आतापर्यंत वैयक्तिक अपघात विम्यासाठी दुचाकीधारकाला १ लाख रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षणासाठी ५० रुपये प्रीमियम भरावा लागत होता, तर खाजगी चारचाकी किंवा व्यवसायासाठी वापरली जाणारी चारचाकी यांना २ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा संरक्षणासाठी १०० रुपये प्रीमियम आकारला जात होता. आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी १५ लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण सक्तीचे करण्यात आले असून, यासाठी ७५० रुपये प्रीमियम अधिक कर आकारले जाणार आहेत.
वाहन विम्यासाठी विमाधारकाला आता किमान ६०० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. वाहन विमा घेताना वैयक्तिक अपघात विम्याचे संरक्षण घेणे सक्तीचे करण्यात आले असून, विमा संरक्षणाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणार्या ‘दि इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया’ (आयआरडीएआय) नुकतेच विमा कंपन्यांना पत्रक काढून सूचना दिल्या आहेत की, यापुढे वाहन विमा उतरविताना वैयक्तिक अपघात विमा १५ लाख रुपयांचा सक्तीने उतरविलाच पाहिजे. यापूर्वी ही मर्यादा दुचाकी वाहनांसाठी एक लाख रुपये व चारचाकी वाहनांसाठी २ लाख रुपये इतकी होती. मद्रास उच्च न्यायालयाने आयआरडीएआयला ही सूचना केली होती. आयआरडीएआयने सर्व विमा कंपन्यांना हा नवा बदल २९ ऑक्टोबर २०१८ पर्यंत अमलात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहन विम्याचे दोन भाग असतात. एक ’थर्ड-पार्टी लायाबिलिटी कव्हर.’ यात रस्त्यावरून चालणार्या किंवा त्रयस्थ व्यक्तीला वाहनामुळे अपघात झाला तर त्यांना किंवा जर अपघातात त्रयस्थ व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर त्याच्या कायदेशीर वारसाला विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळते. प्रत्येक वाहनधारकाकडे हे विमासंरक्षण असणे सक्तीचे आहे. दुसरा भाग म्हणजे ‘ओन डॅमेज कव्हर.’ यात वाहनाला अपघात झाला, वाहनाची चोरी झाली वगैरेसाठी नुकसानभरपाई मिळू शकते. थर्ड पार्टी विम्यासाठीचा प्रीमियमचा दर आयआरडीएआय दरवर्षी ठरविते, तर ‘ओज डॅमेज कव्हर’ विम्याच्या पॉलिसीचा प्रीमियम दर प्रत्येक विमा कंपनी स्वतः ठरविते. इंडिया मोटर टेरिफ कायदा, २००२ नुसार सक्तीच्या वैयक्तिक अपघात विम्याचे संरक्षण हे वाहन विम्याच्या संरक्षणाचा अंतर्गत भाग आहे. हे संरक्षण वाहनाच्या मालकाला तो स्वतः वाहन चालवित असताना अपघात झाला व त्याच्याकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना हवा, असा इंडिया मोटर टेरिफ या यंत्रणेचा नियम आहे.
आतापर्यंत वैयक्तिक अपघात विम्यासाठी दुचाकीधारकाला १ लाख रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षणासाठी ५० रुपये प्रीमियम भरावा लागत होता, तर खाजगी चारचाकी किंवा व्यवसायासाठी वापरली जाणारी चारचाकी यांना २ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा संरक्षणासाठी १०० रुपये प्रीमियम आकारला जात होता. आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी १५ लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण सक्तीचे करण्यात आले असून, यासाठी ७५० रुपये प्रीमियम अधिक कर आकारले जाणार आहेत. एखाद्या वाहनधारकाला १५ लाख रुपयांहून अधिक रकमेचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण हवे असेल, तर त्याला ते मिळण्याचीही तरतूद आहे. त्यासाठीचा जास्त प्रीमियम त्याला भरावा लागेल. वैयक्तिक विमा अपघातात वाहनचालकाचा/वाहनधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला कायमचे अपंगत्व आल्यास विमा संरक्षण मिळते. नुकसानभरपाई आर्थिक स्वरूपात मिळते. मृत्यू झाल्यास १५ लाख रुपये आर्थिक नुकसानभरपाई मिळणार. अपघातात दोन्ही डोळे निकामी झाल्यास किंवा दोन्ही हात, दोन्ही पाय निकामी झाल्यास १०० टक्के नुकसानभरपाई मिळते. एकच हात, एकच पाय किंवा एकच डोळा निकामी झाला असेल तर विमा संरक्षण असलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळू शकते. ज्याचे नाव वाहन चालविणारा म्हणून पॉलिसीत नमूद असेल, त्यालाच हे विमा संरक्षण मिळणार. वाहन कंपनीच्या मालकीचे असेल तर हे विमा संरक्षण मिळत नाही. वाहनाची मालकी वैयक्तिक हवी. कंपन्यांच्या वाहनांना वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाचा प्रीमियम इंडिया मोटर टेरिफच्या नियमानुसार आकारता येत नाही. एका व्यक्तीच्या बर्याच चारचाकी असतील तर त्याला यापैकी एका चारचाकीसाठीच हे विमा संरक्षण मिळेल. ते कोणत्या चारचाकीसाठी घ्यायचे, हे वाहनधारक ठरवू शकतो. पण ज्या चारचाकीसाठी संरक्षण घेतले आहे, ती गाडी न चालविता, दुसरी गाडी चालविताना अपघात झाला, तरी तो हे विमा संरक्षण मिळण्यास पात्र आहे. दुसरी गाडी घेताना त्याने पहिल्या गाडीसाठी वैयक्तिक अपघात विमा संरक्षण घेतले आहे, याचा पुरावा विमा कंपनीला सादर करावा लागतो. १ सप्टेंबरपासून नवीन खाजगी वाहनांसाठी आर्थिक वर्षाचा थर्ड पार्टी विमा सक्तीचा करण्यात आला आहे. आता नव्या दुचाकींना थर्ड पार्टी विमा पाच वर्षांचा व खाजगी ‘कार’ना तीन वर्षांचा सक्तीचा करण्यात आला आहे. विमा कंपन्या आता दुचाकींचा पाच वर्षांचा व चारचाकीचा तीन वर्षांच्या विम्याच्या ‘प्रीमियम’ची रक्कम सुरुवातीलाच वसूल करतात.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/