आम्हाला वाटतात आणि त्यामुळे गेली आठ वर्षे इथे आणि इतरत्र संप, पत्रे, अर्ज यांच्याद्वारे वर्तमानपत्रातून किंवा व्यासपीठावरून जी चळवळ आम्ही केली, तिचे आम्हाला फळ मिळाल्याचे समाधान वाटते.” दि. ४ ऑगस्ट, १९१८ च्या पत्रात सावरकर म्हणतात, ”अर्ज पाठविण्यात सर्व राजकीय बंद्यांची निरपवाद बंधमुक्तता हा माझा उद्देश आणि साध्य असल्यामुळे ते साधण्याच्या मार्गात माझे वैयक्तिक उदाहरण काट्यासारखे आड येत असेल, तर एकटे माझे नाव या बंधमुक्ततेतून वगळावयाला माझी अत्यंत संतोषाने संमती आहे.” बरं ही नि:स्वार्थी मागणी करताना सावरकरांची प्रकृती ढासळलेली होती. त्यांचे वजन मार्च १९१७ मध्ये ११९ पौंड होते. ते ऑगस्ट १९१८ मध्ये ९८ पौंड इतके कमी झाले होते. ‘’ऐवढेसे पत्र लिहिताना शरीराला त्रासाची जाणीव होते आहे.
अलिपूर बॉम्ब खटल्यातील आरोपी हेमचंद्र दास आणि बारिंद्र कुमार घोष हे १९०८ साली अंदमानात आले व सन १९२० मध्ये ब्रिटिशांनी त्यांना क्षमा करून सोडून दिले. लाहोर कटातील आरोपी सचिंद्रनाथ सन्याल यांनी सावरकरांप्रमाणेच ”आम्हाला उघड उघड राष्ट्रहितैषी चळवळ करायला मोकळीक दिली, तर आम्ही गुप्त क्रांतिकारक चळवळीचा मार्ग काय म्हणून स्वीकारू?” असे सरकारला आवेदन केले होते. ‘बंदिजीवन’ हे त्यांचे आत्मचरित्र. त्यांची सुटका झाली, पण सावरकरांची नाही. सुरेंद्रनाथांचे जावई विजयचंद्र चटर्जी हे बॅरिस्टर होते व विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचे मित्रही होते. सचिंद्रनाथ विजयचंद्र यांना भेटायला गेले तेव्हा म्हणाले, ”विनायक दामोदर सावरकरने भी तो अपनी चिठ्ठी मे ऐसीही भावना प्रकट की थी, जैसेकी मैने की है। तो फिर सावरकर को क्यों नही छोडा गया और मुझको क्यों छोडा गया? यदि आपकी बात सत्य होती, तो सावरकरको भी छोडना चाहीए था।” (जोशी वि. श्री., क्रांतिकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, १९८५, पृष्ठ ५३३) यावरून सरकारच्या मनात सावरकरांविषयी किती अविश्वास होता ते दिसते. अंदमानातून आपल्यासह राजबंदिवानांची सुटका व्हावी, यासाठी सावरकरांनी दोन प्रकारे प्रयत्न केले. एक मार्ग म्हणजे स्वत:सह राजबंदिवानांच्या मुक्ततेसाठी ब्रिटिशांना आवेदने धाडण्याचा. त्यासोबत भारतात ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्यासाठी सावरकरांसह राजकीय बंदिवानांच्या मुक्ततेसाठी ठिकठिकाणी प्रांतिक परिषदा आयोजित करून सहस्रावधी स्वाक्षर्यांची आवेदने सरकारला धाडणे. यात सावरकरांचे धाकटे बंधू नारायणरावांचा सिंहाचा वाटा होता. सावरकरांनी बंधू नारायणरावांना पाठवलेल्या पत्रात या सुटकेसाठीची ‘स्वाक्षरी मोहीम’ काढण्यास सांगितले होते, तर दुसरा मार्ग म्हणजे त्यांच्या क्रांतिकारक मित्रांनी त्यांची मुक्तता करण्यासाठी जर्मनीचे साहाय्य घेतले होते. परिणामी, जर्मनीची ’एम्डेन’ युद्धनौका अंदमानच्या आसपास फेऱ्या मारू लागली. अंदमानात सावरकरांना भेटून गेलेल्या सर रेजिनाल्ड क्रॅडॉकच्या नोंदीतही याचे सुतोवाच जाणवतात. भारतातून परत जाताना ’महाराजा’ बोटीवर २३ नोव्हेंबर, १९१३ ला सावरकरांच्या आवेदनावर क्रॅडॉकनी प्रतिवृत्त लिहिले. त्यात ते म्हणतात, ”सावरकरांचे हे एक दयेचे आवेदन आहे. त्यांना इथे काही स्वातंत्र्य देणे अगदी अशक्य आहे. मला असेही वाटते की, ते हिंदुस्थानातील कोणत्याही कारावासातून निसटून जातील... ते असे महत्त्वाचे पुढारी आहेत की, हिंदी अराजकवाद्यांचा युरोपियन विभाग त्यांच्या सुटकेसाठी कट करील नि तो कट त्वरेने रचला जाईल. त्यांना अंदमानातही सेल्युलर जेलच्या बाहेर जाऊ देण्यात आले, तर ते निसटून जातील, हे अगदी निश्चित आहे. त्यांचे मित्र याच बेटावर दबा धरून बसण्यासाठी एखादी बाष्पनौका सहज भाड्याने मिळवू शकतील आणि स्थानिक लोकांमध्ये थोडेसे पैसे वाटले की, बाकीचे कार्य पार पडेल.”
(जोशी वि. श्री., क्रांतिकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, १९८५, पृष्ठ ५१३-५१४)
(क्रमश:)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/