‘घर पाहावं बांधून’ अशी मराठीत एक म्हण आहे. एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस फ्लॅट घेतो. त्याचे मासिक हफ्ते भरण्यातच त्याची जमापुंजी संपते. तो घर कसा सजवणार? आपलं घर स्वप्नातलं असावं, प्रत्येक पाहुण्याला त्याचं अप्रूप वाटावं, मात्र त्याचवेळी ते आपल्या आवाक्यातदेखील असावं. या सगळ्या स्वप्नांना साकार करणारं एकच नाव म्हणजे सुनील देशपांडे.
“नवीन घर घेईपर्यंत हे घर मला कधी जुनं वाटलंच नाही. याचं नावीन्य शेवटपर्यंत टिकून राहिलं. हे सारं श्रेय सुनील तुझ्या कल्पकतेला बरं का?” सुपरस्टार अभिनेता भरत जाधवांचं हे वाक्य सुनील देशपांडेसाठी कोणत्याही अॅवॉर्डपेक्षा खूप मोठ्ठं होतं. कारण, ते वाक्य होतं एका समाधानी असलेल्या ग्राहकाचं. अशा शेकडो ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातलं घरं मिळवून देण्याचं काम गेल्या दोन दशकांहून अधिक वर्षे ते करत आहेत. एका पोलिसाचा इंजिनिअर मुलगा ते काही कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक हा सुनील देशपांडेचा प्रवास खऱ्या अर्थाने कल्पक असाच आहे. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस वसाहत. या पोलीस वसाहतीत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर देशपांडे पत्नी, २ मुले आणि ३ मुलींसह राहात होते. एक शिस्तप्रिय वडील. त्यामुळे मुलांमध्ये त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती असायची. आई शैलजा मात्र मायाळू, पण मुलांकडून चूक झाली तर वेळीच कान उपटणारी. त्यामुळेच या देशपांडे भावंडांवर चांगले संस्कार झाले. आपले वडील पोलीस अधिकारी आहेत, याचा गैरफायदा घेणं दूरच, पण त्याचा अभिनिवेशदेखील त्यांच्यामध्ये नव्हता. कारण प्रभाकर देशपांडे स्वत: कधीच पोलीस अधिकारी असल्याच्या आविर्भावात वावरले नाही. अशा या संस्कारी वातावरणात सुनीलचं बालपण गेलं. दहावीला उत्तम गुणांनी तो उत्तीर्ण झाला. आर्किटेक्ट व्हायचं त्याचं स्वप्न होतं. मात्र, त्याला सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी प्रवेश मिळाला. पदरी पडलं अन् पवित्र झालं, असं काहीसं मानण्याचा तो काळ होता. त्यामुळे डिप्लोमाला प्रवेश मिळालाय तर तोच पूर्ण कर, असं घरच्यांनी सांगितलं. सुनीलने घरातल्यांचा आदेश शिरसावंद्य मानला.
सिव्हिलचा डिप्लोमा सुरू असताना सुनीलच्या आतील कलाकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. काहीतरी क्रिएटिव्ह करायचं, निव्वळ इंजिनिअरिंग करायचं नाही. आर्किटेक्ट होता आलं नाही, पण आपली कला वाया जाऊ द्यायची नाही, या विचाराने त्याने रहेजामधून इंटिरिअर डिझायनिंगच्या डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. ज्या दिवशी सिव्हिल इंजिनिअरिंगची परीक्षा झाली, त्याच दिवशी सुनील आणि त्याचे काही मित्र वेगवेगळ्या बिल्डर्सकडे नोकरी मागायला गेले. सुदैवाने त्यांना नोकऱ्यासुद्धा मिळाल्या. अवघ्या अठराव्या वर्षी सुनील नोकरी करू लागला. काही दिवसांनी त्याला एका मोठ्या कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली. मात्र, तिथे तो इंटिरिअर डिझायनरचे काम करायचा. सुनीलची कल्पकता, डिझाईन्स पाहून तेथील मालक बेहद्द खुश होते. चार वर्ष तिथे नोकरी केल्यानंतर स्वत:चं काहीतरी सुरू करावं, या उद्देशाने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ‘कल्पक आर्ट’ नावाने स्वत:ची इंटिरिअर डिझायनिंग फर्म सुरू केली. १९९६ साली ‘कल्पक आर्ट’ सुरू झालं खरं, पण हातात अगोदरच्या नोकरीच्या एक चतुर्थांश पगाराइतका पैसाही मिळत नव्हता. सुनीलने मात्र आशा सोडली नाही. तो स्वतःच्या निर्णयाशी ठाम चिकटून राहिला. २००० नंतर कामं मिळण्यास सुरुवात झाली. २००६ मध्ये मराठी चित्रपटांचा सुपरस्टार भरत जाधव यांच्या घराचे, व्हॅनिटी व्हॅन आणि ऑफिसचे इंटिरिअर डिझायनिंग देशपांडे यांनी केले. त्यानंतर २००९ मध्ये सयाजी शिंदे या गुणी अभिनेत्याच्या घराचे इंटिरिअर केले. कॉर्पोरेटमध्ये एअर फ्रान्सचे कार्यालय, एशियन पेण्ट्सचे कार्यालय, कोनिकाच्या भारतातील २६ लॅब्ज त्यांनी डिझाईन केल्या. ठाणे-मुंबईतल्या जवळपास १९ डेंटिस्टचे दवाखाने त्यांनी सजविले. त्यामुळे काही काळ ते डेंटिस्ट स्पेशालिस्ट इंटिरिअर डिझायनर म्हणून ओळखले जात. १३ कर्मचारी आणि काही कोटींची उलाढाल अशी दमदार वाटचाल सुरू होती. मात्र, कुठेतरी एका बिंदूपाशी आपण थबकलोय, असे त्यांना जाणवत होते. त्यांच्यासारखीच जाणीव त्यांच्या काही इतर उद्योजक मित्रांनादेखील होती. त्यांच्या या जाणिवेतूनच एक नवीन कंपनी उदयास आली. ‘मेराकी एन्टॉस इन्फ्रा एलएलपी.’ ‘मेराकी’ म्हणजे ग्रीक भाषेत चार लोकांनी एकत्र येऊन आपल्या कौशल्याचा वापर करून केलेलं काम. सुनील देशपांडे यांच्यासह ‘क्लासिक बिझनेस कॉर्पोरेशन’चे गिरीश मळगांवकर, ‘टेक्नोक्रॅट’चे जितेंद्र सकपाळ आणि ‘डिलायटो’चे मिलिंद साठे हे ‘मेराकी’मध्ये भागीदार आहेत.
सुनील देशपांडेंचे मित्र मिलिंद पाटील हे व्यवसायाने इंजिनिअर असून ‘डेन्टफॅब’ कंपनीचे संचालक आहेत. दोघेही कलेचे भोक्ते. देशपांडे यांनी स्वत: काही प्रायोगिक नाटके लिहिलेली आहेत. तसेच ते मित्रांसोबत गाण्याचे कार्यक्रमदेखील सादर करतात. आपल्या काळात कलेला प्राधान्य देणारी केंद्रे नव्हती. कलेपेक्षा अभ्यासाला जास्त महत्त्व असल्याने कलेला मारलं जायचं, ही खंत सुनील आणि मिलिंद या दोघांनाही आहे. भावी पिढीने मात्र आपल्यातील कलेला न मारता तिला वाव द्यावा यासाठी ‘कलेची प्रयोगशाळा’ सुरू करण्याचा दोघांचा मानस आहे. कोणताही मुलगा वा मुलगी या प्रयोगशाळेत येऊन त्यांच्या आवडीची कला सादर करू शकतात, अशी ही थोडक्यात कल्पना आहे. मात्र, यासाठी जागेचा महत्त्वाचा प्रश्न असून मुंबई वा ठाणे महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास किंवा महानगरपालिकेच्या शाळेतील एखादा वर्ग जरी दिल्यास आपण उत्तमप्रकारे ही कल्पना प्रत्यक्षात आणू शकतो, असे या दोन्ही मित्रांना वाटते. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेला यासंबंधी विचार करण्याची विनंती ते करतात. याद्वारे सौंदर्यदृष्टी जोपासणारा समाज घडविण्याचा त्यांचा मानस आहे. ‘घर पाहावं बांधून’ अशी मराठीत एक म्हण आहे. एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस फ्लॅट घेतो. त्याचे मासिक हफ्ते भरण्यातच त्याची जमापुंजी संपते. तो घर कसा सजवणार? आपलं घर स्वप्नातलं असावं, प्रत्येक पाहुण्याला त्याचं अप्रूप वाटावं, मात्र त्याचवेळी ते आपल्या आवाक्यातदेखील असावं. या सगळ्या स्वप्नांना साकार करणारं एकच नाव म्हणजे सुनील देशपांडे. म्हणूनच त्यांचं बोधवाक्य आहे, ‘आम्ही करतो तुमचं स्वप्न साकार, तुमच्या घराला देऊनिया योग्य तो आकार.’
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/